कथा ही दुधाची


पर्यावरण आणि विज्ञानः


(जुलै 2017 च्या अंकापासून आपण पर्यावरण आणि विज्ञान या नावाची एक मालिका सुरु केली आहे. पुण्यातील नॅशनल केमिकल लेबॉरेटरी या संस्थेतील निवृत्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मोघे हे या मालिकेचे लेखक आहेत. भारतीय संस्कृतीचे वैशिष्ठ्य असलेल्या कित्येक गोष्टी आपण टाकाऊ म्हणून नाक मुरडून बाजूला सारतो. पण त्यांचेमागे असलेले वैज्ञानिक सत्य मात्र आपल्याला माहित नसते. अशा काही पर्यावरण पूरक सत्यांचा आपण या मालिकेत शोध घेणार आहोत. )


भारतात आपल्या वाट्याला जे दूध येते ते शुध्द असेल अशी खात्री परमेश्‍वर सुध्दा देवू शकत नाही. दूध काढणे ते पुरवणे येथे वरच्या प्रवासात कुणाची बुध्दी कुठे फिरेल ह्याची खात्री देणे कुणालाही शक्य नाही. माझे एक वैज्ञानिक मित्र खाद्य आरोग्यशाळेचे संचालक होते, त्यांनी दुधातील भेसळीचे इतके प्रकार गेल्या 4 वर्षात अनुभवले की ते स्वत:चे दूध स्वत: गोठ्यावरून जावून समक्ष आणू लागले. इतका भेसळीचा धसका त्यांनी स्वत: घेतला.

कच्च्या दुधावरून अमेरिका, युरोपातील उफाळलेला असंतोष !
आपण मागील लेखात जंतुविनाशक पाश्‍चरायझेशन पध्दत अमेरिका इंग्लंडमध्ये दुधासाठी कशी सक्तीची झाली हे जाणून घेतले.

पण साधारण 1990 - 95 सालात जगात नैसर्गिक पदार्थांचा दैनंदिन जीवनात वापर करण्याची चळवळ वाढू लगली. त्यात दूध कच्चे उपयुक्त कसे ह्यावर वैज्ञानिक संशोधन वाढू लागले. त्यात असे आढळले की पूर्वापार पध्दतीने फक्त गवत चरणार्‍या ज्या गायी आहेत त्यांचे कच्चे दूध सेवन हेच शरीराला अत्यंत उपयुक्त आहे. जेव्हा आपण असे कच्चे दूध जंतुविरहित करण्यास तापवू लागतो म्हणजे पाश्‍चराईज करू लागतो तेव्हा त्या दुधातील उपयुक्त जीवजंतू जे पचनास मदत करतात, अशी ईमिनोलगोबिन्स, इंजाइम्स ही नष्ट होतात, कच्चे दुधातील लिपेज, फॉस्फेटेज पण कमी होतात. दुधातील व्हिटामिन्सचे प्रमाण तापवण्यामुळे कमी होते. उदा. व्हिटॅमिन बी - 6, हे 20 टक्के कमी होते.

कच्चे दूध सेवनाने दुधातील लॅक्टोज ही साखर बाधत नाही. शिवाय त्यामुळे बाल दमा आटोक्यात राहतो.

दुधाची व दुधाच्या उपपदार्थांची चवही बदलत नाही.

ह्या शोधामुळे कच्चे दूध सेवनार्थ जी बंदी अमेरिकेमध्ये जवळ जवळ सर्व राज्यांनी संपूर्ण अटी घालून होती, त्याविरूध्द कच्चे दूध प्या, ह्या चळवळीने दंड थोपटले.

कच्चे दूध दुकानातून सर्वत्र मिळावे व नागरिकांचे आरोग्य चांगल्या पध्दतीने सुधारावे अशासाठी तेथील शेतकर्‍यांनी चळवळीत भाग घेतला. कच्चे दूध पिणार्‍यांचे क्‍लब 2000 सालापूसन प्रस्थापित झाले व पाश्‍चरायझेशन कायदा बदलावा, ह्यासाठी तेथे जोरदार वादविवाद होवू लागले.

