घामाचं पाणी


कारण या चौघंना सहज सूचले म्हणून त्यांनी केलेल्या खोदकामाची मापं 100 फूट लांब, 105 फूट रूंद व 5 फूट खोल अशी होती. आपल्या डोंगरवाडीतील अवघ्या चारच म्हातार्‍या माणसांनी एवढा मोठा खड्डा खणला हे ज्यावेळी ग्रामस्थांना समजले तेव्हा त्यांना सुध्दा आश्‍चर्याचा धक्का बसला आणि या खड्ड्यात पाण्याचा साठा केला जाणार असल्याचे कळाल्यानंतर त्यांना हा एक चमत्कार झाल्याप्रमाणेच वाटायला लागला....

डोंगरवाडी निसर्गाच्या कुशीत लपलेलं एक छोटसं गाव, चारही बाजूंनी उंच डोंगर आणि त्यामध्ये स्थित हे गाव. म्हणूनच या गावाला डोंगरवाडी असं नाव पडलेलं.... तालुक्याच्या गावापासून पाच किलोमीटर अंतरावर वसलेलं अवघी सहाशे - सातशे लोकसंख्या असलेलं लहानस गाव.

या गावातील लोकांचे जीवन म्हणजे अगदी साधे, सामान्य. डोंगराळ भाग म्हणून इथे शेती नाही, शेतीचा व्यवसाय नाही, गावात राहून लघु उद्योग, शेळी पालन, गाय - म्हैस पालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुट पालन नाहीतर मग तालुक्याच्या ठिकाणी जाऊन मोल मजुरी करून या गावातील ग्रामस्थांचा उदरनिर्वाह चालतो.

महत्वाचे म्हणजे या गावात किंवा गावाच्या जवळपास नदी नाही, कालवा नाही, तलाव नाही, बंधारा नाही, धरण तर नाहीच नाही, साधा पाण्याचा फाटा नाही. त्यामुळे या गावाला पाण्याचा तुटवडा कायमचाच. गावात फक्त दोन विहीरी एक वरच्या आळीला आन् खालच्या आळीला. पावसाळ्यामध्येच फक्त या विहीरींना पाणी. त्याच विहीरीच्या पाण्यात पिण्यासाठी, धुण्यासाठी, इतर वापरासाठी आणि जनावरांसाठी वापर करावा लागतो. पाण्याचा सतत उपसा होतो. या दोन्ही कारणांमुळे दोन्ही विहीरी उन्हाळ्याच्या दिवसात कोरड्या फट पडतात.

मग पाण्यासाठी लोकांना मैलोंमैल पायी चालत वणवण भटकावे लागते. गावच्या विहीरीचे पाणी फक्त पिण्यासाठी वापरून बाकी वापरासाठी लागणारे पाणी मिळविण्या करिता..... लोकांना तालुक्याच्या गावातून वहाणार्‍या नदीच्या पाण्याचा आधार घ्यावा लागतो. ते पाणी मिळविण्याकरीता डोंगरवाडीतील ग्रामस्थांना कायमच मोठे परिश्रम घ्यावे लागतात. ही अवस्था ही अडचण कित्येक दिवसांपासूनची आहे. परंतु त्याच्यावर आजपर्यंत काहीच उपाय योजना करण्यात आली नव्हती. शासकीय योजनांचा देखील या गावाला आजपर्यंत काही लाभ झालेला नव्हता. शिवाय गावातील गावकरी मंडळी मध्ये एकी नसल्यामुळे आप-आपसात मत भेद असल्यामुळे एकत्रीत येऊन गाव पातळीवर,तालुका पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर पाण्याचा प्रश्‍न सोडविण्याचा कधीच कुणी प्रयत्न केलेला नव्हता.

आपल्याला कुणी वाली नसल्यामुळे गेली कुत्येक दिवसांपासून डोंगरावाडी गावातील ग्रामस्थ मंडळी पाण्याची गैरसोय सहन करीत होते. कदाचित पाण्याचा हा प्रश्‍न गंभीर असल्यामुळे त्यावर कुणीच काही प्रयत्न करण्याचे धाडस केले नव्हते. परंतु नंतर मात्र या प्रश्‍नावर अतिशय महत्वाचा तोडगा निघाला. आणि डोंगरवाडीची पाण्याची समस्या अगदी सहजा-सहजी दूर झाली. एका-एकी चमत्कार झाला. आणि ही घटना ग्रामस्थांसाठी एक वरदानच ठरली, असे काय घडले बर नेमके?

