जल ऊर्जा

जलाचा आणि मानवी संस्कृतीच्या विकासाचा खूप निकटचा संबंध आहे. पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टीचा आधार जल आहे. जलाची जीवनधारण करण्याची शक्ती आपल्या पूर्वजांनी वैदिक कालापासून जाणलेली होती. पंचमहाभूतांमध्ये जलाला अनन्य साधारण महत्व दिलेले आहे.

दैवी कल्पनांचा उगम होतांना देखील परमेश्वराचा पहिला अवतार (मत्स्य) जलातच उत्पन्न झालेला दर्शविला आहे. पाण्याचे सुक्ष्म निरीक्षण करून, वैदिक काळातल्या दोन देवता जलाच्या नियोजनासाठी, पूर्वजांनी मानल्या. आकाशातील जलासाठी देवराज इंद्र व भूपृष्ठावरील पाण्यासाठी वरूण. या दोन्ही देवतांच्या आवाहनाची, आराधनेची अनेक सूक्ते आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतात.

जगातल्या सर्व मानवी वसाहती जलाच्या आश्रयाने म्हणजे नद्यांच्या काठी उदयाला आल्या. जलाच्या अंगी असणारे प्रवाही सामर्थ्य फार पूर्वीपासून मानवाला अवगत होते. व त्या प्रवाहातील शक्तीचा उपयोग लाकडाचे ओंडके वाहून नेण्यासाठी वापरात होता.

चक्राचा शोध लागल्यानंतर, पाण्याच्या प्रवाह शक्तीचा उपयोग चक्रे फिरवून त्यापासून यांत्रिक शक्ती निर्माण करणे व त्या शक्तीचे अनेक उपयोग (जसे पीठाच्या चक्क्या चालवणे, शेतीसाठी पाणी उपसणे) मानवाने केले.

पाण्यातील स्थितीजन्य शक्ती व प्रवाहजनीत शक्तीचा उपयोग करून विद्युत निर्मिती करता येईल असे तंत्रज्ञान, विजेचा शोध लागल्यानंतर अस्तित्वात आले.

शक्तीच्या कोणत्याही स्त्रोतापासून विद्युत जनित्राचा आंस फिरवता आला, की वीज निर्मिती होते. उष्णता देवून पाण्याचे वाफेत रूपांतर करून बाष्पसंयत्राने वीज निर्मिती करता येते त्याला आपण औष्णिक वीज निर्मिती म्हणतो. तद्वतच पाण्याच्या स्थितीजन्य अथवा प्रवाहजन्य शक्तीचा उपयोग करून जनित्राचा आंस फिरविल्यावर जल विद्युत निर्माण होते.

नदी प्रवाहातील, प्रवाहजन्य. शक्तीने जलचक्र फिरवणे -
या पध्दतीत पाण्याचा प्रवाह अडवला जात नाही. पर्यावरणावर कोणताही परिणाम होत नाही. परंतु ही पध्दत बारमाही वाहणाऱ्या नद्यांवरच फायदेशीर ठरते. प्रवाहाचा वेग व स्त्रोत यावर विद्युत निर्मितीचे प्रमाण अवलंबून असते.

खालील आकृतीत जलविद्युत केंद्राची संयत्र यंत्रणा दर्शविलेली आहे.
धरणामुळे अडविलेल्या पाण्याची पातळी, त्यापासून पाईपद्वारे (Penstock) पाणी वेगाने टर्बाईनच्या पात्यांवर पडून ते फिरते जलचक्राचीच सुधारित आवृत्ती म्हणजे जल टर्बाईन्स. पाती फिरविल्यानंतर ते पाणी नदीतील प्रवाहाचे पात्रात - धरणाचे खालील बाजूस सोडले जाते.

या प्रकारात नदीचा प्रवाह बंधारा / धरण बांधून अडविला जातो व विद्युत निर्मितीच्या गरजेनुसार किंवा खालील गावांच्या शेती अगर पिण्याच्या पाण्याच्या गरजेनुसार टर्बाईन्स मधून सोडला जातो.

