कथा ही दुधाची (भाग-4)


पर्यावरण आणि विज्ञान : (जुलै २०१७ च्या अंकापासून आपण पर्यावरण आणि विज्ञान या नावाची एक मालिका सुरु केली आहे. पुण्यातील नॅशनल केमिकल लेबॉरेटरी या संस्थेतील निवृत्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मोघे हे या मालिकेचे लेखक आहेत. भारतीय संस्कृतीचे वैशिष्ठ्य असलेल्या कित्येक गोष्टी आपण टाकाऊ म्हणून नाक मुरडून बाजूला सारतो. पण त्यांचेमागे असलेले वैज्ञानिक सत्य मात्र आपल्याला माहित नसते. अशा काही पर्यावरण पूरक सत्यांचा आपण या मालिकेत शोध घेणार आहोत.)

त्याच बरोबर २१ कंपन्यांच्या दुधातही मोलामाईन घातक प्रमाणात आढळले की ज्यामुळे चीनभर दोन - तीन महिन्यात अशा दुग्धसेवनाने ३ लाख बालके मूत्रविकार, मुतखड्याची बळी ठरली. जवळ जवळ ५१ हजार बालकांना हॉस्पिटलची खास मदत घ्यावी लागली. ११ मुले मृत्युमुखी पडली.

१५ सप्टेंबर २००८ साली सानलू कंपनीला ह्या कृत्याबद्दल आपल्या देशाची जाहीर माफी मागावी लागली. ९००० टन दुग्धजन्य पदार्थ सर्व जगातून परत मागवावे लागले, दूध साठे नष्ट करावे लागले. चीनच्या वर्तमानपत्रांकडून, चित्रवाणी माध्यमाकडून ह्या घटनेला कमी प्रसिध्दी मिळावी म्हणून कंपनीमार्फत प्रयत्न झाले. कंपनीने आपल्या जनरल मॅनेजरला प्रथम जबाबदार धरून त्याला काढून टाकले, त्या व्यक्तीला चीनच्या कम्युनिस्ट पार्टीतूनही निलंबित करण्यात आले.

ज्या शिजीयन हुआंग प्रांतात ही फॅक्टरी होती, त्या प्रांताच्या सरकारला बेजबाबदारीसाठी जबाबदार धरण्यात आले. तेथील प्रांताच्या महापौर, उपमहापौर ह्या दोघांना आपापल्या पदांचे राजीनामे द्यावे लागले.

कंपनीला दूध पुरवठा करणार्‍या डेअरींना, दूध पावडर निर्माण करणार्‍या अशा ४ अधिकार्‍यांवर खटले भरण्यात आले, शिवाय प्रोटीन दूध पावडर निर्माण करणार्‍या भेसळ वीरावरही खटले दाखल झाले. सानलू कंपनीच्या जनरल मॅनेजर टियान बेनहुआ हिला जन्मठेप, दोन अधिकार्‍यांना १५ वर्षे ते ८ वर्षे तुरूंगवास, आणि मॅनेजरला ५ वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. भेसळवीर झांग युजून व गेंग जिनपिंग ह्यांना मृत्युदंड देण्यात आला. फार महत्वाचे म्हणजे हा खटला फक्त दोन महिन्यांत चीनने निकालात काढला.

सानलू कंपनीवरती जवळ जवळ ७०० लाख चायनीज येनचे खटले भरले गेले. त्यामुळे कंपनीला टाळे लावावे लागले व दिवाळखोरी जाहीर करावी लागली.

पुढे मेनगुनियू, यीली व ब्राईट डेअरी कंपनीतील दुधात मेलामाईन आढळून आले. त्यामुळे जागतिक बाजारात ह्या कंपन्यांची प्रत उतरली. त्यांच्या दूध पुरवठ्यावर परिणाम झाला. चिनी सरकारने त्यांचा ब्रँडही परत मागे घेतला. कंपन्यांचे शेअर्स कोसळले.

चिनी दुग्धव्यावसायिक शेतकर्‍यांच्यावर तर आसमानी संकट कोसळले. त्यांच्या दुधाला भेसळीच्या भीतीने गिर्‍हाईकच मिळेना. २ लाख दुग्ध व्यावसायिकांवर दूध खपेना म्हणून ते जमिनीवर फेकून देण्याची वेळ आली. पर्यायाने त्यांना आपली गुरे - ढोरे विकावी लागली. सर्वात वाईट म्हणजे चिनी लोकांचा आपल्याच दूधपुरवठा करणार्‍या डेअरीज, दुग्धपदार्थ बनवणार्‍या कंपन्या ह्यांच्यावरचा विश्‍वास उडाला. तो इतका की चिनी माता सर्रास परदेशी दूध पावडर आज २०१३ साली आयात करून मुलांना देत आहेत. केवढी ही दारूण चीनची परिस्थिती ! फक्त सुपीक डोक्याच्या एका चिनी माणसाच्या विपरित बुध्दीमुळे हे सारे घडले.

दूधभेसळीमुळे चीनवर ओढवलेली संकट मालिका :


दोन चिनी माणसांच्या लोभी प्रवृत्तीने चीनसारख्या प्रगतीशील, बलाढ्य देशाची मान, शान, पत स्वत:च्याच देशात झुकली पण त्यांचे परिणाम अनेक देशांनाही भोगावे लागले.

