जलतरंग - 6 : भुयारांतर्गत जलविद्युत साधना


महाराष्ट्राच्या विकासात अग्रेसरत्वाची भूमिका बजावणारा प्रकल्प म्हणजे कोयना जलविद्युत प्रकल्प, स्वातंत्र्यपूर्व काळापासून जाणकारांचे लक्ष असलेला व राजकीय धुरिणांनी ही उचलून धरलेला. गुंतागुंतीची अनेक भुयारांची गुंफण कुशलतेने हाताळून भुयारांतर्गत विद्युतनिर्मितीचे तंत्र देशात प्रथमच यशस्वीपणे त्यात राबवले गेले होते. या कामामुळेच महाराष्ट्राला आजवरचा जलविकास क्षेत्रातील जो एकमेव पद्मपुरस्कार मिळाला तो कोयनेचे मुख्य अभियंते श्री. ना.गो. कृष्णमूर्ती यांना. कोयनेचे आद्य शिल्पकार व पहिले अभियंता चाफेकर यांच्या पठडीत तयार झालेले मूर्ती.

महाराष्ट्राच्या विकासात अग्रेसरत्वाची भूमिका बजावणारा प्रकल्प म्हणजे कोयना जलविद्युत प्रकल्प, स्वातंत्र्यपूर्व काळापासून जाणकारांचे लक्ष असलेला व राजकीय धुरिणांनी ही उचलून धरलेला. गुंतागुंतीची अनेक भुयारांची गुंफण कुशलतेने हाताळून भुयारांतर्गत विद्युतनिर्मितीचे तंत्र देशात प्रथमच यशस्वीपणे त्यात राबवले गेले होते. या कामामुळेच महाराष्ट्राला आजवरचा जलविकास क्षेत्रातील जो एकमेव पद्मपुरस्कार मिळाला तो कोयनेचे मुख्य अभियंते श्री. ना.गो. कृष्णमूर्ती यांना. कोयनेचे आद्य शिल्पकार व पहिले अभियंता चाफेकर यांच्या पठडीत तयार झालेले मूर्ती. अशा प्रकल्पाचे पहिले दर्शन मी मुद्दाम जावून घेतले ते 1960 मध्ये प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम त्यावेळी पूर्ण भरात होते.

माझ्या पत्नीकडून आमच्या नात्यातले असलेले श्री. ढमढेरे तेथे कार्यकारी अभियंता म्हणून त्यावेळी कामात होते. त्यांच्याकडे मी सप्तनीक माझे वडील, धाकटा भाऊ सुरेश व आत्या यांना घेवून रहायला गेलो होतो. प्रकल्पाचा सर्व तपशील त्यावेळी लगेच पूर्णपणे नीट उपगडला नाही तरी त्या प्रकल्पाबद्दलची मनात असलेली आदराची भावना त्या भेटीनंतर दृढमुल झाली होती. त्यात पुढे आणखी भर पडत गेली ती त्या प्रकल्पाचे रचनाकार आनंद व निर्माते मूर्ती यांच्या हाताखाली काम करायची संधी मिळाली तेव्हा पानशेत फुटीनंतर पुण्याचा पाणी पुरवठा तातडीने मार्गस्थ करायच्या कामावर असतांना मुख्य अभियंता श्री. आनंदांबरोबर व नंतर मुळा धरणाच्या उभारणीच्या कामावर मी असतांना त्यावेळचे मुख्य अभियंता श्री. मूर्ती यांच्या बरोबर झालेल्या अनेक चर्चांमुळे केवळ तांत्रिक उत्तुंगता म्हणून नव्हे तर व्यवहारातील ऋजुता ही वैशिष्ट्ये कोयनेची परंपरा म्हणून मनावर ठसली होती.