जलविद्युत केंद्र :


जलप्रपाताच्या शक्तीची माहिती मनुष्यास पुरातन काळापासून होती. पाणचक्कीच्या रूपाने पाण्याच्या शक्तीचा प्रथम उपयोग केला गेला असावा असे वाटते. याच पाणचक्कीच्या तत्वाचा पुढे विस्तार होवून व त्यात संशोधनाची भर पडून जल टर्बाईनचा शोध लागला. जलशक्तीचा उपयोग करून वीज निर्माण करण्याच्या क्षेत्रात विसाव्या शतकात फार झपाट्याने प्रगती झाली. प्रत्यावर्ती (उलट सुलट दिशेने वाहणाऱ्या) विद्युत प्रवाहासंबंधीच्या अभियांत्रिकीतील प्रगतीमुळे बऱ्याच दूरवर विजेचे प्रेषण शक्य झाले व वीजेचा वापर करणारे अॅल्युमिनियमसारखे नवीन उद्योग, घरगुती कारखाने इत्यादी सुरू झाले.

यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करता येते. यांत्रिक ऊर्जा मुख्यत: दोन मार्गांनी मिळू शकते.
1. कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, अणूऊर्जा इत्यादी मर्यादित साठ्यांची इंधने वापरून आणि
2. पाणी, वारा, समुद्राची भरती - ओहोटी, लाटा, सौर ऊर्जा इत्यादींतील ऊर्जांचा उपयोग करून.

दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जांपैकी वाऱ्याचा साठा करता येत नाही म्हणून वाऱ्याच्या ऊर्जेपासून वीज निर्मिती अनिश्चित अवधीत व अल्प प्रमाणात होवू शकते. तथापि भारतातील जल विद्युत निर्मिती मॉन्सून काळात पडणाऱ्या पावसावर बहुतांशी अवलंबून आहे. जल ऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्याच्या पध्दती व यंत्रणा यांचा समावेश जलविद्युत केंद्रात होतो.

जलविद्युत शक्ती - उत्पादन केंद्रे :


जलविद्युत केंद्र : जलविद्युत केंद्रांमध्ये जनित्र चालविण्यासाठी लागणारी ऊर्जा उंचावरून कोसळणाऱ्या पाण्याच्या झोताने पुरविली जाते. पाण्याच्या स्थितिज ऊर्जेचे गतिज ऊर्जेत रूपांतर करून ही गतिज ऊर्जा टर्बाईन चालविण्यास वापरली जाते. जलविद्युत केंद्रांचे त्यांच्या जलशीर्षांवरून उच्च, मध्यम व निम्न शीर्षांची असे तीन प्रकार पडले आहेत. उच्च जलशीर्षाच्या केंद्रातील महत्वाचे विविध घटक पुढीलप्रमाणे असतात -

1. धरण
2. शीर्षजल
3. शीर्ष तटाक
4. मुख्य झडपा गृह
5. पातनळ
6. पुरवठा झडप
7. प्रोथ
8. टर्बाईन व तदनुषंगिक साहाय्यक यंत्रे व यंत्रणा
9. जनित्र
10. पादजल
11. वीज उत्पादनानंतर दूर प्रेषणासाठी लागणारी रोहित्रे इत्यादी सामग्री. जलविद्युत केंद्रांची विद्युत उत्पादन शक्ती मुख्यत: पाण्याचे प्रवाहमान व जलशीर्ष या दोन गोष्टींवर अवलंबून असते. जलशीर्ष जर 305 मीटर पेक्षा जास्त असेल,तर आवेग टर्बाईन आणि त्यापेक्षा कमी असल्यास प्रतिक्रिया टर्बाईन वापरले जाते जल टर्बाईन साधारणत: दर मिनिटाला 100 ते 375 ह्या फेरेव्याप्तीतील कोणत्याही एका समकालिक गतीने फिरतात.

भरती ओहोटी विद्युत केंद्रे :


भरती ओहोटीतून मिळणाऱ्या ऊर्जेचा उपयोग (विशेषकरून भरती व ओहोटीच्या वेळी असणाऱ्या समुद्राच्या पातळ्यांतील फरत जास्त असेल तेथे) वीज निर्मितीसाठी करता येवू शकतो. भूभागाच्या रचनेवर भरतीची उंची अवलंबून असते. अशा ठिकाणी बल्ब जातीची टर्बाईनने वापरली जातात. जगातील पहिले भरती - ओहोटी विद्युत केंद्र 1967 मध्ये इंग्लिश खाडीत फ्रान्सच्या किनाऱ्यावर रांस नदीच्या मुखावर कार्यान्वित झाले. भरतीमुळे मिळणारे जलशीर्ष सुमारे 8 मीटर असून 24 टर्बाईन असलेल्या या केंद्राची क्षमता 550 मेगावॅट आहे.