परंतु अमेरिकेच्या आरोग्य खात्याला ह्यावरचे संशोधन अपुरे व न पटणारे असे वाटू लागले. त्यामुळे 2006 पासून 2009 सालापर्यंत कच्चे दुधाचे संशोधनासाठी त्यांनी प्रतिसंशोधन आघाडी उघडली व त्याचे निष्कर्ष अमेरिकन जनतेसमोर ठेवले ते असे -

1. पाश्‍चरायझेशन पध्दतीमुळे दुधात लॅक्टोज साखर सहनशक्तीवर परिणाम होतो, अस्थमा वाढतो असे म्हणणे चुकीचे आहे, कच्चे दूध व पाश्‍चराईज दुधामुळे allergy ही येतेच कारण त्या मानवाची ती लॅक्टोज साखर पचवण्याची ताकदच कमी असते.
2. कच्चे दुधात जंतुविनाशक घटक आहेत हे विधान वैज्ञानिक कसोटीवर खरे ठरत नाही.
3. कच्चे दूध तापवल्यास त्याची आरोग्यशक्ती कमी होते हेही वैज्ञानिक कसोटीवर मान्य नाही.
4. पाश्‍चरायझेशनने म्हणजे दूध तापवल्यावर ते थंड पध्दतीने टिकू शकते.
5. पाश्‍चराईज पध्दतीनेच दुधातील सर्व विषारी जिवाणूंचा नाश होतो, व मानवाला क्षय, टॉयफाईड, हगवण, घटसर्प इ. अनेक रोगांपासून बचाव करण्याची संधी मिळते. कच्चे दूध सेवनाने वरील सर्व धोक्यांना मानवाला सामोरे जावे लागते.

पण ह्या चळवळीचा फायदा असा झाला की अमेरिकेतील जवळ जवळ 29 राज्यांनी कच्चे दूध विक्री करण्यास अटी घालून परवानगी दिली आहे. त्यात अमेरिकेतील 12 राज्यांनी दुकानातून कच्चे दूध सर्व हानिकारक तत्वे विरहित लेबलसह विकण्यास परवानगी दिलेली आहे.

17 राज्यांनी फक्त गोठ्यावरच पण पूर्ण हानिकारकतत्वे विहरित लेबलसह कच्चे दूध विकण्यास परवानगी दिली आहे. तर 17 राज्यांना सरकारी नियमाप्रमाणे कच्चे दूध विक्रीवर पूर्ण बंदी घातलेली आहे.

एकंदरित काय कालचक्र असे बरेच गोष्टीत जुने ते सोने ह्या नात्याने मागे फिरणार आहे व ते आपल्याला अनुभवण्यास पण मिळणार आहे.

निर्भेळ,शुध्द दुधासाठी चला गोव्याला, पाँडिचेरीला !
आपल्या देशात केंद्र सरकारची मिनिस्ट्री ऑफ हेल्थ and फॅमिली वेलफेअर ही आपल्या वाट्याला येणार्‍या खाद्यपदार्थाच्या सुरक्षेबाबत उत्तरदायी आहे. भारत स्वातंत्र्याआधी ब्रिटीश सरकारने 1899 साली सुरक्षित खाद्य पदार्थासाठी येथे प्रथम काही कायदे केले. त्यावेळी जी संस्थाने होती तेथे खाद्यपदार्थांसाठी, त्यांचे स्वत:चे कायदे होते.

स्वातंत्र्यानंतर 1954 साली भारतात खाद्यपदार्थ भेसळीसाठी स्वतंत्र कायदे सुचवले गेले व जून 1955 रोजी ते अस्तित्वात पण आले. 1964, 1976 व 1986 साली त्यात वेळोवेळी बदलही करण्यात आले व त्याप्रमाणे भारतातील प्रत्येक राज्याने ते अंमलात आणणे सुरू केले.

आपल्या खाद्यपदार्थ भेसळ प्रतिबंधक कायद्यानुसार साधारणत: भेसळयुक्त खाद्यपदार्थ म्हणजे काय ? ह्याची व्याख्या खालीप्रमाणे होवू शकेल.

