प्रश्न : स्त्रीरोगतज्ज्ञ पाण्यावर कसा आला ?
उत्तर : पुण्यातील पूर्व पश्चिम वाहणाऱ्या मुळामुठा नदीचे पात्र, काठावर हिरवी झाडी व उन्हाळ्यातही सुरूवात होती. दुपारच्या हवेला जोर होता. पाण्यावर लाटा हळूवार उठत होत्या. काही आपल्या डोक्याला फेसाळत होत्या. झाडेही हवेबरोबर झुलत होती. हवेत पानेही पाण्याबरोबरीने बोलत होती. सकाळची न्याहारी संपवून पाखरे विसावली होती.
अशा वातारणात निळ्या रंगाची शिडे दिमाखात फडकावत नौका पाणी कापत होती. लाटांवर आदळत स्वत: हेलकावत होती.
वारा, शिडांना फुंकून एका तीराहून दुसऱ्या नावेस नेत खेळत होता. आणि नावाडी म्हणून माझ्यातला उत्साहाचा अग्नी तेवत होता.
अशा ह्या खेळात निर्सगाने मला ही सामील करून घेतले होते. नौकेचे सुकाणू धरून, दुसऱ्या हातात शिडाची दोरी धरून, गुडघ्यावरील शरीर नौकेबाहेर झोकून, नौकेचा तोल सांभाळत मी ह्या खेळात सामील झालो. आणि हा खेळ आकाश, सूर्याच्या साक्षीने नि:शब्द होवून वरून बघत होतो.
सह्याद्रीच्या अनेक डोंगरांगातून मुळामुठेचा उगम झाला. हिच्या पाण्याच्या पुण्याईने पुरातन पुनवडीचे आज पुणे झाले. पुण्यनगरी ही उपाधी कदाचित ह्या नद्यांमुळेच असावी. हे जगातले एकमेव शहर आहे, जे पाच नद्यांच्या काठी नांदतेय. नागझरी, मुळा, मुठा, पवना व रामनदी ह्या साऱ्या मुळा - मुठा होत भीमेत सामावल्या. आईच्या अस्थि मी इंद्रायणीत सोडल्या होत्या. तिच्या पाण्याबरोबर वाहत त्यांची भेट काही अंतराच्या प्रवासाने मुळा मुठेच्या पाण्याशी झाली.
स्वच्छ गार पाण्याबरोबर हवाही पश्चिमेकडून वाहत येताना ह्या नदीपात्राचा आसरा घेते. शहरातील इमारतींनी हवेचा मार्ग रोखलाय. तेथे वाऱ्याची चाहूल लागत नाही. नदीवर मात्र ती लगेच जाणविते. वाऱ्याचे आणि झाडांचे वाद आणि संवाद वाद्यवृंदाच्या सूरांसारखे येथेच ऐकू येतात.
आकाश निरभ्र का ढगांनी आच्छादित, हेही दिसते नदीवरून.
नदी पूर्व पश्चिम वाहते. सूर्यास्ताच्या विविध रंगी छटा मोहक दिसतात. पाण्याच्या हेलकाव्यावर क्षणोक्षणी त्याची आकृती वेगळी दिसते. मध्यान्ही लाटांना जोर आला की असंख्य सूर्य दिसू लागतात. प्रत्येक लाटेवर वेग - वेगळ्या दिशांना चमकू लागतो. दिवसाचा हा सूर्याचा प्रवास नदीतीरावर सखोल निरिक्षता येतो. नदी मार्गाच्या आलेखावर सूर्याेदयाचे व सूर्यास्ताचे स्थान बघितले की उत्तरायण व दक्षिणायण लक्षात येते.
पावसाळ्यात आकाशात एक वेगळी शोभा दिसते. प्रत्येकात नवीन उत्साह संचारतो. सूर्यास झाकत विजा चमकू लागतात आणि क्षणात प्रखर उजेडाची रेषा खेचतात.
वारा ही वेग वाढवतो. अंगात आल्यासारखा सर्वांच्या खोड्या काढत सैरावैरा पळतो. पाण्याला हलवत, वृक्षांना डोलवत, ढगांना पळवत, सर्व सृष्टीला आपल्या चैतन्याने स्पर्श करतो. पृथ्वीच्या पदराशी खेळत पालापाचोळा आणि माती आकाशात उडवतो. कोणीही त्याच्या खोड्यांपासून अस्पर्शित राहत नाही.
पावसाळा स्थिरावला की ह्याचा वेग मंदावतो. त्याचा जोर पावसाळ्यानंतर परत वाढतो. पण आता मात्र तो आपली दिशा बदलत पूर्वेहून पश्चिमेस वाहायला लागतो.नदीचे रूपही पावसाळ्यात पदापदाला, क्षणाक्षणाला बदलते. एरवी एका पातळीने शांत वाहणारी नदी, एका दिवसात आपला आकार वाढविते, प्रवाहांचा वेग दाखविते, पाण्याचा रंग बदलते, लालसर दिसते, रागावलेली भासते, तिचे शक्तीप्रदर्शन पाहून आदरयुक्त भीती निर्माण होते. एरवी तिच्या कुशीत नाव चालवण्यासाठीची आतुरता कायरतेत बदलते. काठावर राहून हे रौद्र सौंदर्य मी बराच वेळ बघत राहतो.
दोन तीन पूर येवून गेले आणि मृगाचा पाऊस हळूवार पडू लागला की त्याच्या तालाने नदी सुध्दा समपातळीवर संथ वाहू लागते. ही मात्र पर्वणी असते. मृगाच्या कोमल धारा, शिरा अंगावर घेत दिवसाच्या कोठल्याही वेळेस मी माझ्या ह्या सवंगड्यांच्या बरोबर नावेतून खेळायला येतो. त्यांच्यात समरस होत मनसोक्त आनंद उपभोगतो.
पाण्याची पातळी बदलली की नदीकाठ ही आपले रूप बदलतो. एरवी मुळांनी पाणी पिणारे वृक्ष आपल्या फांद्यापानांनाही पाण्याचा आस्वाद घेवू देतात. एरवी वाऱ्याशी खेळणारी पाने, पाण्याच्या प्रवाहासंगे डोलू लागतात. बहुतेक पानांना हा प्रवाह आवडत असावा म्हणून फांद्यांशी आपले नाते तोडून पाण्याबरोबर वाहत जातात. पिकलेले पाने होण्याची वाट न पाहता पाणी ओसरले की पानांनी भरलेल्या वरच्या फांद्या आणि पाने नसलेल्या खालच्या फांद्या हा वेगळेपणा वृक्षांमध्ये लगेचच दिसतो. ओसरून सुध्दा आपल्या पातळीची आठवण ह्या पानविरहित फांद्यांच्या रूपाने नदी सोडून जाते. काही वर्षांपूर्वी अशा फांद्यांवर वाहून आलेले गवत अडकलेले दिसायचे. आज वाहून आलेला कचरा, प्लॅस्टिकच्या पिशव्या दिसतात.
काही झाडांच्या नवीन मुळ्या दिसू लागतात आणि काही वृक्ष परतीच्या प्रवासास नदीबरोबर वाहून जातात. त्यांच्या जागेवर नवीन काहीतरी उगवतं, काठ गेलेल्यांची जाणीव भरून काढायचा आपला प्रपंच तसाच सुरू ठेवत.
हिवाळ्यात अजून वेगळी सृष्टी उभरते. वाऱ्याची जाणीव त्याच्या अनुपस्थितीत, त्याच्या गैरहजेरीमुळे उदास का खोड्या काढणारा नाही म्हणून शांत समाधीस्थ असे काठावरचे वृक्ष आणि आरशासारखे नदीपात्र. गारठ्याने सर्वांच्या हालचाली मंदावलेल्या. पक्षीसुध्दा पिसांना फुलवून त्यांची दुलाई करून उठण्यास उदासीन. कोठे दूर हलकी ओढूनताणून काढलेली शिळ कानी येते. धुक्याची चादर ओढून नदीपात्रसुध्दा सूर्याची किरणे प्रखर होईपर्यंत शांत पहुडलेले. नदीच्या पाण्यातून हलकेच धुकं उठतं. गारठल्यासारखं मंदपणे वर जातं. धुकं गडद होताच पाणी आणि त्यावरील पोकळीचा भेद लुप्त करतं. पुढे पाणी आहे का धुके हे कळत नाही. दोन तत्व जणू आपलं वेगळेपण त्यागत एकमेकांत मिसळतात. आणि तरीही एकातून दुसरं उत्पन्न झालयं ह्यांची जाणीव ठेवून असतात.
