जलदिंडी संकल्पनेची वाटचाल


नदीच्या प्रवाहाबरोबर कालप्रवाहाची कल्पना जोडा म्हणजे जीवन जगण्याची कला आत्मसात करता येईल. जलदिंडीचा आळंदी ते पंढरपूर हा नदीमार्गाचा प्रवास ज्ञान विज्ञानाचा विवेक समजावतो.

२००१ ला सुरू झालेली जलदिंडी आजही म्हणजे एक तप अखंडितपणे सुरू आहे. दिंडी दरवर्षी दसर्‍यानंतर दुसर्‍या दिवशी अश्‍विन एकादशीला आळंदीतून प्रस्थान ठेवते. इंद्रायणी - भीमा नद्यांतून होड्या वल्हवत बारा दिवसांचा प्रवास करत जलवारकरी पंढरपूरला पोचतात ! जलदिंडी जो संदेश इंद्रायणी भीमा खोर्‍यात पोचवते तो संदेश आज एकूण ९ नद्यांवर नदीमार्गे प्रवास करत जलमैत्री यात्रा पोचवत आहेत. आज हा उपक्रम मुठा, पवना, घोड, कुकडी, प्रवरा, गोदावरी, (नांदेड / पैठण) नद्यांवरही राबवला जातोय. आळंदी आणि दुसर्‍या अनेक गावांमध्ये उन्हाळी सुट्यांच्या दरम्यान जलदिंडीची मुलांसाठी संस्कार शिबिरं आयोजित होतात. काही गावांमध्ये जलस्वास्थ्य - मंच स्थापन झाले आहेत. तरूण किर्तनकार ग्रामस्वास्थ्य यात्रेअंतर्गत गावाची सफाई करून, तसेच गावकर्‍यांना सूर्यनमस्कार शिकवून संध्याकाळी कीर्तन - प्रवचनातून पर्यावरण स्वास्थ्याचा संदेश देतात.

अनेक ठिकाणच्या, अनेक क्षेत्रातल्या, असंख्य संस्थांचा सहभाग, सहकार्य जलदिंडीला लाभले आहे. ज्ञानेश्वर मंदीर संस्थान, आळंदी, विठ्ठल मंदीर संस्थान, पंढरपूर, वारकरी शिक्षण संस्था, आळंदी, शिवाय मार्गातील अनेक मंदीरे - संस्था शिक्षण क्षेत्रातल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे एस.जी.एस सरकारी अभियांत्रिकी कॉलेज, नांदेड, मेडिकल कॉलेज, नांदेड, दुसरी अनेक महाविद्यालये आणि नामांकित शाळा, पुणे विद्यापीठाचे पर्यावरण शास्त्र आणि मास कम्युनिकेशन हे विभाग, भारती विद्यापीठ दंत महाविद्यालय, पुणे महानगरपालिकेचा स्वास्थ्य विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अनेक विभाग, शेतीविषयक आणि रोपांची निर्मिती करणार्‍या संस्था, अनेक क्षेत्रातल्या व्यक्ती, विद्यार्थी आणि अधिकारी यांच्या बरोबर अनेक मान्यवरांचा जलदिंडीत सहभाग आणि सहकार्य लाभले आहे.

कुलगुरू आणि ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, प्रख्यात साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे, सुप्रसिध्द शिवशाहिर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे, जलतज्ज्ञ मा. राजेंद्रसिंह राणा, महाराष्ट्राचे मंत्री श्री. बाळासाहेब थोरात व इतर लोकप्रतिनिधी, वारकरी संप्रदायाचे श्री. ह.भ.प. विठ्ठलबुवा चौधरी, ह.भ.प.वा.ना. उत्पात, तुकोबांचे वंशज ह.भ.प. बाळासाहेब देहुकर, ह.भ.प. श्री. मारूतीबुवा कुरेकर, ह.भ.प. नारायण महाराज जाधव यांचेही शुभाशीश जलदिंडीच्या उपक्रमाला मिळालेत. वैद्यकीय क्षेत्रातल्या संस्था व नामांकित डॉक्टरही या उपक्रमात सहभागी आहेत.

सांप्रदाय, पर्यावरण, शिक्षण, वैद्यक, स्वास्थ्य, अभियांत्रिकी, विज्ञान, साहित्य, प्रशासन, राजकारण अशा विविध विभागांना जलदिंडी एका व्यासपीठावर आणतेय. या प्रक्रियेत शाळेतले लहान विद्यार्थी वयस्कर विवेकी वारकर्‍यांना भेटतात. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वैज्ञानिक, प्राचार्य, शिक्षक यांच्याबरोबर जेमतेम शिकलेले मच्छिमार किंवा शेतमजुर मिसळताना दिसतात. जलदिंडी म्हणजे एक प्रकारे समाजातील सगळ्या थरांचा, घटकांचा गोपाळकालाच झालेला असतो.

जलदिंडीवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर अनेक शोधनिबंध वाचले गेले आहेत. जयपूर येथे जागतिक सरोवर परिषदेत जलदिंडीचा शोधनिबंध स्वीकारला गेला. २००९ ‘वुहान चीन’ येथे भरलेल्या १३ व्या जागतिक सरोवर परिषदेत तर जलदिंडीवर बीजभाषण होते.

जलदिंडी हा विषय महाराष्ट्र राज्य शासनाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केला गेला आहे. २०१० ला महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात राज्य शासनाने प्रकाशित केलेल्या, राज्याचा सांस्कृतिक वारसा गौरवणा-या ‘सांस्कृतिक महाराष्ट्र’ ह्या ग्रंथात जलदिंडीचा उल्‍लेख व विस्तृत वर्णन आहे.

IWWA ह्या अखिल भारतीय जल अभियंत्यांच्या संघटनेनं त्यांचा सर्वात मानाचा ‘जलनिर्मलता’ हा पुरस्कार देवून जलदिंडीचा गौरव केला. तसेच बा-बापू समितीनं विधायक कार्यकर्ता ह्या पुरस्कारानं जलदिंडीला आणि जलवारकर्‍यांना मानांकित केलं. पण जलदिंडीला मिळालेला सर्वात मानाचा पुरस्कार म्हणजे जनमानसानं त्याच्या स्मृतीत, मनात आणि हृदयात जलदिंडिला दिलेलं स्थान हाच आहे.

जल हे जीवन हे आधुनिक विज्ञानालासुध्दा पटतं. म्हणून जिथं जिथं विज्ञान जीवन शोधतंय तिथं आधी पाणी आहे का हे बघतंय. ओंजळ भरली की प्यायलं पाणी हे माणसाला आणि अन्य प्राण्यांना नदीवरच शक्य आहे.

सागराचे जल नाही कधी पिता आले
बर्फाच्या खड्यांनी का केव्हा रांजण भरले
तहान लागली मग का विहीर खोदली
नदीचे मात्र लगेच हातांची ओंजळ भरली.


आणि म्हणूनच की काय माणूस नदीतीरावर राहू लागला. आपलं घर त्यानं तिच्या तीरावर बांधले. आजूबाजूची जमीन तो कसू लागला. नदीमुळे तो स्थिरावला, वसला, समृध्द झाला आणि यथार्थानं नदी ही संस्कृती, सभ्यतेची जननी झाली. नदी आहे तरच संस्कृती, समृध्दी आणि जीवन आहे. पण आज नदीच्या दूरावस्थेबद्दल - अगदी प्रत्येक नदीच्या - काय सांगावं?

तिच्या स्वास्थ्याबद्दलची अनास्था वाढलीय, तिच्या बद्दलचा आदर खालावलाय. तिच्या अस्तित्वाचीच जाणीव आज संपलीय. ज्या गतीनं आज देशातल्या नद्या आजारी होताहेत त्या गतीनं त्या लवकरच मृत होतील. विज्ञान, सामान्यज्ञान, इतिहास सर्वच शास्त्रे सांगताहेत की नदी जर मृत झाली तर तेथील संस्कृती र्‍हास पावत नामशेष होईल. आपण क्षणभर, ज्या नदीचं पाणी आपल्याला पोसत,. त्या नदीला फक्त विचारांतूनच वजा करावं आणि बघावं काय अरिष्ट ओढवतं. साधारण बुध्दीमत्तादेखील आपल्याला सांगेल ‘बाबारे ! सावधान !! तुझी सगळी मौजमजा, श्रीमंती, स्वास्थ्य, आरोग्य धोक्यात आहे, तुझं सगळं जीवनच नव्हे तर जीवच धोक्यात आहे.’

भावी पिढीसाठी जीवनाचा हा अमूल्य ठेवा जपायलाच हवा. नदी निर्मळ करण्यासाठीचे प्रयत्न सतत व्हायला हवेत. अगणित अपयश आणि विघ्नांना न जुमानता.

