जलसाक्षरता आवश्यक


जे पाण्याचा विचार करतात, ते जीवनाचा विचार करतात. कारण पाणी म्हणजे जीवन आणि जीवन म्हणजे पाणी. एवढे अनन्यसाधारण महत्त्व असलेले हे पाणी म्हणजे पंचमहाभूतांपैकी एक, आग विझविणारे पाणी, पण आता पाण्यासाठी माणसाची मने पेटू लागली तर विझवायची कशाने? थोडक्यात गरजेपेक्षा पाणी कमी पडणार आणि त्यामुळे तंटे होणार.

जे पाण्याचा विचार करतात, ते जीवनाचा विचार करतात. कारण पाणी म्हणजे जीवन आणि जीवन म्हणजे पाणी. एवढे अनन्यसाधारण महत्त्व असलेले हे पाणी म्हणजे पंचमहाभूतांपैकी एक, आग विझविणारे पाणी, पण आता पाण्यासाठी माणसाची मने पेटू लागली तर विझवायची कशाने? थोडक्यात गरजेपेक्षा पाणी कमी पडणार आणि त्यामुळे तंटे होणार. जाणकार मंडळी जसे म्हणतात, की यापुढे होणारे महायुध्द पाण्यासाठी होणार.

तरीही भविष्यात निर्माण होणाऱ्या या जलसंकटावर मात करण्यासाठी पाण्याबद्दल जेवढे ज्ञान लोकांपर्यंत पोचविता येईल तेवढे पोचविले पाहिजे. ज्ञानामुळे समस्या सुटतात. अज्ञानामुळे काहीही घडू शकते. खरेच पाण्याबद्दल लोकांना ज्ञान कमी आहे का? ज्ञान कमी आहे असे म्हणणेही योग्य वाटत नाही. सामाजिक बांधिलकीचे विस्मरण होत चालले आहे आणि त्यासाठी जलसाक्षरतेची नितांत गरज आहे. पाणी त्याच्या उपलब्धतेच्या सहजतेमुळे आणि त्याच्या अतिपरिचयामुळे क:पदार्थ मानण्याची विचारधारा बदलण्यासाठी समाज जलसाक्षर करावा लागेल. विचार-आचारांना, आचार-सवयींना, सवयी-स्वभावांना, स्वभाव-व्यक्तींना आणि व्यक्ती सर्व समाजाला बदलतील म्हणून विचारधारेवरच संस्काराचे शिंपण करून जलसाक्षर समज घडविण्याची सुरवात करावी लागेल.

पाण्याची उपलब्धता :
शुध्द पाणी एक दुर्मिळ नैसर्गिक वस्तू आहे. एकूण उपलब्ध पाण्याच्या97 टक्के पाणी समुद्राचे खारे पाणी आहे. उरलेल्या तीन टकक्यांपैकी दोन टक्के हिमनद्या व ध्रुवीय प्रदेशातील बफर्ामध्ये आहे. मानवी उपयोगासाठी फक्त एक टक्का पाणी उपलब्ध आहे. त्यापैकी 0.62 टक्के सहज उपलब्ध आहे, तर 0.38 टक्के पाणी भूगर्भात 800 मीटरपेक्षा खोल सामावले आहे.

उपलब्ध पाण्यापैकी चार टक्के पाणी आपल्या देशाच्या वाट्याला आले आहे. एकंदर जगाच्या पृष्ठभागाच्या दोन टक्के जमीन आणि 17 टक्के लोकसंख्या, तसेच 15 टक्के गाई-गुरांची संख्या आपल्या देशातच आहे, त्यामुळे भूमीवर आणि जलस्त्रोतावर प्रचंड दबाव पडतोय. देशात सरासरी 1170 मि.मी. आणि महाराष्ट्रात 1250 मि.मी. पाऊस पडतो तो पुरेसा असल्याचे भासते, आपल्याकडे पडणारा पाऊस अत्यंत बेभरवशाचा आणि लहरी आहे. देशात दर वर्षी जवळजवळ 400 दशलक्ष हेक्टर मीटर पाणी पावसाद्वारे मिळते. यापैकी सुमारे 187 दशलक्ष हेक्टर मीटर उपलब्ध स्वरूपात आहे. म्हणजे दर वर्षी दर माणशी सुमारे 1900 घनमीटर पाणी वाट्यास येते. वाढती लोकसंख्या आणि पाण्याची कमी होत जाणारी उपलब्धता पुढील कोष्टकावरून सहज स्पष्ट होते.