गावाबाहेरील ओढ्याच्या कडेला असलेल्या एका झाडाखाली गावातील वयस्कर मंडळी सुदाम अण्णा, रामभाऊ तात्या, तुकारामनाना, दिनकर आप्पा हे चौघे चिलम ओढत बसलेले असताना त्यांच्यामध्ये गप्पा चालू झाल्या त्यामध्ये विषय निघाला तो पाण्याचा. चिलमीच्या नशेत दिनकर आप्पाने ओढ्याच्या दिशेने पाहिले त्यांना ओढ्यामध्ये एक छोटस पाण्याच डबकं दिसलं. आणि त्या डबक्यामध्ये छोटे छोटे जिवजंतू हालचाल करताना दिसले. दिनकर आप्पांनी बाकीच्या तिघांचे लक्ष तिकडे केंद्रीत केले आणि त्यांना एक प्रश्‍न विचारला. या डबक्याकडे पाहून तुम्हाला काय वाटतं?

डबक्याकडे बघून काय वाटायचे, डबके ते डबकेच. सुदाम आण्णा बोलले. डबक्याकडे बघून काय वाटून घ्यायचे , डबके हाय तेवढं कळतय, आता वढा, नदी, नाला जिथ आसल तिथं डबक हे असणारच की. दोघांचे बोलणे सुरू असताना रामभाऊ तात्याने मध्येच सूर उचलला....

एक गोष्ट मातर लक्षात येतीय, आपण बरच दिस झाल हितं बसतूय, तसं हे डबकं सुदीक लयी दिसापासून हितं दिसतय... त्याच्यात पाण्याचे प्रमाण वाढत बी न्हाय आन कमीबी बोत न्हाय. तुकाराम नानाने त्या डबक्याबद्दल जरासा सविस्तर खुलासा केला…

तिघांचे ऐकून घेऊन दिनकर आप्पा पुढे म्हणाले - मितरांनो, निट इचार करून बघा. पावसाळ्यात या वढ्याला पाणी असतं. आन उन्हाळ्याचे दिसबी संपत आले, तरीबी डबक्यामंदी ओंजळ दोन ओंजळ का व्हयला पाणी.... शिल्‍लक हाय. याचा आरथं पाण्याचा साठा केला तर पाणी साठून रहातं... आपण सुदीक पाण्याचा साठा करू शकतू.

आपुण म्हणजी आपूण चौघं, आरं आप्पा आपुण चौघजन करून करून काय करणार?

सुदाम अण्णाच्या या प्रश्‍नाला उत्तर देताना दिनकर आप्पा म्हणाले - आरं आण्णा, असं कसं म्हणतू. आपुण चौघांनी जर मनावर घितले तर बरंच काय करून दाखवू शकतू.

दोघांच्या संवादाला प्रतिसाद देताना तुकाराम नाना मध्येच म्हणाले.. आरं मंग असं काय असल तर करूया की काय करायचं त्ये. पर नेमकं काय करायचं त्ये तरी ठरवा.

चौघांच्या चर्चेमध्ये आपणही सहभागी आहोत हे भासविण्यासाठी रामभाऊ तात्या उदगारले - पाणी साठवायची काय युगत कुणाच्या डोक्यात असल तर सांगून टाका... त्यापरमान आपल्याला काय काम करता येईल ते बघा....यावर दिनकर आप्पा म्हणाले - हे बघा गड्यांनो. आपल्या गावच्या बाहीर पलीकडे ज्ये डोंगर दिसत्यात, त्या डोंगरांच्या पायथ्या लगत केवढं मोठे मैदान हाय. त्याचा आपल्याला काय उपयोग हाय का ? बाकीचे तिघे एक साथ म्हणाले - नाही बा । कायच उपेग न्हाय. तेव्हा दिनकर आप्पा पुन्हा म्हणाले - आता ह्या मैदानाचा उपेग आपुण करून घ्याचा तवा मी म्हणतू तसं तूमी करा.

उद्या आपुण हितं येताना कमीत कमी एक टिकाव, एक फावड, एक घम्यालं घिऊन यायचं. कुणी काय आणायचे ते ठरवा. कुणा कुणाकडे काय काय हाय ते आणा. मी माझ्याकडे टिकाव आणतो, सुदाम आण्णा - मी माझ्याकडे फावडे आणतो, रामभाऊ तात्या - मी माझ्याकडे घम्यलं आणतो, तुकाराम नाना दिनकर आप्पाने अवलोकन केलं आन् सांगितले ठिक हाय. मी माझ्याकडचे आणखीन एक टिकाव घिऊन येतो. तर चला गड्यांनो उद्या सकाळी आपुण आपल्या नेहमीच्या ठिकाणी भेटूया. माझ्या डोक्यात काय युगत हाय ती मी तुमाला उद्याच सांगतो. असं म्हणून चौघांनी एकमेकांचा निरोप घेतला आणि आपल्या घरी निघून गेले.

