जलसंवर्धनाचा वसा घेतलेले


श्री. प्रदीप पाटील कव्हर स्टोरी

सन २०१३ मध्ये या परिसरात पाऊस झाला. परंतू नदी नाले ओसंडून वाहतील असा दमदार पाऊस झाला नव्हता. ओढे, नाले आणि नद्यांना पूर आले नाही. त्यामुळे महत् प्रयासाने तयार करण्यात आलेली सर्व भांडी पूर्ण भरली नाहीत. परंतू जिथे पाणी साचले तिथे त्यामुळे लाभ झालेला दिसला. बोअरवेल तसेच विहिरींना पाणी आले. सन २०१५ च्या मोसमात गणपती उत्सवाच्या कालावधीत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे मात्र ही बहुसंख्य भांडी भरलीत.

औरंगाबाद येथील प्रदीप रावसाहेब पाटील यांची कार्यपध्दती राजकीय कार्यकर्त्याच्या परंपरागत प्रतिमेला छेद देणारी आहे. साधारणपणे व्यासपीठावरील भाषणबाजीतून आश्वासनांची आतषबाजी, चेहर्‍यावर कृत्रिम हसू, वेळी अवेळी हात जोडणे, वारंवार गुडघ्यात वाकून नमस्कार करणे, प्रत्यक्षात कोणतेही काम न करता काम करीत असल्याचा आभास निर्माण करणे अशी बहुसंख्य कार्यकर्त्यांची आचरण पध्दती. राजकीय कार्यकर्ता असण्यासाठीचे जणू हे आवश्यक क्व्लॉफिकेशनच. तथापि, नेहरु शर्ट, गांधी टोपी, खांद्यावर उपरणं आणि कपाळावर गंध असा अस्सल राजकीय कार्यकर्त्याचा गेट-अप असला तरी अशा गुणी कार्यकर्त्यांच्या पठडीत प्रदीप पाटील बसत नाही. निव्वळ भाषणबाजी न करता सर्वसामान्यांचा जीवनस्तर उंचावण्याची क्षमता असलेली जलसंधारणाची लहान मोठी कामे त्यांनी अहर्निश पाठपुरावा करुन प्रत्यक्षात अमलात आणली. त्यामुळे दुष्काळाने पछाडलेल्या औरंगाबाद तालुक्यातील काही गावांमध्ये टँकर बंद झाले, पीक लागवड पध्दतीत बदल केल्यामुळे शेतक-यांचे उत्पन्न वाढले. प्रदीप पाटील यांना पाहताच ग्रामीण महाराष्ट्रातील एखाद्या आमदार लगबगीने अधिवेशनास उपस्थित राहण्यासाठी निघालय की काय? असा भास होतो. परंतू प्रदीप पाटील अद्याप आमदार झालेले नाहीत. तथापि लोकसंपर्क मात्र एखाद्या आमदारपेक्षाही जास्त. पाण्यामुळे गावं आणि गावांमुळे माणसं जोडली गेल्याने लाभलेला जनाधार ही प्रदीप पाटलांची खरी ताकद आहे.

औरंगाबाद तालुक्यातील दुधड, भांबडी, शेवगाव, गाढेजळगाव, करंजगाव, शेकटा, देवणी वाहेगाव, जटवाडा, चित्तेपिंपळगाव, आडगाव ठोंबरे ही दुष्काळग्रस्त गावे हे त्यांचे कार्यक्षेत्र. या गावांच्या परिसरातील लहानमोठे ओढे, नाले आणि नद्यांवरील जुन्या नव्या बंधार्‍यांचे खोलीकरण, रुंदीकरण, गाळ काढणे, गळती बंद करणे अशी कामे करुन पाणी साठविण्यासाठी भांडी तयार करण्याचं काम करण्यात आलं. नुकत्याच झालेल्या पावसामुळे जेव्हा ही भांडी ओसंडून वाहताना दिसतात, तेव्हा ग्रामस्थ आणि प्रदीप पाटील यांच्या चेहर्‍यावर दिसणार्‍या समाधानाची तुलना कशाशी करावी असा प्रश्न पडतो. या कामांची उभारणी करण्यासाठी देवगिरी नागरी सहकारी बँक, अन्य विविध वित्तीय संस्था, बांधकाम व्यावसायिक, उद्योजक यांच्या वित्त शक्तीची आणि ग्रामस्थांच्या श्रमशक्तीची मोट बांधण्यात आली. प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर दुष्काळाची तीव्रता कमी करण्याचा केलेला खटाटोप दिलासा देणारा आणि जगण्याची उमेद वाढविणारा ठरला. पाण्याचे राजकारण ही सर्वांना परिचित असलेली नित्याची बाब. परंतू राजकारणातून पाण्याचे काम आणि त्यातून राजकीय नेतृत्वाची पायाभरणी असा काहीसा अनोखा प्रकार येथे घडताना दिसतोय.