माझ्या, ह्या सवंगड्यांचे प्रत्येक ऋतूत निराळे गणवेष, प्रत्येक दिवशी आगळे आवेश, प्रत्येक क्षणी वेगळे वेष असा मनात विचार आला आणि मान ताठ झाली. शहरात एवढा दुसरा श्रीमंत नाही. अन्यांकडे असावेत अर्मयाद भूखंड, चढवावेत अनेक अलंकार अमूल्य. भौतिकसामर्थ्यावर राखावेत सखे जगभर जीवलग. पण साक्षात पंचतत्वांनी मला सखा म्हणून सामील करणं ही आहे माझ्या ऐश्वर्याची चरमसीमा.
माझ्या ह्या खेळांत अन्य माणसांची लुडबूड नको होती. पाहिजे तेव्हा नौका तयार. नदीचं मुक्त पटांगण बागडायला हजर. बरेच तरूण काठावरून दिसणारे सौंदर्य, नावाड्याचे धाडस बघून मला विनंती करायचे की आम्हाला नौका शिकवा. पण मला ह्या आनंदात कोणी वाटेकरी नको होता म्हणून त्यांना टाळायचो. कशी लुटवू ही दौलत दुसऱ्यांवर ??
आणि अचानक जाणवलं - एक दशक, दोन दशक, तीन दशक असा किती काळ मी असा येथे असणार आहे ?
मला पंचतत्वांच्या हजेरीची जाणीव त्यांच्या बरोबर राहण्याने, त्यांच्या दौलतीची ओळख बघून आणि उपभोगून झाली होती. सानिध्याशिवाय मैत्री कशी साधावी. दुसऱ्यांनाही नौका चालविण्यास शिकविणे गरजेचे होते तर.
मी माझ्या मुलाला आणि त्याच्या मित्रांना नौका शिकविण्याचे ठरवले. सहा-सात वर्षांचे त्यांचे वय. शिडाचा एक दोर धरून बसला. पहिल्यांदाच बसत होता. बसतांना उत्साह होता. जशी नौका वेगाने धावू लागली आणि जोर जोराने हलू लागली तसे त्याच्या उत्साहाचे रूपांतर भीतीत झाले. प्रत्येक हेलकावण्या बरोबर त्याला वाटू लागले की नौका आता उलटली. भेदरलेल्या आवाजात त्याने नाव परत काठावर न्यायला सांगितली. त्याला धीर देत की 'जरी नाव उलटली तरी तुला पोहोता येते'. मग काय काळजी असे सांगत तशीच पाण्यावर चालवत ठेवली. तरी पडक्या रडक्या आवाजात त्याच्या विनवण्या चालूच होत्या, शेवटी न राहून रागावून त्यास बोचक्या शब्दात 'भित्रट' अशी नालस्ती करत मी नाव काठाकडे वळवली.
लहान पोराचा चेहरा करारी दिसू लागला. त्याचा आवाज किंचित वाढला. म्हणाला, 'खडकवासलाच्या स्वच्छ पाण्याच्या तलावात घेवून चला मला. नाव मध्य तळ्यात उलटी करा, काही हरकत नाही. मी भीतोय तो ह्या घाण पाण्यात पडायला.'
मुलाच्या उत्तराने मात्र नदीच्या पाण्याकडे माझी नजर वळाली. नाव चालवताना वर ढगांवर पसरलेली सूर्याची लाली बघणारी नजर पाण्यावर पडलेला कचरा आणि घाण बघू लागली. मला पाण्यात पडण्याच्या भीतीपेक्षा नौकानयनाचा आनंद शतपटीने अधिक होता. आधी दुर्गुण दिसावेत आणि मैत्रीने गुणांची खोली कळावी लक्षात यावी तसे.
पण लक्षात आले की एका पिढीने पर्यावरणाचा केवढा ऱ्हास बघितलाय. जे पाणी प्यायले जायचे ते करंगळीनेही स्पर्शू नये इतके दूषित झाले होते. कुठला वारसा बरं देणार होतो मी. कशा स्थितीत मला माझं घर मिळालं होतं आणि कसल्या अवस्थेत ते सपूर्द करणार होतो ते माझ्या वंशाला.
आपण काही तरी करावे असे मनात ठरविले. खडकवासला धरण शहरांत आणणं शक्य नाही. पण नदीचे पाणी स्वच्छ करता येवू शकेल, पण तसा प्रयत्न यशस्वी व्हावा का ? समस्येची व्याप्ती बघून मन कातरलं.
मनानेही पेश्याचा आधार घेत बजावलं की हे काम तुझ कुठे, पण जर नदीशी मुलांची मैत्री व्हायची असेल तर नदीवर त्यांना आणणं ही तितकच गरजेच होतं. पाणी बऱ्यापैकी स्वच्छ झाल्याशिवाय त्याचं उत्साहानं येणं ही कठीण होतं.
लहान मुलांना नदीकडे कसे आकर्षित करायचे ह्या माझ्या प्रश्नाने माझी नजर नदीकाठच्या सृष्टीवरून परिस्थितीकडे वळाळी. काठावर चार पाच मजल्यांच्या इमारती दिसत होत्या. लोकांनी नदीकडे पाठ करून आपले संसार थाटले होते. इमारतीच्या भिंतीवर मैलापाणी नेणारे पाईप दिसत होते. ठिकठिकाणी गळून त्यांनी भिंतीवर गलिच्छ नक्षीही केली होती. ह्या स्थितीतही निसर्ग एखादे रोप उगवून जगण्याच्या प्रयत्नात होता. शोषण करणारी जाडजूड मुळेच जास्त. जेथे पाणी मिळेल तेथे लांबलांब पसरलेली. पण खुजे बुंधे व मोजकीच पाने. पाखरांना फळे चाखू देण्याइतपत त्याची मजल जाणं अशक्य. नदीच्या एवढ्याजवळ असून ही वृक्ष होण्याच्या आपल्या क्षमतेपासून दूर. असण्यासाठीची तडफड आणि कुचंबणा दिसत होती. भिंतीला चिकटून कसाबसा तग धरून होता, पिंपळ.
शेजारी वस्ती. शहरातल्या सुबत्तेच्या स्वप्नांना गोंजारत स्थलांतरित झालेली कुटुंब. पैसे कमावून सुखसोयीच्या वस्तु मिळवून समाधानात राहता येईल म्हणून आलेली. सर्व विधी उघड्यावर. एका झोपडीत स्वत:ची सर्व नित्यकाम. गावाकडील मोकळीक सोडून शहरात उघड्यावर पडलेली.
शेजारून नदीकाठावर नदीला सोबत करत शहराची घाण नेणारा मोठा सिमेंटचा पाईप चालला होता. बहुदा जास्त ताण पडल्यामुळे मध्येच तुटला होता. धबधब्यासारखं त्यातून पाणी निघून नदीपात्रात येत मिसळत होतं. नदीचं पाणी तरी वेगळं कुठे होतं.
मन विष्षण झालं. झालं गेलं गंगेला मिळालं. नदीनं पाणी दिलं आणि परत पाणी फिरून नदीत आलं. जीवन गावाला दिलं तिनं अन गावानं तिला काय दिलं. सर्वांनी तिच्याकडे पाठ फिरवून संसार थाटले. तिचं स्वतंत्र्य रोखलं, रूप नासावलं, पावित्र्य भंगविलं. नाल्याचा रंग दिला. अतिक्रमणाने अंग छाटलं. तरीही झालं गेले गंगेला मिळालं म्हणत क्षमाशीलतेने दुर्लक्षित वाहतेय. 'क्षीण' एखाद्या आजारीसारखी आणि ती जर संपली तर तिच्या काठची संस्कृती, सभ्यता सुध्दा लुप्त झाली. नदीची स्वच्छता ही शहराच्या प्रदूषणाचे मापदंड होतेच, पण नगरवासियांच्या स्वत:च्या अस्तित्वाच्या जाणिवीचे हे चिन्ह होतं तर.
आधीही काही जणांनी तिचे रूप सुधारण्याचे प्रयत्न केले असावेत. सिमित यश मिळाले असावे किंवा प्रयत्न पूर्ण विफल झाले असावेत. मग ते अनुभव दूर सारून नव्याने प्रयत्न करावेत का ? 'झालं गेलं गंगेला मिळाले '. नवीन जोमाने प्रयास करावेत. नदीचे जीवंतपण संस्कृतीच्या स्वास्थ्याशी, मनुष्याच्या असण्याशीच निगडीत होते. किती ही अपयशं आली तरीही प्रयत्न अखंड चालू रहायलाच पाहिजेत हे जाणवले. सभ्यतेच्या संस्कृतीच्या स्वास्थ्याची भिंत एकीकडे सातत्याने ढासळतेय. पण जर त्यास नवीन विटांच्या रचनेचा आधार नाही मिळाला तर ती पूर्णपणे पडून जावी.
