धरणांचे आयुष्य किती


आज जे लिहितो आहे त्याची सुरूवात 28 ऑक्टोबरला झाली. दि. 28.10.2014 चा दै. लोकसत्ताचा अंक पहात असतांना सरदार पटेल यांच्या पुतळ्याबाबतच्या बातमीने लक्ष वेधून घेतले.

लोकांकडून लोखंड गोळा करून त्यामधून लोहपुरूषाचा भव्य पुतळा उभारण्याची कल्पना लोकसभा निवडणुकीपूर्वीच मांडण्यात आली होती. पण लोखंड गोळा करण्याच्या मोहिमेत फारसा वेग पकडला नसावा कारण फारसे लोखंड जमा न झाल्याचा रिपोर्ट बघितला होता.

ताज्या बातमीनुसार सरदारांचा पुतळा उभारण्याच्या प्रकल्पाचा खर्च रू. 2979 कोटी एवढा अपेक्षित आहे. मला ही रक्कम फारच मोठी वाटली. त्यातच या बातमीमध्ये असाही उल्लेख होता की यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी अर्थसंकल्पात रू. 200 कोटी रूपयांची तरतूद केली आहे. याचा अर्थ लोकांकडून कररूपात गोळा केलेल्या पैशांमधून हा खर्च होणार आहे.

मंदिरे, पुतळे - स्मारके या माझ्या दृष्टीने समान गोष्टी आहेत. त्यामधून कोणाचा आर्थिक कोणाचा राजकीय फायदा होतो. पण समाजाचे हित साधण्याच्या दृष्टीने ती काही कामाची नाहीत. त्यामुळे अशा गोष्टी सरकारी खर्चाने तरी होवू नयेत असे मला वाटते. यानंतरच्या काही दिवसात अजून काही बातम्या आल्या. मुंबईच्या समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाला केंद्रीय पर्यावरण खाते लवकरच मंजूरी देणार (प्रस्तावित खर्च 250 कोटी रूपये) कै. बाळासाहेब ठाकरे यांचे उचित स्मारक उभे करण्याची मा. मुख्यमंत्री यांनी घोषणा केली इ.इ. एकूण सुश्री मायावती यांनी सुरूवात करून दिल्यावर शेकडो कोटी रूपये खर्चून भव्य स्मारके उभारण्याची राजकीय युक्ती आता काँग्रेस (शिवस्मारक) व भाजप यांनी स्वीकारलेली दिसते आहे. गरिबातल्या गरिबाकडून वसूल केलेला पैसा अशी तऐहेने वापरला जावा का हे आता जनतेने ठरवायचे आहे.

मला ही भव्य पुतळा योजना पसंत नसल्याने मी स्वाभाविकपणे मित्रमंडळींशी बोलू लागलो. त्यामधून अजून काही गोष्टी समजल्या -

1. स्वत: सरदारांनी सोमनाथ मंदीर उभारण्यात पुढाकार घेतला. परंतु त्यासाठी सरकारी पैसा घेतला नाही.
2. सरदारांच्या पुतळ्यासाठी सरकारी पैसा खर्च करण्यावर मल्लिका साराभाई यांनी आक्षेप घेतला. त्यासाठी त्यांना भाजप आणि काँग्रेस यांच्या धिक्काराला सामोरे जावे लागले.
3. काक्रापारा हे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर बांधण्यात आलेले धरण गाळाने जवळपास भरून गेले आहे आणि देशामधील बहुतेक धरणे या संकटाच्या छायेत आहेत.
4. सलग सम पातळी चर हे 2000 मि.मी पर्यंतच्या पावसात टिकतात. मातीची धूप पूर्ण थांबते. या पध्दतीने 1 टीएमसी पाणी जमवायचा खर्च रूपये 5 कोटी एवढा येतो आणि धरण बांधून पाणी अडविले असता हा खर्च रूप. 150 कोटी एवढा येतो.
5. महाराष्ट्र राज्याचा एक वर्षाचा रोजगार हमीचा खर्च रूपये 2200 कोटी एवढा आहे.
6. सरदार स्वत: शेतकरी कुटुंबांतले होते आणि त्यांना 'सरदार' हा किताब बारडोली लढ्यातल्या शेतकऐयांनी दिलेला होता. शेतकरी हा सरदारांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय होता. एवढा की पावसाचे आगमन लांबले की सरदार अस्वस्थ असत.

