एका तपस्वीची जल सेवा


भारतीय संस्कृतीमध्ये गुरूचे स्थान फार मोठे आहे. गुरूपासून ज्ञान ग्रहण केलेले शिष्य त्या ज्ञान अमृताचे थेंब समाजातील सर्व थरापर्यंत पोहचवितात. या प्रक्रियेमध्ये अनेक शिष्यांना त्यांच्या अविश्रांत मेहनतीमुळे गुरूपद प्राप्त होते. अशा वेळी गुरूंचे महर्षी पदावर पोहचतात. निस्वार्थ बुध्दीने समाजामधील विविध क्षेत्रात उच्च पदावर राहून हजारोंची शिष्य परंपरा निर्माण करणारे काही मोजके महर्षी आजही भारतीय क्षितीजावर तेजाने तळपत आहेत.

भारतीय संस्कृतीमध्ये गुरूचे स्थान फार मोठे आहे. गुरूपासून ज्ञान ग्रहण केलेले शिष्य त्या ज्ञान अमृताचे थेंब समाजातील सर्व थरापर्यंत पोहचवितात. या प्रक्रियेमध्ये अनेक शिष्यांना त्यांच्या अविश्रांत मेहनतीमुळे गुरूपद प्राप्त होते. अशा वेळी गुरूंचे महर्षी पदावर पोहचतात. निस्वार्थ बुध्दीने समाजामधील विविध क्षेत्रात उच्च पदावर राहून हजारोंची शिष्य परंपरा निर्माण करणारे काही मोजके महर्षी आजही भारतीय क्षितीजावर तेजाने तळपत आहेत. कृषी महर्षी डॉ. स्वामिनाथन आणि जलमहर्षी डॉ. माधवराव चितळे हे त्यापैकीच एक. काही दिवसांपूर्वीच डॉ. स्वामिनाथन यांनी नव्वदी पार केली. या निमित्ताने आयोजित 'भूक' आंतरराष्ट्रीय दूर अंतरामुळे (या विषयाशी संबंधित) परिषदेस जाता आले नाही पण जलमहर्षी डॉ. माधवराव चितळे यांच्या 81 वर्ष पदार्पणाच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यास 8 ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथे जाण्याचा योग आला आणि या जल तपस्वीच्या विनयशीलतेचा एक वेगळाच अनुभव मिळाला. डॉ. माधवरावांचा माझा संबंध जेमतेम एक दशकाचाच पण या कालावधीत मला त्यांच्यापासून मिळालेली उर्जा व ज्ञानशिदोरी मात्र आयुष्याच्या अंतापर्यंत पुरेल एवढी जमा झाली आणि अजूनही त्यात भर पडत आहे.

1955 मध्ये इंजिनिअरिंगची पदवी प्रथम श्रेणीत प्राविण्यासह सर्वप्रथम आलेले माधवराव महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागात वर्ग 1 अधिकारी पदावर सरळ नियुक्त झाले. 1960 ते 1980 या कालखंडात भीमा, पैठण, पेंच, तिल्लारी या धरणांच्या बांधकामात संकल्पचित्रासह त्यांचा बहुमोल वाटा होता. 1976 - 1978 या काळात भातसा धरण विकास आराखड्याचे त्यांनी नियोजन करून मुंबईकरांसाठी पाण्याची कायम सोय केली. जेवणाच्या ताटामध्ये वाढलेल्या पोळीचा घास घेतांना मला डॉ. स्वामिनाथन यांची आठवण येते. त्याचबरोबर मुंबई मध्ये पाण्याचा घोट पितांना माधवरावांची आठवण होणार नाही हे कसे शक्य आहे ? धरणावर आधारित सर्वांगीण विकास कामे करावयाची असतील तर त्या परिसरातच शासनाचे नियोजन कार्यालय हवे या मताशी ते विरोध असूनही कायम आग्रही राहिले.

नर्मदा प्रकल्पाचे कार्यालय दिल्ली वरून इंदौरला व भातसा प्रकल्पाचे शहापूरला स्थापन केल्यामुळेच तेथे जलविकास होवू शकला. मुळा नदीवरील धरणाच्या निर्मितीमध्ये येणाऱ्या भौगोलिक व तांत्रिक अडचणींवर मार्ग शोधण्यासाठी या जलतज्ज्ञाने नदी काठच्या माती आणि वाळूचा सखोल अभ्यास करण्याकरता नदी काठाने 90 कि.मी चा प्रवास पायी केला. पाण्याबद्दल असलेली श्रध्दा व निष्ठा यामधूनच हे शक्य झाले. पुस्तके वाचून धरणांची निर्मिती होत नाही त्यासाठी स्वत: त्यात पूर्णपणे झोकून द्यावे लागते. माधवराव मला वंदनीय आहेत ते याच मुळे. 1989 - 1992 या काळात भारत सरकारच्या जलसंसाधन मंत्रालयाचे प्रधान सचिव या नात्याने त्यांनी देशासाठी जल नियोजनाचे फार मोठे कार्य केले आहे. केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष असतांना शुध्द जलापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून त्यांची अविश्रांत मेहनत आणि या कार्याचा बहुमान म्हणून 1993 साली त्यांनी स्विडन या राष्ट्रात पाणी क्षेत्रात जनहितासाठी केलेल्या कार्याबद्दल स्टॉकहोम वॉटर प्राईझ (पाण्याचे नोबेल पारितोषिक) मिळाले.