खांद्यावर ह्या जाणीवेने भार पडला. नदीवर आधी आलेले, तिचे सौंदर्य बघितलेले, तिचा सहवास अनुभवलेले साथी एकत्र आणावेत आणि सर्वांनी मिळून धुरा संभाळावी हे जाणवले.
वल्हवत मी नदीला अभ्यासू लागलो. तिची समस्या केवढी मोठी आहे हेही जाणवू लागले. स्वच्छ नदी हे शहराच्या स्वच्छतेचं मापदंड होते. प्रत्येक घराने कचऱ्याचे योग्य नियमन केले तरच नदी स्वच्छ होणार होती. कुठेही पडलेली घाण नैसर्गिक उताराने नदीला येवून मिळणार होती. शिवाय शहरात येणारी थंड हवाही नदीपात्राला मार्ग म्हणून उपयोग करत शहर व्यापणार होती. शहरातले नदीपात्र प्रदूषित व संकुचित झाले तर हवेला ते अनुचित होते. नदीकाठी झाडी वाढली तर प्राणवायुने युक्त हवा शहराला मिळणार होती. नदीचे स्वास्थ्य शहराच्या स्वास्थ्याचे मापदंड होते. आणि तिचे स्वास्थ्य शहराचे स्वास्थ्य सुधारणार होते.
पण समस्येची व्याप्ती बघून मन खंगले. दूर क्षितीजावर संभाव्य यशाची किरणे दिसण्याची शाश्वती नव्हती. कुठला मार्ग घ्यावा हे ही माहित नव्हते. मला माझी पेशंट आठवली. आधीची धडधाकट व नंतरची कर्करोगाने खंगलेली. नदीचे हे रूप का वेगळे होते. आधीची सुदृढ सुंदर आणि आजची रोगग्रस्त, मलीन व म्लान. काळानुसार बदलणारी.
शहरही नदीला वेढत अमर्याद, अनियंत्रित वाढत होतं. एका कर्करोगाच्या गाठीसारखंच तिचे आयुष्य शोषत. मग शहरात राहणारा मी त्या गाठी मध्ये असलेली कर्करोगाची एक पेशी झालो. कर्करोग बळावला तर रूग्ण मेला आणि ती कर्करोगाची गाठ ही चढली चितेवर आणि त्यातली पेशीसुध्दा.
नदीला वाचविणे हे मग स्वत:ला वाचविणे होते तर. नदी स्वच्छतेचे गांभीर्य अधिकच वाढले. कर्करोगाची अनियंत्रित पेशी होवून नदीच्या अंताबरोबर स्वत: मरणे का नियंत्रित पेशी होवून तिच्या स्वास्थ्यास हातभार लावणे. सर्वस्वी स्वत:वर अवलंबून होते तर.
पण येवढे मोठे कार्य, कशी सुरूवात करावी, मला एका रूग्णावरची शस्त्रक्रिया आठवली. सुरूवातीला शस्त्रक्रिया करता येईल किंवा पूर्ण होईल ह्याची खात्री नव्हती पण जसे एक एक पाऊल पुढे जावे तसा मार्ग सापडायला लागला. किंवा मग असाध्य रोग झालेल्या रूग्णाच्या उपचारासारखं काही न करता हातावर हात धरून बघत बसावे. शेवट गृहित धरून अंताची वाट पाहात. मनाची तळमळ वाढली. आज विटामिनच्या गोळ्या देवून वेळ मारून न्यायची स्थिती नव्हती. आज माझ्या असण्या नसण्याचा प्रश्न होता. कॅन्सरच्या रूग्णाची मनस्थिती व त्याच्या कुटुंबाची परिस्थिती आज वेगळ्या खोलीने जाणवली. काळाचे, अनेक पिढ्यांचे पर्व किंवा निमिष मात्र निमित्त असतो. शरीराच्या किंवा शहराच्या खंगण्याचे हे समान चक्रच जसे होते वेळेच्या घड्याळाचेच फक्त वेगळेपण होतं.
नदी सफाईची सुरूवात म्हणून संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या. त्यांनी सहकार्य करायचे आश्वासन दिले. समविचारांच्या मित्रांची फळी तयार होवू लागली. प्रत्येकजण चर्चेत भाग घेत अनुभवांनुसार सुचना करू लागला. उत्साहाचे सगळ्यांकडे भरपूर भांडवल होते. पण काही दिवसांत लक्षात आले की आमच्या चर्चाच जास्त आणि प्रत्यक्ष सफाईचे काम मात्र नगण्य झालेले.
परत भेटी घेतल्या. त्यांनी सांगितले की नदी सफाईचा आराखडा तयार आहे. एक दोन दशकात शहरातून नदीत पडणारा प्रत्येक थेंब स्वच्छ असेल. नदी स्वच्छतेबद्दल आपण काही काळजी करू नका.
त्यांचे हे वाक्य ऐकून तत्काळ चापट बसून जाग आली. दोन दशके अजून ! एक पिढीचा काळ. तोपर्यंत हातावर हात ठेवून बसायचे. तोपर्यंत आपण संपलेलो असायचो. आता मात्र स्वत: जमेल तशी, जमेल तेवढी कामास सुरूवात करावी.
सुरूवात म्हणून धक्याजळच्या झाडीच्या जाळीत अनेक प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि कचरा अडकलेला होता, तो काढावा असे ठरविले. नावेत बसण्याआधी मी नौकांची देखरेख करणारे कामगार त्यांना तो परिसर साफ करून घेण्यास सांगितले. ते म्हणाले की सर तुम्ही नदीवर जावून या तोपर्यंत सफाई करून घेतो. पण आठवडा झाला तरी एक ही पिशवी निघाली नाही.
मनात काही तरी केले पाहिजे ह्या उत्साहाचे वादळ होते पण प्रत्यक्ष एक पान ही हालत नव्हते.
संध्याकाळी मी नौका वल्हवत होते. कोंदलेल्या वाफेस बाहेरची वाट न मिळाल्यामुळे आत स्फोट व्हावा तसे वल्हेही वेगाने व जोराने चालू लागले. मनातला राग दुसऱ्यांवर वाढू लागला. कोणालाच नदीची सोयरी नाही. त्यांच्या नकळत त्यांची आई मरते आहे. त्यानंतर सुतक ही लागणार नाही त्यांना. लागेल ही कसं. स्वत: मेल्यावर स्वत: कुठे सुतक ठेवावं लागते. काहीही न करता आल्यामुळे स्वत:वर ही राग आला. आता काहीही करता येणार नाही असे नैराश्य आले. हतबल होवून वल्हवणे थांबवून हातावर हात ठेवून मी तसाच बसून राहिलो.
गालावर हात ठेवून आयुष्य संपून गेलेले सुध्दा कळणार नाही. आईचे शब्द आठवले. नकारात्मक विचार आले. घाल आता सूर्यनमस्कार, तिने सांगितले होते.
निमुळत्या बोटीवर ज्यावर तोल संभाळल्याशिवाय बसता सुध्दा येत नाही तेथे कसे सूर्यनमस्कार घालावेत. कशी भोगावी शिक्षा लगेच.
परत तिचे शब्दच जणू एैकू आले ' गालावर हात धरून बसण्याऐवजी दुसऱ्यांच्या हातांनी काम करवून घेण्याऐवजी, तेच हात वापर कचरा काढायला.'
चमकून मी शब्दांच्या रोखाने तीराकडे बघितले. आतापर्यंत स्तब्ध वाटणारा परिसर पक्षांच्या किलबिलाटाने भरला होता. पक्षांचा एक थवा नदीकाठावरील झाडावरून उडून मुक्तपणे आकाशात बागडत होता.
मी नवीन जोमाने नौका परत धक्क्याकडे वळविली. आताही वल्ही वेगाने जोरात चालली होती. पण केवढा फरक होता ह्या परतीच्या प्रवासात. लवकरच नाव धक्क्यावर आली.
धीरगंभीर आवाजात जणू ती बोलत होती. स्वत:च्या हातांची ताकद आज कळेल तुला. बहुदा ही तुझी स्वत:च्या ओळखीची सुरूवात असावी.
उत्साहाच्या भरात शेजारच्या झाडीत अडकलेले प्लास्टिक काढू लागलो. ही कृती कामगारांना लगेच खेचून घेवून आली. जे काम तोंडी समजावून, सांगून आठ दहा दिवस हललं नव्हतं. ते आठ दहा मिनिटांत पार पडलं सुध्दा.
