जलतरंग - तरंग 2 : नदीची ओळख


तापी नदीचे रूंद विशाल पात्र - पण त्या मानाने अगदीच चिंचोळा वाटणारा नदीचा प्रवाह. प्रवाहाच्या काठी उभे राहिले की तो मोठा दिसे, पण नदीपात्राच्या उंच काठावरून त्याच्याकडे पाहिले की, ती नागमोडी धारा छोटीशी वाटे. नदीचे काव्यांतले वर्णन व प्रत्यक्ष दर्शन यातील तफावत जाणवली. दुथडी भरून वाहणारी तापी नदी ओलांडायची आहे अशा हिशोबाने पुलाची उंची ठरवलेली होती.

अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षणाचा भाग म्हणून मिळालेली एक दुर्लभ संधी म्हणजे शेवटच्या वर्षात असतांना दिवाळीच्या सुट्टीत काढलेली आम्हा विद्यार्थ्यांची दक्षिण भारतातील शैक्षणिक सहल. नव्यानेच पूर्ण होत आलेले तुंगभद्रा धरण, सह्याद्रीच्या पश्चिम उतारावरचे पायरवरा जलविद्युत केंद्र, कावेरी नदीवरचे कृष्णराजसागर धरण व त्याच्या पायथ्याशी विस्तारलेले थुईथुई कारंजांचे वृंदावन उद्यान, रेल्वेचे प्रवासी डबे निर्माण करणारा मद्रास जवळचा पेराम्बुरचा भारतीय कारखाना - या नव्या विश्वात दहा दिवस कसे संपले हे कळलेच नाही. अभियांत्रिकीचे व्यापक असे भव्य दिव्य स्वरूप त्यावेळी मनांत ठसले.

नंतर एकदा आम्हाला दादर येथील मुंबई महानगरपालिकेचे मलप्रवाह शुध्दीकरण केंद्र दाखवण्यात आले. घराघरातून येणारे घाण पाणी एकत्र आणून त्यावर रासायनिक व जैविक प्रक्रिया करणाऱ्या मोठाल्या टाक्या तेथे पहायला मिळाल्या. उपद्रवी घाणपाण्याचे रूपांतर तेथे उपयोगी निर्दोष पाण्यात व ज्वलनशील वापरयोग्य वायूत होई. त्या केंद्रातून दादर परिसरातील रहिवाशांना थेट स्वयंपाकघरात नळ्यानळ्यांमधून इंधनवायूचा पुरवठा होत होता. स्वच्छ झालेले पाणी समुद्राला जात होते.

पुढील आयुष्यात अशी व्यवस्था पुन्हा कोठे पाहण्यात आली नाही. उलट काही वर्षांनंतर हे प्रगत केंद्र कोणत्या तरी निमित्ताने बंद करण्यात आल्याचे कळले, तेव्हा फार वाईट वाटले. आता लक्षात येते की मध्यंतरीच्या काळातील अशा काही अदूरदर्शी निर्णयांची कटुफळे आपण समुद्र किनाऱ्याकाठी व मुळामुठा, यमुना अशा नद्यांतील प्रदूषित प्रवाहांच्या रूपात भोगत आहोत.

पुढे लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेतून सरकारी नोकरीला लागल्यानंतरची सार्वजनिक बांधकाम विभागांतील पहिली दोन वर्षे हा प्रशिक्षणाचा काल म्हणजे अभियांत्रिकी व्यवस्थांचे, बांधकामाचे व समाजाचे निरीक्षण करण्याचा मुक्त काळ होता. त्या काळात धुळे जिल्ह्यांत तापी नदीवर सारंगखेडे येथे मोठा पूल बांधायचे काम चालू होते. तेथे प्रशिक्षणार्थी म्हणून नेमणूक झाली. तापी नदीच्या काठी या कामासाठी बांधलेल्या सरकारी सामानाच्या गोदामात तात्पुरती व्यवस्था करून तीन महिने राहिलो. तापी सारख्या मोठ्या नदीच्या काठी सलगपणे वावरण्याचा हा पहिलाच अनुभव, तोही उन्हाळ्याच्या दिवसात.

तापी नदीचे रूंद विशाल पात्र - पण त्या मानाने अगदीच चिंचोळा वाटणारा नदीचा प्रवाह. प्रवाहाच्या काठी उभे राहिले की तो मोठा दिसे, पण नदीपात्राच्या उंच काठावरून त्याच्याकडे पाहिले की, ती नागमोडी धारा छोटीशी वाटे. नदीचे काव्यांतले वर्णन व प्रत्यक्ष दर्शन यातील तफावत जाणवली. दुथडी भरून वाहणारी तापी नदी ओलांडायची आहे अशा हिशोबाने पुलाची उंची ठरवलेली होती. नदी पात्रांत उभे राहिले की, आपण किती छोटे आहोत हे जाणवे, पुलाच्या खांबांच्या जाडीच्या व उंचीच्या तुलनेत व नदी पात्राच्या एकूण आकाराच्या तुलनेत.