जल ऊर्जा :


सर्वदूर गावांमध्ये वीज पोचवण्यासाठी छोट्या जलविद्युत प्रकल्पांमध्ये निर्माण झालेल्या विद्युत ऊर्जेचा वापर केला जात आहे. देशातील लघु जलविद्युत केंद्रांची विद्युत निर्मिती क्षमता अंदाजे 1500 मेगावॅट आहे. गेल्या दहा - बारा वर्षात 3 मेगावॅट क्षमतेच्या लघु जलविद्युत प्रकल्पांची क्षमता चौपट वाढून 63 ते 240 मेगावॅट झालेली आहे. छोट्या प्रकल्पांतर्गत 420, 25 मेगावॅट क्षमतेची केंद्रे स्थापित केली गेली असून त्यांची क्षमता सरासरी 1433 मेगावॅट आहे. 521 मेगावॅट क्षमता असणारे 187 हून अधिक प्रकल्प निर्माणाधीन आहेत.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या एक्सपर्ट अप्रेझल कमिटीने (ईएसी) गेल्या पाच वर्षात एप्रिल 2007 ते डिसेंबर 2012 या कालावधीत 262 जलविद्युत व जलसिंचन प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.

जलशीर्ष - Head :


जलविद्युत केंद्राची विद्युत उत्पादन शक्ती मुख्यत: पाण्याचे प्रवाहमान - Flow - व जलशीर्ष Head या दोन गोष्टींवर अवलंबून असते. जलविद्युत केंद्राचे जलशीर्ष म्हणजे त्यातील त्या टर्बाईनवर मिळू शकणारा पाण्याचा दाब. केंद्राच्या वरच्या बाजूस असलेल्या नदीतील किंवा तलावातील पाण्याची पातळी म्हणजे प्रतिस्त्रोत जलस्तर Up stream व केंद्राच्या खालील बाजूची पाण्याची पातळी म्हणजे अनुस्त्रोत जलस्तर Down stream यांतील उभ्या अंतरास जलशीर्ष म्हणतात.

भारांक - Load Factor :


विजेचा वापर हा मुख्यत्वे समाजातील औद्यौगिक व सामाजिक जीवन व ऋतुमान यांनुसार बदलत असतो. विजेच्या वापरानुसार विद्युत केंद्रावर येणाऱ्या भारात काळानुसार चढउतार होतो. दिवसाकाठी केंद्रावर येणाऱ्या भाराचा आलेख काढला तर असे दिसून येते की, काही अवधीत हा बराच जास्त असतो. असाच फरक निरनिराळ्या ऋतुंतील आलेखात आढळतो. सरासरी भार व कमाल भार यांच्या प्रमाणास भारांक म्हणतात. कोणत्याही अवधीतील कमीतकमी भार हा त्या काळातील आधार भार किंवा स्थिर भार समजतात.

जलविद्युत केंद्रावरील जलशीर्षात नियंत्रणाने वेळेनुसार बदल करणे शक्य नसते म्हणून टर्बाईन - जनित्राला होणाऱ्या पाण्याचा पुरवठा कमी - अधिक करून विद्युत निर्मिती कमी - अधिक ठेवतात. विद्युत केंद्रावरील भार कमी असतो त्या वेळी पाण्याचा वापर कमी होतो म्हणून सतत वाहणाऱ्या कमी शीर्षाच्या जलविद्युत योजनेच्या अभिकल्पात (आराखड्यात) कमी भाराच्या अवधीत जादा प्रवाहाचे पाणी जलाशयात साठवून ठेवतात. जास्त भाराच्या अवधीत लागणारा वाढीव पाण्याचा पुरवठा या जलाशयातून मिळू शकेल, इतकी जलाशयाची धारणा म्हणजेच आकारमान ठेवतात.