आता जमेल तेवढे आणि जमेल तसे स्वच्छतेचे अभियान चालवायचे होते.
नदीचे प्रदूषण अनेक प्रकारचे होते. मैलापाणी, रसायने, तरंगत बुडत असलेल्या टाकाऊ वस्तू. गाडीच्या चाकापासून ते चपलांपर्यंत. वापरा आणि फेका ह्या संस्कृतीला धरून जे काही आज मी जीवंत राहण्यासाठी वापरत होतो, ते सर्व नदीपात्रात दिसत होते. ह्या प्रदूषणाचे मापदंड म्हणून जलपर्णी बेबंद वाढली होती. नदीचा काठच काय तो तिला रोखत होता. आणि तिच्यावर डासांची बेसुमार पैदास झाली होती. त्यांचे थवेच्याथवे काठाच्या झाडांवर आणि माणसांच्या डोक्यावर जमा व्हायचे, वाहणाऱ्या हलक्या वाऱ्यावर झुलायचे, वर उठणाऱ्या आगीच्या ज्वालेसारखे. पण रंगाने काळे.
नदीपात्रावरील जलपर्णी आणि तरंगता कचरा काढण्याचे सुचले आणि शेजारी उभ्या सहकाऱ्यांना तसे सांगितले.
'केवढा पसरला आहे पाला. त्याने सगळी नदी हिरवी केली.' एकाने साशंक उत्तर दिले.
जलपर्णी हे देठात हवेचे कोष धरून पाण्यावर तरंगणारे विलायती रोप. निळ्या फुलांचे शोभेचे म्हणून परदेशातून आले. नदीवर हळूहळू पसरत सार्वभौम सत्ताधीश झाले. अन्य कोणालाही जगू देत नाही. नैसर्गिक वनस्पतीस नष्ट करत, एका रोपाची महिना भरात सोळा रोपं होतात. सोळा आणे स्वार्थाचा बन्दा रूपयाच जणू. ह्यावर पाणीही रसायनांनी दूषित झालेले आणि वरून हवेचा स्पर्शही नाही आणि नाही सूर्यप्रकाशाचाही. माश्यांनी पाण्यात मग कसे जगावे. पात्रभर जल असले तरी कसा असावा नदीपात्रास जीवंतपणाचा श्वास.
'सरकारी लोक सुध्दा पाला गेली पंधरा वर्ष काढत. त्यांना पण जमले नाही.' परत उत्तर मिळाले.
मोठ्या यंत्रणेस ही नाही जमले. खोल खोल मुळ्या पसरून शतकाहून अधिक काळ आपला भव्य डोलारा उभारून आकाशाला भिडणारे वृक्ष मिनिटाला एक एकर या गतीने आम्ही उपटून टाकतो आहोत. आणि पाण्यावर फक्त तरंगणारे दोन फुटाचे हे रोप उखडता येत नाही आपल्याला. केवढा हा विरोधाभास.
जमेल तसे व जमेल तेवढे करूया असे आमचे संगनमत झाले. पण हे जाणवले की नदीची कशी विभागणी अशी काय करता येईल. मातीचा वेगळा गोळा करता येतो, पण ही माझी हवा, हे माझे पाणी, असे ठरवणे कसे काय खरं होईल. एक वस्ती दुसरीशी नदीने जोडली गेली. एक गाव दुसऱ्या शहराशी नदीतीराचे नाते सांगू लागले. प्रवाहाची कशी काय विभागणी व्हावी. एका ठिकाणीची स्वच्छता दुसऱ्या ठिकाणीही पोहोचली. कचरा वाहत गेला आणि दुसरे काठही घाण झाले. एकाची कृती दुसऱ्यासही प्रभावी करते तर. हीच बहुतेक असावी समाजाची घडी.
थोड्या अंतरावर नदीकाठाला लागून औदूंबराचे झाड आहे. किती दूर नावेतून यायचे ह्याचा जणू तो माझा भोज्या. अनेक वर्ष हे झाड पाहतो आहे. जमिनीच्या धुपेमुळे नदीपात्रात त्याची मुळे उघडी पडली आहेत. काठावर उभे राहून कदाचित हा कमकुवत झालेला आधार दिसत नसावा. झाडाचा बुंधाही नदीकडे कललेला. काही थोडे पावसाळे अजून बघायचेतच बहुदा पाहिले असावेत. तरी पानांनी आजही बहारलेला होता. ह्याची पानेही पहिल्या वृक्षाच्याच जोमाने सळसळत होती. उघड्या पडलेल्या मुळाच्या, कमकुवत झालेल्या बुंध्याच्या ताकदीबद्दल अज्ञानी मी औदुंबराच्या झाडाच्या रोखाने नौका चालवू लागलो. वाऱ्याबरोबर झोका घेणे काही पानांना असह्य झाले. दोन पाने माझ्या नौकेजवळ येवून पाण्यावर पडली. वाऱ्यासंगे हलणारी पाने आता पाण्याबरोबर झुलू लागली. त्यातले एक पान उचलून मी नौका संगमाच्या दिशेने चालवू लागलो.
संगमावर इंग्रज गर्व्हनरचा पहिला बंगला आहे. शेजारी भला मोठा वटवृक्ष पारंब्यांचा बुंधा झालेला. मूळ बुंधा कुठला हे ओळखता न येणारा. काहीच्या मते हा वृक्ष तिथल्या वास्तूहून ही जुना आहे. त्याने तिथे चाललेली राजकीय खलबते ऐकली असावीत. त्या नंतरचा इतिहास बघितला असावा. नदीकाठ मिळाला, वर्षभर तिचे पाणी मिळाले व एवढा फोफावला. आणि ही नदी तर किती अनादी. मनुष्याच्या आगमनाआधीची. पुनवडी हे गाव वसले ते महानगर झालेले तिने अनुभवले. अनेक राजे राजवटी हीने बघितल्या. मंदिरही हिच्या तिरी, पानवठे व स्मशाने सुध्दा. अनेक पिढ्यांचे संपूर्ण जीवन हिच्या साक्षीने गेले. नदीला त्यांचा इतिहास माहित होता. काळाचा प्रवाहही नदीच्या रूपात आहे तर.
बघता बघता नागझरी हे तिचे अंग आज नाला म्हणून परिचित झाले. कसबे उभारू दिले तिने आपल्या तिरावर व स्वत:चे नाव रूप बदलेले - सांडपाणी वाहून नेणारे नाले.
विषण्ण मनस्थितीत मी उचललेले औदुंबराचे पान परत पात्रात सोडले. हळूहळू ते प्रवाहाबरोबर वाहू लागले व काही अंतरानंतर काठाला लागले.
मी धक्याकडे परतीचा प्रवास सुरू केला. वाडी, गावापासून कस्बा, नगर व आज महानगर. ही वाढ होताना आधीच जर नदीकाठचा विशिष्ट रूंदीचा पट्टा फक्त वनराईसाठी राखला असता तर. सांडपाणी शुध्द होत नदीत गेले असते. ते पाणी झाडांसाठी खतपाणी झाले असते. झाडीही फोफावली असती व नदीपात्रातून येत शहरात पसरणारी हवाही शुध्द असती. भूतकाळात केलेल्या कामामुळे वर्तमान आहे. माझा व्यक्तिश: व माझ्या आधीच्या पिढ्यांच्या केलेल्या कामामुळे आज जेथे मी आहे तेथे आहे. कर्माची फळे उपभोगा व चाखा. प्रारब्धही बहुदा असेच गतकर्मावर असावे. जो जो वांछिल तो ते लाहो. व्यक्तिसदृश, समाजसदृश व पिढीजात काळसदृश.
2. जलदिंडीचा विचार आणि सुरूवात :
एक रूग्ण आपल्या रोगांबरोबरची शेवटी लढाई लढतो आहे. मधुमेहाने त्याचे सर्व अवयव हळूहळू निकामी होत आहेत. गोड बोलून हो ला हो करणाऱ्या कारभाऱ्यांसारखे मधुमेहाने प्राणांचे शरीरावरचे शासन विस्कळीत केलेयं. यकृत, हृदय, मूत्रपिंड हे रियासतीचे भक्कम बुरूज पोखरलेले. पायावर जखमेचे निमित्त झाले व कीटाणूंनी रक्त विषविले. शरीरभर जेथे जेथे रक्त जाईल, तिथे कीटाणूंनी आपल्या वसाहती उभारल्या. विषमज्वराने लागत असलेल्या थंडीमुळे रूग्ण कुडकुडत होता. शब्दश: हाडांपर्यंत पोचलेल्या गारठ्यामुळे त्याच्या सर्वांगात हुडहुडी भरली होती.