धुळे जिल्ह्यांतील प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून नंतर पांझरा नदीवरचे बंधारे व तेथील सिंचनाची फड पध्दत यांचे निरीक्षण करण्याची संधी मिळाली. त्यावेळी विश्वैश्वरय्यांच्या तेथील योगदानाची व त्यांनी केलेल्या दुरूस्तीच्या कामांची माहिती घेण्याचा योग आला. पांझरा तशी तापीचीच एक उपनदी. तापी पेक्षा खूप लहान. पण अनेक शतके सिंचनाचा लाभ मिळालेले ते पांझराचे खोरे, त्यामुळे सर्व परिसर समृध्द. तापीच्या रूक्ष काठांवरून पांझरेच्या काठांवर येताच फरक लक्षात आला. नजरेत भरणारे ते सिंचन विकसित प्रदेशाचे नेत्रसुखद दर्शन मोहक होते. उन्हाळ्यांतही वहाते असणारे कालवे व भोवतीची हिरवीगार शेते. या उलट तापीचा काठ चांगल्या काळ्या मातीच्या शेतीचा, पण उन्हाळ्यांत रणरणता ठार कोरडा. तापीचे निसर्गातले रूप बरेचसे तसेच कायम होते. पांझरेचे रूप मात्र मानवी कल्पकतेने व व्यवस्थापन कौशल्याने बदललेले होते. पांझरेच्या पाण्याने एका समृध्द परिसराला जन्म देवून त्याला शतकानुशतके तसे सांभाळण्याचे व्रत चालू ठेवले होते.

पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यामुळे तत्कालीन ब्रिटीश सरकारच्या नियमांप्रमाणे विश्वैश्वरय्यांना सरळ प्रवेशाने भारतीय अभियांत्रिकी सेवेच्या पहिल्या श्रेणीत घेण्यात आले होते. त्यांची पहिली नेमणूक धुळ्याला उपविभागीय अभियांत्रिकी अधिकारी - म्हणजे सहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणून झाली होती. त्या काळात ब्रिटीशांनी बांधलेल्या ज्या उपविभागीय अभियांत्रिकी कार्यालयात ते बसत होते त्याच जागेत महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय चालत होते. त्या प्रेरणा स्थळाचे मला धुळ्यांत दर्शन घडले. दोन वर्षांपूर्वीच विश्वैश्वरय्यांना भारतरत्न या पद्मपुरस्काराने गौरवण्यात आले होते.

विश्वैश्वरय्यांनी दुरूस्त केलेला बंधारा व त्या कालव्यावरची उपवाहिनी (Syphon) पहाण्यासाठी त्या कामांची देखभालदुरूस्तीची जबाबदारी असणाऱ्या कनिष्ठ अभियंत्याबरोबर मी निघालो, तो जूनचा महिना होता. पावसाची भूरभूर सुरू झाली होती. त्या कामापर्यंत पोचायचे म्हणजे वाटेतला एक नाला ओलांडून जावयाचे होते. सिंचित क्षेत्रातील नाला असल्याने त्यातून पाणी वहात होते. नाल्यावर पूल नव्हता. मोटार सायकलवर मला पाठीमागे बसवून तो शाखाधिकारी चालला होता. अनवधानाने नाल्यातील एका दगडावरून मोटार सायकल घसरली. मोटार सायकलसकट आम्ही दोघेही पाण्यात पडलो. थोड्याशा प्रयत्नांनी मोटारसायकल पुन्हा उभी करून तिला ढकलत पैल तीरावर नेले, पुढे पायीच चालत गेलो.

मनात आले, पासष्ट वर्षांपूर्वी त्या परिसरात वहातुकीची काय व्यवस्था असणार ? विश्वैश्वरय्या बहुधा घोड्यावरूनच गेलेले असणार. घोडा बाळगण्यासाठी त्या काळात पगारा व्यतिरिक्त अश्व - भत्ता मिळत असे. आश्चर्य म्हणजे स्वातंत्र्यानंतर दहा वर्षे उलटून गेल्यावरही पायचाकी दुचाक्या किंवा यंत्रचाकी (मोटारसायकल) वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांना जो प्रवास भत्ता मिळे तो 'अश्वभत्ता' या शीर्षकाखालीच चालू राहिला होता. स्वातंत्र्यानंतरच्या व्यवहारांमध्ये व नियमावलींमध्ये जे तातडीने बदल व्हायला हवे होते, त्याबाबत प्रशासन व्यवस्था उदासीन होती. पुढे नोकरीत असतांना ही उणीव मला अनेक बाबतीत पदोपदी अनुभवायला येणारच होती.

धुळे शहर हे त्या काळात ब्रिटीशांचे लाडके असावे. त्या शहराच्या विस्ताराची आखणी जिल्हाधिकारींनी स्वत: केली होती. शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी स्वतंत्र साठवण तलावाचीही निर्मिती केली होती. तेथून धुळेकरांसाठी पाण्याचे नळ टाकले होते. नदी काठी असलेले गाव, पांझरेचे कालवे शहराला खेटून वहाणारे तरी नागरी पाणी पुरवठ्यासाठी धुळेकर नदीवर व कालव्यावर अवलंबून राहू नयेत म्हणून ब्रिटीशांनी स्वतंत्र तलाव बांधला होता.

