जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील साठविलेल्या पाण्याचे समन्याय वाटप


सह्याद्रीमध्ये उगम पावणार्‍या कृष्णा आणि गोदावरी या पूर्ववाहिनी नद्यांच्या खोर्‍यात उगमाकडील भागात भरपूर पाऊस असला तरीही पूर्वेकडे तो लगेच कमी कमी होत ५०० ते ६०० मि.मी पेक्षा कमी पाऊस असलेला पर्जन्यछायेतील (Rain shadow area) बराचसा भाग अवर्षणप्रवण गणला जातो. कृष्णेचे खोरे आकाराने पंख्यासारखे (Fan Shaped) असून त्याच्या दक्षिण - पश्‍चिम टोकापाशी असलेले ५००० - ५५०० मि.मी प्रमाणे उत्तर पश्‍चिम टोकापाशी २००० मि.मी येवढे कमी होते.

दक्षिण व मध्य भारतातील कोणत्याही नदीखोर्‍यातील उपलब्ध जलसंपत्तीचा माणसाच्या उपयोगासाठी वापर करण्यामध्ये मोठी व मध्यम धरणे यांचा वाटा सर्वात मोठा असतो. परंतु सिंचन सुविधांचे सर्वत्र विखरण करून जलसंपत्तीचे सर्व खोर्‍यामध्ये समन्यायी पध्दतीने वाटप करण्यामध्ये राज्यस्तरीय लघु धरणे, स्थानिक स्तरीय लहान योजना, पाणलोट क्षेत्र विकास आणि भूजलविकास यांचा वाटा फार महत्वाचा असतो. मोठ्या - मध्यम धरणांच्या लाभापासून वंचित राहिलेल्या पर्जन्याधारित शेती करणार्‍या अल्पभूधारक शेतकर्‍यांना सिंचनाद्वारे होणार्‍या विकासाच्या संधी त्यामुळे उपलब्ध होतात.

पावसाच्या पडणार्‍या पाण्यावर या प्रकारच्या लहान योजनांचा प्रथम हक्क (First charge) असल्यामुळे त्याद्वारे पावसाचे पाणी प्रथम अडविले, साठविले व / वा जिरविले गेल्यानंतर जास्तीचे पाणी नदी नाल्यातून वाहाते आणि मोठ्या - मध्यम धरणात साठविले जाते. त्यामुळे अशा लाभधारकांना चांगल्या पावसाच्या वर्षात (Good year) दोन पिकांची हमी मिळाली तरी अपुर्‍या पावसाच्या वर्षात (Bad year) खरीपाचे पीक हाती आले तरी पुष्कळ झाले असे म्हणावे लागते. अवर्षण वर्षात (Drought year) मात्र एकाही हंगामातील पीक हाती न आल्यामुळे अल्पभूधारक व शेत मजूर यांच्यासाठी उत्पादन कामे काढून रोजगार पुरवावा लागतो आणि धान्य व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागते. जनावरांसाठीही चारा आणि पाण्याची व्यवस्था करावी लागते.

जास्त पावसाच्या क्षेत्रात ७५ टक्के विश्वासार्हतेच्या पाणी येव्यावर आधारित असलेल्या मोठ्या धरणात सर्वसामान्यपणे दरवर्षी पूर्ण साठा होतो. या पाण्याचा वापर कालव्याद्वारे खालच्या बाजूच्या अवर्षणप्रवण क्षेत्राला सिंचनसुविधा पुरविण्यासाठी केला जावून पाण्याचे समन्यायी वाटप होते. कमी पावसाच्या क्षेत्रात तुलनेने सपाटीच्या प्रदेशात बांधलेल्या मोठ्या - मध्यम धरणात मात्र सकंल्पित साठा दरवर्षी प्रत्यक्षात होईल याची खात्री नसते. खोर्‍यातील जलसंपत्तीचा जास्तीत जास्त वापर होण्याच्या दृष्टीने जेव्हा शक्य असतील तेवढी धरणे बांधून पूर्ण केली जातात तेव्हा मात्र एका वेगळ्याच प्रश्‍नाला तोंड देण्याची वेळ येते. ती म्हणजे वरच्या बाजूच्या धरणात कमी पावसाच्या वर्षात जेव्हा तुलनेने चांगला पाणीसाठा असतो परंतु खालच्या बाजूच्या धरणात तुलनेने बराच कमी साठा असतो.

