जलपुनर्भरण - काळाची गरज


पर्यावरणाशी शत्रुत्व आपल्याला महागात पडत चालले आहे. वृक्ष तोड, जंगल तोड इत्यादी कारणांमुळे आपण पर्यावरणातील संतुलन बिघडवून टाकले आहे. त्यामुळे पावसावर, उष्णतेवर असलेले निसर्गाचे नियंत्रण आपण हारवून बसलो आहोत. मागील कालखंडात अत्यंत नियमित येणारा पाऊस आता लहरी बनत चालला आहे. ʅनेमेची येतो मग पावसाळा' या सारख्या कविता आपल्याला पावसाच्या नियमितपणाची महती सांगत होत्या.

आजकाल आपण वर्तमानपत्रात, मासिकात, जलतज्ञांच्या भाषणात, आकाशवाणीवर जलपुनर्भरण करण्यासंदर्भातील बातम्या वाचतो, ऐकतो. पण प्रत्यक्षात मात्र पुनर्भरणाचे काम फक्त थोड्या कुटुंबांनी हाती घेतलेले दिसते. पुनर्भरण करणे म्हणजे नक्की काय करणे, त्याचा मला व सर्वसामान्य समाजाला फायदा काय, ते कसे केले जाते, त्यासाठी किती खर्च येतो याबद्दल बराच गैरसमज समाजात दिसून येतो. त्यामुळे याबद्द्ल प्रबोधन करणे हा या लेखाचा प्राथमिक उद्देश आहे.

जलपुनर्भरणाचे कार्य निसर्गसुध्दा न चुकता, अव्याहतपणे, कोणीही न सांगता करीत असतो. दरवर्षी पावसाळा सुरू झाला म्हणजे पाण्यासाठी आसुसलेली जमीन पाऊस पडल्याबरोबर पाणी प्यावयास सुरूवात करते. जमिनीच्या रंध्रांमधून, फटींमधून पाणी सातत्याने जमिनीत मुरतच राहते. व खोल जात जात ते भूपृष्ठाखालील जलसाठ्यात जमा होत राहते. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढत जाते. यालाच आपण नैसर्गिक पुनर्भरण म्हणू या. वर्षभर होणाऱ्या पाण्याच्या उपशामुळे ही पातळी खालावत जाते पण या पुनर्भरणामुळे ती पातळी पूर्वस्थितीवर आणण्यात निसर्गाचा मोठा वाटा आढळतो. अशा प्रकारे हे निसर्ग चक्र अव्याहतपणे चालत राहते व सर्वसाधारण परिस्थितीत त्यात खंड पडावयास नको.

जमिनीत भरले जात असलेले पाणी व दरवर्षी उपसले जात असलेले पाणी यात समतोल राहिला तर कोणतीही अडचण येवू नये. पण घोडे इथेच पेंड खाते. जमिनीत भरले जात असलेले पाणी व उपसले जात असलेले पाणी यांचेमधील असलेला समतोल बिघडविण्यास मानव कसा कारणीभूत झालेला आहे हे स्पष्टपणे समजून घेणे आवश्यक आहे.

ज्यावेळी मेणबत्ती दोन्ही बाजुंनी पेटविली जाते त्यावेळी ती लवकर विझणारच. इथेही नेमकी अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. सध्या नैसर्गिक पुनर्भरणाचा वेग कमी होत आहे व दुसऱ्या बाजूने पाणी उपसण्याचा वेग मात्र सतत वाढतच चालला आहे. याचा दुहेरी परिणाम होवून जमिनीतील पाणी प्रश्नाला उद्याच्या एैवजी आजचेच आमंत्रण देवून आपण मोकळे झाले आहोत. कसे ते आपण थोडक्यात पाहूया.

पूर्वी आपण दोर बालटीने, हपश्याने, मोटीने, रहाटगाड्याने पाणी उपसून त्याचा वापर करीत होतो. या सर्वच उपश्याचा वेग अत्यंत कमी होता. मानवी व प्राणीमात्रांचे मेहनतीवर ही उपसा पध्दती चालत होती. त्यामुळे माणूस थकला वा बैल थकला तर उपसा बंद होत असे. म्हणजेच उपसा हळूहळू व कमी प्रमाणात झाल्यामुळे समाजाकडून कमी पाणी वापरले जात असे.

आता मात्र परिस्थिती झपाट्याने बदलली आहे. आज मानवी व प्राणीमात्राच्या शक्तीशिवाय विद्युतशक्ती नावाची शक्ती जन्माला आली आहे व तिच्या सहाय्याने विद्युत मोटारी व पंप यांचा वापर खूपच प्रमाणात वाढला आहे. बटन दाबले की उपसा सुरू होणार व गरज नसली तरी पाणी वेगाने उपसले जाणार! यामुळे कोणतीही तमा न बाळगता, बेदरकारपणे पाण्याचा वापर वाढला आहे.

वाढती लोकसंख्याही पाण्याचा वापर वाढविण्यात कारणीभूत झाली आहे. 1950 च्या जवळपास 40 कोटीच्या घरात घोटाळणारी लोकसंख्या आज 100 कोटींचा आकडा पार करून बसली आहे. या वाढत्या लोकसंख्येचा ताण आता भूगर्भातील पाण्याला सहन होईनासा झाला आहे.