विश्वैश्वरय्यांच्या तेथील वास्तव्यानंतरच्या काळात धुळे शहराचा उत्तरोत्तर विस्तार होत गेला. मुळचे गाव हे नदीपासून आदरयुक्त अंतर ठेवणारे होते. पण नागरी स्वायत्त संस्था त्या गावाच्या व्यवस्थापनासाठी निर्माण झाल्यानंतर थेट नगरपालिकेच्या नजरेखाली असूनही ते अनियंत्रितपणे नदीच्या दिशेने पसरत राहिले. पांझरेचा कालवा ओलांडून थेट नदी काठापर्यंत पोचले. दीर्घकाळ सिंचित क्षेत्र असलेल्या जमिनींवर दाटीदाटीने बांधलेल्या इमारती वाढत जावून धुळे कालव्याखालची सारी जमीन नागरी क्षेत्र म्हणून रूपांतरित झाली, ते पाहून वाईट वाटले. अनिर्बंधित नागरीकरणाच्या प्रक्रियेतून आपण कसे जात आहोत याचे पहिले दर्शन तेथे घडले.

1958 पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागातच पाटबंधारे व्यवस्था व नागरी पाणी पुरवठा जबाबदारी सामावलेली होती. त्यामुळे धुळ्यानंतर माझी बदली प्रशिक्षणासाठी पुण्याच्या पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण विभागात झाली. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा काळ 1956 मध्ये सुरू झाला होता. शेती विकासासाठी सिंचन प्रकल्पांना प्राथमिकता होती. पण कामे हाती घेण्यासाठी सिंचन प्रकल्पांच्या तपशीलवार योजनाच तयार नव्हत्या. केवळ रस्ते इमारतींच्या जुजबी बांधकामात किंवा दुरूस्ती देखभालीत वाढलेल्या व त्यामुळे मूलत: नागरी सुखवस्तू जीवनात रूळलेल्या मागच्या पिढीतील अभियंत्यांना आडवळणी जावून तेथे राहून धरणाच्या जागांचे सर्वेक्षण करणे, कालव्यांच्या संरेखा ठरवणे ही क्षेत्रीय कामे अवघड व जिकीरीची वाटत होती.

अशा कामांवरील अभियंत्याचे आयुष्य म्हणजे वाहनांमध्ये तंबू भरायचे, मुक्कामाला लागणारे शिधा साहित्य घ्यायचे व निघायचे, रानावनांत वस्ती करून रहायचे. यासाठी काही प्रोत्साहन नव्हते, शाबासकी नव्हती, किंवा मार्गदर्शन नव्हते. शासकीय आदेश मानून कर्मचाऱ्यांनी अशा कामावर रूजू व्हायलाच हवे अशी अधिकारवादी भूमिका बहुसंख्य वरिष्ठांची होती. अशा उपेक्षित कर्मचाऱ्यांबरोबर, अभियंत्यांबरोबर हिंडतांना त्यांच्या व्यथा ऐकायला मिळत. ज्यांच्या क्षेत्रीय मोजणीच्या आधारावर मोठाल्या प्रकल्पांची मांडणी व्हायची आहे ती मोजणी व तिची क्षेत्रीय वस्तुस्थिती प्रत्यक्ष तेथे जावून वरिष्ठांनी पहाण्याची काहीच पध्दत अस्तित्वात नव्हती हे लक्षात आले. कनिष्ठ अभियंता व उपअभियंता यांच्यावरच अन्वेषणाचे बरेचसे काम सोडून दिलेले असे. त्यामुळे पाण्याचे हिशोब, नदी प्रवाहांची मोजणी यात बरेच कच्चे दुवे असावेत असे जाणवले. कार्यकारी अभियंता अशा मोजणीची क्षेत्रीय छाननी क्वचितच करीत असावेत. अधीक्षक अभियंत्यांनी अन्वेषण कामांची क्षेत्रीय तपासणीला जाण्याचा तर प्रश्नच नव्हता.

प्रकल्प अन्वेषणासाठीच्या प्रशिक्षण काळातील सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे ब्रिटीश इंजिनिअर बील यांचा गाजलेला अहवाल मुळात समग्र वाचायला मिळाला. मुंबई प्रांतातील 1899 - 1901 च्या भीषण दुष्काळानंतर सरकारी सेवेतील अधीक्षक अभियंता मि. बील यांना दुष्काळी प्रदेशाला दिलासा देता येईल अशा सिंचन प्रकल्पांचा शोध घेण्याचे काम सोपवले गेले होते. त्या कामात बील यांनी अक्षरश: जीव ओतला. तत्कालीन मुंबई प्रांतातील सह्याद्रीच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतचा पूर्व उताराचा सारा प्रदेश त्यांनी पिंजून काढला. अनेक संभाव्य धरण स्थळांना स्वत: भेटी देवून, त्यांचे प्राथमिक सर्वेक्षण करून, पाण्याच्या उपलब्धतेचे आडाखे बांधून, कालव्यांच्या विस्ताराचा अंदाज घेवून - सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या सर्व नद्यांचा कसा उपयोग करून घेता येईल याबाबतचा विस्तृत अहवाल त्यांनी तयार केला. त्याला या नद्यांचे नकाशे जोडले. त्या अहवालात व्यक्त झालेली बीलची दूरदृष्टी, समग्रता, अथक परिश्रम हे सारे वाचून मी फार प्रभावित झालो, नतमस्तक व्हायला झाले. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर नदी खोऱ्यांमधील सिंचन विकासाची मांडणी करायला या अहवालाचा पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण विभागाला फार उपयोग होत होता.

