जलजागृती सप्ताह - शासनाचा स्तुत्य उपक्रम


ज्या प्रमाणे काही वर्षापुर्वी प्रौढशिक्षण अभियानाद्वारे शिक्षणाचे महत्व जनतेस पटवून दिले व त्याचा अत्यंत चांगला परिणाम दिसून आला, त्याच प्रमाणे हे जल अभियानाचा परिणाम काही वर्षामध्ये दिसून येणार आहे.

22 मार्च हा दरवर्षी जगामध्ये जलदिन म्हणून साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये यावेळेपासून उन्हाची तीव्रता जाणवते, पाणीसाठे आटण्याकडे जातात कधीकधी या पूर्वीच आटलेले असतात जसे की, यावर्षीची परिस्थिती आहे.

महाराष्ट्रात बहुतांशी भागामध्ये व प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये गेल्या 3-4 वर्षापासून व त्यातल्यात्यात या वर्षी गंभीर पाणी टंचाई आहे. वर्षानुवर्षे केलेला उपसा व त्यामुळे खोल जाणारी भुगर्भातील पाणी पातळी व त्याच बरोबर यावर्षी झालेले अत्यल्प पर्जन्यमान अशा दुहेरी मार्‍यामध्ये मुख्यतः शेतकरी व ग्रामीण समाज भरडला आहे. यामुळे केवळ पिण्याच्या पाण्याची समस्या नसून शेत उत्पादनामध्ये कमालीची घट झालेली आहे. शेतकर्‍याची क्रयशक्ती देखील या समस्येमुळे कमी झालेली आहे. आजमितीस शेतकरी शेतात काम नसल्यामुळे केवळ पिण्याच्या पाण्याच्या चिंतेत जगत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी घंटो न घंटे रांगेत उभे रहावे लागत आहे.

निसर्गाच्या अवकृपेबरोबरच शेतकरी हा आर्थिक परिस्थितीमुळे दुरगामी नियोजन करण्यास त्यास वाव नसल्याने पुरता हतबल झाल्याचे दिसत आहे.

निसर्गाच्या अवकृपेमुळे आजमितीस केवळ हंडाभर पाण्याकरीता घंटो न घंटे वाट पाहणारे लोक आपणास दिसतात. यामुळे लोकांची क्रयशक्ती वाया जात आहे. देशाचे नुकसान होत आहे. यासाठी पाणी किती महत्वाचे आहे याचे प्रबोधन जलजागृती अभियानात आहे. या बाबींचा विचार करून शासनाने जलसंपदा खात्यासोबतच पाण्याशी संबंधीत इतर खात्यावर पाणी बचत, सुयोग्य नियोजन, भविष्यात महत्व अधोरेखीत करणेसाठी कृषी, पाणी पुरवठा, महसूल, ग्रामिण विकास इ. खात्याचा समन्वय साधुन अत्यंत उपयुक्त असा जलजागृती सप्ताह हा कार्यक्रम तुझे दु:ख तुझे नाही तर तुझे दुःख आमचे आहे या भावनेने दि. 16 ते 22 मार्च या दरम्यान हाती घेतला होता. यासाठी जलसंपदाबरोबरच शासनाच्या विविध खात्याच्या लोकांनी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत. असा सप्ताह दरवर्षी घेण्यात येणार आहे.

यामुळे मराठवाड्यातील आठही जिल्हे पाण्याच्या महत्वाबाबत व पाणी हेच जीवन आहे पाण्यापासून सर्व जीव मात्रांचे आस्तित्व आहे. त्यामुळे पाणी हे पुजनीय वस्तू असून पाण्याचे मोल करता येणार नाही, पाण्याचा किफायतशीर उपयोग ही संपत्ती निर्माण करण्याचे पुण्य देऊ शकते, ही बाब सर्व अभियंते, शासनाच्या इतर संबंधीत खात्यातील सर्व अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, एनजीओ, किर्तनकार, लेखक, कवी, स्वयंसेवक करू लागले आहेत.