प्रभाव शिरपूर पॅटर्नचा.....


भारतीय जनता पक्षाशी निगडित असलेले प्रदीप रावसाहेब पाटील औरंगाबाद येथील देवगिरी नागरी सहकारी बँकेचे संचालक होते. काही काळ बँकेच्या उपाध्यक्ष पदाची धुरा देखील त्यांनी सांभाळली. युवावस्थेत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी काम केलेले. त्यामुळे संघ परिवारातील विविध जबाबदार्‍या सांभाळण्याची संधी त्यांना मिळाली. तरुण भारत दैनिकाचे ते संपादक देखील होते. मूळ पिंड सामाजिक कार्यकर्त्याचा. लोकांमध्ये मिसळण्याचा. त्यामुळे भारतीय जनता पक्षासाठी काम करण्यास त्यांनी सुरुवात केली. ग्रामीण भागात संपर्क वाढविला. या प्रवासात दुष्काळाची तीव्रता अधिक ठळकपणे लक्षात येत होती. सन २०१२ चा दुष्काळ प्रदीप पाटलांच्या संवेदनशील मनाला वेदना देणारा ठरला. विविध वृत्तपत्रे आणि वाहिन्यांच्या माध्यमातून नागरिकांची पाण्यासाठीची वणवण दिसत होती. पाण्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती दाहकता वाढविणारी होती. या परिस्थितीत आपण काय करु शकतो? दुष्काळाची झळ कमी करण्यासाठी काही उपाय आहेत काय? या अनुषंगाने त्यांचे विचारचक्र सुरु होते. याच कालावधीत शिरपूर पॅटर्नचे सुरेश खानापूरकर यांची एका चॅनेलवर सुरु असलेली मुलाखत त्यांनी पाहिली. ज्येष्ठ नेते विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याशी चर्चा करुन त्यांनी तडक शिरपूर गाठलं.

माजी मंत्री आमदार अमरिश पटेल यांच्या पुढाकाराने सुरेश खानापूरकर यांनी खान्देशातील शिरपूर तालुक्यात जलसंधारणाचे केलेले प्रयोग आणि त्याची फलनिष्पत्ती प्रत्यक्ष पाहून प्रदीप पाटील प्रभावीत झाले. अशा प्रकारचं काम आपल्या भागात केलं तर दुष्काळाची तीव्रता कमी होण्यास मदत होऊ शकते, हे त्यांच्या लक्षात आलं. मार्गदर्शनासाठी खानापूरकरांना मराठवाड्यात निमंत्रित करण्यात आले. त्यावेळी जालना शहरास पाणी टंचाई अधिक जाणवत होती. औरंगाबादपेक्षाही जालन्यातील परिस्थिती दाहक होती. त्यामुळे प्रथम जालन्यात सुरेश खानापूरकरांचे व्याख्यान देवगिरी बँकेच्या वतीने आयोजित करण्यात आलं. २२ एप्रिल २०१३ रोजी व्याख्यानासाठी जालन्याकडे जात असताना जालना- औरंगाबाद रस्त्यावर गाढे जळगाव परिसरात बंधारा उभारण्यासाठी जागा निश्चित करण्यात येऊन खानापूरकरांच्या हस्ते दोन ठिकाणी नारळ फोडण्यात आला. या कामांसाठी लोकांचा सहभाग मिळेल की नाही अशी शंका होती.