प्रकल्पातून वीजनिर्मिती सुरू होवून कोयनेच्या भुयारातून पाणी वहायला लागल्यानंतर प्रथमच 1967 मध्ये होळीच्या वेळी कारखान्यांची विजेची मागणी कमी असते याचा फायदा घेवून प्रकल्पाची विद्युत निर्मिती पूर्णत: बंद ठेवून सर्व बोगदे व वीजयंत्रे आतून तपासण्याचा निर्णय घेतला गेला होता. त्यावेळी कोयनेचे संकल्पचित्र तज्ज्ञ अधीक्षक अभियंता श्री. कापरे यांनी मुद्दाम भातसा प्रकल्पावर मला निमंत्रण पाठवले की कोयना 'आतून' बघायला या. त्या संधीचा मला व्यक्तीश: खूप फायदा झाला. भुयारांतर्गत प्रकल्पाच्या रचनेतील अचुकतेच्या गरजा मनावर ठसल्या. याच प्रकल्पाच्या विस्तारातील एक भाग सांभाळण्याची जबाबदारी पुढे लवकरच माझ्याकडे येणार आहे हे नियतीच्या योजनेतले गुपित त्यावेळी उघडले गेलेले नव्हते.

कोयना भुकंपाचा धक्का पहाटे शहापूरला मला जाणवला होता. नंतर तेथील विध्वंसाची कल्पना वृत्तपत्रातून व खात्याच्या संपकमधून कळत होती. तेव्हा परिस्थितीच्या या आव्हानाला तोंड देण्यासाठी मलाही जावे लागणार आहे. हे प्रारंभी माहित नव्हते. शासनाचे तसे आदेश आले व प्रत्यक्ष तेथे रूजू होण्यासाठी निघालो, तेव्हा मनावर दोन प्रकारची दडपणे होती. एक कोयनेच्या गौरवान्वित परंपरेचे, मी त्या निकषांना उतरू शकेन का ? आणि दुसरे म्हणजे भूकंपाचे धक्के बसत असतांना प्रकल्पाच्या नव्या कामांना गती देता येईल का ? कोयना प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याची कामे अलोरे परिसरात चालू होती कोयना बोगदे मंडलाचा अधीक्षक अभियंता म्हणून अलोरे येथे रूजू होताच कामांची जी स्थिती पाहिली त्यात जे अनुकूल घटक लक्षात आले त्यातील एक महत्वाचा घटक म्हणजे प्रकल्पाची जी तिन्ही मोठाली कामे ठेक्यांवर दिली गेली होती त्यांचे सूत्रधार असणारे अभियंते, मजूर, यंत्रे कामावर हजर होती. त्यांच्या व्यावहारिक व वित्तीय अडचणी मात्र वाढल्या होत्या, पण त्यांचे मनोधौर्य टिकून होते. अशा परिस्थितीतही काम करीत रहाण्याची उमेद, ते सर्वजण बाळगून होते.

बोगद्यांच्या कामांचा अनुभव पाठिशी असलेली पटेल इंजिनिअरिंग कंपनी वयोवृध्द पण अनुभवी अशा संन्याल यांच्या नेतृत्वाखाली सर्वाधिक उमेद टिकवून होती. एस. बी. जोशी कंपनीने बोगद्यांचे अवघड काम प्रथमच अंगावर घेतले होते. त्यांच्या या कामाचे स्थानीय सूत्रधार अभियंते श्री. चाफेकर तशा परिस्थितीतही काम पुढे रेटण्याचा प्रयत्न करीत होते. पण कंपनीची वित्तीय स्थिती कोलमडलेली होती. मॅकीन्झीकडे असलेले प्रकल्पाच्या उघड्या अवजल कालव्याचे काम अनुभवी अभियंते श्री. आर्चिक शालांत परिक्षेत महाराष्ट्रात पहिले आलेले होते. कामावर निष्ठा ठेवून होते. पण कामाची मंदावलेली प्रगती त्यांना पुन्हा उंचावता येत नव्हती.