मित्रमंडळींबरोबर जो विचारविनिमय झाला त्यामधून अशी अनुत्पादक कामे सरकारी खर्चाने करू नयेत अशी माझी खात्री पटली आणि उलट हा पैसा धरणांसारखी अत्यंत मूल्यवान संसाधने अक्षय टिकावीत यासाठी खर्च व्हायला हवा असे मला तीव्रपणे वाटू लागले. धरणे गाळाने भरून जावून निकामी होण्याचा धोका काल्पनिक नाही. सलग समपातळी चरामुळे धूप थांबविता येते हे वन खात्याच्या अनुभवामधून खरे तर सिध्द झाले आहे. मग धरणांचे जलाशय गाळापासून मुक्त का ठेवता येत नाहीत? त्याचे कारण माझ्या लक्षात आले ते असे - धरणाच्या पाणलोट क्षेत्रात केवळ वने नसतात तर शेती क्षेत्रही असते. सरकारच्या ताब्यामधील वनक्षेत्रात सलग समपातळी चरांच्या योगाने (म्हणजेच युक्तीने) धूप थांबविता येईल.

परंतु शेतीक्षेत्रात हे कसे करणार ? आपल्या देशातला पाऊस हा काही परमेश्वरी कृपेसारखा अलगद उतरत नाही आणि (भात सोडल्यास) कोणतेच पीक शेतात पाणी साचू दिल्यास तग धरू शकणार नाही. संसतधार लागते त्यावेळी किंवा मुसळधार पाऊस पडतो त्यावेळी हा सर्व वर्षाव शेतातच जिरविणे शक्य नाही आणि त्यासाठी मोठे मोठे चर खणले तर शेतामधून अडथळे निर्माण होतील. त्यामुळे जमिनीवरून पाणी वाहणार, जमिनीवरून पाणी वाहू लागले की ते मातीचे फूल वाहून नेणार आणि त्यामुळे आपली धरणे ही अंतकाळाची गाळ साठविण्याची आणि थोड्या काळाची पाणी साठविण्याची साधने ठरणार हे अटळ सत्य आहे. धरणासाठीच्या जागा थोड्याच असतात हे देखील साधारणपणे सर्वचजण जाणतात. तेव्हा मोठ्या धरणावर आपली शेती, शहरे, वीज निर्मिती इ. अवलंबून ठेवणे ही अतिशय ऐहस्व दृष्टीचे आहे असे लक्षात आले.

पुणे शहरात नुकताच एक व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या एक वक्त्या होत्या आणि शासकीय सेवेत उच्च पदावर काम करणारे एक अभियंताही एक वक्ते होते. धरणाचे आयुष्य म्हणजे धरणाच्या भिंतीचे आयुष्य नव्हे. भिंतींना फारच मोठी नैसर्गिक आपत्ती आली तरच धोका असतो. एरवी धरण गाळाने भरून निकामी होण्याचा काळ म्हणजेच धरणाचे आयुष्य हे त्यांच्याकडून स्पष्ट झाले. 100 - 150 वर्षांपेक्षा साधारणपणे ते जास्त असत नाही असेही समजले. म्हणजे मोठी धरणे बांधून पाण्याचे साठे करायची युक्ती ही जेमतेम पाच ते सहा पिढ्यांपर्यंतच उपयोगी आहे. साठा करण्याची नवीन जागा न मिळाल्यास साचलेला गाळ उपसणे एवढाच मार्ग आहे. 1 टीएमसी गाळ काढून जलाशयापासून दूरवर वाहून नेला तर पाण्याचा साठा 1 टीएमसी ने वाढेल. 1 टीएमसी म्हणजे किती ? 100 कोटी घनफूट ! 1 टीएमसी जलसाठा (गाळ उपसून) वाढवायचा झाल्यास किती किंमत चुकवावी लागेल याचा यावरून अंदाज करावा.