त्यामुळे प्रारंभीच्या टप्प्यात बंधार्‍यांची दोन कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतू विविध व्यक्ती आणि संस्थाचं भरघोस सहकार्य मिळालं. त्यामुळे लहूकी नदीच्या औरंगाबाद तालुक्यातील स्त्रवण क्षेत्रात लहान मोठी एकूण ३५ बंधार्‍यांची कामे झालीत. यापैकी सहा मोठे बंधारे लहुकी नदीवर आहेत, तर उर्वरित बंधारे लहुकी नदीला मिळणार्‍या ओढे व नाल्यांवर आहेत. प्रारंभीच्या टप्प्यात नवनिर्मितीचा ध्यास होता परंतू या कामांसाठी अर्थसहाय्य उपलब्ध नव्हते. त्यावेळी ज्येष्ठ नेते हरीभाऊ बागडे यांनी छत्रपती संभाजी राजे साखर कारखान्याचे अध्यक्ष विठ्ठलराव अंबरवाडीकर यांच्याकडे पोकलॅण्ड साठी शब्द टाकला. त्यामुळे पाच पोकलॅण्ड उपलब्ध झाले. सहजच उत्साहात कामाला सुरुवात झाली. पुढे वित्तीय संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आणि या पाणी टंचाईवर मात करण्याच्या कामाला लोक चळवळीचे स्वरुप आले. देवगिरी बँकेचे संचालक किशोर शितोळे यांनी पैठण तालुक्यातत कौंडगाव, धुपखेडा येथे अशा प्रकारच्या बंधार्‍यांच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला.

कल्पकतेचा मिलाफ :


प्रारंभीपासूनच काटकसरीचे धोरण ठरविण्यात आले होते. शिरपूर पॅटर्ननुसार सात ठिकाणी बंधारे उभारणे शक्य होतं. उर्वरित ठिकाणी कल्पकतेने काम करणं आवश्यक होतं. या नदीवर कोल्हापूर पध्दतीचा बंधारा पूर्वीपासून अस्तित्वात होता. मात्र त्याची गळती सुरु होती. त्यामुळे पाणी साठत नव्हते. नव्याने बंधारा उभारण्यापेक्षा अस्तित्वात असलेल्या बंधार्‍याची डागडुजी करण्यात आली, बंधार्‍यावरील दरवाजे प्लास्टीकने झाकण्यात आले. त्यामुळे एरव्ही वाहून जाणारे पाणी थांबले. शिवाय या ३०० फुट रुंद, ८०० फुट लांब आणि १२ ते १५ फुट खोली वाढविण्यात आली. वाहेगाव येथील बंधार्‍याची अशीच अवस्था होती. तेथे देखील या प्रयोगाची अंमलबजावणी करण्यात आली. काही ठिकाणी जुने बंधारे दुरुस्त करण्यात आले तर काही ठिकाणी नवीन बंधार्‍यांची निर्मिती करण्यात आली. विहीर व नाले खोलीकरण रुंदीकरणातून निघालेल्या मटेरिअलचा वापर करुन गळती असलेले बंधारे बंद करण्यात आले. लहुकी नदीवर गाढे जळगावचा बंधारा अशाच पध्दतीने उभारण्यात आला आहे. सटाणा नदीवर झालेली कामे अशाच स्वरुपाची आहेत.

जुन्या पुलांचे झाले बंधारे :