आज नदी स्वच्छ, प्रदूषण विरहित करण्यासाठी तंत्रज्ञान, निधी उपलब्ध आहे. संस्था, प्रशासन कार्यान्वित आहे. संवैधानिक तरतुदी आहेत. पण तरीही हे घोर अपयश का? तर कारण आहे लोक सहभागाचा अभाव. नदीच्या भल्यासाठी कार्य करू शकणार्‍या सर्वांची मने जर नदीनिष्ठ झाली आणि आपल्या आईसारखी नदीची काळजी घेवू लागली तर नदीच्या निर्मळतेचं स्वप्न दूर नाही. स्वत:चं स्वास्थ्य हे नदीच्या स्वास्थ्याशी जोडलेलंय हे सत्य तर लक्षात येणं गरजेचं आहे. पाण्याच्या प्रदूषणाने संसर्गजन्य रोगांबरोबरच पोटाच्या आजारांपासून कर्करोगासारखे दुर्धर आजार संभवतात.

पण आज स्वास्थ्याकडे किती लक्ष देतोय आपण ? दूषित पाण्यामुळे होणार्‍या आजारांव्यतिरिक्त अनेक रोग दूषित जीवनशैलीमुळे दिसू लागले आहेत. वयाच्या ५ - ६ दशकांनंतर होणारे आजार दोन एक दशकं लवकर डोकं काढू लागलेत. माझा देश लवकरच मधुमेह्यांची राजधानी होणार हे भाकीत कुठल्या डॉक्टरलाच नव्हे तर प्रत्येक देशबांधवाला मान खाली घालायला लावणारं आहे. WHO च्या व्याख्येनुसार स्वास्थ्याला शारीरिक आलेखाबरोबर मानसिक, सामाजिक आणि अध्यात्मिक आयामही आहेत. स्वत:क़डे, आजूबाजूला आणि समाजाकाडे लक्ष दिलं तर स्वास्थ्याच्या सगळ्या अंगांना सुधारण्यासाठी भरपूर वाव आहे हे जाणवतं.

‘स्व’ मध्ये स्थित असणं म्हणजे स्वस्थ असणं. सरळ सोपं उत्तर. ह्या भूमीमध्ये जन्म घेतलेलं अध्यात्माचं तत्वज्ञान ‘ स्वमध्ये’ स्थित रहाणं ह्याला स्वास्थ्य समजतं. हेच तत्वज्ञान नदीला माता, देव मानतं. स्वत:मध्ये देवत्व शोधायला शिकवतं. सगळं विश्व माझं घर असावं अशी सदिच्छा करतं. वृक्षवल्ली यांची आणि आमची सोयरिक आहे असं सांगत स्वार्थ - परमार्थ, स्वत:चं आणि दुसर्‍यांचही भलं चिंतत स्वत:मध्येच विठ्ठलाला शोधायचं आवाहन करतं.

मेटाफिजिक्स आणि आजचं आधुनिक भौतिक विज्ञानसुध्दा वेळ आणि व्योम समजण्यासाठी निरीक्षणाला महत्व देतं. निरीक्षण करणारा आहे म्हणून वेळ आणि व्योम आहेत. आईनस्टाईनला व्योमाची व्याख्या करायला सांगितली असता तो म्हणाला, ‘ आपण पट्टीने मोजतो ते व्योम, ती पोकळी’. म्हणजे ‘आपण’ हा ह्या सूत्रामधला महत्वाचा घटक आहे. अध्यात्माचं तत्वज्ञान एक असा निरीक्षक बनवतो ज्याचं अंतेंद्रिय बाहेरच्या डोळ्याला, कानाला समजावू शकेल की काय बघावं, काय ऐकावं. अध्यात्मशास्त्र शोधायला प्रवृत्त करतं की ह्या निरीक्षकाचं निरीक्षण करणारा कोण बरं ? माऊलीही सांगतात की ते पावन केव्हा झाले तर जेव्हा वेगळेपणाची भावना संपली तेव्हा.

आपण सार्‍या विश्वाची एकरूपता आहे हे सत्य जाणणं आणि त्याप्रमाणे वागणं यासाठी अध्यात्म प्रेरित करतं. इतरांबद्दल प्रेम, करूणा निर्माण केली की वाटणारा मत्सर, लोभ लयाला जातो. कारण दुजाभावच संपलेला असतो. हे सगळं स्वास्थ्यासाठी लाभदायक आहे.