नंतरचा प्रशिक्षणात्मक अनुभव गोदावरी नदीवरील बांधकामाच्या अंतिम टप्प्यांत असलेल्या गंगापूर प्रकल्पावर आला. ज्या मातीच्या धरणाचे बांधकाम यंत्रांनी केल्याबद्दलचे प्रभावी व्याख्यान अभियांत्रिकीचा विद्यार्थी या नात्याने मी महाविद्यालयात ऐकले होते, ते धरणाच्या भरावाचे मातीकाम पूर्ण झाले होते. यंत्रे हलली होती. पण कर्मचाऱ्यांची तात्पुरती वसाहत अजून रिकामी उभी होती. नदीप्रकल्पांच्या बांधकामावर आयुष्य घालवणाऱ्यांच्या वाट्याला कशाप्रकारची राहाणी येत होती, हे पाहून धक्का बसला. पत्र्याची, बांबूच्या कुडांची झोपडीवजा घरे पाहून प्रश्न पडला, ' कोणत्या प्रेरणेतून ही माणसे येथे येवून जवळपास उघड्यावरच संसार थाटून चार - पाच वर्षे राहिली, उन्हा - पावसात - थंडीत वावरली ?'

मातीच्या धरणाच्या एका अंगाने काढायचा सांडवा गंगापूरला मला पहिल्यांदाच पहायला मिळाला. धरणामागे पुरेसे पाणी साठल्यावरही नदीत वरून आणखी पाणी येत राहिले किंवा पुराचे पाणी आले तर धरणाच्या बाजूने ते सुरक्षितपणे धरणाला अपाय न करता निघून जाण्यासाठी केलेली ही रचना. सांडव्यापासून उंचीवरून वाहू लागलेले नदीचे नवनिर्मित पात्र हिंडून पाहिले. सांडव्या जवळच्या नदी काठच्या उंचीवरून नदीपात्राच्या मूळ पातळीपर्यंत उतरायचे म्हणजे सांडव्यावरून वहाणाऱ्या पाण्याला उतार फार, वेगही फार. पुराच्या वेळी त्या उंचीवरून धावत घोंघावत खाली येणारे पाणी वाटेतील माती - खडक यांना किती ओरबाडत जाते हे पहायला मिळाले.

भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणली तेव्हा उंचीवरून येणाऱ्या पाण्याने हिमालयाला फार ओरबाडू नये म्हणून शंकराला आपल्या जटांमध्ये गंगा अडवून ठेवावी लागली होती. गोदावरीवरील धरणाचा नवा सांडवा वाहून तशी तीन चार वर्षेच झाली होती. तरी त्या नव्या उतरणीवरच्या नदीपात्राची 'उधवस्त' अवस्था झाली होती. दरवर्षी नव्या नदी पात्राचे असे धुपणे होत गेले तर हे नवे पात्र खोल खोल जात जात धरण रेषेपर्यंत मागे पोचेल व धरणामागे तयार झालेल्या जलाशयाला सांडव्याच्या ठिकाणी खिंडार पडेल ही भीती असते. गंगापूर धरणाचा सांभाळ करणाऱ्या अननुभवी अभियंता चमूला ही विवंचना अस्वस्थ करीत होती. नव्या पूरपात्राचे झरणे कसे रोखायचे याबाबत त्यावेऴी त्यांच्याजवळ काही उत्तर नव्हते. मोठ्या प्रकल्पांच्या नव्या पध्दतीच्या रचनांना आपण सामोरे जात होतो, तेव्हा त्यातून पुढे येणारे असे नवे प्रश्न अस्वस्थ करीत होते.

गंगापूर नंतर मातीचे मोठे धरण घोड नदीवर बांधले गेले. तेथे नदीचा व पुराचा प्रवाह गंगापूरच्या गोदावरीपेक्षा कितीतरी पट जास्त. त्यामुळे सांडव्यावरून वाहणाऱ्या नदीच्या पाण्याने व पुरांनी सांडव्या खालच्या नदीच्या नव्या पात्राची मोठ्या प्रमाणात धुळधाण केली होती. प्रशिक्षण काळातील माझी पुढील बदली योगायोगाने घोड प्रकल्पावर झाली. तेथे नदीचे नव्या उंचीवरून वहाणारे पाणी केवढी उचापत करते हे पाहायला मिळाले. हे असे अनेक ठिकाणी झालेले नंतरच्या दशकांत जसजशी मातीच्या धरणांची निर्मिती वाढली तसे तसे पाहाण्यात आले. क्षेत्रीय अभियंत्यांनी सांडवा मार्गाच्या धरणाच्या ठेवलेल्या नोंदीवरून स्पष्ट झाले की, पहिल्या दोन तीन पुरांमध्ये भूपृष्ठाची जेवढी हानी होते, तेवढी पुढे पुढे होत नाही. कमी कमी होत जाते. 15 - 20 वर्षांनंतर बरीचशी संतुलित स्थिती नव्या प्रवाह मार्गावर तयार होते.