दुसर्‍या दिवशी ठरल्याप्रमाणे हे चौघे जन सकाळची न्याहरी झाली की, आपल्या रोज भेटायच्या ठिकाणी आपआपले साहित्य घेऊन हजर झाले. प्रथमत: नेहमीप्रमाणे एक चिलीम भरली गेली. आणि मग चौघांनी मिळून दमावर दम मारले. नशा मेंदूपर्यंत भिडल्यानंतर दिनकर आप्पांनी आपला प्लॅन समाजावून सांगायला सुरूवात केली....

आप्पा म्हणाले - हे बघा मितरांनो माझ्या मनात अशी एक युगत हाय की, आपुण चौघांनी मिळून डोंगर पायथ्याच्या त्या मोकळ्या जागेवर एक छोटसे तळ बनवायचे.. अन् त्यामंदी पाण्याचा साठा करून ठिवायचा. तवा पावसाला सुरू व्हयाला अजून दीड महिना बाकी हाय. तवर आपुण त्या जागेवर रोज थोडा थोडा खड्डा खांदायचं काम करीत रहायचे. बघुया... महिना दीड महिन्यानं त्या जागेवर आपल्याच्याने केवढा मोठा खड्डा खांदून व्हतुय त्ये.

दिनकर आप्पांच्या या म्हणण्यावर आणि त्यांच्या एवढ्या मोठ्या निर्णयावर बाकीच्या तिघांनी लगेचच होकार दिला. आणि मग या चांगल्या कामाला उशीर कशाला करायचा असे म्हणून हे चौघंजन खोदकाम करण्यासाठी डोंगर पायथ्याच्या मोकळ्या जागेकडे निघाले....

सकाळी नऊ वाजता खोदकामाला सुरूवात झाली. खोदकाम करणे, फावड्याच्या सहाय्याने माती घमेल्यात भरणे, घमेल्यातून वाहून घेऊन ती माती खड्ड्याच्या बाहेर फेकणे ही सर्व कामे या चौघांनी आळी पाळीने आणि एकत्र मिळून केली.

साठ ते पासष्ठ वर्ष वयोगटातील ही वयस्कर मंडळी पण आयुष्यभर काबाड कष्ट करून पोलादासारखं शरीर बनविलेली, न थकता, न थांबता, न दमता... अगदीच तरूणाईच्या उत्साहाने खोदकाम करीत राहिले. दुपारी बारा वाजता तळपता सूर्य डोक्यावर आला, उन्हाळ्याच्या ऋतू मधील ऊन अंगाला चटके द्यायला लागले, अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या, म्हणून थोडीशी विश्रांती घेऊन पुन्हा एकदा चिलीम भरून - आता काम बंद करूया... आन् दुपारी ऊन उतरल्यावर पुन्हा कामाला सुरूवात करूया.

असा निर्णय घेऊन दुपारी जेवणाची सुट्टी करून ही मंडळी आपआपल्या घराकडे निघून आली. जेवण खाण उरकून दुपारी थोडी विश्रांती घेऊन दुपारचे ऊन उतरल्यानंतर ही मंडळी पुन्हा डोंगर पायथ्याच्या ठिकाणी खोदकाम करण्यासाठी हजर झाली. दिवस मावळेपर्यंत खोदकाम करून शेवटी कामाला पूर्ण विराम दिला. आजच्या दिवसाचे खोदकाम पूर्ण करण्यात आले.

त्या दिवसापासून या चौघांचा दिनक्रमच चालू झाला. रोज सकाळी डोंगरपायथ्याला जायचे, चिलम ओढायची, खोदकाम करायचे, दुपारच्या विश्रांतीनंतर सायंकाळी दिवस मावळेपर्यंत पुन्हा खोदकाम करायचे असं करता करता दीड महिना संपुन गेला. या दीड महिन्याच्या काळात सुदाम आण्णा, रामभाऊ तात्या, तुकाराम नाना, दिनकर आप्पा या चौघांनी राबविलेल्या या उपक्रमाबद्दल गावात कुणालाही खबर लागली नव्हती. शेवटच्या दिवशी आपण केलेल्या खोदकामाची लांबी - रूंदी-खोली मोजण्यासाठी हे चौघेजण जाताना त्यांनी काही शिकलेल्या तरूण मुलांना मदतीस घेतले. चार तरूणांनी त्या खड्ड्याची लांबी-रूंदी-खोली मोजून त्याचे माप सांगितले तेव्हा ते ऐकून या चौघांना सुध्दा आश्‍चर्याचा धक्का बसला.