अधिष्ठापन क्षमता - Installed Capacity :


विद्युत केंद्रापासून मिळणारी खात्रीलायक विद्युत शक्ती केंद्राच्या अधिष्ठापन क्षमतेच्या म्हणजे अपेक्षित क्षमतेच्या 90 टक्के धरतात. पावसाळ्यात जास्त पाणी उपलब्ध होते त्या वेळी जास्त विद्युत निर्मिती करता येते. म्हणून अशी अल्पकालीन अतिरिक्त विद्युत निर्मिती विचारात घेवून जलविद्युत केंद्राची अधिष्ठापन क्षमता थोडी वाढीव धरणे फायदेशीर ठरते. कमीत कमी खर्चात उपलब्ध पाण्याचा फलप्रद उपयोग करून विद्युत निर्मिती करणे हाच जलविद्युत प्रकल्पाचा प्रमुख हेतू असतो.

जलविद्युत केंद्राची कमाल क्षमता ठरविताना मुख्यत: विद्युत जलाच्या क्षेत्रातील कमाल मागणी व त्यात पुढील काही काळात होणारी संभाव्य वाढ विचारात घेतात, परंतु पाण्याचा साठा किंवा नदीतील पाण्याचा किमान प्रवाह मर्यादित असेल, तर जलविद्युत केंद्राची क्षमता त्या पाण्याच्या उपलब्धतेवरच आधारावी लागते. सरासरी प्रवाह व सरासरी जलशीर्ष यावरून जलविद्युत केंद्राची सरासरी क्षमता ठरविता येते व केंद्रावरील भारांकावरून त्याची कमाल मर्यादा ठरविता येते.

वर्गीकरण :


जलविद्युत केंद्रांचे वर्गीकरण हे मुख्यत: 1. स्थानपरत्वे. 2. जलशीर्षानुसार अथवा 3. जमिनीवरील किंवा भूमिगत अशा प्रकारे करतात.

1. स्थानपरत्वे वर्गीकरण :
यामध्ये अनेक उपप्रकार असून ते खालीलप्रमाणे होत.

अ) प्रवाहस्थित केंद्र :


नदीचा प्रवाह वर्षभर मोठ्या प्रमाणात चालू रहात असेल, तर अशा नदीवर बंधारा घालून पाणी विद्युत केंद्राकडे वळविले जाते. सामान्यत: विद्युत केंद्र हे बंधाऱ्यातच एका टोकास अथवा बंधाऱ्याच्या बाजूस नदीच्या काठी असते. केंद्राची क्षमता नदीवरील कमीतकमी प्रवाहावर अवलंबून असते. केंद्रातून बाहेर पडलेले पाणी नजीकच्या नदीत पुन्हा सोडले जाते. बंधाऱ्याचा उपयोग फक्त प्रवाह वळविण्यापुरताच असतो. अतिरिक्त प्रवाह सांडव्यावरून कमी जास्त प्रमाणात वाहत राहतो. केंद्रावरील भार दिवसात जसजसा बदलेल त्या प्रमाणे पाण्याचा वापर कमी- जास्त करावा लागतो. हे करण्यासाठी आवश्यक तेवढीच जलसंचयक्षमता म्हणजेच तेवढा पाण्याचा साठा मावेल एवढी जागा बंधाऱ्याच्या वरील तलावात असली म्हणजे पुरते. अशी केंद्रे गंगा, यमुना अशा नद्यांवर सोईस्कर असतात. नदीच्या पात्रात नैसर्गिक धबधबा असल्यास नदीचे पाणी धबधब्याच्या पायथ्याजवळील केंद्रावर नेवून त्याद्वारा विद्युत निर्मिती करण्यात येणारी उदाहरणे म्हणजे कर्नाटक राज्यातील गोकाक आणि गिरसप्पा (जोग) ही होत.

इ) साठविलेल्या पाण्यावर चालणारी केंद्रे :


या प्रकारात नदीवर आवश्यक तेवढ्या उंचीचे धरण बांधून पर्जन्यकाळातील पाणी साठवून तलाव करतात व त्यातील पाणी विद्युत निर्मितीसाठी वापरतात. भारतात ज्या नद्यांना पाण्याचा पुरवठा फक्त मॉन्सून काळातच होतो अशा नर्मदा, तापी, कृष्णा या नद्यांवर अशी केंद्रे सोईस्कर असतात या प्रकारच्या केंद्रांचे खालील प्रमाणे पोटविभाग पडतात.