खालच्या धरणातून पिण्याचे पाणी व औद्योगिक वापर यामध्ये येणारी तूट वरचे धरणातील पाणी सोडून भागविणे न्याय असले तरीही त्यासाठी वरच्या धरण क्षेत्रातून त्याला विरोध होतो. खालच्या धरणातून वरच्या धरणात पाणी वळविणे शक्य नसल्यामुळे वरच्या धरणात प्रथमत: जास्तीत जास्त पाणीसाठा करून अतिरिक्त पाणी सांडव्यावरून वाहून ते खालच्या धरणात साठविणे हेच धोरण त्यामुळे योग्य ठरते. परंतु जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते त्यावर्षी वरच्या धरणातून किती पाणी केव्हा व कसे सोडावे या विषयी सर्वमान्य तोडगा हे प्रत्यक्षात आणणे अत्यंत अवघड काम होते. अशा परिस्थितीत गोदावरी खोर्‍यातील जायकवाडी धरणाच्या पोणलोट क्षेत्रातील धरणांची काय स्थिती आहे आणि त्याबाबत कोणत्या उपाय योजना करता येणे शक्य आहे याबद्दलचे सविस्तर विवेचन करण्याचा प्रयत्न केला आहे.

सह्याद्रीमध्ये उगम पावणार्‍या कृष्णा आणि गोदावरी या पूर्ववाहिनी नद्यांच्या खोर्‍यात उगमाकडील भागात भरपूर पाऊस असला तरीही पूर्वेकडे तो लगेच कमी कमी होत ५०० ते ६०० मि.मी पेक्षा कमी पाऊस असलेला पर्जन्यछायेतील (Rain shadow area) बराचसा भाग अवर्षणप्रवण गणला जातो. कृष्णेचे खोरे आकाराने पंख्यासारखे (Fan Shaped) असून त्याच्या दक्षिण - पश्‍चिम टोकापाशी असलेले ५००० - ५५०० मि.मी प्रमाणे उत्तर पश्‍चिम टोकापाशी २००० मि.मी येवढे कमी होते. गोदावरी खोर्‍याचा आकार वरती निमुळता असून उगमाकडे पावसाचे प्रमाण काहीसे कमी आहे. पर्जन्याचे प्रमाण जेवढे जास्त तेवढी त्याची दोलायमानता कमी असते. त्यामुळे गोदावरी खोर्‍यातील उगमाकडील क्षेत्राची दोलायमानता कृष्णा खोर्‍यापेक्षा जास्त असते. पावसाच्या या गुणधर्मामुळे गोदावरी नदीच्या उगमाकडील मोठ्या धरणांमध्येही अवर्षण वर्षात कमी पाणीसाठा असण्याची शक्यता कृष्णा खोर्‍यातील धरणांपेक्षा जास्त असते.

स्वातंत्र्यपूर्व काळात भंडारदरा व दारणा यासारखी मोठी धरणे जास्त पावसाच्या डोंगराळ भागात बांधून त्यात साठविलेले पाणी पिकअप विअरद्वारे वळवून पूर्वेकडील अवर्षण प्रदेशात सिंचनसुविधा पुरवितांना जलसंपत्तीच्या समन्यायी वाटपाचा प्रयोग त्याकाळी यशस्वीपणे राबविला गेला. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र जास्त पावसाच्या क्षेत्रात तसेच सपाट प्रदेशात गंगापूर, मुळा, निळवंडे, मुकणे, पालखेड यासारखी बरीच मोठी व मध्यम धरणे बांधून कालव्याद्वारे अतिरिक्त सिंचन सुविधा निर्माण केल्या गेल्या. मराठावाड्याला वरदान ठरणारे गोदावरी खोर्‍यातील सर्वात मोठे जायकवाडी धरण १९७६ साली बांधले गेले. खोर्‍यातील खालच्या भागात गोदावरीच्या उपनद्यांवर मराठवाड्यात पूर्णा, येलदरी, सिध्देश्वर, पेनगंगा, निम्न दुधना यासारखी बरीच मोठी व मध्यम धरणे बांधण्यात आली. गोदावरी ही आतंरराज्यीय नदी असल्यामुळे तिच्या खोर्‍या - उपखोर्‍यातील पाणी वापरावर गोदावरी नदी पाणीतंटा लवाद निर्णयाच्या तरतुदीनुसार बंधन होते. जायकवाडीपर्यंत उपलब्ध असलेले सर्व पाणी वापरण्याचा महाराष्ट्राला हक्क असल्यामुळे शक्य तेवढी सर्व मोठी - मध्यम धरणे पाणलोट क्षेत्रात बांधून जलसंपत्तीचा अनुकूलतम (Optimum) वापर करण्याचे उद्दिष्ट्य साध्य करण्यात आले.