माणसाच्या जीवन पध्दतीतही झपाट्याने बदल होत आहेत त्यामुळे पाण्याच्या वापराला नवनवीन दिशा प्राप्त झाल्या आहेत. पिण्यासाठी पाणी, आंघोळीसाठी पाणी, कपडे धुण्यासाठी पाणी, वरकड वापरासाठी पाणी, शेतीसाठी पाणी, जनावरांसाठी पाणी, पर्यावरण संतुलनासाठी पाणी, याचबरोबर कारखान्यांसाठी पाणी, कारखान्यातील उष्णता कमी करण्यासाठी पाणी एवढेच नव्हे तर करमणुकीतसुध्दा पाणी वापरले जात आहे. या चौफेर वापरामुळे पाण्याचा उपसा, उपसा आणि उपसा हाच आज परवलीचा शब्द बनला आहे.

याचा परिणाम म्हणजे जमिनीतील घसरलेली पाण्याची पातळी हा होय. पूर्वीचे काळी 20 ते 25 फूटावर जमिनीत पाणी लागत होते. पण आजमात्र 500 ते 1000 फूट खोदून सुध्दा बऱ्याच क्षेत्रात बोअरला पाणी लागत नाही. व पाण्यासाठी वणवण हिंडायची पाळी माणसावर आली आहे. महिला व लहान बालके मैलामैलावरून डोक्यावर पाण्याच्या घागरींची जेव्हा चळत घेवून येतात तेव्हा त्यांचेवर दया आल्याशिवाय राहत नाही.

माझे आंगण स्वच्छ दिसावे, आकर्षक दिसावे यासाठी प्रत्येकाने आंगणात फरश्या, टाईल्स, काँक्रीटचा थर इत्यादींचा वापर वाढविला आहे. यामुळे जमिनीची सर्व छिद्रेच बंद झाली आहेत. जमिनीत पाणी मुरण्याचा रस्ताच बंद झाला आहे. त्यामुळे पाऊस सुरू झाल्यावर प्रत्येकच्या कंपाऊंडमधून पाण्याचा लोंढा रस्त्यावर यावयास लागला आहे.

रस्त्यांची परिस्थिती अधिकच नाजूक आहे. वाढत्या वाहतुकीमुळे बहुतांश रस्ते वॉल टू वॉल झालेले आहेत. खडीकरण, डांबरीकरण, सिमेंटचे रस्ते यामुळे कंपाऊंडच्या बाहेरही पाणी मुरायला जागाच राहिलेली नाही. त्यामुळे पाण्याचेे मुरणे बंद होऊन वाहणे वाढत चालले आहे. त्यामुळे थोडासा जरी पाऊस आला तरी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण व्हावयास लागली आहे. पाणी मुरण्यासाठी 'धावते पाणी चालते करा, चालते पाणी रांगते करा, व रांगते पाणी थांबते करा' या तत्वाचा वापर करावा लागतो. पण हे करण्यासाठी कोणीही प्रयत्न करतांना दिसत नाही.

पाण्याच्या प्रवाहाचा वेग कमी करण्यात झाडे व वनस्पती फार मोलाची कामगिरी करीत असतात. ज्या ठिकाणी झाडे जास्त प्रमाणात असतात त्या ठिकाणी पाणी वाहण्याचा वेग कमी होत असतो. जमिनीवर गवताचे आच्छादन असेल तर आणखी चांगले! गवतामुळे व झाडांमुळे पाणी वाहण्याचा वेग कमी होवून पाणी मुरण्याचा वेग वाढविण्यात ते कारणीभूत ठरतात.

झाडे तर जलपुनर्भरणासाठी आणखी वेगळ्या प्रकारे मदत करतात. झाड जसजसे वाढते तसतशी त्याची मुळे खोलवर जातात. खाली जातांना ती जमिनीचे थर ढिले करतात. एवढेच नव्हे तर कडक मुरूम व दगड फोडून ती खोलवर जाण्याच्या प्रयत्नात असतात. यामुळे मुरूमात व दगडात फटी निर्माण होतात व पाणी मुरण्याचा वेग वाढीस लागतो. पण माणूस किती अभागी बघा. स्वत:च्या हाताने वनराईचा घात करून त्याने पुनर्भरणाचा हाही रस्ता बंद करून टाकला आहे.

बहुतांश नगर व महानगर पालिकांत एक महत्वाचा नियम असतो. स्वत:च्या आंगणात पाच झाडे लावल्याशिवाय घराचे भोगवटा पत्रक दिले जाऊ नये असा तो नियम आहे. पण शहरात एक चक्कर मारा व तपासून बघा किती घरात अशी झाडे आहेत? थोडयाश्या चिरीमिरीवर घरात झाडे लावली आहेत असे दाखविले जाते व भोगवटा प्रमाणपत्र दिले जाते. अशा परिस्थितीत वनस्पतीत वृध्दी होणार तरी कशी?

आतापर्यंत मांडलेल्या मुद्यांमुळे नैसर्गिक पुनर्भरणाचा वेग कसा खुंटत चालला आहे ही बाब लक्षात येवू शकेल. पुनर्भरणासाठी निसर्ग साथ देत नसेल तर ती तूट भरून काढण्याकरिता माणसाने कृत्रिम पध्दतीने पुनर्भरण करणे अपरिहार्य ठरते. खरे पाहिले असता पुनर्भरण न करता जमिनीतून पाण्याचा उपसा करण्याचा माणसाला नैसर्गिक अधिकारच नाही.