(इ1) धरणाच्या पायथ्याशी बसविलेली केंद्रे :


धरणातून पोलादी किंवा काँक्रीटचे नळ टाकून त्यातून धरणातील पाणी केंद्रातील टर्बाईनवर नेतात व अवजल म्हणजे वापरलेले पाणी पुन्हा त्याच नदीत सोडतात. या प्रकारात धरणामुळे निर्माण झालेल्या जलशीर्षावरच केंद्रातील टर्बाईन चालतात. अवजलाचा उपयोग सिंचाई आणि इतर कामांसाठी होतो भाटघर धरणाच्या पायथ्याशी, भाक्रा धरणाच्या पायथ्याशी, तसेच म्हैसूर येथील शिवसमुद्रम्, महानदीवरील हिराकुंड, रिहांड बंधारा इत्यादी बंधाऱ्यांच्या पायथ्याशी अशी केंद्रे आहेत.

(इ2) धरणापासून दूर असलेली केंद्रे :


नदीच्या उताराचा फायदा घेवून नदीच्या वरच्या भागात बांधलेल्या तलावातील पाणी नदीच्या खालच्या भागाजवळ उभारलेल्या विद्युत केंद्रावर कालव्याने शीर्षधीमध्ये (नळाच्या वरच्या बाजूला असलेल्या तलावात) व तेथून नळावाटे नेवून उपलब्ध होणाऱ्या जलशीर्षावर (आ. 6 अ) किंवा तलावातील पाणी बोगद्यातून अगर नळातून भूमिगत केंद्रावर नेवून मिळणाऱ्या जलशीर्षावर विद्युत निर्मिती करतात व अवजल त्याच नदीत अथवा दुसऱ्या ठिकाणी सोडतात. चिपळूणजवळ अलोरे येथे कोयनेच्या अवजल कालव्यावर वरील दुसऱ्या प्रकारचे विद्युत निर्मिती केंद्र आहे. सिंचाई कालव्याच्या मार्गात भूरचनेत एकदम बराच उतार असेल तेथेही जलविद्युत केंद्र उभारता येते. पंजाबमधील नानगलपासून निघालेल्या कालव्यावरील व गंडक व कोसी प्रकल्पांपैकी नेपाळमधील केंद्रे अशा प्रकारची उदाहरणे आहेत.

(इ3) धरणानजीकच्या दरीत असलेली केंद्रे :


डोंगरमाथ्यावरील नदीवर धरण बांधून ते पाणी पायथ्याजवळील विद्युत केंद्रात नेवून दुसऱ्या नदीत सोडल्यास मोठे जलशीर्ष मिळते. सह्याद्रीच्या पायथ्याशी कुलाबा जिल्ह्यात खोपोली, भिरा, भिवपुरी व रत्नागिरी जिल्ह्यात पोफळी येथे तसेच काश्मीरमध्ये सिंधू नदीच्या पाण्यावर वीज उत्पादन करणारी जुनी केंद्रे आहेत. तामिळनाडू व केरळच्या परंबिकुलम् - अलियार प्रकल्प व इतर कित्येक प्रकल्प असे आहेत.

(इ4) पंपाच्या साह्याने केलेल्या जलसंचयावरील केंद्रे :


दिवसाच्या निरनिराळ्या वेळी तसेच ऋतुमानाप्रमाणे विजेचा भार बदलत असतो. विद्युत केंद्राच्या क्षमतेपेक्षा ज्या वेळी भार कमी असतो त्यावेळी केंद्रातील सामग्रीचा पुरेपूर उपयोग होत नसल्याने आर्थिक दृष्टीने फायदेशीर ठरत नाही. अशा वेळी निर्माण होवू शकणाऱ्या पण खप नसलेल्या जादा विद्युत शक्तीचा साठा करून ठेवण्याचा एक उपाय म्हणजे कमी भाराच्या काळात जादा विद्युत शक्तींच्या साहाय्याने पाणी वरच्या पातळीतील जलाशयात पंप करून चढविणे. याच पाण्याचा उपयोग विजेची मागणी वाढताच पुन्हा विद्युत निर्मितीसाठी होतो.

2. जलशीर्षानुसार वर्गीकरण :


हे तीन प्रकारांत करतात. यामध्ये 15 मीटर पर्यंत, 15 ते 50 मीटर पर्यंत व 50 मीटर पेक्षा जास्त जलशीर्ष असलेल्या केंद्रांना अनुक्रमे कमी, मध्यम व जास्त जलशीर्षाची केंद्रे असे म्हणतात. जगातील सर्वाधिक जलशीर्ष असलेले केंद्र इटलीमध्ये लांरेस येथे असून त्या केंद्रावरील जलशीर्ष 2030 मीटर आहे.