थोडा फरक पडावा म्हणून दोन रजाई त्याच्या अंगावर टाकत मी हळूवार विचारले, ' फार थंडी लागते आहे ना.'
चेहऱ्यावर हसू आणत त्याने मान हलवली व क्षीण आवाज म्हणाला, ' एखाद्या गिरीशिखरावर असल्यासारखी, काश्मीरच्या खोऱ्यात असल्यासारखं जाणवतय.'
मी ह्या उत्तराने चमकून त्याच्या डोळ्यांत बघितले. ह्याने मला संगीताची ओळख करून दिली होती. गाणे गाण्यास प्रोत्साहन दिले. वयाचे बरेच अंतर असून आम्ही मित्र झालो. हस्तांदोलन करतांना मुठीत दडविलेले चॉकलेट हळूच दुसऱ्याच्या हातात देणे ही त्याची खासियत होती. त्याच्या मानेत अनेक सुया, पलंगाशेजारी अनेक सलाईनच्या बाटल्या, सभोवती हृदय, श्वसन आदी सर्व क्रिया मोजणारी व त्यांच्या गतीस सहायक बनणारी, स्वत:च्या विशिष्ट लयीत केकाटणारी यंत्रे. ह्या सर्व गंभीर, भीषण वातावरणात ह्यास विनोद सुचतो ? त्याचे सर्व शरीर जरी रडत असले, तरी डोळे मात्र हसत होते.
दुसऱ्या दिवशी मी परत रूग्णापाशी आलो. पूर्ण शरीर आतमधून पिडीत असावे. त्याचे एक कुशीवरून दुसऱ्या असे निरंतर हलणे चालू होते. शरीराची अशांती स्पष्टपणे दिसत होती. बंदिस्थ प्राणांची आतली तडफड जाणवत होती.
त्याला थोडा आधार द्यावा म्हणून त्याच्या पलंगाजवळ जावून विचारले, 'आराम पडावा म्हणून काही मदत करू का ?'
क्षीण आवाजात परत उत्तर मिळाले, 'मऊ गाद्यांच्या खाली असलेल्या चण्यामुळे झोप न येणाऱ्या राजकन्येची कथा माहित आहे ना ?'
चमकून मी परत त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले. आज त्याचा चेहरा ही दिसत नव्हता. ऑक्सिजनच्या मास्कने त्याचे नाक, तोंड झाकले होते. चेहऱ्यावर डोळ्यांचे अस्तित्व त्यामुळे उठून आले होते. आणि ते डोळे आज परत मिस्किल हसत होते.
मला रूग्णाच्या सकारात्मक विचारधारणेचा मोठा आदर वाटला. नुसत्या गप्पा मारणे आणि स्वत: त्या स्थितीत असतांना त्यानुसार वागणे. केवढा फरक. सगळे जीवन असे जगल्याशिवाय शेवटच्या घटकेला कसे जगता यावे असे. जगताना प्रत्येकात राम जर बघितला तरच शेवटचा श्वास राम म्हणत बाहेर यावा.
मी त्याचा हात माझ्या हातात नाडी बघण्याचे निमित्त करून घरला. तो त्याच्या छातीवर ठेवत हलकेच दाबला. त्याच्या छातीतल्या हृदयाच्या सकारकतेचा स्पर्श माझ्या हाताला थोडा फार व्हावा अशी प्रार्थना करत, हात हलकेच पोटावरून पायांकडे आणला व पायांकडे येत आदराने त्याचे पाय पकडत, विचारांने त्याला नमस्कृत झालो. त्याच्या पायांकडे बघत, हात जोडलेले तसेच ठेवत पाठमोरा मी खोलीतून बाहेर पडलो.
त्या दिवशी संध्याकाळी मी परत त्याच्या कक्षात गेलो. त्याची परिस्थिती अजून बिकट झाली होती. रोग आपली विजयी आगेकूच पुढे चालवत रूग्णाची शुध्द अधून मधून हिरावून घेत होता. त्याचे डोळे बंद होते. श्वसनाची, हृदयाची गती वाढली होती. सभोवतीच्या यंत्रांची कलकल सुध्दा त्यांच्या गतीला अनुसरून होती.
धीर देण्यासाठी जवळ जात मी कपाळावर हात ठेवत त्याला म्हणालो, ' लवकर बरा हो. आपल्याला गाणी जी म्हणायची आहेत.'
हळूवार त्याने डोळे उघडले. क्षणभर ते मिस्किल हास्य डोळ्यात उमलले. अगदी क्षणभर. व लगेच त्याचे डोळे पाण्याने भरून आले. कमजोर झालेल्या शरीराच्या मानाने अश्रूंची दाटी डोळ्यात निमिषमात्रातच झाली. पाण्याने त्याच्या डोळ्यातला भाव बुडवत माझ्या दृष्टीआड नेला. त्याने डोळे मिटले. पापण्या ओलावल्या. त्याची ही हरकत मला अपरिचित होती. थोडा वेळ त्याच्या पलंगाशेजारी थांबलो. मी जवळ असेपर्यंत त्याने परत डोळे उघडले नाहीत. त्याच्याशी झालेले हे माझे शेवटचे संभाषण.
माझे मन मला प्रश्न विचारू लागले. का बरं त्याच्या डोळ्यात अश्रू आले ? प्रवासावेळेस निरोप घेतांना आप्तांना दाटून येणारा कंठ जसे डोळ्यात पाणी आणतो, असे का होते त्याचे अश्रू. हा देह सोडायला लागणार ह्याचे दु:ख, का सकारक विचारांनी आता नवे सुदृढ शरीर मिळणार म्हणून आनंदाश्रू. आपल्या कुटुंबाला आपण मुकणार आणि आप्त आपल्याला म्हणून त्याचे हे मूक रडणे, का मुक्तीची वेळ आल्यामुळे हर्षाचा हा वर्षाव होता. त्याच्या कक्षाबाहेर माझे येरझारा मारणे चालू होते. त्याची जवळीक सोडायला पाऊल तयार नव्हते.
काही वेळात त्याच्या कक्षात डॉक्टरांची परिचारकांची पळापळ सुरू झाली. एका परिचारिकेने काचेमागचे पडदे ओढले, बाहेरच्या अटकाव करत. तरीही काही पडद्यांच्या फटींतून आत डोकावत होते. मी पण आत गेलो. त्याची शुध्द हरपत होती. काहीतरी बरळणे चालू होते. लोकांना वाटले त्याचे दुखण्यामुळे कण्हणे चालू आहे. त्याच्या प्राणांचा आक्रोश चालला आहे. पण मला त्याचे बरळणे जरा वेगळे वाटले. त्याच्याजवळ जात मी माझा कान त्याच्या तोंडाकडे नेला व लक्ष देवून ऐकू लागलो.
शब्द अस्पष्ट येत होते. पण तरी त्यांना सूर होता. लयीत ते त्याच्या तोंडावाटे बाहेर पडत होते. त्याचे आवडते गीत तो गात होता. मुक्त हवेस, स्वच्छंद भ्रमरास, वाहणाऱ्या धारेस गौरवणारे हे गीत होते. तो गाणे गात होता.....आदराने माझे मस्तक झुकले.
काही वेळाने त्याचे बरळणे पूर्ण थांबले. डॉक्टरांचीपळापळ वाढली. त्याचा जीव कृत्रिमरित्या लांबण्याची विचारणा झाली. वैद्याकीयदृष्ट्या पोखरलेल्या देहाची क्षमता लक्षात घेता, आणि त्याहूनही जास्त, रूग्णाचा जीवनाबद्दलचा दृष्टीकोन, त्याची जीवनशैली बघता कृत्रिमतेस ठाम नकार दिला गेला. शेवटच्या श्वासाची वाट पाहत सर्व आप्त निशब्द पलंगापाशी उभे पाहिले. नेहमीप्रमाणे आताही त्याने दुसऱ्यांना आपल्यासाठी विनाकारण तिष्ठत ठेवले नाही.
आप्तांचा शोक उफाळून आला. त्याच्या स्वभावास मान देत, स्थळाचे भान ठेवत काही मोजके दबलेले हुंदके बाहेर आले. डोळे मात्र सर्वांचे निशब्द वाहत होते. माझे ही.....
अश्रूंचे उदक सोडत मी ह्या आनंदयोग्यास मनात साष्टांग दंडवत घालता झालो.....