पर्यावरणाशी शत्रुत्व आपल्याला महागात पडत चालले आहे. वृक्ष तोड, जंगल तोड इत्यादी कारणांमुळे आपण पर्यावरणातील संतुलन बिघडवून टाकले आहे. त्यामुळे पावसावर, उष्णतेवर असलेले निसर्गाचे नियंत्रण आपण हारवून बसलो आहोत. मागील कालखंडात अत्यंत नियमित येणारा पाऊस आता लहरी बनत चालला आहे. ʅनेमेची येतो मग पावसाळा' या सारख्या कविता आपल्याला पावसाच्या नियमितपणाची महती सांगत होत्या. 7 जूनला पावसाळा सुरू होणार असे आपण छातीठोकपणे सांगू शकत होतो. पण रेल्वेच्या वेळापत्रकामप्रमाणेच पावसाळा आता बेभरवश्याचा झाला आहे.

पावसाच्या नवीन प्रवृत्तीप्रमाणे तो उशीरा सुरू व्हावयास लागला आहे. जून संपत आला तरी आपले शेतकरी चातकासारखे आकाशाकडे डोळे लावून बसलेले असतात. त्यांच्या डोळ्यास पाणी येते पण कठोर वरूण राजाला मात्र त्याची दया येत नाही. पूर्वी डिसेंबर जानेवारीपर्यंत लांबणारा पावसाळा आता ऑक्टोबर मध्येच गायब व्हावयास लागला आहे. म्हणजे पावसाने दोनही बाजूंनी आपले हात आखडावयास सुरवात केली आहे. एवढेच नव्हे तर पावसाचे दिवसही आता कमी होतांना दिसतात.

पण दरवर्षी पावसाची सरासरी मात्र थोड्याफार फरकाने पूर्ण होत असते. पूर्वीचे काळी जेवढा पाऊस पडत होता, जवळपास तेवढाच पाऊस आजही पडतच आहे. याचाच अर्थ असा की पावसाचा जोर आज वाढत चालला आहे. पूर्वीसारखी भीजपावसाची झड आजकाल लागत नाही तर चापकाचे फटके मारल्यासारखा वेगाने पाऊस पडावयास लागला आहे. त्या पावसाला अडवण्यासाठी, त्याचा वेग कमी करण्यासाठी जी वनस्पती आवश्यक होती तिचाही आधीच पहिल्याप्रमाणे आपण ऱ्हास केलेला आहे. यामुळे दिवसेंदिवस महापूरांची संख्या वाढावयास लागली आहे. वेगाने वाहात जाणारे पाणी मुरत नाही तर नदीनाल्यांद्वारे आजूबाजूची वस्ती व पिके नाश करीत ते पाणी समुद्राला परत जावून मिळते.

माणूस तरी केवढा उदार बघा! स्वत:ची पाण्याची गरज असून सुध्दा पावसाचे मिळालेले पाणी अत्यंत उदारपणे तो वाहू देतो व समुद्राला परत करीत असतो. पाण्याची स्थिती जिल्हा परिषदांना मिळत असलेल्या ग्रँटसारखी झाली आहे. न वापरल्यामुळे मिळालेली ग्रँट सरकार ज्या प्रमाणे परत घेवून घेते त्याचप्रमाणे मानवाने न वापरलेले पाणी निसर्ग त्याचेपासून हिरावून घेतो. शेवटी इतका पाऊस पडून सुध्दा माणूस कोरडा तो कोरडाच!

सूर्याला आपण आपला मित्र मानतो. कारण तो आपल्याला उष्णता व प्रकाश देतो. आपले मित्रत्व पक्के व्हावे म्हणून आपण त्याला देवत्वसुध्दा बहाल केले आहे. सूर्याची जी 24 नावे आहेत, त्यापैकी 'मित्राय नम:' असे म्हणून आपण त्याला शरण जात असतो. पण आपला हा मित्र अत्यंत लबाड आहे बरं का! तो आपणाला आवळा देतो पण त्याच्या बदल्यात भोपळा मागतो. भूपृष्ठावर जेवढे पाणी असते त्यापैकी 60 टक्क्याच्यावर पाणी तो आपल्यापासून हिरावून घेऊन जातो. केवढे मोठे नुकसान हे! हे थांबविण्यासाठी आपल्याजवळ काही मार्ग आहे का? आहेनं. हे पाणी आपण सूर्याच्या तावडीतून सोडविण्यासाठी त्याच्यापासून लपवून ठेवू शकतो. आहे आपल्या जवळ तेवढी जागा? आहे नं! भूपृष्ठाचेखाली आपण हे पाणी सहजपणे लपवून ठेवू शकतो. शहाणी माणसे आपल्याला 'पाणी अडवा-पाणी जिरवा' कशासाठी सांगतात? ते नुसतेच सांगत नाहीत तर 'आधी केले मग सांगितले' या तत्त्वाचा वापर करून मगच हे सिध्दतत्व आपल्यासमोर मांडत आहेत. राळेगण सिध्दीचे अण्णा हजारे, हिवरेबाजारचे पोपटराव पवार, राजस्थानमधील राजेंद्रसिंग राणा, आपल्याला अत्यंत जवळचे असलेले अण्णा बोराडे यांनी हे तत्त्व मांडण्यासाठी आपले आयुष्य वेचले . त्यांच्या अनुभवावरून आपण शहाणे होणार की नाही? तहान लागल्यावर विहीर खोदणारी माणसं आपण. परिस्थितीचे गांभीर्य अजूनही आपल्या लक्षात आलेले नाही. पाण्यासाठी आक्रोश सुरू झाल्यावर आपण जागे होणार आहोत का?