1. जमिनीवरील व भूमीगत जलविद्युत केंद्रे :


1900 पर्यंत बहुतेक सर्व जलविद्युत केंद्रे जमिनीच्या वर बांधलेली गेली. त्यानंतरच्या काळात अनेक भूमिगत केंद्रे निरनिराळ्या देशांत बांधण्यात आली आहेत. विद्युत केंद्र पृष्ठभागावर बांधावे किंवा भूमिगत ठेवावे, हे भौगोलिक व भूवैज्ञानिक पहाणी करून ठरविता येते. विद्युत केंद्रे भूमिगत ठेवण्याचे कारण त्यांच्या बांधणीचा खर्च कमी येतो. भूमिगत केंद्रामध्ये पाणी वाहून नेणाऱ्या नळांची व बोगद्यांची लांबी कमी ठेवूनही पुरेसे जलशीर्ष मिळविता येते. तसेच चांगल्या खडकातून बोगदा खणला असल्यास पाण्याचा दाब पेलण्यास नळांना खडकाचा आधार मिळतो व कमी जाडीचे, पोलादी नळ वापरता येतात. यामुळे होणाऱ्या बचतीमुळे भूमिगत विद्युत केंद्रे कमी खर्चाची होतात. तसेच भूमिगत विद्युत केंद्राचे बांधकाम व त्यातील यंत्रांची उभारणी सर्व ऋतूंत अबाधितपणे चालू ठेवता येते. विद्युत केंद्र भूमिगत ठेवल्यामुळे हवाई हल्ल्यापासून संरक्षण होवून युध्दकालातही विद्युत निर्मिती चालू ठेवणे शक्य होते.

महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रांची यादी :


मोठी जलविद्युत केंद्रे -

जलविद्युत केंद्राचे नाव

स्थापित क्षमता (मेगावॅट)

कोयना टप्पा 1 व 2

600

कोयना टप्पा 3

320

कोयना टप्पा 4

1000

कोयना धरण

36

एकूण

1956 मेगावॅट

 


लघु जलविद्युत केंद्रे

जलविद्युत केंद्राचे नाव

स्थापित क्षमता (मेगावॅट)

वैतरणा

60

येलदरी

22.50

वीर

9

राधानगरी

4.80

भाटघर

16

पैठण

12

पानशेत

8

तिल्लारी

66

भिरा (पुच्छ) (टेलरेस)

 80

पवना

10

वैतरणा धरण

1.50

कण्हेर

4

वरसगांव

8

भातसा

15

धोम

2

उजनी

12

माणिकडोह

6

डिंभे

5

वारणा

16

तेरवान मेढे

0.2

सूर्या

6

दूधगंगा

24

भंडारदरा 1

10

भंडारदरा 2

34

एकूण

432 मेगावॅट

 


ठळक वैशिष्ट्ये :