मूळ खाद्यपादार्थात स्वस्त, कमी दर्जाचा पदार्थ मिसळणे.
मूळ खाद्यपदार्थातील घटक रचना बदलणे, फरक करणे.
खाद्य पदार्थ निर्मित, पॅकिंग, पुरवठा अस्वच्छ जागेत करणे.
खाद्य पदार्थात आजारी पशूचे अवयव असणे.
खाद्य पदार्थ भाजीसदृश असल्यास ती कुजकी, रोगट कीटक इ. सह वापरणे.
खाद्य पदार्थात विषारी पदार्थांचा अंश असणे.
खाद्य पदार्थांत परवानगी नसलेले, प्रकृतीला हानिकारक असलेले रंग वापरणे.
खाद्य पदार्थात प्रमाणित असलेले रंग जादा प्रमाणात वापरणे.
खाद्य पदार्थ टिकवण्यासाठी परवानगी नसलेले प्रिझर्व्हेटिव्ह (टिकाऊपणासाठी पदार्थ) वापरणे वा परवानगी असलेले पदार्थ जास्त प्रमाणात वापरणे.
पदार्थांची प्रत ठरवलेल्या प्रतीपेक्षा निकृष्ट असणे.

आपल्या 1990 शेतीमाल कायद्यानुसार, दुधाची व्याख्या अशी आहे. दूध हे गाय, म्हशी, शेळ्या, मेंढ्या अशा सस्तन जनावरांचेच असावे - झिरो रेट Act, पुरवठ्यानुसार असे हे दूध आटवलेले, उकळलेले, कृत्रिम गोडी असलेले, कल्चर केलेले, सुगंधित केलेले नसावे.

जे दूध पुरवाल ते टिकवण्याकरता फक्त होमोनाईझेशन वा पाश्‍चराईज पध्दतीनेच ते निर्जंतुक केले पाहिजे. असे महत्वाचे नियम दुधासाठी आहेत.

आपल्या देशात 2011 साली फक्त दुधाचे प्रतिसाठी फूड सेफ्टी and स्टँडर्ड ऑथोरिटी ऑफ इंडिया ह्या संस्थेने सर्व राज्यांचे दुधाचे नमुने तपासले आणि जो अहवाल दिला तो सर्व भारतीयांनाच नव्हे तर जागतिक दूध पुरवठा क्षेत्रात सुध्दा एक प्रचंड धक्कादायक गणला गेला.

त्या अहवालानुसार भारतातील 70 टक्के राज्यातील दूध ठरवलेल्या नियमांनुसार लोकांना मिळत नसून भेसळयुक्त आहे.

बिहार, छत्तीसगढ, ओरिसा, पं.बंगाल, मिझोराम, झारखंड, दमण, दिऊ येथे तर दुधात 100 टक्के भेसळयुक्त, कमी प्रतीचे दूध जनतेसाठी उपलब्ध होते.

बाकीच्या राज्यांत ही भेसळ थोड्या फार प्रमाणात सापडतेच. दुधात पाणी हे सर्वत्र आढळतेच, पण दुधात पावडर, साखरही आढळते. काही राज्यांतील दुधात स्टार्च, युरिया, डिटर्जंट्स, मीठ इ. नंबर लागतो. भेसळ दुधासाठी, दुर्दैवाने महाराष्ट्राचा नंबर ह्या 70 टक्के देशाच्या राज्यात लागलेला आहे.

पण अशा परिस्थितीत गोवा व पाँडिचेरी ह्या राज्यात मात्र जो दुधपुरवठा जनतेला होतो तो 100 टक्के पात्रतेचा असून, पूर्ण निर्भेळ,निर्जंतुक दूध तेथील जनतेच्या वाट्याला येत असल्याची ग्वाही त्या अहवालात देण्यात आली आहे.

तेव्हा ह्यासाठी गोवा व पाँडिचेरी ही आपली गणराज्य अभिनंदनास पात्र तर आहेतच पण इतर राज्यांनाही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्यास काय हरकत आहे ?

दूध भेसळीचे जनकत्व युरोप - अमेरिकेकडेच !
खाद्य पदार्थांतील भेसळीचा इतिहास तसा मनोरंजकच आहे.
युरोप व अमेरिकेत अगदी 1800 सालापासून खाद्यपदार्थ, पेयांचे विविध पदार्थ ह्यांत बेमालून भेसळ कशी करावी ह्याचे पाठ आजसुध्दा भारतीयांना उपयुक्त ठरलेले आहेत.

युरोपात भेसळ अगदी एखाद्या कलेसारखी तेथे जोपासलेली होती. ह्या कलाकुसरीतून खाद्याचे कोणतेही पदार्थ, फळाचे रस, दूध इतकेच काय तर नेहमीच्या खाण्यातील ब्रेड सुध्दा भेसळीच्या तडाख्यातून सुटलेला नव्हता.

