जो करी बांद बंधनी


सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेला शहादा तालुका खान्देशातील श्रीमंत तालुका म्हणून ओळखला जातो. तापी, गोमई, सुसरी, वाकी या नद्यांची देणगी, काळी सुपीक कसदार जमीन आणि येथील बहुसंख्य असलेल्या गुर्जर मंडळींचे परिश्रम यामुळे समृध्दीची कमान सतत उंचावत गेली. समृध्दीकडून अती समृध्दीकडे जाण्याच्या ओघात जमिनीतील पाण्याचा उपसा वाढला. निसर्गाने जमिनीच्या पोटात निर्माण केलेला पाण्याचा तोल बिघडला.

सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेला शहादा तालुका खान्देशातील श्रीमंत तालुका म्हणून ओळखला जातो. तापी, गोमई, सुसरी, वाकी या नद्यांची देणगी, काळी सुपीक कसदार जमीन आणि येथील बहुसंख्य असलेल्या गुर्जर मंडळींचे परिश्रम यामुळे समृध्दीची कमान सतत उंचावत गेली. समृध्दीकडून अती समृध्दीकडे जाण्याच्या ओघात जमिनीतील पाण्याचा उपसा वाढला. निसर्गाने जमिनीच्या पोटात निर्माण केलेला पाण्याचा तोल बिघडला. चक्र फिरले. ऊस पिकविणाऱ्या तालुक्यात पिण्यासाठी नियमित पाणी मिळणे अवघड झाले. या परिस्थितीत नांदरखेडा येथील मोतीलाला फकिरा पाटील नावाच्या सुशिक्षित शेतकऱ्याने आपल्या चिंतनास कृतीची जोड देत मार्ग काढला... परिवर्तन घडविले. त्याची ही कहाणी.

खानदेशात बोलली जाणारी अहिराणी ही मुख्यत: कृषी जीवन जगणाऱ्यांची बोली आहे. हजारो वर्षांच्या अनुभवातून साकार झालेल्या असंख्य अर्थगहन म्हणी आजही अहिराणीमध्ये प्रचलित आहेत. विद्यमान परिस्थितीवर त्या नेमके आणि मर्मग्राही भाष्य करतात. 'जेन्हा हेरवर मोट, तेन्ह कधी न भरे पोट' (ज्याचे विहीरीवर इंजिन अगर विजेचा पंप आहे, तो भूगर्भातील पाण्याचा प्रचंड उपसा करतो. त्यामुळे उत्पन्न जसे वाढत जाते तसा आधाशीपणा वाढत जातो. तो कधी तृप्त होत नाही, त्याचे पोट कधी भरत नाही, तो पाण्याचा उपसा करतच राहतो.) पाण्याचा उधळमाप वापर करणाऱ्यांच्या लालसी प्रवृत्तीवर भाष्य करणारी ही म्हण आहे. तशीच पाणी व कुंपण याची काळजी घेणाऱ्या शेतकऱ्यांचे वर्णन करणारी देखील म्हण आहे. 'जो करी बांद बंधनी तो खंडीना धनी' (जो स्वत: शेताचे बांध वगैरे घालतो, शेताकडे सतत लक्ष देतो, योग्य ठिकाणी बांध घालून पाणी अडवतो त्यास उत्पन्न जास्त मिळणारच) या दोन्ही म्हणी आठवण्यास निमित्त ठरला तो गेल्या महिन्यात नंदूरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात झालेला प्रवास.

ग्रामीण भागातून प्रवास सुरू असताना या दोन्ही म्हणींचे प्रत्यंतर सतत येत होते. भूजलाचा उपसा करण्यासाठी एक हजार फुटापर्यंत बोअरवेल्स खोदून, जमिनीची अक्षरश: चाळणी करूनही पाणी मिळत नाही अशी रडकथा ऐकविणारे शेतकरी या भागात दिसले. दुसरीकडे शाळा, महाविद्यालयाच्या मैदानावर विशिष्ट कार्यपध्दती वापरून हजार फुट बोअरवेल्स च्या माध्यमातून जमिनीच्या उदरात पाणी सोडणारे, उथळनदी पात्राची नांगरटी करून पाणी अडविणारे आणि परिसरातील विहीरी व बोअरवेल्स जीवंत करणारे मोतीलाल पाटील यांच्या सारखे बांद बंधनी करणारे शेतकरी देखील आढळले.