कारण या चौघंना सहज सूचले म्हणून त्यांनी केलेल्या खोदकामाची मापं 100 फूट लांब, 105 फूट रूंद व 5 फूट खोल अशी होती. आपल्या डोंगरवाडीतील अवघ्या चारच म्हातार्‍या माणसांनी एवढा मोठा खड्डा खणला हे ज्यावेळी ग्रामस्थांना समजले तेव्हा त्यांना सुध्दा आश्‍चर्याचा धक्का बसला आणि या खड्ड्यात पाण्याचा साठा केला जाणार असल्याचे कळाल्यानंतर त्यांना हा एक चमत्कार झाल्याप्रमाणेच वाटायला लागला....

पुढे पावसाळा सुरू होण्यास आणखी एक आठवडा बाकी होता. तेव्हा खोदकामाच्या जवळच असलेल्या ओढ्याला जोडून एक मोठी चारी खांदून त्याच्या पुढच्या बाजूला दगडमाती यांची भर टाकून पावसाळ्याच्या दिवसात डोंगरावरून खाली जमिनीवर कोसळणारे आणि पुढे ओढ्यातून वाहून जाणारे पाणी अडवून चारीच्या मार्गाने त्या मोठ्या खड्ड्यात अर्थात तळ्याला मिळविण्याची या चौघांनी व्यवस्था केली होती.

काही दिवसांनी पावसाळा सुरू झाला, त्या तळ्यात रोज, थोडा थोडा पाण्याचा साठा होऊ लागला. सुरूवातीला काही पाणी जमिनीत मुरले, शेवटी जेव्हा पावसाळा संपला तेव्हा तो खड्डा पाण्याने गच्च भरून एखाद्या तळ्यासारखा दिसू लागला. आणि या चौघांनी ठरविल्याप्रमाणे डोंगरपायथ्याच्या मोकळ्या जागी, छोटसं तळं बनविण्याचे त्याचे स्वप्न साकार झाले. हे पाणी साठविण्यासाठी आपण खांदलेल्या खड्ड्यासाठी अर्थात तळ्यासाठी जे कष्ट घेतले, जो घाम गाळला, त्याचे आज आर्थक झाले. या गोष्टीचा या चौघांनाही अगदी मनापासून आनंद झाला.....

आज डोंगरवाडी गावाचा पाण्याचा प्रश्‍न अशा प्रकारे सुटला आहे. पावसाळा संपल्यानंतर गावातील दोन्ही विहीरीचे पाणी फक्त पिण्यासाठी वापरले जाते. बाकीच्या वापरासाठी या तळ्याचे पाणी उपयोगात आणले जाते. आता पूर्वीसारखे उन्हाळ्याच्या दिवसात ग्रामस्थांना पाण्यासाठी कुठे वणवण भटकण्याची गरज भासत नाही. योग्य वापरासाठी आणि काटकसरीने वापरलेले तळ्याचे पाणी बाकीचे आठ महिने पुरविण्यात येते....

महत्वाचे म्हणजे - इतके दिवस भेडसाविणारी ही पाण्याची समस्या इतकी सहजच सुटू शकते. असे डोंगरवाडीच्या ग्रामस्थांना स्वप्नात देखील वाटले नव्हते. परंतु सर्व कृपा म्हणजे सुदाम आण्णा, रामभाऊ तात्या, तुकाराम नाना आणि दिनकर आप्पा या चार वयोवृध्द म्हातार्‍यांची. कारण त्यांनी ही गोष्ट मनावर घेतली नसती तर इतका मोठा खड्डा खांदण्यासाठी कठोर परिश्रम घेऊन घाम गाळला नसता तर.... हे शक्यच नव्हते. पाण्याचा प्रश्‍न सुटतच नव्हता.

आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे विना खर्चाचे, विना सहकार्याचे, विना अनुदानाचे, विना योजनेचे, विना प्रकल्याचे हे छोटेसे तळे डोंगर वाडीमध्ये राहणार्‍या ग्रामस्थांसाठी एक वरदानच ठरले. परंतु या तळ्याचे पाणी फुकट मिळाले नसून ते गावातील चार वयोवृध्दांच्या घामाचे पाणी असल्याबद्दलची जाणीव डोंगरवाडी वासियांच्या मनात कायमचीच राहिली.....

सम्पर्क


श्री. संजय मागाडे, पुणे

Path Alias

/articles/ghaamaacan-paanai

Post By: Hindi
×