आपल्याला एक वाईट खोड लागली आहे. ती म्हणजे सर्व जबाबदाऱ्या सरकारवर ढकलून देण्याची. इतर प्रश्नांप्रमाणे पाणी प्रश्नही सरकारनेच सोडवावा यासाठी हाकाटी करणारे आपणच आहोत. स्वत:चे प्रश्न स्वत: सोडविण्याचे ऐवजी ते सरकारवर ढकलण्यात कोणता शहाणपणा? सरकराच्या मर्यादा आपण जाणून घेतल्या पाहिजेत. तोकडी यंत्रणा, पैशाचा अभाव व दिशाहीन कारभार यामुळे सरकार हा प्रश्न सोडविण्यासाठी असमर्थ आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणेला मदतीचा हात पुढे करून हा प्रश्न सोडविता येणार नाहीका याचा विचार प्रत्येकाने करणे आवश्यक आहे.

राम म्हणा, अथवा रहिम म्हणा, देव जसा एकच असतो त्याचप्रमाणे जमिनीमध्ये पाणी भरण्याच्या पध्दती जरी भिन्न असल्यातरी सर्वच पध्दतींद्वारे शेवटी जलपुनर्भरणच होते! या सर्वच पध्दतींचे आपण दोन पध्दतीत विभाजन करू शकतो. त्या दोन पध्दती म्हणजे शहरी भागातील पुनर्भरण व ग्रामीण भागातील पुनर्भरण सर्वप्रथम आपण शहरी भागातील पुनर्भरणावर आपले लक्ष केंद्रित करू या.

शहरी भागातील पुनर्भरण :


शहरांमध्ये पाणी पुरविण्याचे तीन महत्वाचे स्त्रोत असतात. विहीरी, बोअर अथवा ट्यूब वेल्स व शहराला पाणी पुरविणारे छोटेखानी तलाव हे ते तीन स्त्रोत आहेत. याशिवाय पावसाचे पाणी साठविण्यासाठी तयार केलेल्या टाक्यातसुध्दा जलसंग्रहण केले जावू शकते.

बोअरमध्ये पुनर्भरण :


तुमच्याकडे स्वत:चे बोअर असेल तर त्या बोअरमध्ये गच्चीवरील, छपरावरील अथवा जमिनीवर जमा होणाऱ्या पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण केले जावू शकते. तुमच्या आंगणाचा उतार तपासून बघा व ज्या ठिकाणी पाणी जमण्याची शक्यता आहे त्याठिकाणी पाच फूट लांब, पाच फूट रूंद व 8 फूट खोल अशा आकाराच एक खड्डा खणा. या खड्ड्यात छोटे दगड, विटांचे तुकडे व जाडी रेती यांचे समान थर टाकून खड्डा भरून टाका. सर्वात वरती बारीक रेतीचा थर टाका. पाऊस सुरू झाल्यावर आंगणात जमा होणारे पाणी जमिनीत मुरायला सुरवात होईल. जमिनीतील पाण्याचे प्रवाह या पाण्याला बोअरकडे घेवून जातील व त्यामुळे बोअरची उपश्याची क्षमता वाढावयास मदत होईल.

तुमच्या घरी बोअर अथवा विहीर नसली तरीही प्रयोग करावयास हरकत नाही. पाणी जमिनीत मुरविणे हे एक सामाजिक व्रत आहे. त्यामुळे या मुरलेल्या पाण्याचा तुम्हाला जरी नाही तरी कोणालाही त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा परमार्थ करावयास काय हरकत आहे? यासाठी येणारा खर्चही बघा किती कमी आहे. खड्डा खोदण्याची मजुरी अंदाजे रू. 400/- व त्यात वर वर्णिलेले मटेरियल भरण्यासाठी तेवढाच खर्च. अशाप्रकारे रू.1000/-चे आत जमिनीत पाणी मुरण्याची कायमची सोय केल्याचे समाधानही थोडके नाही.

खड्डा वर वर्णिलेल्या आकारचाच असावा असे बंधन नाही. स्वत:च्या आंगणाचे क्षेत्रफळ, खुली जागा इत्यादींचा आकार बघून खड्डा कसा खणायचा ते ठरवा. खड्डा आंगणातच खणला पाहिजे असेही नाही कंपाऊंडचे बाहेर अशी सोय केली तरी चालू शकते. तो खड्डा पूर्णपणे मटेरियलने भरला जात असल्यामुळे कोणी त्यात पडूही शकत नाही व अपघात होण्याचीही शक्यता नाही.

जमिनीच्या वरच्या थरात सहसा चिकण मातीचा मोठा थर असतो. ही माती मात्र निघावी या पध्दतीने खड्डा खणावा. काळी माती पाण्याला जमिनीत मुरण्यास मज्जाव करते. त्यामुळे ती जर काढून टाकली तर पाणी मुरण्याचा वेग साहाजिकच वाढू शकतो. मातीचे कण एकमेकाला इतके चिकटले असतात की त्यातून पाणी मुरण्याला संधीच मिळत नाही. पण आपण खड्ड्यात जे मटेरियल भरले आहे त्यात मात्र भरपूर फटी राहणार. त्यामुळे पाणी मुरण्याची क्रीया जलदपणे होवू शकते.

आपल्या अंगणात बोअर असल्यास पध्दतीत थोडे फार बदल करावे लागतील. 3 फूट त्रिजा घेवून बोअर भोवती एक गोल आखून घ्या. ती गोलाकार जागा खड्डा खणण्यासाठी वापरा - खड्डा खोदतांना बोअरच्या केसिंग पाईपला धक्का बसणार नाही याची काळजी घ्या. हा खड्डा आठ फूट खोदल्यावर त्यात आधीच वर्णन केल्याप्रमाणे दगड, विटा व जाडी रेती यांचा भरणा करा. गच्चीवरून खाली आलेला, पावसाचे पाणी खाली आणणारा पाईप तुकडा जोडून या खड्ड्याचा तोंडापर्यंत आणून सोडून द्या म्हणजे बोअरच्या अगदी समीप पाणी मुरण्याची सोय होवून त्याचा बोअरमधील पाणी वाढण्यासाठी निश्चितच फायदा होईल.