गाढे जळगाव येथे नाल्यावर जुना पूल होता. जवळच नवीन पूल झाल्यामुळे या जुन्या पुलाचा वापर होत नव्हता. वाहतुकीसाठी बंद असलेल्या रस्त्यावरील या जुन्या नळकांडी पुलाखाली असलेले पाईप जर बंद केले तर हा पूल बंधार्‍यासारखे काम करु शकेल हे लक्षात आल्याने पाईप बंद करण्यात आले. त्यामुळे सिमेंट, रेती, डबर आदींचा खर्च वाचला. या बंधार्‍याच्या मागे सुमारे दीड हजार फुट खोदकाम करण्यात आले. ठिकठिकाणी पाणी साठविण्यासाठी लहान-मोठे डोह तयार करण्यात आले. हा बंधारा उंचीला २० फुट आणि रुंदीला १६० फुट आहे. चित्तेपिंपळगाव येथील बंधारा अशाच पध्दतीने २० फुट खोल आणि ८०० फुट लांबीचा बंधारा तयार करण्यात आला आहे. करंजगाव नदीवर ३ सिमेंट बंधारे होते. त्यांचा उपयोग करुन क्षमता वाढविण्यासाठी त्याला ५०० फूट लांबीचा, ३०० फुट रुंद आणि १२ फुट खोल बंधारा बांधण्यात आला. स्थानिक परिस्थितीनुसार आणि उपलब्ध सहकार्यानुसार कल्पकतेने पाणी साठविण्यासाठीची भांडी तयार करण्याचा सपाटा त्यावेळी सुरु करण्यात आला. अन्य ठिकाणी अस्तित्वात असलेल्या सिमेंट बंधार्‍यांच्या तसेच कोल्हापूर पध्दतीच्या बंधार्‍यांच्या ठिकाणी नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. भांबरडा, दुधड, गाडेजळगाव, देमणी वाहेगाव, करंजगाव, शेकटा, शेवगा, आडगाव, जटवाडा येथे बंधार्‍यांची निर्मिती अवघ्या सव्वा महिन्यात झाली. यात काही निजामकालीन बंधार्‍यांचे पुनरुज्जीवन करण्यात आले.

सन २०१३ मध्ये या परिसरात पाऊस झाला. परंतू नदी नाले ओसंडून वाहतील असा दमदार पाऊस झाला नव्हता. ओढे, नाले आणि नद्यांना पूर आले नाही. त्यामुळे महत् प्रयासाने तयार करण्यात आलेली सर्व भांडी पूर्ण भरली नाहीत. परंतू जिथे पाणी साचले तिथे त्यामुळे लाभ झालेला दिसला. बोअरवेल तसेच विहिरींना पाणी आले. सन २०१५ च्या मोसमात गणपती उत्सवाच्या कालावधीत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे मात्र ही बहुसंख्य भांडी भरलीत. यावर्षी म्हणजे २०१६ मध्ये वरुणराजाची कृपा झाल्यामुळे अंजनडोह गावी तयार केलेल्या बंधार्‍यासकट अनेक बंधारे भरभरुन वाहतांना दिसत आहेत.

देवगिरी नागरी सहकारी बँकेचा भरघोस हातभार :


मराठवाड्याच्या अर्थकारणात देवगिरी नागरी सहकारी बँकेचे महत्वपूर्ण योगदान आहे. मराठवाड्याच्या सामाजिक,सांस्कृतिक जीवनाशी समरस झालेल्या किंबहुना येथील मातीतच रुजलेल्या या बँकेचे संचालक मंडळ दुष्काळी परिस्थतीमुळे व्यथित होतेच. त्यावेळी प्रदीप पाटील या बँकेचे उपाध्यक्ष होते. दुष्काळी परिस्थितीची तीव्रता कमी करण्यासाठी आपण काय करु शकतो या अनुषंगाने विचारमंथन सुरु असताना प्रदीप पाटील यांनी शिरपूर पॅटर्नची उपयुक्तता पटवून दिली. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीत पाणी उपलब्ध होण्यासाठी या प्रयोगाची अंमलबजावणी प्रभावी ठरु शकते हे त्यांनी लक्षात आणून दिले. या पार्श्वभूमीवर पाणी अडविण्याच्या कामासाठी संचालक मंडळाने पन्नास लाख रुपये मंजूर केले. सुरेश खानापूरकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यासाठी बँकेने पुढाकार घेतला. जलसंधारणाची कामे करण्यासाठी बँकेने जागा निश्चित केल्या. त्यानुसार औरंगाबाद तालुक्यात दुधड, भांबडी, शेवगा, गाढेजळगाव, करंजगाव, शेकटा, देवणी, वाहेगाव, जटवाडा येथे कामे करण्यात आलीत.