मधुमेह होता. अंतविधी लवकर उरकून घ्यायला हवा. मी सल्ला दिला. वॉर्डबॉयने लगेच देह तयार करून पांढऱ्या कापडात गुंडाळून स्ट्रेचरवर ठेवला. बरोबरीने मी स्ट्रेचर ढकलू लागलो. त्याचा प्राण ज्याठिकाणी मुक्त झाला ते स्थान परत एकदा डोळ्यात साठवावे म्हणून मी मागे वळून कक्षाकडे बघितले. परिचारिका ओढून घेतलेले पडदे बाजूला सारत होती... कक्षाच्या भिंती पुन्हा एकदा पारदर्शक झाल्या होत्या.
आईने सांगितल्याप्रमाणे जीवनातले सौंदर्य बघण्याची दृष्टी थोडीफार तयार होवू लागली होती पण आप्तांच्या मित्रांच्या चितेत सौंदर्य बघणे, बंद झालेल्या विद्युतदाहिनीच्या दरवाज्याने माझी लाज राखली. माझ्या दृष्टीआड अग्निने माझ्या सासऱ्यांचा देह स्विकारला होता.
काही वर्षांपूर्वी ओंकारेश्वरजवळ आईच्या दशक्रियेच्या वेळेस स्वच्छ वाहत्या पाण्यात आपल्या अस्थि विसर्जित करण्याची इच्छा त्यांनी प्रदर्शित केली होती. ती आठवली. आळंदीतल्या इंद्रायणीचे पाणी प्रदूषित, शहराच्या पश्चिमेस असलेल्या तलावात स्वच्छ पाणी. तेथे अस्थि विसर्जित कराव्यात हा विचार पक्का केला. तिसऱ्या दिवशी गाडीत तलावाकडे जायला निघालो. आठवले की इच्छा होती वाहत्या पाण्यात अस्थि सोडण्याची. तलावातले पाणी स्वच्छ पण वाहतं कुठे. क्षणात तुळापूर हे स्थान सुचले. हे गाव शहराच्या पूर्वेस त्रिवेणी संगमावर आहे. पश्चिमेस होणारा माझा प्रवास पूर्वेकडे वळाला.
तासाभरात संगमावर पोहोचलो. संगमावर, नदीच्या दक्षिणकाठावर शिवमंदिर, संगमेश्वराचे, दाराबाहेरून नमस्कार केला.
त्याच्या देहाचे दहन कैलासस्मशानभूमित झाले. अस्थिंनी संगमेश्वराचे दर्शन घेतले. महाशिवरात्री हा त्यांचा सण, मग आता ते कैलासवासी. विचार करत मी घाटाच्या पायऱ्या उतरू लागलो. समोरच नद्यांची पात्रे येवून मिळत होती. घाटाच्यासमोर उत्तरेकडून आले भीमेचे पात्र, काही अंतराआधी भीमेस आपल्यात समावत आले.
इंद्रायणीचे पात्र बघता आईची आठवण झाली. तिच्या अस्थि इंद्रायणीच्या पाण्याबरोबर बहुदा येथे वाहत आल्या असाव्यात. तिचे दहन वैकुंठस्मशानभूमित, आळंदी जेथे पांडुरंगाच्या अंशाच्या समाधी वेळेस, पांडुरंगाचा पदस्पर्श झालेले स्थान. तेथे अस्तिविसर्जन. कृष्णजन्माष्ठमी हा तिचा सण. मग ती झाली वैकुंठवासी.
मी कलश घेवून अस्थि पाण्यात विसर्जित करण्यास होडीत बसलो. दोघांचे दहनस्थान जरी वेगळे, शेवट तरीही विद्युतदाहिनीतच . दोघांच्या अस्थिही एकाच रंगाच्या, करपट पांढरा रंग त्यांचा. आईने सांगितल्याप्रमाणे सगळीकडे पंचमाहाभूते एक. त्यांना मी वेगवेगळे केले. काही कैलासधामी गेले काही वैकुंठधामी पोचले. जे कायमचे निजले, ते निजधामी पोचले. मग सर्व कैवल्यधामाचेच निवासी होते तर.
आंतरिक ओढीने मी नावाड्यास संगमाच्या मध्यास होडी न्यायला विनविले. उत्तरेकडून भीमाशंकरहून आलेले शांत निळसर पाणी दक्षिणपश्चिमेकडून आळंदी देहूस स्पर्शून आलेल्या इंद्रायणीच्या मातीरंगाच्या पाण्यास भिडले होते. मातीच्या पात्रातल्या अस्थि मी नदीपात्रात सोडल्या व हात जोडून नावेत उभा राहिलो. वाहत जाणाऱ्या प्रवाहाकडे बघत. थोड्या अंतरावर दोन्ही नद्यांच्या पाण्याचा रंग एकमेकात भिनला होता, एक झाला होता. संगमानंतरचा जो त्याचा प्रवास होता.
काठावर येवून मंदिराजवळच्या वृक्षाच्या छायेत पाण्याकडे बघत बसलो होतो. ज्या होडीतून संगमावर नदीपात्राच्या मध्यावर अस्थि जलात सोडल्या होत्या, त्या नावेतून काही पर्यटक नौकाविहाराचा आनंद घेत होते. नयनरम्य संगमाचा परिसर, संगमानंतर सरळ खाली वाहत जाणारे विस्तृत पात्र, स्वच्छ पाणी आणि दोन्ही काठी वनराई. मंदिराचे पावित्र्य व घाटाच्या भक्कम पायऱ्या, शिवाय फेऱ्या मारण्यास नावा. पर्यटकांची येथे तुरळक भ्रमंती कायमची असायची. होडीतले दोन हौशी नावाड्याच्या हातून वल्ही घेत नाव चालवू लागले. त्यांचा समन्वय काही जुळेना. नौका वेडीवाकडी चालत होती. जागेवर गोलगोल फिरू लागली. नावेतले सगळे अधूनमधून टाळ्या पिटत हसत होते. लहान व मोठे सर्व, नावाडी, वल्ही मारणारे, त्यांचे सखे सगळे आनंद लुटत होते. त्यांचा हा खेळ बघून माझ्याही चेहऱ्यावर हसू आले. बघता बघता नवशिक्यांच्या हातात नाव प्रवाहाबरोबर वाहत गेली.
तिच नौका, तेच पात्र, तेच पाणी. एकदा शोकाकूल चमू तर आता आनंदी समुह. परिस्थितीनुसार नावाड्याच्याही भावना. एक फेरी प्रिय व्यक्तिचे शेवटचे अवशेष हरविण्यासाठी, तर दुसरी जीवनातला आनंद हेरण्यासाठी. पण दोन्ही वेळेस प्रवाहाबरोबर त्याच वेगाने वाहत गेली नाव. अशीच वाहत दोन्ही वेळेस पोचावी ती पंढरपूरला.
आणि मला एक अभंग आठवला, 'पंढरीचा राजा उभा भक्त काजा, उभारोनी भूजा वाट पाही.'
भक्तांना प्रेमाने कवेत घेण्यासाठी, हात उभारून त्यांची वाट पाहत उभा आहे. आणि उभा आहे तो भीमातीरी. मग, गेल्यानंतर अस्थिनींच का जावे वाहत त्याच्या चरणी ? सजीव असतांना का नाही हाडामासांनी जावे. ह्या विचारांनी शरीरात चैतन्य प्रवाहले. जागेवरून उठून पायऱ्या लगबगीने उतरून नदीकाठावर आलो. तिचा प्रवाह स्पर्शायला. संगमाचे पाणी ओंजळीत घेत मी ते माझ्या अंगावर उडविले. काठावरचा ओला चिखल इंद्रायणीच्या प्रवाहाकडे बघत मी माझ्या कपाळाला लावला. दोन डोळ्यांमध्ये, तिलकासारखा. बरोबर आलेल्या मित्राला माझे हे वागणे भावूकतेचे व शोकाचे प्रतिक वाटले. त्याने माझे मन हलके करावे म्हणून जवळ येवून विचारले ,'मडबाथ, मातीने आंघोळ चालली आहे का. प्रसाधनाची ही आजची नवी महागडी कृती आहे.'
आईला आठवत मी इंद्रायणीला नमस्कार केला. तिच्या हातांची ऊब कपाळावरच्या ओल्या चिखलात जाणवत होती. कपाळावरचे हळूवार तिचे थोपटणे अनुभवत डोके शांत झाले. वळून संगमानंतरच्या भीमेच्या पात्रास दृष्टी जाईल तेथवर बघत नमस्कार केला. नदीमार्गे आळंदी ते पंढरपूर प्रवास करायच्या विचाराने अंकूर धरला होता. मृत्यू मध्येही सकारकता जाणवायला लागली होती.