भूस्तरशास्त्रीय माहिती व जलशास्त्रीय विश्लेषण यांच्या संयुक्त उपयोगातून सांडव्या खालच्या नवनिर्मित पात्रांच्या दीर्घकालीन अवस्थेचा आगाऊ अंदाज करण्याचे वैज्ञानिक तंत्र मात्र अजूनही नीट विकसित करता आलेले नाही. त्यासाठी आवश्यक असणारे अनेक सांडव्यांवरच्या निरीक्षणांचे दीर्घकालीन सातत्य पाटबंधारे विभागाला टिकवता आलेले नाही. अशा निरीक्षणांचे विश्लेषण करणारी व्यवस्थाही अजून नीट उभी करता आलेली नाही. अगदी अलीकडच्या एका प्रथितयश जाणकार अभियांत्रिकी प्राध्यापकाने लिहिलेल्या 'सांडवा' या विषयावरील उत्तम पुस्तकांतही सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्याने होणारी नदीची नवपात्र - निर्मिती याबाबत मौन बाळगलेले पाहिले तेव्हा महाराष्ट्रातील जल - अभियांत्रिकीच्या सध्याच्या मर्यादा पुन्हा एकदा स्पष्ट झाल्या. अभियांत्रिकीचे प्राध्यापक व क्षेत्रीय प्रश्न यांची सांगड अजूनही घालता आलेली नाही.

गोदावरीवरील गंगापूर धरणाला उजव्या अंगाने काढलेल्या कालव्याचे, वितरिकांचे व विमोचकांचे चालू असलेले बांधकाम समजावून घेणे हेही माझ्या प्रशिक्षणाचा एक भाग होता. कालव्यांची क्षेत्रीय आखणी, मोजणी, कालव्यावरील छोटी मोठी बांधकामे, विमोचके हे सर्व मी प्रथमच पाहात होतो - शिकत होतो. धरणाची वास्तु मोठी असल्याने लक्षवेधी असते पण धरणामागचे पाणी वितरण व्यवस्थेतून शेतांपर्यंत पोचवणाऱ्या कृषि विकासाच्या या धमन्या किती कुशलतेने निर्माण कराव्या लागतात हे चटकन लक्षात येत नाही. सिंचन विस्ताराचे हे अंग अजूनही पुष्कळ प्रमाणात उपेक्षित राहिले आहे. या कामासाठी शेतरानांतून उन्हातान्हात पायपीट करणारे अभियंते हे सुध्दा उपेक्षित राहिले आहेत. धरणाच्या कामावरील नेमणूक ही मानाची. ती प्रतिष्ठा काही आपल्याला नाही ही बोचरी जाणीव वितरिकांच्या कामावर नेमलेल्या अभियंत्याबरोबर हिंडतांना त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झाली.

नोकरीतील पुढच्या आयुष्यात नाशिकला अधून मधून जाणे होई. तेव्हा नवविकसित विस्तारित नाशिक आकर्षक दिसे. देशाच्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात परिश्रमपूर्वक नाशिकजवळ निर्माण केलेले सिंचन क्षेत्र मात्र नाहीसे होवून त्याचे नागरी क्षेत्रात रूपांतर झाले आहे हे पाहून वाईट वाटे. 1955 ते 1960 या काळात तेथे सिंचन विस्तारासाठी झटलेल्या अभियंत्यांची आठवण होई. सरकारी पैसा वाया गेला याचे दु:खही वेगळेच. धरण बांधणीमुळे त्या अगोदर वाहाती दृष्य असणारी गोदावरी नव्या रूपांत कालव्यांमधून व शेतचाऱ्यांमधून वहातांना पहायला मिळावी हे स्वप्न तेथे पुसले गेले होते.