जायकवाडी धरणाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे बहुतांशी पाणलोटक्षेत्र हे उत्तर महाराष्ट्र प्रदेशात असून फारच थोडे मराठवाड्यात आहे. जायकवाडी धरणसाठा हा ७५ टक्के विश्वासार्ह पाण्याच्या येव्यावर आधारित होता. अर्थात उपलब्ध येव्याच्या हिशोबासाठी १९६० - ६५ पूर्वीच्या ५० - ६० वर्षांची पर्जन्यमानाची आकडेवारी आधारभूत धरली होती. पर्जन्यापासून अपेक्षित येवा काढताना रास्त अंशगुणकाचा (Rainfall runoff coefficient) वापर केला होता. १९७६ सालापासून ते २०१५ सालापर्यंत गेल्या ४० वर्षात धरणात प्रत्यक्ष उपलब्ध झालेल्या पाण्याच्या आकडेवारीवरून दिसते की धरणात पूर्ण पाणीसाठा ३० टक्के वर्षातही झालेला नाही. संकल्पित साठा आणि प्रत्यक्ष साठा यातील फरकाची संभाव्य कारणे पुढीलप्रमाणे असावीत -

१. प्रकल्प अहवालानुसार पाणी नियोजन करताना गतकाळातील पर्जन्यमानाच्या आकडेवारीवरून येवा काढण्यासाठी जे गुणक वापरले ते जास्त असल्यामुळे (ङळलशीरश्र) अपेक्षित येवा जास्त आला असावा. धरणे पूर्ण झाल्यानंतर दरवर्षी प्रत्यक्ष आलेल्या येव्याची तुलना त्या त्या वर्षीच्या पावसाशी करून जायकवाडी आणि सर्व मोठ्या धरणांसाठीचे असे गुणक काढून त्यांची तुलना प्रकल्प अहवालातील गुणकाशी केल्यास या कारणाची सत्यासत्यता पडताळून पाहता येईल. आजवरच्या पर्जन्याच्या आकडेवारीला हे गुणक लावून जायकवाडी धरणात ७५ - ६० - ५० टक्के व सरासरी विश्वासार्हतेचा किती येवा उपलब्ध होईल ते काढणे आवश्यक आहे.

२. जायकवाडी प्रकल्प अहवालात पाणलोट क्षेत्रातील वरच्या धरणासाठी राखून ठेवलेला पाणीसाठा आणि आजवर प्रत्यक्ष बांधलेल्या धरणातील पाणीसाठा यांची तुलना करून त्यातील झालेली वाढ यामुळे जायकवाडीतील येव्यावर झालेला परिणाम.

३. जायकवाडी प्रकल्पाच्या नियोजनात नसलेली स्थानिक स्तरावरील धरणे ( २५० हेक्टरपेक्षा कमी) गावतलाव, पाझर तलाव, साठवण तलाव यामध्ये प्रत्यक्ष झालेल्या पाणीसाठ्यामुळे जायकवाडीतील येव्यात झालेली घट.

४. भूजलाच्या गेल्या ४० वर्षात वाढलेल्या वापरामुळे पावसाळ्यानंतरच्या काळात (Fair weather flow) नदीप्रवाहात झालेली घट. नद्यातून थोडेफार वाहणारे पाणी पंपाने उचलून शेतीसाठी वापरल्यामुळे हिवाळ्या - उन्हाळ्यात येव्यात झालेली घट.

५. पाणलोटक्षेत्र विकास योजनांद्वारे पावसाचे पाणी वरच्या वर अडविले, साठविले व जिरवले गेल्यामुळे पावसाळ्यातील येव्यात झालेली घट.

वरीलपैकी प्रत्येक कारणामुळे जायकवाडी धरणातील येव्यावर किती परिणाम झाला याचा हिशेब करणे आवश्यक आहे.