भारतीय वेषात स्विडनच्या राजाकडून हे पारितोषिक स्विकारणारा हा माणूस जलतज्ज्ञापेक्षाही एक सच्चा देशप्रेमी म्हणून मला काकणभर सरस वाटला. पानशेत धरण फुटी, भूकंप व त्याचा कोयना धरणावर झालेला परिणाम, मुंबईमधील जलप्रलय या नैसर्गिक आपत्तीमध्ये माधवरावांनी केलेले कार्य, त्यांच्या सूचना जलतज्ज्ञांना, शासनास, आदर्शवृत आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या जनहिताच्या विविध योजना कितीही छान असल्या तरी त्या राबवणारे शासकीय अधिकारी त्या योजनांचे अभ्यासक नसल्यामुळे अनेकवेळा फसतात, शासनाचा म्हणजेच जनतेचा पैसा वाया जातो, याबद्दल माधवरावांच्या मनात अजूनही खंत आहे. डॉ. चितळे यांनी 2003 साली भारतीय सरोवर संवर्धीनीची स्थापना करून लाभधारकांच्या सहभागातून सरोवरांचे संरक्षण आणि संवर्धनाच्या कार्यास वाहून घेतले आहे. त्यांच्या बहुमोल मार्गदर्शनामुळेच महानगरामधील अस्तित्वात असलेल्या तलावावर संवर्धनाचे कार्य करण्याची संधी मला मिळाली. हे सर्व तलाव, बारव, जलकुंड वाचले तरच भविष्यामधील पाणी टंचाईस तोंड देणे सोपे जाईल.

माधवरावांच्याकडे जलनितीची दूरदृष्टी आहे यासाठी हे एक उदाहरण पुरेसे आहे. उजनी धरण, लाभार्थी शेतकरी, धरणाकाठची रासायनिक ऊस शेती, पाण्याचे प्रदूषण, धरणाकाठच्या गावागावामध्ये निर्माण झालेल्या आरोग्य समस्या या विविध विषयावर मला त्यांच्याशी अनेकवेळा चर्चा करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या संवेदनशील मनाचे दर्शन घडले. सिंचन हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आजही ऐंशीच्या उंबरठ्यावर ते शेतकऱ्यांना या विषयावर सातत्याने मार्गदर्शन करून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्व पटवून देत असतात. डॉ. चितळे म्हणतात, ' अनुदान आणि कर्जमुक्तीने शेतकऱ्यांचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, जो पर्यंत शेतापासून बाजारपेठेपर्यंत पक्या रस्त्याचे जाळे तयार होत नाही तोपर्यंत शेतीचा विकास हे दिवास्वप्नच असेल.' शेतकऱ्यांना भाजीपाला, फलोत्पादनासाठी प्रोत्साहन दिले जाते मात्र मालवाहतुकीसाठी शेतापासून बाजारपेठेपर्यंत रस्ता उपलब्ध नसल्यामुळे या नाशवंत मालाच्या निर्मितीमध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते.

ग्रामीण भागात शितगृहाची किती गरज आहे याबाबत ते सकारात्मक बोलतात पण त्याचबरोबर श्रीमंत शेतकरी अनुदान आणि कर्जमुक्तीमुळे अजून जास्त श्रीमंत होत आहेत. मात्र गरीब शेतकऱ्यांची वाताहात चालू आहे. याबद्दल खंत व्यक्त करून अनुदान व कर्जमुक्तीची मोजमाप पट्टी व निकष बदलण्यासाठी आग्रह घरतात. 8 ऑगस्ट रोजी माधवरावांनी 81 व्या वर्षात पदार्पण केले, दक्षिणेतील तामिळनाडूचे डॉ. स्वामिनाथन च्या रूपात भारतास कृषिक्षेत्रातील हिरा दिला तर महाराष्ट्राने डॉ. माधवराव चितळेंच्या रूपाने देशास जलक्षेत्रातील कोहिनूर दिला आहे. या थोर जलतपस्वीच्या शतक समारंभास हजर राहून त्यांचा आशीर्वाद घेण्याचे भाग्य मला लाभो हीच ईशचरणी प्रार्थना.

Path Alias

/articles/ekaa-tapasavaicai-jala-saevaa

Post By: Hindi
×