3. जलदिंडीचे आयोजन :
'हा प्रवास स्वास्थ्यास हितकारक आहे. दररोज आठ तास नावा चालवायच्या म्हणजे शारीरिक क्षमता वाढेल. माहिती नसलेल्या पाण्यावर जायचेच, एक मोठा पल्ला गाठायचा म्हणजे मनात आत्मविश्वास वाढेल. मनाचे स्वास्थ्य वाढेल. अनेक नवी स्थानं, नवीन लोकांच्या ओळखी वाढतील. म्हणजे सामाजिक स्वास्थ्य चांगले झाले. आणि आळंदी पंढरपूरही श्रद्धास्थाने आहेत. म्हणजे अध्यात्मिक शक्तीची वृध्दी झाली. हे असे एक व्यासपीठ आहे जे स्वास्थ्यास पोषक आहे. शिवाय पर्यावरणाच्या कामास ही हातभार लागावा. नदी एका शहराची नाही, वाहत तिने गाव जोडली. ती अभ्यासली जाईल. नदीच्या सफाईचे ज्ञान मिळेल, लोकांचे बळ वाढेल. ' असे समजावत मी तरूण बालमित्रांप्रमाणे प्रौढांचे समर्थन मिळावे म्हणून आशेने अन्यांकडे बघितले. पण अजून मोकळा 'हो' काही मिळेना.
काही शिक्षित मित्रांना माझे म्हणणे तत्वत: पटत होते पण आक्षेप होता त्यांच्या प्रवासाच्या सुरूवातीच्या आणि शेवटच्या धर्मस्थानांचा. प्रत्येकास स्वास्थ्य आवश्यक आहे हे त्यांना पटले होते. पर्यावरणाची निगा राखणे गरजेचे आहे म्हणून नदी सफाई कार्यात त्यांचा हातभार मिळाला होता. पण धर्म हा मंदिरात, मशिदीत आणि चर्चपर्यंत सीमित राहावा. हा त्यांचा वादविवाद. परत एकदा विज्ञानाचा झगडा सुरू झाला.
पर्यावरण स्वास्थ्यास गरजेचे हे सर्वांना मान्य. पण त्याची सांगड धर्माशी, ह्यास मात्र आक्षेप होता. त्यांच्या सांगण्यात दुभंगलेल्या समाजाचा विचार केला तर तथ्य होतं. गोंधळून हिरमुसला होवून मी होडी घेवून नदीवर निघालो. काठावरच्या हिरवळीने मन हलके केले. फांद्यांच्या टोकाला नवी पालवी येत होती. हे झाडांच्या वाढत्या सुदृढ देहाचे तर लक्षण. स्वास्थ्य राखण्यास झाडांना कुठे धर्माची गरज. जेथे सूर्याची किरणे पडत होती ती फांदी फुलांनी बहरली होती. बदलत्या ऋतुंच्या, पर्यावरणाच्या ज्ञानास कुठे धर्माची गरज झाडांना.
फांदीवर बसलेला खंड्या नेमका त्या वेळेस उडाला. पंख हलवत एका जागेस स्थिर राहिला. दुसऱ्या क्षणी त्याने पंख मिटले आणि सुर मारला. पकडलेला मासा तोंडात धरत परत फांदीकडे उडाला. स्वत: स्वस्थ्य राहण्यास काय करायचे ह्याचे त्याला जन्मजातच ज्ञान लाभले आहे. मासे सुध्दा, पाणी स्वच्छ तेथेच मुक्तपणे विहारत. पर्यावरणाचे ज्ञान त्यांना कदाचित माझ्यापेक्षासुध्दा अधिक. त्यांचा कुठला धर्म, स्वत:ची त्यांना जन्मजातच ओळख.
पण आधी आत्मन, स्वत:ची ओळख हेच तर अध्यात्म. हा स्वधर्म. आईने तसे समजावले होते. तिचा आवाज जणू ऐकू आला. स्वत:ची ओळख करून देण्यासाठी ह्या धर्मप्रणाल्या आहेत. स्वधर्म हा धर्मप्रणालींच्या भिन्नते बाहेरचा. हसत ती पुढे म्हणाली होती, ' तू हसतो आहेस का रडतो आहेस हे स्वत: बघितल्याशिवाय कसे कळावे तुला ?'
तिचे हे शब्द आठवून मी पटकन माझा चेहरा नावे शेजारच्या पाण्याकडे केला. पाण्याच्या लाटांवर चेहरी कधी निमुळता कधी जाडा, कधी आखूड तर कधी लांब नाकाचा, कधी आकुंचित कपाळ तर कधी विशाल भालाचा दिसू लागला. पाण्यावरचे माझे प्रतिबिंब माझ्या व्यतिरिक्त सर्व काही दुसरेच भासत होते. माझी ओळख माझ्या प्रतिबिंबात नव्हती. मी वल्ही मारत पुढे जाणे थांबविले. काही पल्ल्यानंतर नाव जागेवर थांबली. हळूहळू पाण्यावरचे तरंग कमी होवू लागले. पाणी शांत होवू लागले. जशी तरंगांची हालचाल कमी झाली तसे प्रतिबिंब माझ्या चेहऱ्याशी साम्य दाखवू लागले. पूर्ण शांतितच दिसावे प्रतिरूप प्रतिबिंब.
मनात विचार आला की स्वत:चे रूप स्वत:चे डोळे कुठे बघतात. बघतात ते आपले प्रतिबिंब. डाव्याचे उजवे झालेले. म्हणून बहुदा दुसऱ्यांच्या डोळ्यांना दिसणारे आपले रूप हे खरे रूप समजतो मी.
'स्वत: बघितल्यावाचून कसे दिसावे चेहऱ्यावरचे आसू आणि कसे उमटावे चेहऱ्यावरती हसू.' आईचे मंद हसण्यातले शब्द जणू ओझरते ऐकू आले.
मी नाव वल्हवत पुढे नेवू लागलो. नदीकडे कललेला औंदूबर नवीन फांद्या दुसऱ्या बाजूस उगवून तोल साधण्याचा प्रयत्न करत होता. हे ही त्याचे स्वत:चे ज्ञान. त्याचे अध्यात्म.... संगमावरचा वटवृक्ष वाढलेल्या फांदीच्या भारांस तोलण्यास नवीन पारंब्या जमिनीकडे सोडत होता. त्याचेही हे अध्यात्म बहुदा.
आज आम्हाला आमच्या नदीचे पात्र माहित होते, कुठे खडक आहे व कुठे डोह ते. पाण्यावर, पाण्याशेजारी व पाण्यात सुध्दा नजर आमची. पण अशी नजर हळूहळू ओळखीचे झालेली. सगळ्या खोड्या कळायला तशी मैत्री निर्माण व्हावी, गुण अवगुणांची पारदर्शकता दिसावी. त्यानंतर आहे तसे स्वीकारण्यास प्रेम निर्माण व्हावे. अवगुणांसहित ही कायम सहवास रहावा अशी भावना निर्माण व्हावी. साथीशिवाय करमेनासे व्हावे. आणि मगच एवढा विश्वास की पुरात सुध्दा झोकून दिले. नाव व्यवस्थित चालवू हा आत्मविश्वास आणि नदी आपल्याला तारेल हाही. पुरातल्या समर्पणाला आत्मविश्वास तिच्यावरील निस्सिम भक्तिमुळेच.
ओळख नसेल तर कशी काय मैत्री. मैत्री वाचून प्रेम नाही व नाही भक्ती. संगमाजवळच्या नदीपात्रालाही माझी आधी कधी नुसती तोंडओळख झाली होती.
नदीमार्गाची जायच्या आधी ओळख करून घेवूया, मी विचार केला. अडथळ्यांची माहिती घेवू, जशी आपल्या नदीची घेतली. कुठे बंधारे तर कुठे आहेत धबधबे. कुठे खडकातून पाझरते नदी तर कुठे वाळवंटाची तहान शमविते. कुठे डोंगरातून गर्जत पळते आहे तर कुठे मैदानात शांतपणे सुस्तावते आहे ते. तिची रस्त्याने जावून आधी पाहणी करू या. वाटेतल्या गावांना भेटूया. लोकांकडून तिची ओळख काढूया. तिच्या वेगवेगळ्या भावना बघूया व तिच्याबरोबर कसे वागायचे हे ठरवूया. अति रागावलेली असेल तेथे तिच्यापासून दूर राहू.