कामांना गती द्यावयाची म्हणजे काही अवघड निर्णय त्या परिस्थितीत अपरिहार्य होते. जोशींच्या ताब्यातील कामाला गती देण्यासाठी बोगद्याला दुसऱ्या बाजूने मधेच आणखी एक तोंड फोडून देणे व हे काम खात्यामार्फत स्वतंत्रपणे करून देणे आणि त्या बरोबरच त्यांना बिन व्याजी मोठी वित्तीय उचल देणे या दोन गोष्टी आवश्यक होत्या. एव्हाना कोयनेच्या पहिल्या- दुसऱ्या टप्प्यांच्या कामावर तयार झालेले श्री. देऊसकर साहेब यांच्याकडे कोयना प्रकल्पांचे मुख्य अभियंता म्हणून सूत्रे सोपवण्यात आली होती. त्यांना कामांच्या गरजांची पूर्ण कल्पना होती. त्यामुळे लगेच याप्रमाणे कारवाई झाली. तत्पूर्वीच दर परवडेनासे झाल्याने त्यांनी लवादाची मागणी केली होती. तीही स्वीकारली गेली होती. पण लवादाने दिलेला निर्णय व त्याचा आधार म्हणून देण्यात आलेले विवेचन पटणारे नव्हते. म्हणून तो निर्णय फेटाळावा लागला होता. त्यामुळे मुख्यत: खात्यामार्फतच काम करीत तो बोगदा पुढे सरकवावा लागत होता. अशा अवस्थेतही ठेकेदारांचे प्रकल्प प्रतिनिधी व खात्याचे अधिकारी यात बेबनाव व कटुता नव्हती. मतभेद शिल्लक ठेवूनच परिस्थितीला सामोरे जाणे चालले होते.

उघड्या अवजल कालव्याचे काम मात्र ढेपाळत गेले. त्यामुळे अंतिम उपाय म्हणून ठेकेदारांना कायदेशीर सूचना देवून त्याची यंत्रे खरोखरच अचानक पणे एका रात्रीत ताब्यात घेवून ते काम इतर नव्या छोट्या ठेकेदारांना वाटून देणे एवढाच पर्याय शिल्लक होता. सच्छील वृत्तीच्या आर्चिकांना त्यांच्या कंपनीच्या विरूध्द केलेल्या अशा कारवाईचे फार दु:ख झाले. मंत्र्यांनी मध्यस्थी करावी म्हणून कंपनीच्या मुख्य मालकांनी मंत्रालयात बैठकही घडवून आणली. बैठकीची टिपणे करून ती मंत्रालयाला लगेच सादर केली गेली होती. त्यातील निर्णयांना अनुसरून कंपनीतर्फे जे काही करायचे ते न करता ठेकेदारांनी एकमद उच्च न्यायालयाकडे धाव घेतली. त्यात मंत्रालयातील बैठकीतील निर्णयांचा भंग करण्याची फसवणुकीची तक्रार खात्याच्या अधिकाऱ्यांविरूध्द करण्यात आली होती. सुदैवाने तत्पूर्वीच बैठकीच्या अहवालाची टिपणे कार्यलायीन व्यवस्थेत प्रस्तृत झालेली असल्यामुळे व तदनुसारच प्रकल्पाकडून कारवाई होत असल्यामुळे ती फिर्याद उच्च न्यायलयाने तत्काळ फेटाळून लावली. ठेकेदारांच्या न्यायालयीन डावपेचांना तोंड देण्याची ही माझी पहिलीच वेळ. पण तेही विघ्न दूर होवून... कालव्याचे काम मार्गस्थ झाले. मा.शंकरराव चव्हाण खात्याचे मंत्री होते. त्यांनी या सर्व प्रकरणात अत्यंत संयत भूमिका घेतली. प्रकल्पाचे मुख्य अभियंता या नात्याने देऊसकर साहेबांचे मार्गदर्शन तर अनमोल होते. अनेक लहान लहान गोष्टींत हाताखालच्यांना सांभाळून घेण्याचा त्यांचा दिलदारपणा हाही मोठा आधार होता.

बोगद्यांची कामे खात्यामार्फत यंत्रांच्या सहाय्याने सुरू ठेवतांना काही हितचिंतकांनी मला सावध केले होते की, प्रकल्पातील यांत्रिक कामगारांच्या संघटना फार आक्रमक आहेत. भूकंपापूर्वी मा. शंकरराव चव्हाण प्रकल्पाला भेट देण्यासाठी आले असतांना त्यांना काळी निशाणे दाखवून या संघटनांनी निदर्शने केली होती. पण सर्वच प्रकल्प पूर्णत: ठेकेदारांच्या स्वाधीन करून मोकळे होणे इष्ट नव्हते. काम करण्यासाठी खात्याची पर्यायी यंत्रणा सिध्द आहे सक्षम आहे व कार्यरत आहे, याचा अदृष्य वचक ठेकेदारांवर असणे आवश्यक होते.