सन 1820 साली फ्रेडरिक अ‍ॅक्युम ह्या जर्मन शास्त्रज्ञाने खाद्य पदार्थावरील भेसळीवर जगात प्रथम संशोधन चालू केले आणि त्याने जगासमोर प्रथम घातक धातू असलेले रंग खाद्य पदार्थ, पेयात असल्यास त्याचे प्रकृतीवर काय दुष्परिणाम एरवी जे आपण सर्वत्र भ्रष्ट समाजात वावरतांना पाहतो तेच फ्रेडरिक अ‍ॅक्युमच्या वाट्याला आले. भेसळ करणार्‍या बड्या धेंडांनी त्याला वाळीत टाकण्यासाठी समाजातून बहिष्कृत करण्यासाठी त्याने रॉयल इन्स्टिट्यूट लायब्ररीची पुस्तके वापरून त्याने फेरफार केल्याचे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले.

दरम्यान इंग्लंडमधील राणी व्हिक्टोरियाच्या सत्ता कालखंडात खाद्य व पेय भेसळीने उच्चांक गाठला. पैसा सोप्या मार्गाने मिळवण्यासाठी उद्योजकांनी खाण्याचा, पिण्याचा एकही पदार्थ भेसळीविना ठेवला नाही, साधे गरिबांसाठी मिळणार्‍या आईसकँडी (बर्फ गोळा) दुधाऐवजी चक्क चुना, पीठमिश्रित पाण्यापासून आईस्क्रीम लोकांना पुरविली गेली. फलरस म्हणून कृत्रिम रंग मिसळलेले पाणी लोकांना पाजले गेले. ह्यामुळे टॉयफाईड, घटसर्प, कॉलरा, हगवण इ. रोगांच्या साथी, इंग्लंडमध्ये ठाण मांडून बसल्या. तेथील दूध त्यावेळी गोठे अस्वस्छ पध्दतीने ठेवल्याने दुधात प्रचंड जंतूचे प्रमाण असे, त्यामुळे रोगराईत अखंड भरच पडे. ब्रेड स्वच्छ, पांढरा दिसावा म्हणून तुरटी पिठात टाकून ब्रेड तयार केला जाई. चहात त्या काळी राख व पाने ह्यांचे मिश्रण वजन वाढवण्यासाठी करत. कॉफीमध्ये इतर फळबियांची व वाटाण्याची पावडर मिसळत. द्राक्षापासून केलेल्या दारूत दारूला चकचकी येण्यासाठी तुरटीचा उपयोग केला जाई. दारू रंगवण्यासाठी - लाकडाच्या भुशाच्या सर्रास वापर होई. त्यावेळेचे प्रसिध्द इंग्लिश लेखक थिओडर सेगेविक यांनी तर लेख लिहून, सरकारला विचारले की सरकारने बाजारात एखादा असा पदार्थ त्यांना दाखवावा की जो भेसळयुक्त नाही. श्री पंच हे त्यावेळेचे वृत्तपत्रीय व्यंगावर नेमके बोट ठेवणारे ब्रिटीश पात्र, त्याच्या शब्दांत सध्याचे दूध म्हणजे माणसाने निसर्गावर मिळवलेला प्रचंड विजय आहे, कारण गायीशिवाय माणूस हल्ली पंपाद्वारे पाणी आणि चुना ह्यापासून खेचलेले द्रव म्हणजे दूध मिळवू शकतो. म्हणून आता गाईची व गोठ्यांची आवश्यकता लागणार नाही.

अमेरिकेत तर काय 1850 पर्यंत दुधाचा धंदा दारू गाळणार्‍या भट्टीवाल्यांचाच हातात होता. दूध पुरवठ्यातील इतिहासात ह्याचे वर्णन दुधाचा पुरवठ्यातील भ्रष्टाचारातील टोक गाठलेला काळ असे आहे. निव्वळ प्रचंड नफा कमवण्यासाठी हे दारूडे, जनावरांना कोंडून, त्यांना दारू गाळून झालेले अन्नधान्य, खाण्यास देत, जनावरांना अक्षरश: पिळून त्यांचे निकृष्ट अस्वच्छ असलेले दूध ते शहरात पुरवीत. दुधाची प्रत वाढवण्याकरता सर्रास दुधात चुनापाणी, स्टार्च, प्लॅस्टर ऑफ पॅरिस, पिठे मिश्रित दूध ते पुरवत - अशा दुधाचा व्हावयाचा तो दुष्परिणाम अमेरिकन बालकांच्या वाट्याला आला. 1843 ते 1856 सालपर्यंत तेथील बालमृत्यूंचे प्रमाण दुप्पट झाले व मग अमेरिकन जनतेचे डोळे उघडले.