माझी स्वत:ची ओळख शोधण्यासाठीचा हा प्रवास होता. शब्दांचे माझ्या डोक्यात पळणे खेळणे चालू होते. मी जर फक्त कार्बनचा अणू तर कोळसाही व हीराही. पण आमचे गुणधर्म केवढे वेगळे. अणू कुठेही असला तरी गुणधर्म सोडत नाही. सोन्याचाही अणू, मग अणू परमाणूहूनही असावे काही वेगळे माझ्यात. जनूकांची उत्क्रांती झाली असे आजच्या विज्ञानाचे सांगणे, पण काहीतरी त्यात सुध्दा उणे. किती निराळे ऐकाच जातीच्या प्राण्यांचे वागणे.
शरीराच्या भौतिकतेच्या बरोबरीने माझ्यात अजून काहीतरी असावे. आईच्या जनुकांचे माझ्यात अंश. तिच्या ओळखीने तर माझी ओळख. पण शरीराच्या पंचमहाभुतांच्या बरोबरीने अजून काही वेगळी माझी ओळख असावी. संस्कृतीची आई ही नदी. मग तिच्या ओळखीने मला बहुदा माझी ओळख व्हावी. आता नदीमार्गे प्रवास करायला नक्की ठरवला. बरोबर ज्यांना यायचे असेल ते येतील, आपण मात्र जायचे पंढरपूरला. विठ्ठल. नावाने सुध्दा विद्या ज्यांच्या ठायी ठासून भरली आहे असा विठ्ठल. विद्या, ज्याने माणूस विद्वान होत स्वत:ची ओळख पटवून घेतो. मग बहुदा आनंदप्राप्ती व्हावी.
खंड्या परत उडाला. त्याला कोठे भौतिकविज्ञानाची मति की आपल्या पंखांना मिटून आपली गती वाढवावी ह्याची. शव्याच्या निमुळते होत उडण्याचे बदकांचे ज्ञान, त्यांना तरी कुठे माहित हवेच्या वाहण्याचे विज्ञान. वडाचेही जमिनीकडे पारंबी सोडणे साधण्यास तोल. त्यास कोठे त्रिभूजा विज्ञानाच्या परिसीमेचे मोल. हे ही त्यांचे अध्यात्मच विज्ञानापासून स्वावलंबी.
विज्ञान, धर्मप्रणाली सर्व अध्यात्माच्या छत्राखाली, हे जाणवू लागले.
सुरूवात, नकाशे बघून, नदीकाठच्या गावांना भेटी देण्यापासून करावी असे ठरले. आळंदीस ज्ञानेश्वरांच्या समाधीचे दर्शन घेवून कामास लागलो. जगतगुरूची साथ लाभावी अशी प्रार्थनेत कामना केली व मंदिराबाहेर आलो. पिंपळवृक्षास रूढी प्रमाणे प्रदक्षिणा घातली. ह्या झाडाची पाने चवीला गोड आहेत असा समज. ज्ञानेश्वरांच्या आईपासून सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतो अश्या आख्यायिका. पाराची दगडी घडण सुबक दिसली. सव्वालाख प्रदक्षिणा घातल्या माऊलीनी. केवढे अंतर त्या चालल्या असाव्यात. तेवढे अंतर व वेळ, मात बुध्दित सतत मागायच्या वरदानाचा विचार. विचारावर केवढी शक्ती एकत्रित झाली असावी. झाडाच्या शेंड्याकडे बघत माझी नजर वर गेली. आठशे वर्ष एकाच पायावर, त्याच जागी वृक्षासनात उभा राहून तपस्या केल्यासारखा सुवर्णपिंपळ भारदस्त व पोक्त भासला.
मंदिराच्या आवाराबाहेर आलो व कामाला सुरूवात केली. कामामध्ये नशीब साथ देवू लागले. नदीवर मासे पकडायला जाणारी लोक अनपेक्षितपणे रस्त्यातच भेटू लागली. नदीच्या प्रवाहाच्या खालच्या गावातले वरच्या आदल्या गावात भेटले. अनोळखी रस्ते अजाणतेने इच्छितस्थळी नेवू लागले. बबनरावांना हा शुभशकून वाटला. माझे शास्त्रीय मन ह्यास नियोजन व इच्छाशक्तीस नशीबाची साथ मानत होते. काही का असेना एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे लोकांची उत्सुकता आणि मदत करण्याची प्रामाणिक प्रवृत्ती. गरजेनुसार आणि पाहिजे तेव्हा आम्हाला मदतीचा, माहितीचा चारा मिळत गेला. सरासरीच्या नियमांना डावलत, इच्छित गायरानात आम्ही कळत न कळत अपेक्षेपेक्षा लवकर पोहचू लागलो.
नदीच्या मार्गातले सगळे बंधारे बघून झाले. धोक्याच्या जागांचे निरिक्षण झाले. काही ठिकाणी पाणी उथळ होते, विस्तिर्ण जलाशय होते, दुष्काळात न आटणारे डोहही होते. निसर्गाने तिला ठिकठिकाणी दिलेले मोड होते व माणसांचे तिच्या काठांना बांधांने दिलेले जोडही होते. प्रवासात काही वेळेस नावा उचलाव्या लागणार होत्या. खांद्यावर उचलून वाळूतून चालावे लागणार होते. बंधाऱ्यावर उचलून परत पात्रात सोडाव्या लागणार होत्या. त्यामुळे वजनाने हलक्या अशा नावांमध्ये प्रवास करायचा होता. वल्हवायच्या अशा नावा छोट्या निमुळत्या होत्या. चपळ होत्या पण तोल साधण्यास कठीण होत्या. लक्ष दुसरीकडे वेधले तर बेताल बेलगाम घोड्यासारखे क्षणात खाली पडणाऱ्या होत्या. म्हणून साथीस यंत्रचलित सुरक्षानौका ही ठेवायचे ठरविले. मोठ्या जलाशयात वाऱ्याच्या जोडीने पाण्यास ही उधाण होते. तेथे तरंग लाटा बनल्या होत्या. शिडाची नाव येथे चालवणे योग्य होते.
चालता बोलता, उठता बसता, जागे असता, झोपेत असता प्रवासाचा विचार मनात घोळत होता. जणू ह्या विचाराला मनोबुध्दिची प्रदक्षिणाच होती. हाच नेम झाला, निर्धार झाला. पण किती दिवसात हा प्रवास करता येईल, दररोज किती पल्ला गाठता येईल, मुक्कामास कुठे राहता येईल, ह्यांचे गणित अजून जुळवता आले नव्हते.
वल्हवत तासाला पाच मैलाचा पल्ला नौकेने कापता येतो. आठ तास दिवसाला असे सुमारे चाळीस मैलाचे अंतर प्रतिदिन झाले. पण हे माहीत असलेल्या पात्राच्या पल्याचे होते. पाण्याची अखंड धार असलेल्या नदीचे होते. प्रवासाचे नेमके आयोजन करायला येणाऱ्या कठीण ठिकाणांची, प्रसंगांची तोंडओळख होण्यास प्रत्यक्ष नदीपात्रावर नौका चालवत जाणे गरजेचे होते. मिळालेल्या अनुभवातून आयोजनात वेळोवेळी सुधार काय व कसे करायचे ह्याचे ज्ञान होणार होते.
प्रवासासाठी नदीत पाण्याची न तुटलेली धारा कायम हवी होती. उन्हाळ्यात प्रवाह संपून फक्त डोहात पाणी उरून डबकी झालेली नदी प्रवासास अनुकूल नव्हती. पावसाळ्यातच सर्व डोहांना भरण्यास आणि जोडण्यास पाणी मिळावे. तेव्हाच नदी नदी दिसावी आणि नदी नदी व्हावी. नदीची प्राथमिक औपचारिक तोंडओळख गावाच्या पानवड्यावर झाल्यावर, तिची खरी ओळख तिच्या पोटात शिरल्यावरच होणार होती.
आजपर्यंत नदीच्या पाण्याच्या प्रदूषणाचे गांभीर्य माझ्या लक्षात आले नव्हते. पाण्याचा रंग, त्यावर तरंगत असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, अमर्याद वाढलेली जलपर्णी आणि घाणीमुळे काळी पडलेली खडकं, दलदल झालेली काठावरील माती. नदीला एक नकोसा उग्र दर्प ही होता. काठाजवळच्या पाण्यावर एक काळी सायच जणू आली होती. तळाचा गाळ मध्येच बुडबुड्यांसहित पाण्यावर उकळी आल्यासारखा वर उठायचा आणि पाण्यावर पसरायचा. नदीचे सौंदर्य आणि पाण्याचे पावित्र्य शहराच्या धगधगीने, निष्काळजीने उतू चालले होते.
Path Alias
/articles/jaladaindai-saurauu-karanayaamaagaila-bhauumaikaa
Post By: Hindi