तापी, गोमाई आणि अनेक छोट्या छोट्या नद्यांच्या खोऱ्यातील शहादा तालुका सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलाय. काळी, कसदार आणि सुपीक जमिनीची देणगी तालुक्यास लाभली आहे. या निसर्गदत्त साधन संपत्तीस येथील शेतकऱ्याने आपल्या अंगभूत मेहनतीची जोड दिली. हिरवाईने माळरान फुलविले. त्याबरोबरच बागायती शेतीच्या माध्यमातून आर्थिक समृध्दीचे पर्व अनुभवले. प्रारंभी कालवे आणि उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून शेती बहरली. नंतर साधारण 1972 बोअरवेलच्या माध्यमातून भूजलाचा उपसा सुरू झाला. पुढे समृध्दीचा थर वाढविण्याची जीवघेणी स्पर्धा वाढली. त्यातून भूजलाच्या अतिरेकी उपशाची अहमहमिका सुरू झाली. कालांतराने जमिनीतील पाण्याची पातळी खालावली. त्यातून निर्माण झालेल्या जलदारिद्र्याचे चटके देखील या मंडळींनी सोसले. ऊसासारखे पाणी ओरपणारे नगदी पिक घेणाऱ्या तालुका वासीयांची पुढे पिण्यासाठी पाणी मिळण्यासाठी भटकंती सुरू झाली. अर्थात जलसंकटाच्या या भीषण परिणामांची जाणीव काही विचारी मंडळींना अस्वस्थ करीत असे. मात्र हे संकट थोपविण्याची उपाययोजना सूचत नव्हती.

परिवर्तानाची आस.... :


शहादा तालुक्यातीलच नांदरखेडे येथील शेतकरी मोतीलाल फकिरा पाटील यांचा समावेश अशाच अस्वस्थ शेतकऱ्यांमध्ये होता. तथापि मोतीलाल पाटील हे केवळ पारंपारिक शेतकरी नव्हते. त्यांच्या प्रचलित कृषीविषयक अनुभव व ज्ञानास एम.एस्सी. अॅग्रीकल्चरमधील पदवीमुळे आधुनिक ज्ञानाची जोड लाभली होती. निरीक्षण, विचार आणि अंमलबजावणी असा सुंदर मेळ जमून आला. संभाव्य जलसंकटाची अस्वस्थ करणारी सतत बोचणारी जाणीव परिस्थिती बदल घडवून आणण्यासाठी प्रेरित करीत होती. त्यातून कृतीशील जलनायकाची वाटचाल सुरू झाली. परिवर्तनासाठी प्रारंभी मोठा समुदाय एकत्र येण्याची वाट पाहत बसण्याची गरज असतेच असे नाही. आपण स्वत: पासून सुरूवात करा, परिवर्तनाची आस प्रामाणिक असेल तर व्यक्तीचे समुदायात रूपांतर होत जाणे फारसे अवघड रहात नाही याची प्रचिती या निमित्ताने आली.

नदी पात्राची नांगरणी.... :


नांदरखेडा हे मोतीलाल पाटील यांचे गाव तापी नदीच्या काठावर आहे. पौराणिक स्थळ आणि दक्षिण काशी अशी ओळख असलेले प्रकाशा नांदरखेड्यापासून अगदी जवळ. तापी, गोमाई आणि पुलिंगा या त्रिवेणी संगमावर प्रकाशा वसलय. पैकी गोमाई नांदरखेड्या जवळून वाहते. 1970 मध्ये मोतीलाल पाटील एम.एस्सी. (अॅग्री) झाले. क्लास वन अधिकारी होण्याची संधी होती. मात्र पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. जवळून तापी बारमाही वाहत असे. पाणी न उचलता, येईल त्या उत्पन्नात शेतकरी खूश होता. मोतीलाल पाटलांकडे कोरडवाहू शेती होती. आधुनिक शिक्षणामुळे प्राप्त झालेले ज्ञान प्रत्यक्षात आण्याची संधी त्यांनी घेतली. विविध तंत्राचा वापर करून त्यांनी पूर्ण शिवार इगिगेटेड केलं. ऊसासारखी नगदी पीके घेण्यास सुरूवात केली.