आतापर्यंत वर्णिलेले दोनही मार्ग अप्रत्यक्ष स्वरूपाचे होते. तिसऱ्या पध्दतीत आपण प्रत्यक्षपणे पाणी बोअरमध्येच सोडणार आहोत. गच्चीवर पडलेल्या पावसाचे पाणी अत्यंत स्वच्छ असते. पहिल्या पावसानंतर गच्ची स्वच्छ धुवून काढा. त्यानंतर गच्चीवरील पावसाचे पाणी रेन वॉटर पाईपने खाली आल्यावर त्या पाईपला फिल्टर बसवा. असा फिल्टर बाजारात तयार विकत मिळतो. त्यामध्ये रेतीचे तीन थर असतात. त्यातून हे पाणी गेल्यामुळे ते अधिक शुध्द बनते. त्या फिल्टरचे दुसरे टोक बोअरमध्ये जोडून टाका. म्हणजे पाऊस आला रे आला की ते पाणी गच्चीवरून पाईपने खाली येईल व फिल्टरमधून गाळून ते बोअरमध्ये प्रवेश करेल. अशा प्रकारे शेकडो लिटर पाणी जमिनीमध्ये प्रविष्ट होईल. ही यंत्रणा बसविल्यावर डिसेंबर मध्ये कोरडा पडणारा बोअर पहिल्या वर्षी मार्च पर्यंत पाणी पुरवठा करेल व पुढील वर्षी कदाचित तो पुढील पावसाळा येईस्तवर कार्यरत राहील. अशा प्रकारे स्वत: जमिनीमध्ये पाणी भरा व मगच त्याचा उपसा करा.

आता पर्यंत जलपुनर्भरण कसे करावयाचे याबद्दल आपण विचार केला. यामुळे नक्की किती पाणी जमिनीत मुरते याचा आता आपण थोडक्यात विचार करू. गच्चीवरील पाणी प्रत्यक्षपणे फिल्टर लाऊन बोअरमध्ये टाकण्याचे ठरविल्यास गच्चीचा आकार 1000 चौरस फूट व पावसाचे प्रमाण 700 मि.ली मिटर असता अंदाजे 50000 लिटर पाणी जमिनीत जावयास हरकत नसावी. आपलेकडे बोअर नसेल व निव्वळ पुनर्भरण खड्डा करून पाणी मुरवायचे असेल तर जवळपास 2 लाख लिटर पाणी जमिनीत मुरू शकते. बरेचदा आपण कपांऊडच्या आत किंवा बाहेर 40 फूटाचे जवळपास चर खणला व त्यात पुनर्भरण करावयाचे ठरविले तर त्या चरामुळे 1 लाख लिटरचेवर पाणी जमिनीत मुरू शकेल. खड्ड्यांचे वा चरांचे आकार जागेजागेप्रमाणे बदलू शकतात. आकार कोणतीही का असेना पुनर्भरण करणे महत्वाचे!

या ठिकाणी एक सावधानचेचा इशारा देणे आवश्यक आहे. जमिनीत किती पुनर्भरण होवू शकेल हे जमिनीचे आत मुरूमाचे वा खडकांचे थर कसे पसरले आहेत यावर अवलंबून राहील. काही जमिनीचे आतील रचनाच अशी असेल की जिथे पाणी मुरणे अशक्यच आहे तिथे पुनर्भरण करता येणार नाही. अशा ठिकाणी पाण्याचे संग्रहण करणे योग्य ठरेल. राजस्थानमध्ये तर घराचे बांधकाम करतांनाच घरासाठी तळघर बांधून त्या तळघरात पाण्याचा साठा केला जातो. पण घर आधीच बांधले असल्यास आंगणातसुध्दा टाकी बांधून त्या टाकीत गच्चीवरील शुध्द पाणी साठविले जाऊ शकते. या टाक्याला चांगल्याप्रकारे बंद करण्याची व्यवस्था केली व त्याचा संपर्क प्रकाश व हवा यांचेशी येवू न दिला तर ते पाणी शुध्द राहते व अडीअडचणीच्या काळात त्या पाण्याचा वापर केला जावू शकतो. महाराष्ट्राचे निवृत्त पोलिस महासंचालक श्री. सूर्यकांत जोग यांनी चिखलधरा गावात पाण्याच्या मोठमोठ्या टाक्या बांधून त्यांत पाण्याचा संग्रह करून गावातील पाण्याचा प्रश्न याच पध्दतीने सोडविला.

पूर्वीचे काळी प्रत्येक गावात तलाव राहात असत. या तलावातून गावकऱ्यांची पाण्याची गरज भागत असे. त्या तलावाची स्वच्छता, तलावाच्या परिसराची स्वच्छता व तलावातून गाळ काढण्याचे काम गावातील नागरिकच करीत असत. आज मात्र हे तलाव घाण पाण्याची डबकी बनले आहेत. पाणी प्रश्न एवढा तीव्रतेने भेडसावित असता एवढे पाणी वाया जाऊ देणे बरोबर नाही. गावातल्या सार्वजनिक संस्था, गावातील जनता व सरकारी यंत्रणा इत्यादींनी गावात सरोवर संवर्धन मंडळ स्थापन केले तर त्या मंडळातर्फे पाण्याचा हाही स्त्रोत वापरात येवू शकतो.