गंगापूर प्रकल्पावरील माझ्या प्रशिक्षणाच्या काळात तत्पूर्वीचा गंगापूर धरण बांधणीच्या काळातला जोश ओसरल्याचे जाणवे. उत्साही कार्यक्षम अभियंत्यांची व त्यांच्या इतर साथीदार कर्मचाऱ्यांची घोड प्रकल्पावर बदली झाली होती. त्यांच्या जागी जे अधिकारी गंगापूर प्रकल्पातील पदांवर बदलून आले होते ते विकासप्रवण वाटले नाहीत. अधिकारी पातळीवर सर्व आरामात चालू होते. सांडवा मार्गाची होणारी धूप, किंवा सांडव्यावर आधुनिक वक्राकार दरवाजे बसवण्याचे घाटत होते - त्याबद्दलचे तंत्रवैज्ञानिक कुतूहल, किंवा वितरिका विस्तारांत शेतकऱ्यांशी आवश्यक असणारा संवाद याबद्दल ते उदासीन होते. कार्यालयांतून 10 -11 वाजता क्षेत्रीय निरीक्षणासाठी म्हणून बाहेर पडायचे, पण कधी एखाद्या उपअभियंत्याच्या घरी थांबून तर कधी प्रकल्पाच्या क्षेत्रीय चौकीत अथवा विश्रामशाळेत जावून पथक पत्यांचा ब्रिजचा डाव मांडून 3 -4 वाजेपर्यंत तेथेच रमायचे व नंतर सायंकाळी थातुर मातुर काम उरकून पुन्हा रूबाबात कार्यालयांत परत यायचे असा दिनक्रम होता. त्यांच्या बरोबरची वैयक्तिक मैत्री आणि सलगी यामुळे त्यांच्या गटात मीही 8 - 10 दिवस तशा दिनक्रमात सामील झालो. त्यांतील निरर्थकता जाणवून नंतर हळूच पाय मागे घेतला.

त्या ऐवजी त्यांच्या कार्यालयांत व कार्यकारी अभियंत्याच्या टेबलासमोर कॉफीपान करीत गप्पा मारत बसू लागलो. त्यातून मला बांधकाम व्यवस्थेतील 'फुटकळ ठेकेदारी' या खात्यामधल्या कार्यपध्दतीची चांगली माहिती मिळाली. छोटी छोटी कामे या फुटकळ ठेकेदारांना वाटून दिलेली असत. त्यातील तांत्रिक तपशील समजावून घेण्यासाठी ते छोटे ठेकेदार - कनिष्ठ अभियंत्यांना भेटायला आलेले असत. रस्त्यांंच्या, कालव्यांच्या वितरिकांच्या कामांचा क्षेत्रीय उरक या माध्यमातून चाले हे लक्षात आले. या व्यवस्थेवर कनिष्ठ अभियंत्यांची मुख्यत: चांगली पकड असे. त्यातील चिरीमिरीचे किस्सेही या गप्पांमध्ये मला ऐकायला मिळत.

गंगापूर प्रकल्पावरील वास्तव्यांत खात्यांतील अभियंत्यांच्या तीन वेगळ्या धारा स्पष्टपणे लक्षात आल्या. उत्साहाने आघाडीवर असणारे अभियंते, ज्यांनी महाराष्ट्रातील पहिल्याच मातीच्या मोठ्या धरणाची यांत्रिकी पध्दतीने उभारणी केली होती - व नंतर घोड धरणाच्या उभारणीसाठी गेले होते - हा कौतुकाचे वलय लाभलेला पहिला गट. दुसरा गट हा शासकीय सेवेतील प्रतिष्ठा, अधिकार यांचा यथेष्ट उपभोग घेणाऱ्यांचा होता. स्वातंत्र्यपूर्वकाळातील गेल्या पिढीच्या सरंजामशाही ब्रिटीश परंपरेचे वारस असल्याप्रमाणे त्यांचे रहाणे - वागणे होते. या दोन गटांच्या छत्राखाली काळ पाहून वागणाऱ्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा व्यवहार चतुर असा तिसरा गट होता. व्यवस्थेला लागणारी किमान गतिमानता समयानुरूप हजरजबाबी वृत्तीने ते सांभाळत होते. पुढील आयुष्यांत या तिन्ही गटांशी वेगवेगळ्या संदर्भात सतत संबंध यायचा होता.

नंतर माझी घोडप्रकल्पावर बदली झाली तेव्हा तेथील मातीच्या धरणाचे मुख्य काम बरेचसे आवरले होते. प्रकल्पाच्या कालव्यांचे काम मुख्यत: चालू होते. श्रीगोंदे तालुक्यात लिंपणगाव नावाच्या खेड्याजवळ त्या प्रकल्पाची उपविभागीय वसाहत होती. गंगापूर वसाहतीच्या दयनीय स्थितीनंतर बरीच सुधारणा झाल्याचे जाणवले. अशा सुधारित वसाहतीत तीन महिने राहायला मिळाले.

गंगापूरच्या कालव्यांवरील प्रशिक्षणाचा पुढचा अध्याय येथे सुरू झाला. अवर्षणप्रवण क्षेत्रातील दुष्काळी गावे कशी दिसतात, तेथील कोरडवाहू तथाकथित शेती मूलत: काय अवस्थेत असते, याचे घोड कालव्याच्या प्रस्तावित लाभक्षेत्रात मला प्रथमच दर्शन घडले. प्रकल्पाचा खटाटोप हा नेमका कोणासाठी चालला आहे - हे जवळून पहायला मिळाले. कालव्याची व विकरिकांची संरेखा निश्चित करतांना काही शेतकऱ्यांनी दाखवलेला समजूतदारपणा तर काहींनी आडमुठेपणाने सर्वेक्षण व आखणी करणाऱ्या अभियंत्यांशी घातलेली कटु हुज्जतही पहायला मिळाली. सर्व समाज एकाच धारणेचा नाही, एकाच मानसिकतेचा नाही. त्यांच्यातले चांगले वाईट त्या त्या प्रकारे हाताळत क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मार्ग कसा काढावा लागतो हे न्याहाळता आले.