सन

लोकसंख्या (कोटींमध्ये)

पाण्याची उपलब्धता (घनमीटरमध्ये)

1951

36.1

5177

1991

84.6

2207

2001

102.7

1820

2025

141.4 (अंदाजे)

1341

2050

164.0 (अंदाजे)

 1140

 


जेथे दरडोई 1000 घनमीटरपेक्षा पाणी कमी आहे किंवा शेतीच्या संदर्भात दर हेक्टरी 3000 घनमीटरपेक्षा पाणी कमी आहे, तेथील पाण्याचे व्यवस्थापन समाधानकारक स्तरावर आणणे अतिशय अवघड आहे. महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ 307 लाख हेक्टर असून, जलसंपत्ती सुमारे 4350 टीएमसी (अब्ज घनफूट) आहे. कोकणाचे क्षेत्रफळ 30 लाख हेक्टर म्हणजेच जवळजवळ महाराष्ट्राच्या दहा टक्के, तर कोकणात महाराष्ट्राच्या एकूण जलसंपत्तीपैकी सुमारे 46 टक्के पाणी पावसाद्वारे मिळते. तेथे पडणाऱ्या पाण्यापेकी पाच टक्के पाण्याचा वापरही होत नाही. पाण्याची समस्या अस्मानी नव्हे, तर सुलतानी आहे. जर जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापन योग्य प्रकारे केले, जमिनीची झीज टाळली, हरित आच्छादन वाढविले आणि लोकसंख्या नियंत्रित केली तर भारतात पाण्याची कमतरता भासू शकणार नाही. संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने जी जागतिक जलपरिषद जपानमध्ये भरविण्यात आली, त्यात जगाची विभागणी जलदारिद्र्याच्या निकषावर करण्यात आली. भारताचा क्रमांक या यादीमध्ये बराच वरचा आहे.

देशाची पाण्याची भावी गरज लक्षात घेता खालील स्वरूपाचे निर्णय राबविणे आवश्यक आहे. :
- पाणी ही एक राष्ट्रीय, तसेच नैसर्गिक संपत्ती आहे. पाण्याची मालकी सर्व समाजाची आणि देशातील सर्व लोकांची आहे, याची जाण प्रत्येकाला हवी.
- पिण्याच्या पाण्याची टंचाई, तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी पावसाचा थेंब अन् थेंब अडविणे, त्यांना मुरविणे यासाठी शास्त्रोक्त पाणलोट विकास कार्यक्रम राबविणे हा एकमेव मार्ग आहे.
- पाण्याचा प्रत्यक्ष वापर करण्याऱ्यांकडून पाणीवापराबाबत योग्य तो अधिभार वसूल करता यावा यासाठी लाभधारकांच्या पाणीवापर संस्था स्थापन करण्यात याव्यात.
- शेतीसाठी पाणीवापर करताना तुषार अथवा ठिबक प्रणालीचा वापर बंधनकारक असावा.
- भूगर्भातील जलसाठ्याचे पुनर्भरण न करता पाणी उपसणे हा गंभीर गुन्हा समजला जावा.
- पाणीसाठ्याला बाष्पीभवनाने होणारी हानी कमी करणे खर्चिक असेल, तरीही आवश्यक आहे.
डोंगरमाथ्यापासून पायथ्याकडे वाहणारे पाणी अडविण्यासाठी सोपे आणि योग्य उपचार करणे गरजेचे आहे.
- पावसाच्या अखेरीस उघड्या नाल्यातून वाहणारे पाणी अडविण्यासाठी वनराई अगर तत्सम बंधारे उपयुक्त आणि किफायतशीर ठरतात.
- लोकसंख्या 115 कोटींवर स्थिर व्हायला, तसेच अनुत्पादक गुरांची संख्या नियंत्रित करता यावी यासाठी राष्ट्रीय मतैक्य घडवून आणावयास हवे.
- छपरांवर पडणाऱ्या पाण्याचा थेंब अन् थेंब साठवून पिण्यासाठी तसेच इतर कामांसाठी वापरला जावा यासाठी देशव्यापी मोहीम राबविण्यात यावी.
- पाण्यात घरगुती अगर शेतीकामासाठी पुनर्वापर करणे सक्तीचे केले पाहिजे.