देवगिरी बँकेच्या या उपक्रमाला अकोला अर्बन को-ऑपरेटीव्ह बँकेनेही जटवाडा येथे एक स्वतंत्र बंधारा उभारुन सबका साथ सबका विकास या अशी भूमिका घेत सक्रीय प्रतिसाद दिला. शेतकरी तसेच अन्य ग्रामस्थांनी ट्रॅक्टर व डंपरने मोठ्या प्रमाणात खोलीकरणातले मटेरियल बाहेर वाहून नेण्याचे काम केले. या सहभागामुळे प्रदीप पाटील आणि टीमचा उत्साह वाढला. चित्तेपिंपळगाव येथील गोसंवर्धन सहकारी दूध उत्पादक संस्थेने एक लाख रुपये या कामासाठी दिले. याशिवाय दोन्ही ग्रामपंचायतींनी प्रत्येकी ५० हजार रुपये दिले. या निधीतून त्यांनी गावाला जोडणारा पाणंद रस्ता, हगणदारीचा रस्ता भर घालून तयार केला. त्यामुळे ग्रामस्थांची सोय झाली. मुंबईचे पत्रकार त्यावेळी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मराठवाड्यात हिंडत होते. त्यांना या प्रयोगांची माहिती मिळताच ते या परिसरात दाखल झाले. पत्रकार जालनावाला यांनी मुंबई प्रेस क्लबतर्फे पन्नास हजार रुपयांची मदत या कामासाठी केली. पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्थेने ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले. या सर्व मदतीने आणि लोकसहभागाने पाणी साठविण्यासाठी लहान मोठी भांडी तयार झाली. यासाठी सतत पाठपुरावा, संपर्क आणि ग्रामस्थांना प्रेरित करण्यासाठी आवश्यक असलेली नेतृत्वाची रसद प्रदीप पाटील यांच्या निमित्ताने उपलब्ध झाली.

पातळी वाढली :


या बंधार्‍यांच्या उपयुक्ततेचा अनुभव गेल्या तीन वर्षांपासून औरंगाबाद तालुक्यातील मंडळी घेत आहेत. बंधार्‍यात पाणी साचण्यास सुरुवात झाल्यापासून गावात विलक्षण बदल झालेले दिसतात. दहा वर्षांपासून कोरडाठाक पडलेल्या बोअरवेलमध्ये पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. गावातील विहिरींना देखील पाणी लागले. पिण्याच्या पाण्यासाठी तासंतास टँकरची वाट पाहणे तसेच अनेक मैल पायपीट करुन पाणी घेऊन येणं थांबलं आहे. ज्या ठिकाणी एकाच नदीवर अनेक बंधारे उभारण्यात आले होते त्या परिसरातील विहिरींमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. बंधार्‍यात रात्री साचलेले पाणी सकाळपर्यंत तीन फुटांपर्यंत जमिनीमध्ये मुरत होते. जलपुनर्भरणाचा वेग प्रचंड होता. त्यामुळे विहिरी आणि बोअरवेल्सची पातळी मात्र वाढलेली दिसते. पाणी उपलब्धतेचा फायदा घेण्यास सुरुवात झाली आहे.

सिंकदर जाधव या तरुणाने डाळिंबाची लागवड आधुनिक साधनांचा वापर करुन केली, त्यामुळे औरंगाबाद तालुक्यातील डाळिंबाना परदेशात बाजारपेठ उपलब्ध झाली. तानाजी जाधव या तरुणाने अशाच पध्दतीने पेरु आणि डाळिंबांची लागवड करुन सर्वांना चकीत केले. राज्य शासनाने विशेष सन्मान करुन या तरुण शेतकर्‍याचे कौतुक केले. बांधावर वेगवेगळया हातगा, शेवगा यासारख्या भाजीपाल्याची लागवड करण्याचा ट्रेंड सुरु झाला. गावरान टोमॅटोची वाढलेली लागवड दररोज पैसा उपलब्ध होण्यासाठी उपयुक्त ठरली. बागायती शेती करणार्‍यांचे प्रमाण वाढले. या कामापासून प्रेरणा घेऊन ज्ञानेश्वर बोराडे या तरुणाने गाव वर्गणी करुन बंधारे उभारले, तर बाळू बोर्डे यांना सिमेंट उपलब्ध करुन देताच त्यांनी छोटे छोटे बंधारे उभारण्यासाठी ग्रामस्थांचा सहयोग मिळविला.