तलावांमधील गाळ नियमितपणे काढला तर पाण्याखालील जमिनीतील छिद्रे व फटी मोकळ्या होतील व जमिनीला पाझर मिळाल्यामुळे पाणी वेगाने मुरून जमिनीतील पाण्याची पातळी वाढावयास मदत झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्यासाठी तलावाचा परिसर स्वच्छ राहील, त्यात जनावरे धुतली जाणार नाहीत, कपडे धुतले जाणार नाहीत, गावातले सांडपाणी आत शिरणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक राहील. नसता सांडपाणी जमिनीत मुरल्यास जमिनीतील पाण्याचे साठेही प्रदूषित झाल्याशिवाय राहणार नाहीत. राजस्थानमधील अल्वर जिल्ह्यात श्री. राजेंद्रसिंग राणा यांचे जोहाडचे प्रयोग याच पध्दतीचे प्रयोग होते. त्याचा परिणाम म्हणून जमिनीतील पाण्याची पातळी 20 फूटांनी वाढल्याचे सांगितले जाते. त्यांचे हे प्रयोग पाहण्यासाठी देशविदेशातून पर्यटक या परिसरात येत असतात. व एवढे मोलाचे सामाजिक काम केल्याबद्दल जगन्मान्य मॅगॅसेसे पुरस्कार देवून त्यांना गौरविले गेले. प्रत्येक प्रदेशात असे राजेंद्रसिंग जन्मले तर भारताचे चित्र किती वेगाने पलटेल याचे स्वप्न बघावयाला काय हरकत आहे?

शहरात कारखाने व सरकारी कार्यालये, शाळा व महाविद्यालये, नगरपालिकेच्या मालकीच्या खुल्या जागा याठिकाणी पुनर्भरण व वृक्षलागवडीचे काम हाती घ्यावयास काय हरकत आहे? माझे तर असे प्रामाणिक मत आहे की यांना 1 वर्षाची नोटिस देवून स्वत:ची पाणी व्यवस्था स्वत: विकसित करण्याबद्दल सांगण्यात यावे. एक वर्षानंतर तुम्हाला सार्वजनिक पाणी व्यवस्थेतून पाणी पुरवठा केला जाणार नाही याची जाणीव या नोटिसीद्वारे देण्यात यावी. या संस्थांची छपरे कित्येक चौरस फुटांची राहतात, त्यांनी जर मनावर घेतले, नव्हे तर त्यांना तशा प्रकारची सक्ती करण्यात आली तर शहरात भेडसावणारा पाणी प्रश्न चुटकीसरशी सुटू शकेल. हे सर्व करण्यासाठी नगरपालिकेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रश्नांची जाणीव व दृष्टी असणे मात्र आवश्यक आहे.

ग्रामीण भागातील पुनर्भरण :


आतापर्यंत आपण शहरात पुनर्भरण कसे करावे, त्यासाठी कोणत्या पध्दती वापराव्यात, त्यासाठी येणारा अपेक्षित खर्च किती येवू शकतो, नागरिकांचा व सामाजिक संस्थांचा या कार्यात सहभाग वाढविणे कसे अगत्याचे आहे याबाबत सविस्तर विचार केला.

ग्रामीण भागात तर जलपुनर्भरणाला अनन्य साधारण महत्व आहे हे विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरून लक्षात येईल. या दोन्ही प्रदेशात ज्या आत्महत्या झाल्या त्यापैकी 90 । पेक्षा जास्त आत्महत्या कोरडवाहू शेतकऱ्यांच्या होत्या. जर शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध असेल तर त्यांना दरवर्षी दोन पिकांपेक्षा जास्त पिके काढता येतील व त्यामुळे आर्थिक सुबत्ता येवून मानहानीकारक आत्महत्या करण्याची गरजच पडणार नाही. शेती कसण्यासाठी चांगले बीबियाणे, खतांच्या मात्रा, पैसा व शेतकऱ्यांचे श्रम या निविष्ठा उपलब्ध केल्या जावू शकतात पण पाणीच नसेल तर सर्वच मुसळ केरात जाते व शेतकऱ्याच्या पदरात अपयश व नैराश्य याच गोष्टी पडतात. यामुळे संपूर्ण शेती व्यवस्थाच कोलमडते की काय असे वाटावयास लागले आहे.

एखादा अदृष्य हात येईल व माझे भले करून जाईल या भ्रमात शेतकऱ्याने कदापिही राहू नये. माझ्या शेताची उत्पादकता वाढविण्यासाठी गेल्या दहा वर्षात मी काय प्रयत्न केले हा प्रश्न शेतकऱ्यांनी स्वत:च्या मनाला विचारून पाहावा. या प्रश्नाचे उत्तर नकारात्मकच राहणार आहे. माझे जवळ पैसा नाही म्हणून मी शेताचा विकास केला नाही असे उत्तर आल्यास स्वत:ला फसविल्या सारखे होईल. मला श्रम करायची इच्छा नाही हे त्याचे खरे उत्तर आहे.