भूकंपानंतरच्या परिस्थितीत बोगद्यांत काम करणाऱ्यांना काही वेगळा प्रोत्साहन भत्ता आवश्यक होता. शिवाय व्यावहारिक आणि मानसिक आधार म्हणून भूकंपग्रस्त प्रकल्प क्षेत्रातील सर्वांचा विमा उतरवणे आवश्यक होते. नेहमीप्रमाणे मंत्रालयीन संबंधीत कार्यासनांकडून याला विरोध होत होता. मंत्रालयात जावून त्यांच्याशी चर्चा करतांना असे लक्षात आले की, त्यांना प्रकल्पीय क्षेत्रीय व्यवस्थांची काहीच कल्पना नाही. त्यांनी प्रकल्प, बोगदे या रचना कधी पाहिलेल्याही नाहीत. म्हणून त्यांना एकदा प्रकल्पावर येण्याचा मी आग्रह केला. मीच वाहन चालवायला बसलो व त्यांना घेवून सरळ अवजल बोगद्यात वाहन नेले. बोगद्यांत नुकताच दगडफोडीचा स्फोट घेण्यात आला होता. त्याचा धूर प्रवेशाच्या बोगद्यांतून बाहेर येत होता. मंत्रालयीन अधिकारी थरथरले, ' गाडी लगेच बाहेर घ्या' असे म्हणायला लागले. मी त्यांना समजावून सांगितले की, या क्षणाला आत 200 हून अधिक कामगार व कर्मचारी काम करत आहेत. येथे असेच चोवीस तास चालू असते. बोगदा भत्ता व विम्याचे संरक्षण हे त्यांच्यासाठी मंजूर करायचे आहे. या घटनेनंतर मंत्रालयीन अवर सचिवांच्या वृत्तीत एकदम फरक जाणवला. लवकरच याबाबतचे प्रस्ताव मंजूर होवून आले.

असाच घोळ मंत्रालय व लेखानिरिक्षक यांनी प्रकल्पाच्या वसाहतीच्या पुनर्बांधणीच्या खर्चाचा हिशोब कोणत्या लेखाशिर्षाखाली घालावयाचा या बाबत चालू ठेवला होता. प्रकल्पाची वसाहत सुरूवातीला एकदा बांधली गेलेली असल्याने भूकंपामुळे पडलेल्या घरांची दुरूस्ती व पुन:स्थापना हा खर्च 'योजनेत्तर' मानावा असा एक सूर होता. तर प्रकल्पाचा हा पुनर्जन्म समजून तदनुषंगिक खर्च हा वार्षिक योजना या शीर्षाखालीच व्हावा असा प्रकल्पांतून आमचा आग्रह होता. या कागदोपत्रीच्या हिशोबाच्या गोंधळात घरांची कामे करणाऱ्या फुटकळ ठेकेदारांची देयके अडकू नयेत म्हणून ती रक्कम त्या कार्यकारी अभियंत्याला देण्यात आलेली आकस्मिक उचल म्हणून दाखवण्यात येत होती ! भंगलेल्या घरांची पुर्नबांधणी व दुरूस्ती तडफेने करणाऱ्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मनावरचे हे एक दडपण होते. विकासकामांची प्रत्यक्षात काही जबाबदारी न घेता केवळ सूत्रचालनाचे निर्जीव अधिकार सांभाळणारी मंत्रालयीन कालबाद्य ब्रिटीशकालीन व्यवस्था प्रत्यक्षात क्षेत्रीय काम करणाऱ्यांचा कसा छळ करते याचा हाही एक नमुना होता. अशा टोचण्या सहन करत करत प्रकल्प रेटावे लागतात. प्रकल्प अधिकाऱ्यांना प्रोत्साहित करण्याऐवजी, मार्गदर्शन करण्याऐवजी त्यांना 'सरळ करण्याची' भाषा प्रशासकीय व्यवहारात ऐकावी लागते तेव्हा फार वाईट वाटते.

