जलदिन- महिलांकडून अपेक्षा


जगाच्या लोकसंख्येच्या अर्धी संख्या महिलांची आहे तेव्हा पाण्याच्या प्रश्नांबद्दल त्यांची निष्क्रियता अयोग्य आहे. मुलांवर स्वच्छतेचे, काटकसरीचे संस्कार महिलाच करू शकतात ज्यायोगे नजीकच्या काळात येणाऱ्या पाण्याचे दुर्भिक्ष्य कमी होण्यात, महिलांता हातभार निश्चितच देशाला प्रगतीपथावर नेणाराच असेल.

आज जगाच्या ऐरणीवरचा जो प्रश्न आहे तो म्हणजे पाण्याच्या दुर्भिक्षाचा. जगण्यासाठी जितकी गरज हवेची आहे तितकीच पाण्याची आहे म्हणून त्याला जीवन म्हंटले जाते.

गंमत अशी आहे, की पृथ्वी हा जलग्रह असूनही भूपृष्ठीय वासीयांना लागणाऱ्या गोड्या पाण्याचा साठा एकूण उपलब्ध पाण्याच्या केवळ एक टक्का (1 %) इतकाच आहे व हे एक टक्काच पृथ्वीवरच्या जैविकतेला जिवंत ठेवत आहे. दिवसेंदिवस पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढतच चाललेले आहे. दरवर्षी पाणी हे संसाधन मिळत असले तरी दुर्भिक्ष्य जाणवण्याची महत्त्वाची कारणे म्हणजे, जलसंधारणात होत असलेली कुचराई, पाण्याचा अपव्यय, पाण्याचे प्रदूषण व पाण्याचे अन्यायी वाटप . यातून जबाबदार नागरिकत्त्वाचा अभाव दिसून येतो.

झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे, शहरीकरणामुळे, औद्योगिकरणामुळे पाण्याची गरज दिवसेंदिवस वाढतच आहे. एकविसाव्या शतकाच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे वाढणाऱ्या उद्योगांमुळे पाण्याची गरज वाढत आहेच पण त्याचबरोबर औद्योगिक प्रक्रियेतून वापरल्या जाणाऱ्या पाण्यापैकी पन्नास टक्क्यांहून अधिक पाणी औद्योगिक सांडपाण्याच्या रूपाने कारखान्यातून बाहेर फेकले जाते. यात धातूचे कण, ग्रीस, तेल याबरोबरच अनेक रसायनेही मिसळलेली असतात. घरगुती वापरातील सांडपाणी औद्योगिक कारखान्यातून बाहेर पडणारे सांडपाणी, आपल्या शुध्द पाण्याच्या स्त्रोतांना मोठ्या प्रमाणात दूषित करत आहेत. त्यामुळे शुध्द पाण्याच्या साठ्यात व स्त्रोतातही घट होत आहे.पाण्याचा प्रश्न त्रिपदरी आहे.

1. पाण्याची साठवण, पाण्याची उपलब्धता
2. उपलब्ध पाण्याचे योग्य ते वाटप व व्यवस्थापन
3. पाण्याचा योग्य वापर

यापैकी कोणतीही एक बाजू कमी पडली तरी पाण्याचा प्रश्न चालूच राहणार. योग्य व्यवस्थापन असेल तर इस्त्राईलसारख्या देशात अवघा 7 ते 10 cm पाऊस पडून सुध्दा नियोजन, उपयोजन योग्य प्रकारे असल्याने त्यांना पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत नाही. भारतातही वाळवंट समजल्या जाणाऱ्या राजस्थानात, पाण्याचे योग्य नियोजन केल्यानेच आज ते टँकर मुक्त राज्य आहे.

सार्वजनिक जीवनाचा विचार करावयाचा झाल्यास पाणी :
- पिण्यासाठी आणि दैनंदिन मानवी गरजांसाठी
- शेतीसाठी
- उद्योगांसाठी
- विद्युतनिर्मितीसाठी
- मलनि:स्सारणीसाठी
- जलवाहतुकीसाठी
- अग्निशमनासाठी
- नौकानयनासाठी
- जलक्रिडेसाठी इ.

तसेच आपल्या दैनंदिन व्यवहारापुरता विचार केला तर पिण्यासाठी, अन्न शिजवण्यासाठी, शारिरीक स्वच्छतेसाठी, आंघोळीसाठी, धुणी-भांडीसाठी, बागकाम, घर स्वच्छता, गाडीची स्वच्छता इ. साठी पाणी लागतच असते. पाण्याची वाढती मागणी व घटती उपलब्धता यांचा मेळ घालण्यासाठी सुयोग्य नियोजन व योग्य व्यवस्थापन आवश्यक आहेच.

स्त्रिया व्यवस्थापनात कुशल, जागरूक असल्याने स्त्रीशक्ती पाणी प्रश्नांची सोडवणूक अधिक सक्षमपणे करू शकते असे तज्ञांच्या लक्षात आल्याने, एका आंतरराष्ट्रीय पाणी परिषदेत पाण्यासंदर्भात चार मूलभूत तत्त्वे मांडण्यात आली -

1. पाणी हे जीवनासाठी, पर्यावरणासाठी, विकासासाठी निश्चित असे संसाधन आहे.

2. पाणी वापरणारे, नियोजन करणारे, निती ठरवणारे यांचा पाण्याच्या विकासात, व्यवस्थापनात कृतीशील सहयोग असावा.

3. पाणी उपलब्ध करून देण्यात, जलव्यवस्थापनात, पाण्याच्या संरक्षणात स्त्रियांचे स्थान मूलभूत आहे.