वृत्तपत्रातून मिळालेल्या माहितीनुसार पुणे शहर वर्षाला 16 टीएमसी एवढे पाणी वापरते. नुकतीच मुंबईच्या पाणी पुरवठ्याबद्दल एक बातमी वाचली. मुंबईसाठी आता दमणगंगा नदीपासून (गुजरात सीमेजवळ) पाणी आणण्याची योजना आहे. या योजनेमुळे 20 ते 50 वर्षांचा पाण्याचा प्रश्न सुटेल असे त्या बातमीत स्पष्ट म्हटलेले आहे. 50 वर्षात दमणगंगेवरील धरण गाळाने भरून जाईल का, मुंबई अजून एवढे पाणी मागेल की हे 60 टीएमसी पाणी अपुरे पडेल हे या बातमीवरून समजले नाही. परंतु आताच्या विकास नीतीची ऐहस्वदृष्टी मात्र समजली.

धरण बांधतानाचे अंदाज काहीही असोत. प्रत्यक्षात धरणे गाळाने भरण्याचा वेग किती आहे ? माहितीच्या महाजालात थोडीफार सफर केल्यावर असे समजले की हा वेग अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजे 2 - 3 पट आहे. हे जर खरे असेल तर धरणे गाळाने भरून निकामी होण्याचे संकट आता फार दूर राहिलेले नाही हे मानावे लागते. त्यामुळे देशामधील सर्वच जलसाठ्यांचे ताबडतोबीने सर्वेक्षण करणे आणि खरोखरच किती जलसाठा शिल्लक आहे याचा अंदाज घेणे आवश्यक झाले आहे. नाहीतर आजपासूनची तिसरी पिढी तरी गंभीर संकटात सापडेल ही काळ्या दगडावरची रेघ आहे. धरणे गाळाने भरण्यात अजून एक मुद्दा आहे - पाणी प्रवाही असते. ते सर्वप्रथम तळात मृत साठ्यात जाते पण गाळ हा काही सगळाच्या सगळा मृत साठ्यात जात नाही. तो उपयुक्त साठ्यामधील जागाही व्यापतो. कारण तो पाण्यासारखा प्रवाही नाही.

माझा निरनिराळ्या कारणांनी सोलापूरशी संबंध आहे. त्यामुळे पानशेत, वरसगांव, टेमघर याचप्रमाणे उजनी भरले का नाही याकडे माझे लक्ष असते. गेली काही वर्षे असे घडताना दिसते आहे की, पुणे जिल्ह्यामधील पश्चिमेकडील धरणे भरून वाहिली नाहीत आणि तरीही उजनी भरते आहे. मला असे वाटू लागले होते की पाऊसमान बदलत चालले आहे का ? पुण्याच्या पूर्वेच्या प्रदेशात पाऊस वाढला आहे का? कदाचित थोडाफार वाढला असेल पण उजनी सहजपणे भरते आहे ते त्यामुळे नसावे. गाळ भरल्याने त्या जलाशयाची क्षमता कमी झाली असावी. उजनीमध्ये शेकडो कोटी रूपये किमतीची वाळू साठल्याच्या बातम्या येवून गेल्या आहेत.