संकरित कापूस लावला. उत्पादन वाढविले, पर्यायाने उत्पन्नही. दरम्यान शहादा तालुक्यात लोणखेडा येथे सातपुडा - तापी परिसर सहकारी कारखान्याची मूहुर्तमेढ रोवली गेली होती. कारखान्याने विकत घेतलेल्या यंत्राच्या सहाय्याने ठिकठिकाणी बोअरवेल्स करण्याचा सपाटा सुरू झाला. पाणी आणि वीज मुबलक. पर्यायाने ऊसाचे एकरी उत्पादन वाढले. त्यामुळे साखर कारखान्याचा बॉयलर अखंड सुरू राहिला नसला तरच नवल. बरीच वर्षे कारखाना जोमाने सुरू होता. मात्र कालांतर चित्र बदलले. शहादा तालुक्यातील बहुतांश नद्या सातपुड्यातून उगम पावणाऱ्या. प्रचंड जंगलतोड, पर्यावरणाचा ऱ्हास अथवा अन्य कारणांमुळे बारमाही वाहणाऱ्या नद्यांमधील प्रवाह नोव्हेंबर - डिसेंबरमध्येच लुप्त होवू लागले. नांदरखेड्याजवळून वाहणाऱ्या गोमाई नदीच्या बाबतीत यापेक्षा वेगळी परिस्थिती नव्हती. नद्यांचे बारमाही वाहणे थांबण्यास अनेक कारणे असतीलही. मात्र मोतीलाल पाटील यांच्या निरीक्षणानुसार भूजलाचा प्रचंड उपसा हे नद्या आटण्याचे मुख्य कारण होते.

ऊसाचे ट्रॅक्टर कारखान्यापर्यंत सुरळीत जाण्यासाठी नदीपात्रात तात्पुरता भर घालून त्यावेळी मार्ग तयार करण्यात येत. पुढे वृक्ष तोडीमुळे वाहून आलेला गाळ नदीपात्रात साठण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळा पात्र अधिकच उथळ झाले. पावसाळ्यात पाणी थांबत नसे. ते झटकन वाहून जाई. कालांतराने टणक झालेल्या नदी पात्रातून कोठूनही ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर व अन्य वाहनांची सरर्ास वाहतुक सुरू झाली. हे चित्र भयावह होते. कारणांचा शोध आणि उपाय योजना असे विचारचक्र मोतीलाल पाटलांच्या डोक्यात सुरू झाले. त्यातून नदी नांगरटीची कल्पना त्यांना सुचली.

गाळ साचल्यामुळे टणक व कोरडा ठणठणीत झालेला गोमाई पात्राचा परिसर नांगरण्याचा निर्णय त्यांनी घेतला. साधारण सन जून 2000 मधील ही घटना आहे. काही कार्यकर्त्यांच्या मदतीने या प्रयोगास सुरूवात झाली. चार पाच कार्यकर्त्यांनी स्वत: ट्रॅक्टर आणले. डिझेलचा खर्च मोतीलाल पाटील यांनी केला. नदीपात्राची आडवी नांगरणी झाली. प्रारंभाचा अनुभव उत्साहवर्धक नव्हता. वर्षानुवर्षे गाळ साचण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे पात्र अतिशय टणक झाले होते. नांगराचे फाळ तुटू लागले, तसा कार्यकर्त्यांचा उत्साह मावळू लागला. संध्याकाळपर्यंत साधारण अर्धा कि.मी पर्यंत नांगरणी झाली. पुढे काम करणे अशक्य झाले. काम थांबविण्यात आले. योगायोगाने त्याच रात्री सातपुड्यात पाऊस झाला, आणि अवघ्या दोन तासात गोमाईनदीला पूर आला.