1. महाराष्ट्र राज्य 17813 मेगावॅट वीज निर्मिती करते. त्यापैकी 3551 मेगावॅट वीज ही जलविद्युत प्रकल्पांतून केली जाते. (20 टक्के)
2. महाराष्ट्रामध्ये एकूण 45 वीज निर्मिती प्रकल्प आहेत.
3. घाटघर उदंचन प्रकल्प राज्यातील पहिला मोठा व देशातील दुसरा वीज निर्मिती करणारा प्रकल्प आहे. डिसेंबर 2009 पर्यंत 196.5 मिलीयन सुनिटस् (MU) वीज निर्मिती झाली असून उदंचनाकरीता 259.609 मिलीयन युनिटस् (MU) वीज वापर झाला आहे. प्रकल्पाचा घटक क्र. 1 महाजेनकोकडे 17.8.2009 रोजी हस्तांतर करण्यात आला आहे.
4. 65 जलविद्युत प्रकल्पांचे खाजगीकरणातून हस्तांतर करण्यात आले असून 19 प्रकल्पांची निविदा प्रक्रिया सुरू आहे.
5. महावितरणकडून सरदार सरोवर आंतरराज्य प्रकल्पाद्वारे 108.81 कोटी व पेंच आंतरराज्य प्रकल्पांकडून 21.07 कोटी रूपयाचा महसूल शासनास मिळाला आहे. त्यासाठीचा दर प्रति युनिट रूपये 2.05 होता.
6. महाराष्ट्र विद्युत नियामक मंडळाने महाजेनकोकडे हस्तांतर केलेल्या जलविद्युत प्रकल्पांच्या सुधारित भाडेपट्टी प्रस्तावास मान्यता दिली आहे. प्रति तिमाहीस सन 2009 - 10 पासून प्रकल्पाप्रमाणे सुधारित भाडेपट्टी प्राप्त झाली आहे.
7. डोलवाहल जलविद्युत प्रकल्प सुदूर संचलनाने नियोजित केला जातो व तो महाराष्ट्रातील पहिला सुदूर संचलन प्रकल्प आहे.
8. जलविद्युत प्रकल्पाकरिता सन 2010 - 11 मध्ये रूपये 400 कोटीची तरतूद करण्यात आली.
9. केंद्र शासनाच्या धोरणाप्रमाणे 7 वर्षे पूर्ण झालेल्या जलविद्युत प्रकल्पांचे पुनर्स्थापना / उन्नयन करण्याचे धोरण आहे.
10. कोयना डावा तीर जलविद्युत प्रकल्प (2 X 40 मेगावॅट) या प्रकल्पांची विविध घटकांची निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पामध्ये डेरीयाज प्रकारचे जनित्र राज्यात पहिल्यांदाच वापरण्यात येणार आहे. पाण्याच्या उंचीच्या मोठ्या फरकास अधा जनित्रांचा वापर करण्यात आला आहे.
11. काळ (1 X 15 मेगावॅट), कुंभी (1 X 10 मेगावॅट) या प्रकल्पांची प्राथमिक कामे सुरू झाली आहेत.
12. निरा देवधर जलविद्युत प्रकल्प (2 X 3 मेगावॅट) दिनांक 10.10.2009 पासून कार्यान्वित झाला असून डिसेंबर 2009 अखेर त्यामधून 5.5. मिलीयन युनिटस् (MU) विद्युत निर्मिती झाली आहे.
13. खाजगी करणातून टेंभू बॅरेज, कोणाल व देवगड हे प्रकल्प पूर्ण झाले असून त्याची चाचणी घेण्याचे काम झाले आहे.
14. खडकवासला ( 2 X 0.6 मेगावॅट) खाजगीकरणातून जलविद्युत प्रकल्पाची सुरूवात झाली आहे.

भारतातील जलविद्युत संभाव्य क्षमता

(मेगावॅटस् मध्ये)

सिंधू नदीचे खोरे

33,832

गंगेचे खोरे

20,711

मध्य भारतातील नद्या

4,152

दक्षिण भारतातील पश्चिम वाहिनी नद्या

9,430

दक्षिण भारतातील पूर्व वाहिनी नद्या

14,511

ब्रम्हपुत्रा नदीचे खोरे

66,065

एकूण संभाव्य क्षमता

1,48,701 मेगावॅट

 


आताच्या दिवशी भारतातील सर्व ऊर्जा स्त्रोत मिळून एकूण प्रस्थापित विद्युत निर्मिती क्षमता (Installed Capacity) 2,28,721.73 मेगावॅटस् (30.9.2013 रोजी) आहे. त्यात जल विद्युतचा वाटा फक्त 39,788.4 मेगावॅटस् (17.39 टक्के) आहे. पूर्ण क्षमतेने जलविद्युत केंद्रे उभारून वापरल्यास, भारताला खनिज इंधनांवर (कोळसा, तेल) अवलंबून राहण्याचे प्रमाण घटेल व पर्यावरणाची हानी कमी होईल.

या खेरीज लघू व मध्यम आकाराची जल विद्युत केंद्रे, छोट्या नद्या, ओढे यावर बांधल्यास ती संभाव्य क्षमता 6780 मेगावॅटस् आहे.

पंपाच्या साह्याने केलेल्या जलसंचयावरील विज निर्मिती केंद्रे (Pumped storage schemes) :


उंचावर असलेल्या पाणी संचयातून पाणी जल टर्बाईन्समध्ये पाठवून विद्युत निर्मिती करायची. निर्मिती नंतर टर्बाईनमधून खाली सोडले जाणारे पाणी, नदी पात्रात न वाहू देता, त्याचा खालच्या बाजूस जलाशय तयार करायचा. जेव्हा राज्यातील पारेषण यंत्रणेत वीजेची मागणी कमी असेल त्यावेळी अतिरिक्त वीज वापरून खालच्या जलाशयातून पंपाद्वारे पाणी, उंचावरील जलाशयात भरून ठेवायचे. मग पुन्हा वाढीव मागणीच्या काळात त्याच पाण्याला नैसर्गिक रितीने खाली आणतांना टर्बाईनद्वारे विद्युत निर्मिती करायची.