निर्णय व्यवस्था व क्षेत्रीय व्यवस्था यांच्यात सामंजस्य व उद्दिष्टांची स्पष्टता नसलेल्या परिस्थितीचा चुकीचा लाभ घेण्याचा प्रयत्न कर्मचारी संघटनांकडून होतो, तसाच 'प्रकल्पग्रस्त' या नावाच्या समूहाकडूनही प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे होत रहातो हे कोयना प्रकल्पावर लक्षात आले, 'प्रकल्पग्रस्तांना प्राथमिकता' ही ढाल वापरून काहीच कृपालब्ध कुटुंबांना प्रकल्पात नोकऱ्या फुटकळ ठेकेदारी सवलती, ही साखळी कोठे थांबवायची हे कळेनासे होई.

आमच्या गावात मी 8 वर्षांचा असतांना चाळीसगावला प्रथम वीज आली. तोवर सर्वांच्या घरात कंदीलावर वावर असे. चाळीसगावातले वीजघर हे आमच्या शाळेच्या शैक्षणिक सहलीचे आवडते ठिकाण होते. इंधन तेलावर चालणारी दोन छोटी यंत्रे त्या वीजघरात होती. त्या तुलनेत कोयना प्रकल्पाच्या पोकळीच्या वीजघरात बसवलेली मोठी वीजयंत्रे पहिल्यांदा पाहिली तेव्हा अभियांत्रिकीचे आधुनिक क्षेत्र किती मोठे आहे हे लक्षात आले. कोयना प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात अलोऱ्याच्या वीजघरात तर आपण पोफळी पेक्षाही आणखी मोठी यंत्रे बसवत आहोत व तीही पहिल्यांदाच भारतीय बनावटीची आहेत हा विचार प्रेरणादायी राही. तेथील अडचणींवर मात करायला मानसिक आधार देई. सह्याद्रीच्या आधारे जलविद्युत निर्मितीचा प्रारंभ टाटा समूहाने 1920 - 30 मध्ये केला. पण ती वीजघरे सह्याद्रीच्या कड्याच्या पायथ्याशी उघड्यावर बांधलेली होती. भुयारांतर्गत नव्हती. आकारानेही तुलनात्मक लहान होती.

भूकंपानंतर कोयना प्रकल्पाच्या वसाहतींतील व्यवहारात गुणात्मक बदल झाला. तो म्हणजे प्रकल्पाची रचना, नकाशे, तपशील ठरवणारे कोयनेचे संकल्पचित्र विभाग, संकल्पचित्र मंडळ व मुख्य अभियंत्यांचे कार्यालय हे पुण्याला तातडीची व्यवस्था म्हणून स्थलांतरीत झाले. पण ते पुन्हा प्रकल्प परिसरात परत आलेच नाही. त्यामुळे कोयनेच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात होत असलेल्या कामांची तांत्रिक व वैज्ञानिक बाजू ही वसाहतीच्या वातावरणात लोकांच्या विचारात मुरल्या सारखी झाली होती. ती अनुकूल सुयोग्य साखळी तुटली. खोदाई, बांधणीचा खर्च व त्यांचे आकडे हे मुद्देच प्रकर्षाने प्रकल्पाच्या क्षेत्रीय अभियंत्यांमध्ये चर्चेला अधिक येत राहिले. त्या कामांमागील वैज्ञानिक आधारांची जाणीव हळूहळू उपेक्षित होवू लागली. संकल्पचित्र विभागातील पुण्यातील वास्तव्याची मंडळी कधी कधी क्षेत्रीय निरिक्षणासाठी आलीच, तरी बौध्दिक तपशीलांवर अलोऱ्यातील क्षेत्रीय प्रकल्प अधिकाऱ्यांशी ते मोकळेपणाने चर्चा करीत आहेत, हे दृष्य हळूहळू कमी व्हायला लागले. व्यक्तिगत स्वभावानुरूप संकल्पचित्र विभागातील काही जण तर अशी चर्चा करणे, क्षेत्रीय संवाद ठेवणे, हे जणू बौध्दिक दृष्टीने खाली उतरण्यासारखे समजत, टाळत ' नकाशे, पाठवले आहेत, पाठवत आहोत, त्याप्रमाणे करा ' असे मोघम उत्तरही ऐकायला मिळे.