इंग्लंडमध्ये 1850 साली डॉ. आर्थर हिल हॅसाल ह्या डॉक्टरांचे खाद्य पदार्थावरील भेसळीवरचे संशोधन करून अजूनही गाजत असलेल्या लॅन्सेट ह्या प्रसिध्द वैज्ञानिक नियतकालिकात सतत छापण्यास सुरूवात केली. त्याचा एवढा परिणाम ब्रिटीश सरकारवर झाला की 1860 साली इंग्लंडमध्ये पहिला खाद्यपदार्थ कायदा अस्तित्वात आला.

अमेरिकत नाथन स्ट्रॉस ह्या धनाढ्य समाज सुधारकाने 1893 सालापासून खाद्यपदार्थ भेसळीविरूध्द दंड थोपटले व प्रचंड आंदोलने करून 1906 साली अमेरिकन सरकारला शुध्द खाद्यपदार्थ व औषधे कायदा अमेरिकेत अस्तित्वात आणण्यास भाग पाडले.

भारतात ब्रिटीश राज्य असताना 1899 साली तो भारतात लागू झाला. सन 1937, 1943 मध्ये त्यात बदल केले गेले व स्वातंत्र्यानंतर 1954 साली भारताचा स्वतंत्र भेसळ प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला.

खंत एवढीच आहे की युरोप व अमेरिकेत आता त्या कायद्याचे पालन अत्यंत कठोरपणे होते. पण आपल्या येथे आपली परिस्थिती अजूनही ब्रिटीश व्हिटक्टोरियन उच्च भेसळ कालखंडातीलच आहे.

सामान्यांसाठी दूध भेसळीचे शास्त्र !
भारताचे दूध बहुतांशी ऋतुवरती अवलंबून आहे. साधारणत: दुधाचे उत्पादन हिवाळ्यात जास्त असते पण त्याचवेळी मजा म्हणजे दुधाची बाजारातील मागणी कमी असते. पण उन्हाळ्यात ज्या वेळी दाणा, चारा, पाणी ह्या सर्वांचीच टंचाई असते नेमकी त्याच वेळी दुधाला प्रचंड मागणी ही असते. पावसाळ्याच्या सुमारास बाजारात परत दुधाची मागणी घटते.

आणि जेव्हा जेव्हा दुधाची मागणी उत्पादनापेक्षा वाढते त्यावेळी ती मागणी माणूस दुधाची भेसळ करूनच पुरी करू शकतो. दूध भेसळीचे दुसरे तत्वज्ञान म्हणजे मोह. साधे पाणी टाकून जेव्हा दुधाचे माप वाढू शकते तेव्हा सामान्यातल्या सामान्य माणसाची बुध्दीही भ्रष्ट होवू शकते.

शास्त्रीय भाषेत दुधाची भेसळ दूध काढण्यापासून होते. जेव्हा जनावरांच्या मार्फत दूध काढले जाते त्यावेळी जनावरांचे शरिरावर किती जंतू आहेत, त्याची किती स्वच्छता राखली आहे, गोठा, जनावराचे उठणे, बसणे, लोळणे, खाणे, पिणे ह्या सर्वांवरच दुधाची भेसळ शास्त्रीय रीतीने तपासली जाते. अस्वच्छ परिस्थितीतून अस्वस्छ दूधच आपल्या वाट्याला येणार आणि येथेच दुधात प्रथम भेसळ चालू होते. त्यातून माणसाला टॉयफाईड, क्षय, कॉलरा, हगवण इ. रोगांची बाधा होवू शकते.

पुढची भेसळ घरी, दारी डेअरीत सुध्दा दूध तुम्ही कसे साठवता त्यावर अवलंबून असते. ही दुधाची साठवणीची भांडी स्वच्छ निर्जंतुक, चिरा, तडे न गेलेली अशी लागतात. ती साफ करताना कोणत्याही रसायनाचा साबणामार्फत अंशही त्यांना असता कामा नये, शिवाय साफ करण्यासाठी घेतलेले पाणीही अत्यंत स्वच्छ लागते असे त्याचे मापदंड आहेत.