ब्रिटीश बेटामध्ये म्हणे वर्षाला कोणताही महिना सर्वोच्च पावसाचा ठरू शकतो. म्हणजे पाऊस कमी - अधिक प्रमाणात वर्षभर पडतो त्यातच हिमवृष्टीमधूनही पाणी मिळते. साठलेले हिम म्हणजे फुकटचे जलसाठेच आहेत. थंडी कमी झाली की ते सावकाश वितळून जमिनीला मिळते. नद्या - नाल्यांमधून वाहते. आपल्याला मात्र 3 - 4 महिन्याचाच पावसाळा आहे. आपण मोसमी पावसाच्या प्रदेशातले ! आपल्याला पाणी साठवावे तर लागणारच. शाश्वतरित्या कसे साठवायचे हा प्रश्न आहे. आपण आता अवलंबितो आहोत तो मार्ग दोनच पिढ्यानंतर बंद आहे मग कोणता मार्ग आहे या प्रश्नाने मला सतावायला सुरूवात केली.

त्यातून मला Farmers of Forty Centuries या F.K.King या अमेरिकन माणसाने चीन, जपान व कोरिया या देशांमध्ये काही महिने प्रवास करून प्रत्यक्ष बघून लिहिलेल्या पुस्तकाची आठवण झाली. या लेखकाने हे पुस्तक सन 1913 मध्ये प्रसिध्द केलेले आहे. म्हणजे 100 वर्षांपूर्वीचा चीन. जपान व कोरिया यांच्या शेतीसंबंधी त्यामध्ये खूप माहिती आहे. या सर्व देशामध्ये लोकसंख्या दाट आहे. तुलनेने शेतीयोग्य जमिनीचे प्रमाण कमी आहे. अमेरिकन शेतकऐयाप्रमाणे जमीन पड ठेवण्याची चैन त्यांना परवडणारी नाही. जमिनीतून पिकांनी जी मूलद्रव्ये काढून घेतली आहेत त्याची भरपाई करण्यासाठी रासायनिक खते उपलब्ध नाहीत आणि तरी चिनी (आणि जपानी व कोरियनसुध्दा) शेतकरी त्याच त्याच जमिनीच्या तुकड्यांमधून पिके काढत आहेत आणि देश जगवित आहेत. त्यांना हे कसे साधते हा किंग साहेबांच्या पुढे प्रश्न होता म्हणून त्यांनी एवढा प्रवास करून अभ्यास केला. जमिनीमधून जे जे काढले - त्याचे शेष (अगदी माणसे आणि पशू यांच्या मलमूत्रासकट) चिनी शेतकरी (तेव्हातरी) शेतात पोहोचवीत. फार काय घरामधली सारवलेली जमीन देखील उकरून (दर काही वर्षांनी) शेतात नेवून टाकीत (कारण तळपायामधून निघणारा घाम पायाखालच्या जमिनीत जिरतो) पूर्वजांचे मृतदेह ते आपल्या शेतातल्याच एका ठराविक भागात पुरत. त्या भागात त्यांचे पशू चरत आणि त्यांच्या मार्फत चक्र पूर्ण होई. ते पुस्तक वाचल्यावर आपल्या मनावर खोलवर ठसा उमटतो तो ह्या आवश्यक मूलद्रव्यांच्या अखंड चक्राचा.

परंतु चिन्यांचे पाण्याचे व्यवस्थापन समजून घेण्यासाठीही हे पुस्तक खूप महत्वाचे आहे असे लक्षात आले. त्यांच्या जलव्यवस्थापनाचे उल्लेख या पुस्तकात सर्वत्र पसरले आहे. परंतु 5 क्रमाकांच्या प्रकरणात त्यावरच भर आहे. किंग साहेबांचे अंदाजाप्रमाणे या तीनही देशात (अर्थातच सखल भागात) कालव्यांचे विस्तृत जाळे आहे. किती विस्तृत ? तर दोन लाख मैल. किंग साहेबांना असेही वाटते की हा आकडा नुसत्या चीनसाठीही खरा असेल.