भूकंपाच्या प्रादुर्भावांचे वैज्ञानिक विश्लेषण, भूकंपीय गरजांसाठी करावयाच्या वेगळ्या तांत्रिक तरतूदी, वीजघरांच्या रचनांमधील तदनुसार नवीन आधुनिक बदल जलवैज्ञानिक प्रतिकृती व त्यांचे विश्लेषण या विषयांवरची देवाण घेवाण विरत चालली. संकल्पचित्र मंडळाच्या स्थलांतराबरोबरच या विषयांवरची अद्ययावत पुस्तके व नियतकालिकेही पुण्याच्या कार्यालयाकडे स्थलांतरित झाली. यावरचा अंशत: उपाय म्हणून अधूनमधून काही तांत्रिक व्याख्याने अलोऱ्यात घडवून आणायचा प्रयोग करून पाहिला. पण हेही प्रकल्पाच्या वातावरणातूनच हे विषय हद्दपार झाल्यासारखे असल्याने अशा चर्चासंवादांना प्रतिसाद कमी कमी होत गेला. 'क्षेत्रीय मुकादमी' या दिशेने व्यक्तिमत्वांची जडणघडण बदलत गेली. पाटबंधारे खात्यातील मध्यवर्ती संघटनेच्या निर्मिती नंतर जे बदल खात्याच्या क्षेत्रीय व्यक्तिमत्वांमध्ये लक्षात येवू लागले होते, ते आता हळूहळू कोयना वाङमय भारताच्या रूडकी येथील संस्थेकडून प्रकाशित होत आहे, आंतरराष्ट्रीय संघटनांकडूनही त्या विषयावरची नियतकालिक पुस्तके, चर्चा परिसंवाद वाढत आहेत याची दखल घेण्याची प्रकल्पातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांची मानसिकता क्षीण होत गेली.

अलोऱ्याला वास्तव्यास असणाऱ्या क्षेत्रीय अभियंत्यामध्ये दोन वेगळे प्रकार लक्षात यायला लागले. भूकंपापूर्वी कोयनानगरला असतांना तेथील वातावरणात ज्यांची जडण घडण झाली असे कोयना प्रकल्पातील अभियंते तांत्रिकदृष्टीने जागरूक असल्याचे जाणवत भूकंपानंतर इतर ठिकाणांहून बदलीने कोयना प्रकल्पात अलोऱ्याला आलेले अभियंते वेगळे लक्षात येत. त्यांना कोयना नगरच्या व्यक्तिगत जडण घडणीच्या प्रगल्भ वातावरणाचा लाभ मिळाला नव्हता. मुंबईत पाटबंधारे खात्याच्या मध्यवर्ती संकल्पचित्र संघटनेत कामावर असतांना आम्ही थट्टेने एकमेकांत म्हणत असू की पाटबंधारे खात्यात अभियांत्रिकीची दोन विद्यापीठे कार्यरत आहेत. पहिले 'कोयना विद्यापीठ' व नंतर 'मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना' व महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था हे दुसरे सिंचनप्रकल्प विद्यापीठ. कोयना विद्यापीठाकडे केवळ ज्येष्ठत्वच नाही तर श्रेष्ठत्वही होते.

त्या विद्यापीठाने जे अभियंते घडवले त्यांचे नैतिक चारित्र्यही उच्च श्रेणीचे होते. त्याचा अनुभव अलोऱ्याला रहात असतांना वेळोवेळी आला. कोयना प्रकल्पांच्या व्यवस्थापनातले एक महत्वाचे काम म्हणजे प्रकल्पाला लागणारा सिमेंटचा प्रचंड पुरवठा. केवळ काही सिमेंट वॅगन्समधून नव्हे तर रेल्वेची पूर्ण गाडीची गाडी सिमेंट भरून प्रकल्पासाठी येत असे. त्यातील पोती कराडच्या प्रकल्पाच्या स्वतंत्र फलाटावर प्रकल्पाच्या भांडारगृहामध्ये उतरवून घेतली जात. केवळ पोती हाताळली गेल्याने नंतर त्या भांडारगृहातील फरशीवर पुन्हा काही पोती भरतील इतके सिमेंट झाडलोटीत गोळा होई. पण त्यांचाही काटेकोर हिशोब ठेवला जाई. त्यात कधी अफरातफर झाल्याचे लक्षात आले नाही. बाहेरच्या सिमेंटच्या टंचाईच्या काळातही ही व्यवस्था टिकून होती. 'कोयना विद्यापीठाने' तयार केलेली माणसे ही अशा नैतिक उंचीची होती.