चांगल्या पावसाच्या वर्षात जायकवाडी आणि पाणलोट क्षेत्रातील सर्व धरणात पुरेसा साठा झाल्यास फारसा प्रश्‍न निर्माण होत नाही. वरच्या धरणात पावसाळ्यात येणारे पाणी प्रथमत: साठविले जावून ती बरीचशी भरल्यानंतर सांडव्यावरून खाली पाणी सोडले जाते. पाणलोट क्षेत्रातील खालच्या भागात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे त्यातून येवा बराच कमी होतो. ज्या वर्षी कमी दाबाचा पट्टा निर्माण होवून विस्तृत क्षेत्रावर पाऊस पडतो किंवा ज्या वर्षी परतीचा पाऊस चांगला पडतो तेव्हा गोदावरी खोर्‍यातील जायकवाडी आणि खालच्या बाजूच्या धरणात पाणीसाठा चांगला होतो. परंतु गेल्या ८ - १० वर्षात वरच्या बाजूच्या धरणात साठलेल्या पाण्याची टक्केवारी बरीच समाधानकारक आणि त्या तुलनेत जायकवाडी धरणातील पाणीसाठ्याची टक्केवारी अत्यंत असमाधानकारक अशी वारंवार झालेली स्थिती प्रकर्षाने जाणवत आहे. जायकवाडी पाणीसाठ्यावर अवलंबून असणार्‍या पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि औद्योगिक वापर यांच्या पाणीपुरवठ्यावरही त्यामुळे विपरित परिणाम होण्याची वेळ आली होती. कालव्याखालच्या सिंचनाच्या क्षेत्रात तर फार मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कालवे व वितरिका यावर झालेली कोट्यावधी रूपयांची गुंतवणूक विनावापर पडून रहात आहे.

अशा परिस्थितीला समर्थपणे तोंड देण्यासाठी वरच्या भागातील धरणांच्या लाभधारकांनी सहकार्यासाठी हात पुढे केला पाहिजे आणि खालच्या धरणांच्या लाभधारकांत निर्माण झालेला ताण वाटून घेण्याची तयारी दर्शविली पाहिजे ( Sharing the distress) हे तत्व सांगण्यास सोपे आणि तर्कसंगत वाटले तरी त्याची व्यवहारात प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे अत्यंत अवघड आहे हेही तितकेच खरे आहे. दरवर्षी पडणार्‍या पर्जन्याची अनिश्‍चितता, त्याच्या विविध क्षेत्रात पडण्याचे परिणाम यातील फरक यामुळे प्रत्येक वर्षी वरच्या आणि खालच्या धरणात होणारा पाणीसाठा वेगवेगळा असतो. अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर त्यावर उपाय शोधण्यापेक्षा यावर कायमस्वरूपी सक्षम यंत्रणा उभारणे हाच परिणामकारक उपाय आहे.

याबाबत मेंढेगिरी समितीने काही ठोस उपाययोजना सुचविल्या आहेत. वरच्या आणि खालच्या धरणात प्रत्यक्ष होणार्‍या पाणीसाठ्यानुसार समन्यायी वाटप कसे करावे याबद्दल मार्गदर्शक तत्वे निश्‍चित केली आहेत. त्याच्या अंमलबजावणीसाठी एक कायमस्वरूपी समिती (Standing Committee) नियुक्त केली पाहिजे. दरवर्षी १५ ऑक्टोबरपर्यंत होणार्‍या पाणीसाठ्याचा आढावा घेवून निश्‍चित केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार वरच्या कोणकोणत्या धरणातून खालच्या धरणात किती पाणी सोडावे हे समितीने ठरवावे. ३१ ऑक्टोबर पर्यंत प्रत्यक्ष झालेला पाणीसाठा अंतिम धरून दरवर्षी १ नोव्हेंबरपासून एका आठावड्यात वरच्या धारणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे नियोजन करावे. याबाबतचा अंतिम निर्णय महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने ( MWRRA) घ्यावा.

वरील मार्गदर्शक तत्वे निश्‍चित करण्यापूर्वी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा प्रदेशातील लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, लाभधारकांचे प्रतिनिधी, उद्योजक यांच्याबरोबर चर्चा करण्यात यावी (Public consultation) त्यामुळे मार्गदर्शन तत्वे ठरविण्याच्या पध्दतीत पारदर्शकता (Transperancy) येईल. या परिस्थितीत जनहित याचिका (PIL) दाखल करण्याचीही वेळ येणार नाही असे वाटते. ही पध्दत समाधानकारकपणे राबविली गेली तर कृष्णा खोर्‍यातील उजनी धरणाबाबतही ती अंमलात आणणे शक्य होईल.

विद्यानंद रानडे, पुणे, मो : ९८२२७४२७९८

Path Alias

/articles/jaayakavaadai-dharanaacayaa-paanalaota-kasaetaraataila-saathavailaelayaa-paanayaacae

Post By: Hindi
×