जलसाक्षरता :


जलसाक्षरतेच्या माध्यमातून खालील गोष्टीचे ज्ञान लोकांपर्यंत पोचविले पाहिजे :
- ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी येणाऱ्या अडचणी व उपाय
- शहरी भागात पाण्याचा होणारा अतिरिक्त वापर (अपव्यय) व उपाय.
- शेतीची सध्याची प्रचलित सिंचन पध्दती, त्यामुळे होणारे नुकसान, सुधारित सिंचन पध्दती, फायदे आणि उत्पादनात वाढ.
- औद्योगिक कारणांमुळे वापर, त्यामुळे होणारे प्रदूषण व त्यावर उपाय.
- बाष्पीभवनामुळे वाया जाणारे पाणी.
-पाणी पुनर्भरण, पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी साठवा.
- व्यक्तिगत पातळीवर पाण्याचा जपून वापर.
- लाखो, करोडो सुशिक्षित कुटुंबात सकाळी कितीतरी लिटर पाणी शिळे झाले म्हणून गटारात टाकण्यासाठी मोरीत सोडले जाते. परंतु जलाशयात महिनो न् महिने साठविलेले पाणी नळाच्या तोटीतून घरात ताजे पाणी म्हणून प्रवेश करते, हे ओरडून सांगणे म्हणजेच जलसाक्षरता.
- रस्त्याच्या कडेला सार्वजनिक नळाची रात्रभर चालू राहिलेली तोटी जाता जाता वाटेत थांबून बंद करावीशी वाटणे म्हणजेच जलसाक्षरता.
- ज्याच्या शेतात पाणी नाही, त्याच्या डोळ्यात पाणी इतक्या समर्पक आणि सोप्या शैलीत जलसाक्षर करणाऱ्या म्हणी समाजात रूढ करणे म्हणजेच जलसाक्षरता.
- मंदिरात प्रवेश करताना पाण्याचा नळ जर असेल तर हातपाय धुण्याच्या सबबीखाली प्रतिस्नान उरकले जाते. याच ठिकाणी प्रवेशाच्या पायवाटेवर पाण्याने भरलेली एक नऊ इंच चर ठेवली तर दर्शनार्थी जाता जाता पाय बुडवू शकेल. पर्यायाने पाण्याचा अपव्यय टाळता येईल.
- आडवे सरळ करावयाचे तोटी काढून तोटी दाबल्यावर अगर तोटी उचलताच पाणी येणारे नळ बसविल्याने हजारो लिटर पाणी वाचविता येईल.
- सकाळी सकाळी बेसीनचा चालणारा अखंड नळ किंवा बाथरूममध्ये कपडे धुताना धो- धो वाहणारा नळ गरजेपुरता जरी वापरला तरीसुध्दा लाखो लिटर पाण्याची बचत सहज होऊ शकेल.
- दात घासण्यासाठी लागणारे पाणी : मगचा वापर केल्यास अर्धा लिटर. बेसिनमधील नळाचा वापर केल्यास 4.5 लिटर.
- दाढी करण्यासाठी लागणारे पाणी : मगचा वापर केल्यास दोन लिटर. बेसिनमधील नळाचा वापर केल्यास 10.6 लिटर.
- स्नान करण्यासाठी लागणारे पाणी : बादली वापरल्यास 80 लिटर, शॉवर वापरल्यास 80 लिटर, टब वापरल्यास 80 लिटर, अंगाला साबण लावताना शॉवर बंद केल्यास 60 लिटर पाणी वाचते.
- हात धुण्यासाठी लागणारे पाणी : मगचा वापर केल्यास दोन लिटर, बेसिनमधील नळाचा वापर केल्यास 18 लिटर.
- कपडे धुण्यासाठी लागणारे पाणी : बादलीचा वापर केल्यास 40 लिटर. वॉशिंग मशिन वापरल्यास 260 लिटर, वाहता नळ वापरल्यास 240 लिटर.

(संपर्क - 02358 - 282414) (श्री. महाले दापोलीच्या कृषी तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मृद् व जलसंधारण अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख आहेत, तर श्री. भांदे सहायक प्राध्यापक आहेत.)

(कृषी तंत्रज्ञान महाविद्यालय, दापोली)


Path Alias

/articles/jalasaakasarataa-avasayaka

Post By: Hindi
×