सकाळी नांगरणी केलेल्या पट्ट्यात पुराचे पाणी थांबलेले दिसले. ते पाणी पुढे जात नव्हते. पाणी जाण्यासाठी ठराविक दिशेने मार्ग काढण्यात आला. त्यामुळे गोमाईच्या काठालगतचे 700 फुटावरून उपसा करणारे बहुसंख्य बोअर अवघ्या 20 फुटावरून पाणी फेकू लागले. नदी काठावरची एक विहीर अर्धी भरली. ग्रामस्थांचा उत्साह वाढला. लोक आनंदाने नाचू लागले. नदी पात्र नांगरल्यामुळे पाणी थांबल्याची बातमी थेट 35 कि.मी अंतरावरील खेतियापर्यंत पसरली. लोकांनी स्वयंस्फूर्तीने शक्य तिथे नदी पात्र नांगरण्यास सुरूवात केली. त्याची परिणीती अशी झाली की ज्या परिसरात पाण्याची पातळी 700 -800 फुटावर होती, ती 80 फुटावर आली. या चमत्काराची चर्चा अजूनही होत असते.

पाणी अडवा - पाणी फिरवा :


सतत निरीक्षण आणि त्यानुसार परिणामकारक कार्यवाही हा सिलसिला सुरू असताना मोतीलाल पाटील यांच्या निदर्शनास अजून एक बाब आली. सातपुड्यातून उगम पावणाऱ्या काही छोट्या छोट्या नद्या ऑगस्ट नंतरच कोरड्या होतात. यापैकी बहुतेक नद्यांवर शासकीय योजनेंतर्गत सिंचनासाठी लहान लहान साठवण बंधारे उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी साचलेले पाणी सांडव्यावाटे पुन्हा नदीपात्रात येवून वाहून जाते. त्याचा परिसरातील ग्रामस्थांना टंचाईच्या काळात फारसा उपयोग होत नाही. हे वाहून जाणारे पाणी लगतच्या पाटात - कालव्यात टाकावे, पुढे कालव्यातून नाल्यात आणि नाल्यातून नदीत सोडावे अशी मागणी मोतीलाल पाटील आणि परिसरातील नागरिकांनी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे लावून धरली.

जनमताच्या रेट्यामुळे ही मागणी मान्य झाली. कालव्यांची साफसफाई करण्यात आली. ही मागणी अंमलात आली तेव्हा सांडव्यावरून वाहून जाणारे पाणी कालव्यातून नाल्यात आणि नाल्यातून वाकी नदीत आले. वाकी नदी पुढे गोमाईला मिळते. अशा पध्दतीने एक मिनी नदी जोड प्रकल्पच या निमित्ताने अस्तित्वात आला. अशा पध्दतीने अत्यंत कमी खर्चात लहान लहान नदी - नाले जोड प्रकल्प अंमलात आणले गेले तर बहुखर्चिक महाकाय नदीजोड योजना अंमलात आणण्याची गरजच राहणार नाही, असे ठाम मत मोतीलाल पाटील व्यक्त करतात. या प्रयोगानंतर नदी पात्रातील गाळ काढण्याचा उपक्रम शासकीय यंत्रणेच्या पाठबळाने राबविण्यात आला. त्याचे चांगले परिणाम दिसून आले. गेल्या वर्षी करण्यात आलेल्या आणखी एका प्रयोगातून ग्रामस्थांचा उत्साह वाढला. गोमाई नदीवर प्राचीन फड पध्दतीचा बंधारा आहे. या बंधाऱ्याच्या निमित्ताने अडविण्यात आलेले पाणी लगतच्या सुमारे 40 कि.मी अंतराच्या पाटचारीतून सुमारे वीस गावांच्या शिवारातील शेतीसाठी वापरण्याचा परिपाठ होता.