तुम्ही स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबियांची शक्ती वापरून स्वत:च्या शेतात शेततळ्याचा प्रयोग करून पाहायला काय हरकत आहे? फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे हे शेतकऱ्याच्या जीवनातील चार महिने असे आहेत की त्याला या कालखंडात तुलनात्मक दृष्ट्या कमी काम राहते. हे चार महिने म्हणजे 120 दिवस. सर्वांनी मिळून दररोज खोलगट व उताराची जागा पाहून एक ब्रास खोदकाम केले तर चार महिन्यात 120 ब्रास खोदकाम झालेले राहील. खोदलेली माती काठावर लावली तर खोली दुपटीपेक्षा जास्त वाढलेली दिसेल. एक ब्रास म्हणजे 100 घनफूट व एक घनफूट म्हणजे 28 लिटर. या सूत्राचा वापर केला तर 120 X 2 X 100 X 28 = 6,72,000 लिटर पावसाचे पाणी तुम्ही खणलेल्या या तळ्यात जमा होऊ शकेल. दर मोठ्या पावसाला हे तळे भरेल व पाणी जमिनीत मुरून रिकामे होईल. वर्षभरात असे मोठे पाऊस पाचसहादा तरी येतातच येतात. त्यामुळे जमिनीत 30 ते 40 लाख लिटर पाणी जमिनीत मुरू शकेल. हा प्रयोग खेड्यातील प्रत्येकच शेतकऱ्याने केला तर पुनर्भरण एवढ्या मोठ्या प्रमाणात होईल की ग्रामीण पाण्याचा प्रश्न सुटावयास मदत झाल्याशिवाय राहणार नाही. हे सर्व करण्यासाठी तुम्हाला किती खर्च आला सांगा बरे! एकही दमडी खर्च न करता केवढे पाणी तुम्ही जमा केले आहे! पण दुर्दैव हे की आपण परावलंबी झालो आहोत. सरकारवर अवलंबून राहण्याची आपल्याला सवय लागली आहे. देगा हरी, बाजी वरी ही वृत्ती आपण सोडली तर पृथ्वीवर स्वर्ग अवतरल्याशिवाय राहणार नाही.

या ठिकाणी काही पथ्य मात्र आपल्याला पाळणे आवश्यक राहील. माझ्या तळ्यात कमीतकमी गाळ कसा जमा होईल यासाठी मी जागरूक असणे आवश्यक आहे. गाळ जमा झाल्यास तो मी दरवर्षी उपसण्याचा प्रत्यन करणे योग्य ठरेल. माझे तळे फुटून इतरांना त्याचा उपसर्ग तर होणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे. त्यासाठी पाण्याचा दाब जास्त वाढू नये यासाठी सांडव्याची तरतूद करावी लागेल. पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग हवेच्या प्रवाहामुळे व उष्णतेमुळे वाढू नये यासाठी तळ्याच्या सर्व बाजूनी मी झाडी लावली पाहिजे.

माझी पाण्याची गरज काय, माझे जवळ किती एकर जमीन आहे. त्या जमिनीत मी कोणती पिके घेणार आहे, हे प्रश्न मनाला विचारून मगच मला माझ्या तळ्याचा आकार ठरवावा लागेल. संपूर्ण तळे एकाच वर्षात खोदले गेले पाहिजे असेही नाही. अर्धे या वर्षी व अर्धे पुढील वर्षी खोदले गेले तरी काय हरकत आहे?

शेततळे खणल्यामुळे माझी जमीन वाया जाईल ही भिती बरेच शेतकरी बोलून दाखवितात पण आता माझे शेतात पाणी उपलब्ध झाल्यामुळे पिकांची सुरक्षितता, त्यामुळे वाढणारे उत्पादन व दुबार शेती कसण्याचा विचार करणार की नाही? असे केले नाही तर आपल्यासारखे मूर्ख आपणच ठरू.

एवढेच नव्हे तर बांधाला बांध भिडलेले तीनचार शेतकरी मिळून सुध्दा शेततळे खणावयास हरकत नाही. शेजाऱ्याशी भांडलेच पाहिजे, त्याचेशी संबंध नेहमीच तणावाचे राहिले पाहिजे असा तर काही नियम नाहीना? आसपासच्या शेतकऱ्यांनी चर्चा करून सांगड बांधली तर कठीण काम सोपे होईल व प्रत्येकाला त्याचा फायदा मिळेल.

दरवर्षीच पाहिजे तेवढा पाऊस पडतोच असे नाही. एखादे वर्षी पावसाने दगा जरी दिला तरी शेततळ्याद्वारे जमिनीत मुरविलेले पाणी शेतकऱ्याला त्या वर्षभर तरी साथ देवू शकते हा अनुभव शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे शेततळे खणण्याचा उपक्रम राबविणे शेतकऱ्याला किती हितावह ठरू शकतो याची कल्पना येईल.

शेततळ्यापेक्षा एक पुढील व मोठे पाऊल गावतळ्याचे ठरू शकते. पूर्वीचे काळी अशी गावतळी मोठ्या संख्येने अस्तीत्वात होती पण आता मात्र त्यापैकी बरीचशी नामशेष झालेली दिसतात. त्यावंर सर्वच बाजूंनी आक्रमण होऊन तिथे वस्त्या तयार झाल्या आहेत व तिथे गावतळे होते हे सांगूनही खरे वाटत नाही. या गावतळ्यांच्या पाझराचा गावातील सर्व विहीरींना फायदा व्हायचा व त्याद्वारे पुनर्भरणाचे काम बिनबोभाटपणे होत असे.

आज पाणलोट क्षेत्र विकास हा परवलीचा शब्द बनला आहे. एखादा विशिष्ट पाणलोट विचारात घेवून त्यात असलेल्या छोट्या नद्या, नाले, ओढे यांचेमधील पाण्याचे योग्य नियोजन करून पाण्याचा जमिनीतील पाझर वाढविला जावू शकतो ही बाब सर्वमान्य झाली आहे. छोट्याछोट्या ओढ्यांवर वनराई बंधारे, दगडी बांध, सिमेंट बंधारे बांधून पाणी अडविले तर वाहून जाणारे पाणी थांबते केले जाते व थांबलेले पाणी जमिनीत मुरविले जावू शकते. हे काम करणे गावातील ज्येष्ठांना, महिलांना, तरूणांना आव्हानात्मक ठरू शकते व जर हे काम योग्य मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आले तर गावाची पाण्याची सर्व गरज गावातच भागविली जाऊ शकते. माझ्या गावातून पाण्याचा एक थेंबही गावाचे बाहेर वाहू दिला जाणार नाही ही शपथ मात्र घेणे आवश्यक राहील. लोकांचा सहभाग झाला, वाढला तरच पाणलोट विकासाचे काम यशस्वी ठरू शकते.