श्री. भेलकेंच्या बरोबर श्री. शेंडे आता आतापर्यंत कोयना प्रकल्पाच्या सल्लागार समितीत प्रकल्पाच्या चवथा - पाचवा टप्पा यात श्री. देऊसकरांच्या व श्री. शेणोलिकरांच्या नेतृत्वाखाली उत्साहाने मार्गदर्शन करीत राहिले. कोयनेच्या अनुभवांचे खात्यामध्ये क्रमश: विस्तारीकरण होत होत उर्ध्व वैतरणा, पेंच, तिलारी, घाटघर अशा प्रकल्पांमधून 'भूयारातील वीज' यशस्वीपणे हाती आली. सह्याद्रीच्या आधाराने अशा अनेक रचनांना अजून वाव आहे. त्यातून भार नियमनाचे संकट त्यामुळे आटोक्यात आणता येणार आहे.

'कोयना विद्यापीठा ' ची अशी माणसे हाताशी असणे ही प्रकल्पाची मोठी ताकत होती. श्री. शेंडे, श्री. भेलके, श्री. मनोहर, श्री. खांदेकर, श्री. दोड्डीहाळ ही मंडळी भूकंपानंतरच्या पुनरूत्थानांतील कामांसाठी कंबर कसून उभी होती. म्हणून कोयना प्रकल्पाचा तिसरा टप्पा लवकरच प्रगतीपथावर मार्गस्थ झाला. वाहत्या वासिष्ठी नदीच्या खालून जाणाऱ्या अवजल बोगद्यात नदीतून झिरपा चालू झाला तेव्हा श्री. खांदेकरांनी तेथे अखंडपणे स्वत: उभे राहून तो बंद करून घेतला. भूकंपात कोयनानगरला रहात्या प्रकल्प घराची भिंत कोसळून डोक्याला खोच पडून जायबंदी होवून श्री. भेलके तीन महिने नंतर तंबूत रहात होते. सौ. मीनाताई भेलकेही जायबंदी झाल्या होत्या. पण भेलके कुटुंब तेथेच कोयना प्रकल्पात टिकून राहिले अलोरेजवळच्या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यांतील कोळकेवाडी धरणाच्या बांधकामाची जबाबदारी भेलकेंनी पार पाडली. श्री. भेलके पुढे महाराष्ट्राचे पाटबंधारे सचिव झाले.

अशी माणसे घडवणाऱ्या कोयना प्रकल्पाचा तपशीलवार इतिहास लिहिला जावा म्हणून शासनाने एक स्वतंत्र मंडळ अधीक्षक अभियंत्याच्या नेतृत्वाखाली स्थापन केले. त्यातील अभियंत्यांना संकल्पचित्र मंडळाप्रमाणे प्रोत्साहनभत्ता द्यावयाचा का नाही या वादातून त्या कामाला प्रारंभीच काहीशी दृष्ट लागली. एका भव्य प्रकल्पाचा दिव्य इतिहास त्यातील सर्व वैचारिक व प्रेरणादायी तपशीलांसह समाजासमोर पूर्णत: येवू शकला नाही. माहितीच्या एका मोठ्या खजिन्याला महाराष्ट्र कायमचा मुकला.

अशा परिस्थितीत प्रकल्पात रहाणाऱ्या व वावरणाऱ्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळत रहावे म्हणून प्रकल्पाच्या वसाहतींत दर्जेदार माध्यमिक शाळेची गरज होती. त्यासाठी चिपळूणच्या परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या नामवंत शाळेची शाखा प्रकल्पाच्या वसाहतीत काढायचे ठरले. त्याप्रमाणे ती निघाली. पुढे नावारूपालाही आली. तिच्यातून पुढे अनेक गुणवंत अग्रेसर विद्यार्थी निर्माण झाले. पण अलोऱ्यातील त्या शाळेच्या प्रारंभीच्या काळात त्या शाळेने प्रकल्प परिसरात येणे हाच एक स्थानिक वादाचा मुद्दा निर्माण करण्यात आला. त्या निवडीबाबत राजकीय तक्रारीही करण्यात आल्याचे नंतर कानावर आले.