अशा योजना ह्या फक्त उच्चतम वीज मागणी काळातच निर्मिती करण्यासाठी उपयोगी असतात. परंतु निर्माण होत असलेल्या वीजेपेक्षा 30 टक्के अधिक वीज (तेवढेच पाणी वर चढवितांना) खर्च होते. त्यामुळे एकूण वीज उत्पादनात भर पडत नाही. फक्त वीज निर्मिती उच्चतम गरजेच्या काळात करता येते हा या योजनांचा फायदा.

जलविद्युत निर्मितीचे फायदे -


1. कमतरता असलेल्या खनिज इंधनांची बचत.
2. पर्यायवरणाची हानी होत नाही. स्वच्छ व प्रदूषण रहीत ऊर्जा स्त्रोत
3. दीर्घकालीन वापर. त्यामुळे चालू ठेवण्यासाठी येणारा खर्च कमी.
4. ऊर्जा निर्मितीच्या इतर स्त्रोतांपेक्षा स्वस्त. इंधनाचा खर्च नाही.
5. वीजेची गरज तात्काळ (उच्चतम मागणी काळात) भागविता येते.
6. एकदा गुंतवणूक झाल्यानंतर, दररोजचा खर्च (इंधनासाठी) नसल्यामुळे चलन फुगवट्याच्या किंवा महागाई निर्देशांकाच्या परिणामापासून मुक्त.
7. विद्युत निर्मिती बरोबरच शेती व पिण्यासाठी पाण्याची उपलब्धता, नौकाविहार, मनोरंजन पार्क, पर्यटन व मत्स्यपालन यांना उत्तेजन.
8. दुर्गम भागात योजना असल्यामुळे, योजने बरोबरच आपोआप त्या भागात रस्ते, शाळा, दवाखाने, दळण वळणाच्या सोई उपलब्ध होवून तिथले सामाजिक जीवन सुधारण्यास मदत होते.

जलविद्युत केंद्रे उभारतांना येणाऱ्या अडचणी -


1. दुर्गम भागात (विशेषत: ईशान्येकडील डोंगराळ भागात) प्रकल्प सर्वेक्षण व मोजणी करतांना येणाऱ्या अडचणी.
2. जमिनीचे अधिग्रहण करण्यात येणारे प्रश्न.
3. जल लवाद व आंतरराज्य पाणी वाटपाचे प्रश्न.
4. प्रकल्पाच्या खर्चाचा वाटा, लाभार्थीवर बोजा देण्याबाबत उद्भवणाऱ्या अडचणी.
5. पर्यावरण परवानग्या मिळवण्यात येणाऱ्या अडचणी इत्यादी.

वरील अडचणीवर, लघु व मध्यम आकाराचे जल ऊर्जा प्रकल्प उभारणे हा प्रभावी उपाय आहे. जल ऊर्जेसाठी छोटी धरणे बांधतांना त्याचा उपयोग शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी उपयोग होतो. महाराष्ट्र सरकारने सिंचन प्रकल्पासाठी बांधलेली छोटी धरणे, लघु ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी खाजगी उद्योजकांना देवू केला आहेत.

धरण पातळीवरून सिंचनाच्या कालव्यात सोडले जाणारे पाणी जल टर्बाईन्स मधून सोडले तर वीज निर्मिती करता येते म्हणजे जलसिंचनाला बाधा न येता, पाण्याचा अपव्यय न होता ऊर्जा निर्मितीसाठी हा पूरक लाभ यातून घेता येतो.

आपल्या देशाला फार मोठ्या प्रमाणावर परकीय चलन खर्च करून इंधन आयात करावे लागते. लघू व मध्यम जल ऊर्जा प्रकल्प हा खर्च कमी करण्यास प्रभावी उपाय आहे.

लेखक
प्र. गो. चव्हाण

Path Alias

/articles/jala-urajaa

Post By: Hindi
×