निसर्गाचे चक्र जरी थोड्या कालावधी करीता बदलले असले तरी कायमस्वरूपी पाण्याविषयी सर्वसामान्याचा चंगळवाद हा या समस्येस काही अंशी कारणीभुत असल्यामुळे पाणी बचतीवर व सुयोग्य वापरावर भर देणे व जन-मानसामध्ये जागृती करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून लोकसहभागातून जलसमृध्दीकडे हा कार्यक्रम अस्सल ग्रामीण लोकांना समजावा अशा प्रकारे साजरा करण्यात आला आहे. यामध्ये भारूड किर्तन. पथनाट्य भित्तीचित्र रंगवणे स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, घोषवाक्य, व्याख्याने, प्रभातफेरी, मॅरेथॉन. गोंधळ कार्यक्रम इ. द्वारे खेड्यामध्ये प्रत्येक नागरीकापर्यत पोहचून पाणी कसे मौल्यवान आहे, पाणी निर्मिती करणे शक्य नसल्यामुळे पाणी बचत ही पाण्याची निर्मिती आहे ही वस्तुस्थितीची जाणीव लोकामध्ये निर्माण करणेकरीता या कार्यक्रमाची आखणी व्यापक स्वरूपात करण्यात येऊन कार्यक्रम राबण्यात आला आहे.

ज्या प्रमाणे काही वर्षापुर्वी प्रौढशिक्षण अभियानाद्वारे शिक्षणाचे महत्व जनतेस पटवून दिले व त्याचा अत्यंत चांगला परिणाम दिसून आला, त्याच प्रमाणे हे जल अभियानाचा परिणाम काही वर्षामध्ये दिसून येणार आहे.

पाणीवापर टक्केवारी पाहता जवळपास 85 ते 87 टक्के पाणी हे शेतीसाठी वापरले जाते. 7 ते 8 टक्के पाणी उद्योगासाठी व 7 ते 8 पाणी टक्के पिण्यासाठी वापरले जाते. यामुळे मुख्यतः ज्या क्षेत्रासाठी पाण्याचा वापर जास्त आहे. त्याच क्षेत्रात बचतीस जास्त वाव आहे. ही बाब शेतकर्‍यांनी ओळखणे आवश्यक वाटते. साधारणतः शेतीतील वापरल्या जाणार्‍या पाण्यापैकी 60 ते 65 टक्के पाणी वाया जाते, यामध्ये वापरण्याच्या पद्धतीतील चुक असेल, अतिरीक्त अनावश्यक वापर असेल अथवा पाण्याचे लीकेज असेल, बाष्पीभवनाद्वारे होणारे नुकसान असेल, त्यामुळे वाया जाणार्‍या पाणी वापरावर नियंत्रण मिळविल्यास आपोआप निसर्गाने दिलेले पाणी सर्वांना यथेच्च पुरणार आहे.

शेतकर्‍यांनी यापुढे अमुक इतक्या एकर वर इतके टन उत्पादन काढले असा विचार जो सद्या रुढ आहे. त्या ऐवजी इतक्या घ. मी किंवा इतक्या कोटी लीटर पाण्यामध्ये इतके टन उत्पन्न काढले असा विचार करणे काळाची गरज बनलेली आहे. प्रगत राष्ट्रामध्ये या बाबीने शेती उत्पन्नाकडे पाहिले जाते.

ग्रामीण समाजसहीत सर्वसमाजास जेंव्हा पाण्याचे महत्व लक्षात येईल त्यावेळेस राज्याच्या उत्पादनामध्ये भरपूर वाढ दिसून आल्याशिवाय राहणार नाही एवढे नक्की.

हीच बाब जनजागृती कार्यक्रमाद्वारे प्रकर्षाने जनतेपुढे आणण्यात आले आहे. ज्याचे उपयुक्त परिणाम भविष्यात दिसणार आहेत. आणि यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यापर्यंत पाण्याचे महत्व असणार आहे.

पाणी बचतीस व सुयोग्य वापर करण्याची सवय लागणे आवश्यक आहे. याची जाण यावर्षी येत आहे. यामुळे आता प्रत्येकाने याबाबत कटाक्षाने उपाययोजना करणे आवश्यक आहे.

इंजि. राजेंद्र काळे, औरंगाबाद, मो : 9422701164

Path Alias

/articles/jalajaagartai-sapataaha-saasanaacaa-satautaya-upakarama

Post By: Hindi
×