1967 च्या भूकंपानंतर 1971 पर्यंत प्रकल्प निर्विघ्नपणे पुनश्च मार्गस्थ झाला होता. याच काळात श्री. भालेराव अधीक्षक अभियंता म्हणून कोयना नगरला मुक्काम ठेवून होते व कोयना धरणाच्या मजबूतीकरणाचे काम स्वतंत्रपणे पहात होते. मी मध्यंतरी मुंबईत एका बैठकीसाठी गेलो असतांना श्री. सलढाणा मुख्य अभियंत्यांना भेटलो होतो. त्यांच्याकडे मध्यवर्ती संकल्पचित्र मंडळाची प्रशासकीय जबाबदारी होती (पुढे सलढाणा महाराष्ट्राचे सचिव, व केंद्रीय जल आयोगाचे सदस्य व विश्वबँकेचे सल्लागारही झाले) बोलण्याच्या ओघात त्यांनी मध्यवर्ती संकल्पचित्र मंडळात एका अधीक्षक अभियंत्याची गरज असल्याचे सुचित केले. मी सहजपणे अनुकूलता व्यक्त केली. योगायोग असा की थोड्याच दिवसात माझी मध्यवर्ती संकल्पचित्र मंडळात नेमणुक झाल्याचे अचानक आदेश आले. शालेय वर्षाच्या सत्रामध्येच मला अलोरे सोडून अलोरेच्या शाळेत स्थिरावलेल्या मुलांना घेवून मुंबईत रूजू व्हावे लागले. मला 'कोयना विद्यापीठाकडून' पुन्हा परत 'सिंचन विद्यापीठाकडे' यावे लागले.

'ठेकेदारांकडील कामांची फेरजुळवणी करण्यातील वित्तीय व कायदेशीर अडचणींमधून मार्ग काढणे, प्रकल्पाची काही कामे ताब्यात घेवून खात्यामार्फत यंत्रे व मजूर लावून करवून घेणे, प्रकल्पाच्या वसहातींची फेरबांधणी व विस्तार करणे, तेथील सामाजिक जीवनात उत्साह निर्माण करणे,' अशा प्रकारे प्रकल्प सुरळीतपणे मार्गस्थ, करण्याचे जे काम झाले त्याची 'उत्कृष्ट' म्हणून गणना झाली. शासनाने नंतरच्या वर्षात मंत्रालयातील एका छोटेखानी कार्यक्रमांत मला आकस्मिकपणे खात्याचे तत्कालीन सचिव मा. भुजंगराव कुलकर्णी यांच्या हस्ते व सहीने या कामांसाठी दोन पानी सविस्तर गुणवत्ता प्रशस्तिपत्र बहाल करून आश्चर्यचकित केले. त्या काळात अशाप्रकारे औपचारिक गुणवत्ता प्रशस्तिपत्र देण्याची पध्दत प्रशासनात रूढ झाली नव्हती. त्यामुळे ते अशा प्रकारचे पहिलेच गौरवपत्र ठरले. कालांतराने शासनाने अलिकडे दरवर्षीच्या कामांचा आढावा घेवून गुणवत्ता प्रशस्तिपत्रके देण्याची व गुणवंतांचा समारंभीय सत्कार करण्याचा चांगला पायंडा पाडला आहे.

पुरक संदर्भ : सुवर्ण किरणे (साकेत प्रकाशन) पृष्ठ 58 ते 68
विज्ञानयात्री माधव चितळे (राजहंस प्रकाशन) पृष्ठ 48 ते 49
डॉ. माधवराव चितळे, औरंगाबाद - मो : 09823161909

Path Alias

/articles/jalataranga-6-bhauyaaraantaragata-jalavaidayauta-saadhanaa

Post By: Hindi
×