जर भांडी साफ नसतील व तडे, चिरायुक्त असतील तर तेथूनच परत जीवजंतू, घातक पदार्थ दुधात येवू शकतात. डिटर्जंट, क्‍लोरिन इ. पदार्थ दुधात येवू शकतात.

तड्यातून, चिरातून राहिलेल्या दुधाच्या अंशाने जीवजंतूची वाढ सतत दूधात येवून दूध भेसळयुक्त बनू शकते.

पुढचा टप्पा दुधाचे एकत्रिकरण करत असता आजारी जनावरांचे दूध, चांगल्या दुधात येवून भेसळ होवू शकते. येथे टिकवण्याकरता बर्फ, कृत्रिम रसायने दूध टिकवण्यासाठी वापरली जातात, त्यात फॉर्मालिहाईड, हायड्रोजन पेरॉक्साईडची भेसळ होवू शकते.

पुढे असे दूध दुग्ध विक्रेत्याकडे जाते. तेथे खालील गोष्टींची भेसळ होवू शकते.

अस्वच्छ पाणी घालून दूध उत्पादन वाढवणे.
हे पाणीदार दूध परत दाट करण्यासाठी स्टार्च, मिल्क पावडर, साखर इ. चा वापर करणे.
परत असे दूध टिकवण्यासाठी फॉर्मालिन, अँटीबायोटिक्स, हायड्रोजन पेरॉक्साईड वापरणे.
दुधाला कृत्रिम फेस येण्यासाठी साबणयुक्त रसायने वापरणे.
युरिया टाकून दुधाची शुभ्रता वाढवणे.
जनावरांचे खाद्यातून कीटकनाशकेही दुधातून येतात ती न पाहणे.
चार्‍यातून, खाद्यातून अफ्लाटॉक्सीन विषाची मात्रा दुधात येते ती न तपासणे. ( ज्यामयुळे माणसाला कॅन्सर होवू शकतो) जनावरांना दूध वाढीसाठी दिलेली औषधे दुधात न तपासणे.

ह्या सर्वावर कडी म्हणजे दूध कृत्रिम रित्या तयार करणे. हे रासायनिक दूध निर्माण करण्याची करामत 15-20 वर्षांपासून कुरूक्षेत्रीच प्रथम निर्माण केली गेली. पुढे हे महाभारत राजस्थान, हिमाचल, उत्तर प्रदेश, दुधाची कमतरता निर्माण झालेल्या बिहार, मध्यप्रदेश, ओरिसा, कर्नाटक असे करत महाराष्ट्राही पोहचलेले आहे.

ह्या दुधात युरिया, साबण, खाद्यतेल ह्यांचे मिश्रण वापरले जाते व चांगल्या दुधाऐवजी ते 50 - 50, 70 - 30 अशा टक्केवारीने आपल्यापर्यंत पोहचू शकते.

सामान्यांसाठी दूध भेसळीची घातकता !
भारतात आपल्या वाट्याला जे दूध येते ते शुध्द असेल अशी खात्री परमेश्‍वर सुध्दा देवू शकत नाही. दूध काढणे ते पुरवणे येथे वरच्या प्रवासात कुणाची बुध्दी कुठे फिरेल ह्याची खात्री देणे कुणालाही शक्य नाही. माझे एक वैज्ञानिक मित्र खाद्य आरोग्यशाळेचे संचालक होते, त्यांनी दुधातील भेसळीचे इतके प्रकार गेल्या 4 वर्षात अनुभवले की ते स्वत:चे दूध स्वत: गोठ्यावरून जावून समक्ष आणू लागले. इतका भेसळीचा धसका त्यांनी स्वत: घेतला.

आपल्या देशाची आंतरदेशीय ख्याती, 70 टक्के पुरवले जाणारे दूध हे भेसळीचे असते अशी आहे. तेथे निदान सामान्य माणसाला आपल्या वाट्याला येणार्‍या दुधाच्या भेसळीच्या घातकतेविषयी माहिती असणे अत्यावश्यक आहे.

क्रमश:

डॉ. प्रमोद मोघे, पुणे - मो : 9325380093

Path Alias

/articles/kathaa-hai-daudhaacai-0

Post By: Hindi
×