चीनच्या जलव्यवस्थापनाची सुरूवात झाली ख्रिस्त पूर्व 21 व्या शतकात. परंपरेने चालत आलेला इतिहास सांगतो की, या काळात पीत नदीच्या खोऐयामधील गण - पतींनी एक बैठक घेतली. त्यांचा नायक शन याने पीत नदीच्या पूर नियंत्रणासाठी प्रथम गाँग आणि त्यानंतर गन यांची निवड केली. नदीच्या पुराचे पाणी पसरू नये म्हणून नदीच्या कडेने मातीचे बांध उभारायचा त्यांनी खूप खटाटोप केला. परंतु त्यांना यश आले नाही. या अपयशामुळे शन या सम्राटाने गनला मृत्यूदंड दिला आणि त्याच्या जागी त्याचाच मुलगा यू याला नेमले. यू हा मोठा सूज्ञ आणि विचारी पुरूष होता. तो नुसता हुकूम सोडून थांबत नसे तर स्वत: कामाला हातभार लावी. 13 वर्षे तो स्वत:च्या घरात न राहता उघड्यावर राहिला. या काळात कित्येक वेळा स्वत:च्या घराजवळून जाण्याचे त्यावर प्रसंग आले. परंतु त्याने कधी घरात मुक्काम केला नाही. आपल्या वाडवडिलांचे इतिहासामधून त्याने योग्य तो बोध घेतला होता. पीत नदीवर मांड ठोकण्यात शेवटी तो यशस्वी झाला. त्याने नदीचे पात्र खोल केले. पुराचे पाणी पांगविण्यासाठी त्याने कालवे खणले. सरोवरे खोदली आणि असे फिरवून फिरवून त्याने पाणी समुद्रात जावू दिले. त्यामुळे पुराचे संकट टळले.

हा भीम पराक्रम दाखविला म्हणून गणपतींचा नायक सम्राट शन याने त्याला आपली नायकाची जागा दिली. तेथपासून आजपावेतो यू हा चीनी लोकांच्या अत्यादराचा विषय झालेला आहे.

चीनच्या इतिहासामधील सर्वच राजघराण्यांनी शांततेच्या काळात पूरनियंत्रण आणि जलसंधारण यावर भर दिलेला दिसतो. ही कामे खूप प्राचीन काळात सुरू झाली आणि त्यानंतरच्या पिढ्यांनी ती राखली - पुढे नेली आणि आजसुध्दा त्याचा उपयोग आहे. इ.स. पूर्वी 771 ते 476 यांना वसंद शरद काल असे चीनच्या इतिहासात म्हणतात. हे संबोधन 771 - 476 शरद वसंद बखर अशा नावाच्या कॉन्फ्युशिअसने लिहिलेल्या पुस्तकावरून घेण्यात आले आहे. पीत नदीच्या मुखाकडील प्रदेशाचे पूरापासून संरक्षण करण्यासाठी बंधारे घालायला या काळात सुरूवात झाली. या बंधाऐयांची लांबी 1800 कि.मी आहे.

त्यानंतरच्या भाऊबंदकीच्या काळात ग्रँड कॅनॉल अथवा राजनदीच्या निर्मितीला हात घालण्यात आला. उद्देश होते पुराचे पाणी दूरवर पांगविणे, जल वाहतूक, दलदलीचे प्रदेश निचरून टाकणे आणि अर्थातच सिंचनही ! राजसरिता बिजिंग ते हँगझोऊ असा 800 मैलांचा प्रवास करीत. त्यानंतर इ.स. च्या पहिल्या शतकात पूर्वेच्या हान घराण्याच्या काळात समुद्राच्या लाटांपासून संरक्षणासाठी शेकडो किलोमीटरची सागरी तटबंदी उभी करण्यास सुरूवात झाली. आज पर्यटकांच्या दृष्टीने चीनची भिंत हे एक मोठे आकर्षण आहे. परंतु वर उल्लेखिलेली सर्व कामे ही या प्रसिध्द भिंतीच्याच तोडीची आहेत. आजच्या आधुनिक चीनने पूर नियंत्रणाची जी कामे केली आहेत तशीच मोठी कामे या जुन्या काळात झालेली आहेत.