समाजात एकत्रित येवून काही काम करण्याचा पिंड नाही, आपण बरे व आपले काम बरे अशी आपली वृत्ती असेल तरीही जलपुनर्भरणाच्या कार्यात आपण सहभागी होवू शकतो. आपल्या स्वत:चे शेतात विहीर असू शकते. तिच्यात पुनर्भरण करून आपल्या स्वत:च्या पाण्याचा प्रश्न आपण स्वत:सोडवून घेवू शकतो.

आपल्या विहीरींच्या जवळपास पाणी जमा होणारी जागा शोधून काढा. त्या जागेवर 20 फूट लांब, 20 फूट रूंद व 6 ते 8 फूट खोल खड्डा खणा. या खड्ड्याच्या आतमध्ये विहिरीच्या बाजूला 5 फूट लांब, 5 फूट रूंद व पाच फूट खोल असा खड्डा खणा या खड्ड्यातील खड्ड्याच्या तळाशी 4 इंच जाडीचा एक पाईप टाकून त्याचे तोंड आतल्या बाजूने विहीरीच्या आत टाका. व त्यानंतर तो छोटा खड्डा छोटे दगड, विटा व जाडी रेती यांनी भरा. शेवटचा थर बारीक रेतीचा टाका. पाऊस सुरू झाला म्हणजे या मोठ्या खड्ड्यात पाणी जमा होईल. त्यातच तो छोटा खड्डा असल्यामुळे पाणी तिकडे जाईल व त्यात ते मुरून, गाळले जावून खाली टाकलेल्या पाईपद्वारे ते विहीरीत पडावयास सुरूवात होईल. अशा प्रकारे विहिरीत पाणी जमा व्हावयास सुरूवात होईल. जेव्हा ते विहीरीतील नेहमीच्या पातळीचे वर जाईल तेव्हा ते विहीरीच्या चोहोबाजूना असलेल्या जमिनीत आडवे पसरेल व हळूहळू जमिनीतील पाण्याचा साठा वाढविण्याकडे त्याची प्रवृत्ती राहील. जसजसा उपसा वाढेल तसतसे पाझराद्वारे आजुबाजुला पसरलेले पाणी विहीरीत परत यायला सुरूवात होईल. व त्यामुळे सर्व साधारणपणे आपला पंप दररोज दोन तास चालत असेल तर त्याची क्षमता वाढून तो दोन तासापेक्षा निश्चितच जास्त चालायला लागेल. जमिनीच्या आतील मुरूमाचे व खडकाचे थर जर अनुकूल असतील तर या पुनर्भरणाचा शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात फायदा होईल एवढेच नव्हे तर विहीरीतील पाणी वाढल्यामुळे तो दुबार व तिबार पध्दतीने शेती करू शकेल. श्री. अण्णा हजारे यांच्या राळेगणसिध्दीच्या प्रयोगात या अडलेल्या पाण्यामुळे तो प्रदेश आवर्षणग्रस्त असूनसुध्दा शेतकऱ्यांना बारमाही शेती करणे शक्य झाले आहे.

या ठिकाणी काही खबरदाऱ्या घेणे आवशय्क आहे. जो खड्डा खोदला त्यात शेतातील गाळ जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक राहील. हा खड्डा अतल्याआत ढासळू नये याचीही तरतूद करावी लागेल. या खड्ड्यात प्रदूषित पाणी शिरणार नाही याचीही खबरदारी घ्यावी लागते. ती घेतली नाही तर प्रदूषित पाणी जमिनीत शिरल्यामुळे भूगर्भातील पाणीही प्रदूषित होण्याची शक्यता वाढेल. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरवातीला छोट्या खड्ड्यातील मटेरियल बाहेर काढून ते स्वच्छ करून त्याची पुनर्रचना करणेही फायदेशीर ठरेल.

हे विहीरीत भरलेले पाणी जमिनीत शिरल्यावर आत ते पसरेल असे आपण म्हटले आहे त्यामुळे हे पाणी आपल्या हातातून निसटून तर जाणार नाहीना अशी भिती काही शेतकरी व्यक्त करतात. ही भिती थोडीफार खरीही आहे. या पाझराचा फायदा आजुबाजूच्या शेतकऱ्यांना होवू शकतो. साधारणपणे आपण जमिनीत जमा केलेल्या पाण्यापैकी किमान 60 प्रतिशत पाणी आपल्याला निश्चितच परत मिळू शकते. पण आपल्या शिवाय इतरही हे पुनर्भरणाचे काम करणार असल्यामुळे त्यांच्या पुनर्भरणाचा फायदा आपल्याला पण मिळणार नाही का?

असे आहे पुनर्भरण पारायण. ज्यांनी हा वसा स्वीकारला त्यांचे भले झाले व ज्यांनी ऊतून मातून या वशाकडे दुर्लक्ष केले तेच स्वत: दुर्लक्षित झालेत. मग याच पावसाळ्यात घेणार न वसा पुनर्भरणाचा?

डॉ. दत्ता देशकर, पुणे - (भ्र : 9235203109)

Path Alias

/articles/jalapaunarabharana-kaalaacai-garaja

Post By: Hindi
×