तथापि ठिकठिकाणी बोअर खोदण्यात आले, मुबलक वीज उपलब्ध झाली. त्यामुळे पाटचारीचा वापर हळूहळू बंद झाला, शासनाचेही दुर्लक्ष झाले. देखभाल दुरूस्ती अभावी कालांतराने पाट गाळाने भरला. पोटचाऱ्यांचा वापर शेतीसाठी होवू लागला. गेल्या वर्षी काही लोकप्रतिनिधींच्या मदतीने शासकीय यंत्रणा व ग्रामस्थांच्या एकत्रित सहयोगातून पाटातील गाळ काढण्यात आला. पाणी वाहू लागले. पाट जीवंत झाले. परिसरातील विहीरींची पातळी उंचावली. या माध्यमातून जवळच असलेला एक तलाव भरून घेतला तर, सुमारे सात आठ हजार एकराचा परिसरात विनासायास सिंचनाखाली येवू शकतो. त्यासाठी शासनस्तरावर मोतीलाल पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत, शिवाय या प्राचीन पाणी वाटप प्रणालीविषयी आपलेपणाचा भाव निर्माण व्हावा यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्याचे काम ते करीत असतात.

जम्बो जल पुनर्भरण :


मोतीलाल पाटील शहाद्यातील एका शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष आहेत. सुमारे पाच हजार विद्यार्थी त्यांच्या संस्थेत शिकतात. शैक्षणिक संस्थेच्या 12 एकराच्या परिसरात पावसाळ्यात साठणारे पाणी जमिनीच्या पोटात टाकण्याचे त्यांनी ठरविले. प्रचलित पध्दतीने विहीर खोदून वॉटर हार्वेस्टिंग प्रयोग अंमलात आणून काम केले असते तर वावगे ठरले नसते. मात्र या माध्यमातून जमिनीच्या पोटात पाणी जाण्याचा वेग अत्यंत कमी असल्याचे त्यांचे निरीक्षण होते. त्यामुळे साधारण हजार फूट खोल असे बोअर (कूपनलिका) त्यांनी खोदल्या. त्यासाठी त्यांनी निरीक्षणाअंती स्वत:चा आराखडा तयार करून तो अंमलात आणला. सन 2005 मध्ये शहाद्यात प्रचंड पाऊस झाला. जणू ढग फुटी झाली असावी. 12 एकर परिसर पाण्याने तुडुंब भरला. शाळेला सुट्टी द्यावी लागली. चर्चा सुरू झाली. त्याचवेळी मोतीलाल पाटील यांनी आवारातील बोअरचे झाकण उघडण्याचे फर्माम सोडले. अतिशय जिकीरीने झाकण उघडण्यात आले. हवा बाहेर निघताच, बोअरच्या माध्यमातून पाणी आत जाण्यास सुरूवात झाली. अवघ्या सहा तासात पटांगणावर साचलेले पाणी आत ओढले गेले.

त्यावेळी शहाद्यातील बहुसंख्य बोअर आटले होते. त्यामुळे टँकरने पाणी पुरवठा सुरू होता. खुद्द मोतीलाल पाटील यांच्या शहाद्यातील घरी टँकर सुरू होता. जलपुनर्भरणाच्या या प्रयोगामुळे परिसरातील बोअर जीवंत झाले. पाण्याची पातळी उंचावली. टँकर बंद झाले. नाला कोरून, नाला अडवून करण्यात येणाऱ्या जलपुनर्भरणाच्या किरकोळ प्रयोगांपक्षा हजार फूट खोलवर जावून बोअरच्या माध्यमातून करण्यात जलभरण अत्यंत प्रभावी असल्याचा मोतीलाल पाटील यांचा दावा आहे. यासाठी त्यांनी खास अशी पध्दती विकसित केली आहे. नदीच्या पात्रात नाल्याकाठी पात्रात ही पध्दती वापरता येवू शकते. आपण चाळीस वर्षात बोअरवेल्सच्या माध्यमातून जमिनीच्या पोटातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा केला आहे. त्या तुलनेत आपण सध्या सुरू असलेले पुनर्भरणाचे प्रयत्न अत्यंत तोकडे आहे. त्यासाठी आपण विकिसित केलेला प्रकारच परिणामकारक ठरू शकतो. असा त्यांचा दावा आहे.