आश्चर्य याचे वाटत राही की कनिष्ठ अभियंता - उपअभियंता त्यांची क्षेत्रीय कामे सांभाळून मधून मधून कार्यकारी अभियंत्यांच्या नगर येथील कार्यालयात कामाचा अहवाल द्यायला, मजुरांचा पाठपुरावा करायला जात असत. कार्यकारी अभियंता मात्र त्या तीन महिन्यात एकदाही कालव्याच्या लाभक्षेत्रात आलेले मी पाहिले नाही. हे असेच असते, असे मात्र प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येई.

अलिकडेच दोन वर्षांपूर्वी त्या दुष्काळी पाड्याचे 55 वर्षांनंतर बदललेले विकसित रूप पहाण्याचा योग आला. नव्याने गजबजलेले श्रीगोंदा गाव पाहिले. नव्या पक्क्या घरांमध्ये राहाणारी ग्रामस्थ मंडळी पाहिली. घोड नदीच्या साठवलेल्या पाण्यातून निर्माण झालेले हे नवे हिरवे विश्व पाहून डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. प्रकल्पाच्या माध्यमातून घोड नदी, लोककल्याणकारी मंगलरूपांत कशी प्रवर्तित झाली आहे याचे यथार्थ दर्शन घडले.

माझ्या प्रशिक्षणाचा पुढचा टप्पा हा पानशेत धरणाच्या बांधकामाच्या 'वसाहती' त 1957 अखेरनंतर तीन महिने पार पडला. प्रकल्पाची वसाहत उभी राहिली नव्हती. डोंगर उतारावर वसाहतीसाठी काढायचे रस्ते नीट तयार नव्हते. धरणाच्या बांधकामावर नेमलेल्या तीन उपअभियंत्यांबरोबर एका 5 मीटर ज्र् 5 मीटर आकाराच्या मंडपवजा पत्र्याच्या खोलीत मी राहात होतो. कार्यकारी अभियंता पुण्याहून मुक्कामाला आले की, त्या खोलीला जोडून बांधलेल्या एका छोट्याशा खोलीत उतरत. सर्वांचे एकत्र हसणे, खिदळणे, जेवणे व त्यासोबत कामाची अखंड चर्चा असा दिवस केव्हाच संपे. मित्रत्वाचे वातावरण होते.

पण नीट पूर्वतयारी होण्यापूर्वीच आपण येथे धरणाच्या पायाची खोदाई का सुरू केली याचा मला कधी बोध झाला नाही. हा कामाचा उत्साह व ही विकासाची प्रेरणा असे समजायचे का काही इतर अदृश्य प्रभाव येथे सर्वांना पुढे रेटत आहे - याचा नीट उलगडा झाला नाही. 1956 ते 1960 या कालखंडातील दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत समाविष्ट झालेला हा प्रकल्प आहे व तो लवकर व्हायला पाहिजे एवढेच अधून मधून सर्वांकडून कानावर येई.

जेथे धरण बांधायचे होते, तेथे हिवाळ्यातील त्या दिवसात नदी दिसत नव्हती. एखादा छोटासा झरा वहाता असावा इतपतच स्थिती होती. एका छोट्या चारीतून ते पाणी धरणस्थळाच्या बाजूने सहजपणे वळवले गेले होते. डोंगर - कुशीतले हे धरण स्थळ. गंगापूर व घोड ही दोन्ही धरणस्थळे उघड्यावर मोकळ्यावर होती. पानशेतच्या टेकड्यांना उतार खूप. पावसाळ्यात पाऊस खूप पडतो असे तेथे बोलले जाई. तो साठवून ठेवण्यासाठी एक मोठे धरण तेथे आवश्यक होते.

एव्हाना परिवीक्षाधीन काळाचे माझे दीड वर्षे संपत आले होते. नियमाप्रमाणे मला आता प्रत्यक्ष जबाबदारीचे काम देणे आवश्यक होते. ते तसे दिले गेले, पुलांची संकल्पचित्रे तयार करणाऱ्या विभागात मुंबईला. तापीवरचा सारंगखेड्याचा पूल पूर्वप्रबलित काँक्रीटच्या नव्या तंत्राने बांधण्यात येत होता. त्यावर माझे तीन महिने प्रशिक्षण झाले होते. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत पुलांची अनेक कामे एकदम हाती घेण्याचे चालले होते. नव्या तंत्राने ती द्रुतगतीने होण्यासाठी नव्या अधिकाऱ्यांची संकल्पचित्र विभागात गरज होती. गांधी - मी - मीराणी असे प्रथम श्रेणीत सरळ सेवा प्रवेशाने लोकसेवा- आयोगाकडून निवड झालेले - अधिकारी या कामासाठी मुद्दाम वळते करण्यात आले.