माणसाच्या जीवनाशी आणि जडणघडणीशी सुसंगती राखतच मंदीरांची निर्मिती झाली. कला, समाजशास्त्र, विज्ञान, ज्ञान किंबहुना जीवन जगण्याचं शास्त्र आणि उत्तम प्रकारे जीवत राहण्यासाठीचं कौशल्य शिकवणारी ही विद्यापीठंच होती. पण आज हा उच्च, पुरोगामी विचार जो स्वास्थ्याच्या, पर्यावरणाच्या किंबहुना माणसाच्या आणि सर्वांच्या उत्कर्षाला लाभदायक असा आहे, तो विसरला गेलाय. स्वार्थ आणि भय ह्या भावनाच अधिकांश वेळेस आम्हाला मंदीराकडे नेतात.

मंदिरांचे भौतिक अस्तित्व म्हणजेच अध्यात्म असा बहुतांशी समज झालाय. विचारांना आचारांची साथ नाही मिळाली तर तो केवळ भ्रम राहतो. आणि आचारांना जर विचारांचं बळ नसलं तर ते केवळ कर्मकांड होतात. काळानुसार हा विचार समजवणारी नवीन क्रिया किंवा रीती शोधणं ही आजची गरज झालीय.

आजचा विज्ञानाधारित विचार करणारा वर्ग, विशेषत: तरूण केवळ कर्मकांडांना अध्यात्म समजून अध्यात्माकडे पाठ फिरवून आहे. पर्यायानं हा वर्ग जीवन जगण्याच्या ज्ञानापासून वंचित राहतोय. एकवेळ आकडेमोड करता नाही आली, भौतिकशास्त्राची प्रमेय नाही समजली तरी चालतील पण जीवन जगण्याची कला मात्र अत्यंत मह्त्वाची आहे. ही कलांची कला, शास्त्रांचं शास्त्र आहे. हे एकदा समजलं की नवीन शोध सुध्दा जीवमात्रांच्या भल्यासाठी असतील तरच ते ठेवले जातील. आईनस्टाईनसुध्दा उतारवयात आपल्या राहून गेलेल्या कामाबद्दल खेदानं सांगतो, ‘ अंतरीक्षातले तारे शोधण्याच्या नादात मी स्वत:मध्ये असलेला तारा बघितला नाही.’ एका अतिशय उच्च वैज्ञानिक सृजनशीलतेनं सांगितलेला हा विवेक आहे.

विज्ञानाचा सूर्य आईनस्टाइन याला अपेक्षित असलेला स्वत: मधला तारा शोधायचं विज्ञान म्हणजेच अध्यात्मशास्त्र. शाश्वत असं, प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारं, सगळ्या शास्त्रांचं शास्त्र, कलांची कला, विज्ञानाचं विज्ञान ! कालातील असं हे तत्वज्ञान समजण्यासाठी काही मार्ग आहेत का ? आणि हे तत्वज्ञान शिकून मला नेमकं काय मिळेल ? माझ्या दैनंदिन जगण्यासाठी त्याचा काही उपयोग आहे का ?

नदीच्या प्रवाहाबरोबर केलेला प्रवास अनेक गोष्टी शिकवतो. अगदी भौतिक विज्ञानाचं मूलभूत प्रमेय जसं की न्यूटनचे मेकॅनिक्स मधले नियम, फ्ल्युईड मेकॅनिक्सचे सिध्दांत, समाजशास्त्र असो का वैयक्तिक सामाजिक स्वास्थ्य, किंबहुना विज्ञानाच्या आणि कलेच्या बहुतांश शाखांचा अभ्यास नदीच्या प्रवाहांबरोबर शिकला, शिकवला, अभ्यासला, समजला जावू शकतो. अगदी अर्थशास्त्रही ह्याला अपवाद नाही.

नदीच्या प्रवाहाबरोबर कालप्रवाहाची कल्पना जोडा म्हणजे जीवन जगण्याची कला आत्मसात करता येईल. जलदिंडीचा आळंदी ते पंढरपूर हा नदीमार्गाचा प्रवास ज्ञान विज्ञानाचा विवेक समजावतो.

‘सगुणी विज्ञान निर्गुणी ज्ञान
दोहोंचेही भान लाभो दिंडी॥’


जल म्हणजे जीवन आणि दिंडी ही स्वधर्माची पताका घेवून केलेला जीवनातला प्रवास. स्वधर्म स्वत:च्या ओळखीचा, समाजाशी असणार्‍या बांधिलकीचा आणि विश्वरूपाशी असलेल्या नात्याचा. जलदिंडीचं हे तत्वज्ञान विचारात घेतलं तर जाणवतं की, - जलदिंडी जीवनाच्या सर्व अंगांना सकारकतेने स्पर्श करते.

विश्‍वास येवले, पुणे, मो : ०९३७३३२४२१६

Path Alias

/articles/jaladaindai-sankalapanaecai-vaatacaala

Post By: Hindi
×