जालन्यात शिरपूर पॅटर्न :


सुरेश खानापूरकरांच्या जालन्यातील व्याख्यानानंतर त्यांनी शहराच्या पाणी टंचाईचे निवारण करण्यासाठी उपाययोजना सुचविल्या. त्यानुसार जालना शहराला घाणेवाडी तलावातून पाणी पुरवठा होतो. तेथून जालन्याकडे येणार्‍या कुंडलिका नदीवर शिरपूर पॅटर्ननुसार बंधारा उभारणे, नदीची खोली वाढविणे, पात्र वाढविताना रुंदी वाढविणे यासारख्या गोष्टी करण्याचे ठरले. निधोना गावाजवळ ५० मीटर रुंदी, १५ फुट खोली तसेच ५०० मीटर लांबी वाढविण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे सुमारे १६ कोटी लिटर पाण्याची साठवणूक शक्य झाली. रामतीर्थ येथेही ६० मीटर रुंदी, ५०० मीटर लांबी आणि २६ फुट खोली असलेला बंधारा तयार करण्यात आला. त्यामुळे तेथे सुमारे २० कोटी लिटर पाणी साठविता आले. या कार्यात जालन्यातील उद्योगपती सुनील रायथठ्ठा, जालना शहर संघचालक सुनील गोयल, माजी मंत्री अर्जुन खोतकर, रमेशभाई पटेल, शिरीष देशपांडे यांनी मार्गदर्शकाची भूमिका बजावली असा कृतज्ञता पूर्वक उल्लेख प्रदीप पाटील यांनी केला.

कुलरच्या पाण्यावरुन समजली दाहकता :


औरंगाबाद येथे मुख्यालय असलेल्या देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या जालना शाखेच्या स्थलांतरणाच्या कार्यक्रमाची तयारी सुरु होती. तयारीचा आढावा घेण्यासाठी बँकेचे उपाध्यक्ष या नात्याने प्रदीप पाटील जालन्यात दाखल झाले. त्यावेळी जालना शहरातील ज्या ज्या घरात, कार्यालयांमध्ये अथवा व्यावसायिक संस्थांमध्ये त्यांनी भेट दिली, त्यावेळी पाणी टंचाईची चर्चा होत असे. ज्यावेळी बँकेचा कार्यक्रम होईल त्यावेळी त्याठिकाणी लावण्यात येणार्‍या कुलरमध्ये टाकण्यासाठी पाणी आणायचे कुठून? या समस्येने कर्मचार्‍यांना घेरले होते. हा फारसा गंभीर प्रश्न नाही, मित्रांकडून टँकरने पाणी मागवून घेऊ असा विचार करुन प्रदीप पाटील यांनी जालन्यातील आपल्या काही मित्रांना फोन केला. कार्यक्रमासाठी पाणी मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र त्या सर्व मित्रांनी पाणी उपलब्ध करुन देण्यास असमर्थता दर्शविली. टँकरसाठी तिप्पट पैसे देण्याची तयारी दर्शविण्यात आली. मात्र टँकर उपलब्ध होणार नाही असे स्पष्ट झाले. तेव्हापासून पाणी टंचाईच्या प्रश्नाची भीषणता त्यांना अधिक जाणवली.

विठ्ठलराव सादरे पाटील


प्रदीप पाटलांच्या अहर्निश पाठपुराव्यामुळे आमच्या औरंगाबाद तालुक्यातील गाढेजळगाव परिसरातील नदीवर शेवगाव येथे दोन,करजगाव येथे तीन, दुथड येथे पाच आणि गाढेजळगाव येथे दोन बंधारे उभारण्यात आले आहेत. हे बंधारे उभारण्यापूर्वी लहुकी नदीचे पाणी वाहून जात असे. मात्र शिरपूर पॅटर्ननुसार उभारण्यात आलेल्या या बंधा-यांमुळे पाणी अडविण्यास सुरुवात झाली आहे. विहिरींची पातळी वाढली आहे. गेल्या वर्षी आम्ही डाळिंबाचे चांगले उत्पादन त्यामुळे घेऊ शकलो, अशी प्रतिक्रया पंचायत समितीचे माजी सभापती विठ्ठलराव सादरे पाटील यांनी व्यक्त केली.

सम्पर्क


श्री. संजय झेंडे, धुळे - मो : 09657717679

Path Alias

/articles/jalasanvaradhanaacaa-vasaa-ghaetalaelae

Post By: Hindi
×