साऐया जगात जे महान सिंचन प्रकल्प आहेत, त्यामध्ये दू जिआंग बंधाऐयांचा सहज समावेश होईल. सियुऑन प्रांतातील चेंगडु शहराच्या दक्षिणेस 40 कि.मी अंतरावरील गुआनसियान तालुक्यामध्ये हा प्राचीन बंधारा आहे. यागझी नदीची उपनदी मिनजिआँग हीस वेसण घालून 2 लाख हेक्टरची सुपिक जमीन सिंचनाखाली आणलेली आहे.

हा बंधारा होण्याआधी 9 हजार फूट उंचीवर उगम पावणारी ही नदी चेंगडुच्या सखल प्रदेशात प्रवेश केल्यावर सर्व प्रदेश पाण्याने झाकून टाकीत असे. नदीच्या मुख्य पात्राशिवाय दोन कालवे खोदण्यात आले आणि पुराचे पाणी त्यामध्ये वळविण्यासाठी (साठविण्यासाठी नव्हे) नदीला बांध घालण्यात आला. त्यामुळे संहारक पुरांचे रूपांतर वरदान ठरावे अशा सिंचनात झाले. आधुनिक तंत्रज्ञान आणि त्यामधून उपलब्ध होणारे सिमेंटसारखे पदार्थ नाहीत. खणायला, खडक फोडायला यंत्रे नाहीत, स्फोटके नाहीत, सर्वेक्षणाची साधने नाहीत अशा काळात ही योजना अंमलात आणली गेली आहे. वाळू, बांबू आणि लाकूड या पदार्थांमधून हा बांध उभारला गेला. खडक फोडण्यासाठी ते तापविणे आणि त्यावर गार पाणी ओतणे ही युक्ती वापरली गेली. हे अवाढव्य काम सिच्युऑनमधील एक स्थानिक अधिकारी ली बिंग आणि त्याचा मुलगा यांनी तडीस नेले असे मानले जाते. हा प्रकल्प 2200 वर्षे काम देतो आहे. कृतज्ञ समाजाने ली बिंग आणि त्याचा पुत्र ली एरलाँग यांचे या बंधाऐयाजवळ दोन मंदिरे बांधलेली आहेत. इ.स. 497 मध्ये बांधलेली मंदिरे सुस्थितीत आहेत. आजदेखील द जिआँग बंधारा उभा आहे आणि त्याचे सिंचन क्षेत्र अनेक पटींनी वाढलेले आहे.

इहलोकात अतिशय उपयोगी पडणाऐया या सोयी सुविधांची सुरूवात चीनमध्ये 4000 वर्षांपूर्वी झाली. आजमितीला दोन लक्ष मैल लांबीचे कालवे अस्तित्वात आले आहेत. या कालव्यामधून वाहतूक चालते. यामधील प्रमुख कालवा राजसरिता याचा उल्लेख वर आला आहेच. उत्तर दक्षिण पसरलेल्या या कालव्यांची लांबी 800 मैल आहे. याला पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून मिळणारे अनेक फाटे आहेत. राजसरितेच्या प्रत्येक मैलागणिक तीन तरी फाटे असावेत असा किंगसाहेबांचा निरीक्षणाअंतीचा अंदाज आहे. त्यांच्या निरीक्षणानुसार हे लहान कालवेदेखील 18 - 20 फूट रूंदीचे आहेत. यांच्यामध्ये उन्हाळ्यातदेखील 6 फूट खोल पाणी होते.

या कालव्यांच्या दुतफर्ा शेते आहेत. शेतांची उंची 8 - 12 फूटांपेक्षा जास्त नाही. शेतकरी हवे तेव्हा सहजगत्या परंपरागत साधनांनी कालव्यातील पाणी उचलून शेते भिजवू शकतात. एवढेच नव्हे तर अधूनमधून कालव्याचा तळ खरवडून गाळ आणि पाण वनस्पती खत म्हणून शेतात पसरतात. ह्यायोगे शेताची उंची हळूहळू सावकाशपणे वाढत राहते. मोठे पूर येवून या पाटामधील पातळी वाढली तर जास्तीचे पाणी साठविण्यासाठी तुंगटिंग (हुपे) आणि पोयांग (हुनान) यासारखी 2000 - 1800 चौ. मैल क्षेत्रफळाची उथळ तळी आहेत. हे जास्तीचे पाणी त्यांच्याकडे वळविता येते आणि त्यांची पातळी 20 ते 30 फूटांनी वाढू शकते.