तेथे नद्यांचे अभ्यास वेगळ्या संदर्भात करणे सुरू झाले. नदीवरची पुलाची जागा ठरवायची कशी ? किती ? तिला किती पूर येणार ? पूल कीती उंच हवा ? महत्तम संभाव्य पूर म्हणजे काय ? एवढ्या पुराचे पाणी पुलाखालून कसे, किती जाणार ? अशा अभ्यासामधून एक गोष्ट स्पष्ट होत चालली होती. सर्वसाधारण पुरापेक्षा संभाव्य महत्तम पूर फार मोठा असतो - जवळपास दीडपट. पण तो तर कधी तरी येणार. त्या स्थितीसाठी पूल बांधायला हवा का ? पूल रचनेत हातखंडा असलेले तत्कालीन अधीक्षक अभियंता नातूसाहेब निमग्नता सुरक्षित पुलांची Submersible bridge नवी कल्पना पुढे रेटत होते.

नाशिकला वळण घालून जावयाच्या आग्रा रस्त्याच्या पुलाच्या संकल्पचित्राचे काम माझ्याकडे देण्यात आले. नदीच्या पाण्याचा पूरस्थितीतील विसर्ग हा नदीपात्रातल्या मध्यवर्ती 30 टक्के भागातून 70 टक्के जातो व काठावरच्या 20 टक्के भागातून केवळ 5 टक्के असतो असे लक्षात आले होते. या विश्लेषणाच्या आधारावर पुलाची लांबी - उंची सीमित करून त्या निमग्नता सुरक्षित पुलांची काटकसरी रचना ठरवण्यात आली. नंतर त्याप्रमाणे त्याचे बांधकामही झाले. अजून तो पूल चांगली सेवा देतो आहे, याचे त्या पुलावरून जाता येतांना आता समाधान वाटते. पूरस्थितीतले नदीचे रूप हा आकलनाला अजूनही अवघड विषय राहिला आहे. एक तर अक्राळविक्राळ रूप धारण केलेल्या नदीच्या मध्यभागातल्या पाण्याची तीव्रगती अजून नीट मोजता आलेली नाही. शिवाय वर्षनिहाय वरूणराजाचा बदलता लहरीपणा- त्याचे सांख्यिकीय अपुरे विश्लेषण. त्यात भर म्हणजे नदीपात्रावर होणारी मानवी आक्रमणे, किंवा भूस्खलनामुळे व जमिनीची धूप होत राहिल्याने वाढत जाणारे नदीपात्राचे आकुंचन - यांतून निर्णयकर्त्याला वाट काढावी लागते.

मराठवाडा महाराष्ट्रात समाविष्ट झाला तेव्हा मराठवाड्यातील नद्यांवर पूल नव्हते. रस्त्यासाठी खुद्द गोदावरीवरच पूल नव्हते. त्याकरीता पूल बांधणीचा मोठा व्यापक कार्यक्रम तातडीने हाती घेणे आवश्यक होते. त्यादृष्टीने संकल्पचित्रांच्या वाढत्या कामाची गरज अजमावण्यासाठी मराठवाड्यातील नद्यांची प्राथमिक पहाणी करण्याचे काम माझ्याकडे आले. त्या निमित्ताने मला मराठवाड्याचे पहिले विस्तृत दर्शन घडले. जळगाव, धुळे, नाशिक, नगर, पुणे या पूर्वविकसित प्रदेशात आजवरचे माझे आयुष्य गेले होते. त्यामुळे रस्ता वाहतुकीच्या प्राथमिक सोयी नसलेला मराठवाडा पाहून मी चक्रावून गेलो.

मला परिचित असलेल्या प्रदेशात सह्याद्रीतून येणाऱ्या व आखीव दरीतून शिस्तबध्द रीतीने वाहणाऱ्या नद्यांपेक्षा मराठवाड्यातील नद्यांचे रूप अगदी वेगळे आहे. त्यांची पात्रे तुलनेने अधिक रूंद व सखल आहेत. अशा नद्यांतील पुरांच्या गत दशकांमधल्या उंचीची किंवा एकूण प्रवाहाची काही मोजणी झालेली नाही, नद्यांबाबतची फारशी माहिती उपलब्ध नाही. अशाप्रकारे सर्वार्थाने उपेक्षित नद्या - व उपेक्षित प्रदेश. ब्रिटीश अंमलाखाली राहिलेल्या प्रदेशांना पारतंत्र्य असले तरी आधुनिक प्रकल्प मोजणी, माहिती विश्लेषण - निरीक्षण - सर्वेक्षण अहवाल यांची परंपरा मिळाली होती. ती निर्माण करण्यापासून मराठवाड्यांतल्या कामांचा प्रारंभ करायचा होता. नद्यांतील प्रवाहांची मोजणी करण्याची ठिकाणेच मराठवाड्यात नव्हती.

(पुढे चालू)
डॉ. माधवराव चितळे, औरंगाबाद - मो : 09823161909

Path Alias

/articles/jalataranga-taranga-2-nadaicai-olakha

Post By: Hindi
×