4. पाण्याला आर्थिक मूल्य असून ती आर्थिक वस्तू म्हणून समजली जावी.

एकूणच महिलांच्या सहभागाला महत्त्वाचे स्थान आहे. आपल्या परिसरात उपलब्ध असलेल्या पाण्यातून स्वत:च्या कुटुंबासाठी पाणी मिळवणे, त्याची यथायोग्य साठवण करून ते वापरण्याचे योग्य नियोजन करणे या कामी स्त्रियाच मुख्य भूमिका निभावतात. पाण्यामुळे गावाचा विकास होतो पर्यायाने देशाचा विकास होतो. जमीन व वीज यांना जसे मूल्य आहे तसेच पाण्यालाही आहे. यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर, पाण्याचा पुर्नवापर, पाण्याचे शुध्दीकरण व पाण्याचे पुनर्भरण यांचा सारासार विचार करून त्याची अंमलबजावणी महत्त्वाची आहे. यासाठी महिलांचा पाण्यात्याबाबतीत विवेकीवापर महत्त्वाचा. घराघरातून होणारा पाणी वापर काटकसरीने, स्वच्छतेला पूरक व आरोग्याला उपकारक ठरतो.

कमीतकमी पाण्यात योग्य स्वच्छता करता येऊ शकते त्यासाठी भरमसाठ वपार अनावश्यक आहे.

1. जसे कपडे धुताना, भांडी घासताना नळ चालूच ठेवणे.
2. ब्रश, दाढी, तोंड धुतांना बेसिनचा नळ सुरू ठेवणे.
3. स्वच्छतेच्या नावाखाली शॉवर, टबचा आसरा घेणे.
4. बाहेरगावी जाताना नळ न तपासना जाणे.
5. गळत्या नळांची दुरूस्ती न करणे.
6. शुध्द पाणी संडास बाथरूममध्ये वापरणे.
7. टाकी भरणाकडे दुर्लक्ष करणे.
8. हंड्यातले पाणी शिळे समजून फेकून देणे.

यासाठी घ्यावयाची दक्षता -


- पाणी शिळे कधीच होत नाही. शिळ्या पाण्याची संकल्पना सोडून देणे.
- बादलीत पाणी भरून धुणी, भांडी घासणे.
- बेसीनच्या नळाचे पाणी मग्यात घेऊन वापरणे.
- बगीच्याला आवश्यक तेवढेच पाणी देणे.
- टाक्या ओवरफ्लो होणार नाही याची काळजी घेणे.
- घरात जमिनीतून पाणी मुरवण्यासाठी जागा ठेवावी.
- आंघोळीचे पाणी बगीच्यात सोडावे.
-स्वयंपाक घरात डाळ तांदूळ भाजी धुतलेले पाणी झाडांना दिल्यास काटकसर व पुर्नवापर होईल.
- कपडे धुतलेले पाणी बाथरूप, संडास, बेसिन स्वच्छतेसाठी वापरावे. तसेच पाण्यातून विकार निर्माण होऊ नयेत म्हणून पाणी गाळून, उकळून, तुरटी फिरवून, औषध टाकून किंवा शुध्दीयंत्र वापरून वापरावे.

जगाच्या लोकसंख्येच्या अर्धी संख्या महिलांची आहे तेव्हा पाण्याच्या प्रश्नांबद्दल त्यांची निष्क्रियता अयोग्य आहे. मुलांवर स्वच्छतेचे, काटकसरीचे संस्कार महिलाच करू शकतात ज्यायोगे नजीकच्या काळात येणाऱ्या पाण्याचे दुर्भिक्ष्य कमी होण्यात, महिलांता हातभार निश्चितच देशाला प्रगतीपथावर नेणाराच असेल.

स्त्रीशक्ती फार पुरातन काळापासून या प्रश्नाकडे गंभीरपणे पहाते याची अनेक उदाहरणे आपल्याला माहित आहेत. अहिल्याबाई होळकरांनी संपूर्ण भारतात जलसंधारणाचे जे काम केले आहे त्याला तोड नाही. अनेक दुर्गम ठिकाणी नद्यांना शेकडो घाट बांधले, अनेक मंदिरांजवळ कुंड बारवांची निर्मिती केली. अनेक राज्यात आजही महिलांनी पुढाकार घेऊन विहीरी, तलावांचे पुनरूज्जीवन करून गावात, शहरात चैतन्य फुलविले आहे. मॅगेसेसे पुरस्कार विजेते श्री. राजेंद्रसिंह त्यांच्या राजस्थानातील 20 वर्षाच्या अनुभवाबद्दल बोलताना म्हणतात की - देशातील पाणी समस्या दूर करावयाची असेल तर प्रथम जलस्त्रोतांचे पुनर्भरणाचे काम मोठ्या प्रमाणावर झाले पाहिजे व यांत महिला अत्यंत चांगल्या प्रकारे काम करतात असे म्हणतात.

स्त्रीशक्तीतून होत असलेल्या परिवर्तनाबाबत अनेक उदाहरणे आपल्याला माहित आहेत. याचा महिलांनी योग्य तो बोध घेणे आवश्यक आहे.

तर भगिनिंनो ' जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाते उध्दारी ' ही प्रसिध्द म्हण आपल्याला माहित आहे. पाण्याच्या बाबतीत हीच म्हण आता ' जिच्या हाती पाण्याची दोरी तीच जगाते उध्दारी ' अशी करावी लागेल.

Path Alias

/articles/jaladaina-mahailaankadauuna-apaekasaa

Post By: Hindi
×