ह्या भेसळीचा पहिला फटका मंगोलिया प्रांतातील मेनजिनाऊ व यीली ह्या चीनच्या प्रतिष्ठित दूध गोळा करणार्‍या डेअरींना बसला. त्या चीनच्या दूध पुरवठ्यातील १/४ देशाचा भाग उचलीत.

ह्या डेअरीज अत्यंत छान व्यवस्थापनाचे जाळे विणून ९० टक्के दूध छोट्या छोट्या गोठ्यातून गोळा करीत. तेथे असे आढळून आले की बर्‍याच शेतकर्‍यांचे निकृष्ट दूध मधले दलाल स्वस्तात घेवून स्वीकारीत व दुधाचे प्रोटीन मूल्य अशा ठिकाणी वाढवले जाई.

सुदैवाने २००५ पासून भेसळ मोठ्या प्रमाणावर आढळून आली नाही, म्हणून प्रकरण चव्हाट्यावर आले नाही.

परंतु २००८ साली उद्रेक झाल्यावर चिनी सरकारने त्यांना दिलेले खास प्रतिष्ठापदक मागे घेतले व त्या दोन्ही डेअरीजच्या दुग्ध पुरवठा मागण्या ५० टक्क्यांनी कमी झाल्या, शिवाय ह्या डेअरीची पावडर जेथे जेथे परदेशी वापरली गेली तो माल देखील त्यांना परत मागवावा लागला. कंपनीचे शेअर्स गडगडले. अनेक छोट्या दुग्ध उत्पादकांचे धंदे बसले. दुधाला गिर्‍हाईक नसल्याने दूध रस्त्यावर फेकण्याची वेळ अनेक शेतकर्‍यांवर आली. अंती त्यांना आपली गुरे विकावी लागली.

१. जागतिक स्तरावर डॅनिश, स्विडिश व वरील डेअरी चिनी मेनजिनाऊ ह्यांच्या अरला ह्या प्रसिध्द खाद्यपदार्थ कंपनीला ह्या मेलामाईन मुळे त्यांचा संपूर्ण माल जगातून परत मागवावा लागला.

२. टोकियोतील लोट्टे ही प्रसिध्द खाद्यपदार्थ बनवणारी कंपनी हाँगकाँग व मकाऊ येथून खास कोअलाज मार्च कुकीज ही चिनी दूध पावडर वापरून मोठ्या प्रमाणावर पदार्थ करून घेत होती. ह्या भेसळ प्रकाराने त्यांनाही आपले उत्पादन मागे घेवून उत्पादनाला टाळे लावावे लागले.

३. चीनमध्ये ब्रिटीश कॅडबरीच्या ११ तर्‍हेचे चॉकलेट बनवण्याच्या फॅक्टरीज आहेत. त्या कॅडबरीच्या ह्या प्रसिध्द कंपनीला आपला पूर्ण उत्पादित माल ह्या चिनी दूध भेसळीने २००८ साली परत मागवावा लागला. शिवाय ३ फॅक्टर्‍यांना उत्पादन थांबवून टाळे लावावे लागले.

४. तैवान, हाँकाँग, जपान, कोरिया, ऑस्ट्रेलिया येथे कॅडबरीच्या सुप्रसिध्द डेअरीमिल्क मेलामाईन भेसळ आढळून आली जी चीनमधून आयात झाली होती. तेथे तोही माल कंपनीला परत घ्यावा लागला.

५. युनिलिव्हरच्या लिप्टन मिल्क चहा पावडर ह्यांच्या उत्पदनात चिनी दूध पावडर वापरल्याने मेलामाईनचे अंश आढळले. परिणामी खपावर परिणाम झाला.

६. हेइंज ही सुप्रसिध्द कंपनी हाँगकाँगमध्ये खास बेबी सिरियल (लहान मुलांचे खाद्य) चायनीज दूध पावडर वापरून करत असे. त्या कंपनीला आपला संपूर्ण उत्पादित माल त्यावेळी परत मागवावा लागला.

७. नेस्ले ह्या जगप्रसिध्द दूध पावडर बनवणार्‍या तैवान फॅक्टरीतून चिनी दुधामुळे ही भेसळ आढळली. खबरदारी म्हणून त्यावेळी कंपनीने तो सर्व माल परत मागवला.

ह्या सर्व गोष्टींमुळे चीनच्या खाद्यपदार्थ विशेषत: दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीवर फार गंभीर परिणाम झाला.

२५ देशांनी ताबडतोब चीनच्या दुग्ध पदार्थ निर्मित पदार्थांवर संपूर्ण बंदी घातली. त्यात भारताचाही समावेश आहे.

सर्वात गंभीर म्हणजे चिनी लोकांचा स्वत:च्याच दूध कंपन्यांवर विश्‍वास राहिला नाही. इतका की आज सुध्दा चिनी माता परदेशातून दूध पावडर आयात करून आपल्या मुलांना देत आहेत.

आपले दूध भेसळवाले ह्यावरून काही बोध घेतली अशी आशा आपण करू या का ?

डॉ. प्रमोद मोघे, पुणे, मो : ९३२५३८००९३

Path Alias

/articles/kathaa-hai-daudhaacai-bhaaga-4

Post By: Hindi
×