कृषी पर्यटनात आघाडी..... :


प्रयोगशील व्यक्ती सतत कार्यप्रवण असते. वेस्ट लॅण्ड डेव्हल्पमेंटमध्येही मोतीलाल पाटील यांचे काम आहे. त्यांनी काही वर्षांपूर्वी नांदरखेड्यात तापी काठालगत घळीची बखळ जमीन विकत घेतली. सुमारे चाळीस एकरात तंत्रशुध्द पध्दतीने लागवडीलायक जमीन विकसित केली. त्या ठिकाणी बांबू व सागाची सुमारे तीस ते पस्तीस हजार झाडे लावली. शिवाय नारळ, पेरू, आवळा इत्यादी झाडे लावली. कृषी पर्यटन आणि त्यामाध्यमातून रोजगार निर्मिती ही संकल्पना आजही बहुतांश कागदावर दिसते. मात्र सुमारे वीस वर्षांपूर्वी मोतीलाल पाटील यांनी तापीकाठी नांदरखेड्यात ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. सुरूवातीला ही जमीन खरेदी केल्याबद्दल त्यांची यथेच्छ टिंगल टवाळी देखील झाली.

दाट वनराई आणि अथांग पसरलेल्या तापी काठाची साथ यामुळे निरनिराळ्या जातीचे वेगवेगळ्या प्रांतातील असंख्य पक्षी या ठिकाणी येतात. शेतकऱ्यांनी बांधावर साग आणि बांबूची लागवड केली तर त्यांची पेन्शन आणि पी.एफ. ची सोय होवू शकते असा त्यांचा दावा आहे. मोतीलाल पाटील यांनी उभारलेल्या पर्यटन स्थळाला भेट देणाऱ्यांची गर्दी वाढतेय, शिवाय अनेक दर्दी मंडळींनी या परिसरास भेट दिली आहे. यामध्ये प्रसिध्द कवी अशोक नायगांवकर याचा समावेश करावा लागेल. त्यांनी नांदरखेड्यास भेट दिली. त्यांनी आपल्या शब्दात केलेले वर्णन किती यर्थाथ आहे, याची प्रचिती प्रत्यक्ष भेट दिल्याशिवाय येणार नाही.

कोकणचा तुकडा.....


आकाशातल्या ढगांनी आपला चेहरा बघावा असा
विस्तीर्ण पसरलेला औरस चौरस तापीच्या पात्राचा आरसा
तात्या, तुम्ही सागपानांचा, पिवळ्या बांबूंचा गर्द आडोसाच जणू तापीला बहाल केलाय.
तिकडे तळ कोकणात
ऐन हंगामात लगडलेल्या हापूस वर
कोणी वाटसरू डल्ला मारतो.
तुम्ही तर कोकणचा एक तुकडाच अलगद कुणाच्या नकळत बगलेत मारून आणलात !
उधाणलेली, उफाळलेली तापीमाय नांदरखेड्यात येवून अखेर विसावलीच
गुरगुट्या भात कालवावा अशा तुमच्या लोण्याच्या जमिनीपाशी तापी येवून विसावलीय.
बहुधा ती तहानली असावी
मला तरी कुणी तरी पदरात घ्यावं.
जमिनीच्या पात्रात दोनदोनशे फूट काळजात घुसून जखमा करत जातात लोक
आणि वणवण करत हताश होत मारून घेतात.
इथे तर तीच तुमच्या विशाल वनराईच्या भेटीला आलीय.
तुमच्या विशाल माळावर
त्या मातीला तापीच्या पाण्यात कालवून टिळा लावावा
आणि
हिरवाईची वनराईची गाणी गावीत
पिवळ्या बांबूंच्या बासरीतून
सरी याव्यात, तिरप्या तिरप्या माडांनी डुलत रहावं आणि आभाळभर आनंद करावा

श्री. संजय झेंडे, धुळे - मो : 09657717679

Path Alias

/articles/jao-karai-baanda-bandhanai

Post By: Hindi
×