पाण्याचा साठा करण्यासाठी मोठीमोठी धरणे बांधण्याची क्षमता नसतांना (आणि नसल्यामुळे) चिनी लोकांनी हे पाणी आणि सोबतचा गाळ हा मोठ्या विस्तृत क्षेत्रावर पांगविण्याचा मार्ग अवलंबिला. त्यामधून धरणे गाळाने भरण्याचा धोका मुद्दलातच निकालात निघाला. पाण्यासोबत गाळदेखील पांगला. कोट्यावधी हात हा गाळ उपसून शेतात टाकतात. त्यामुळे आपोआप पाटांची देखरेख होते आणि यामधून काय झाले असेल ? समुद्र 18 मैलांनी मागे हटला आहे आणि त्या नवीन सखल प्रदेशात पाटांनी वेढलेली शेते आहेत. इ.पू. 220 मध्ये शाटुंग प्रांतामधील पुतई हे गाव समुद्रापासून एक मैलाच्या आतच होते. आता ते 1913 मध्ये समुद्रापासून 48 मैल आतमध्ये आहे.

शांघाय हे मूळचे किनाऐयावरचे गाव ! आता उत्तरेला आणि पूर्वेला 20 मैलावर समुद्रा गेला आहे. पई ह्या नदीकाठचे सीएनशूईको हे गाव समुद्रकाठी होते. 1913 मध्ये ते समुद्रापासून 18 मैलावर होते. आपण पाणी एकवटले आणि त्याबरोबर गाळही एकवटला आणि तो हलविणे मुश्किल आहे. चिन्यांनी पाणी आणि गाळ पांगवला - त्यामधून जमीन तयार केली हे तर खरोखरीच परशुराम म्हणायला हवेत.

सखल प्रदेशातले हे सर्व काम भगीरथाला शोभणारे आहे. परंतु या तीनही देशांनी डोंगर उतारावर बंदिस्त खाचरे निर्माण करण्यासाठी जे परिश्रम घेतले आहेत ते देखील थक्क करणारे आहे. या खाचरामध्ये 1 फुटापेक्षा जास्त पाणी तुंबविता येते. त्यामुळे मातीची धूप जवळपास थांबतेच. भाताशिवाय वेगळी पिके घ्यावयाची असल्यास धूप होणार नाही असे उतार दिलेल्या जमिनी आहे. चहाच्या बागा डोंगरावर असतात. त्यांना पाणी साठलेले चालत नाही. त्याठिकाणी उतार तसाच ठेवतात पण जमीन आच्छादून टाकतात. काडाचा 6 ते 8 चा थर जमिनीवर असेल तर पाणी व त्याबरोबर माती वाहणार कशी ? एकूण असे दिसते की या तीनही देशामध्ये जल आणि मृद् संधारण हा सामुहिक जाणिवांचा भागच आहे.

असा पुरूषार्थ दाखविणारे लोक स्वत:ला जगाच्या केंद्रस्थानी मानीत आले असतील तर त्यात फार काही गैर मानता येणार नाही.

किंग साहेबांचे चित्र 1913 मधील आहे. त्यानंतरचे 'Feeding a Billion' हे पुस्तक 1987 मधील आहे. तेव्हा देखील फार फरक पडलेला नसावा. जुन्या व्यवस्था कार्यान्वित होत्याच पण त्यानंतर आता काय परिस्थिती आहे कुणास ठाऊक. चीन हा आता अतिअवाढव्य शहरांचा देश झाला आहे. जुन्या व्यवस्थांची अवस्था काय आहे कुणास ठाऊक पण बहुधा आपला स्वत:चा पायाच उखडून टाकण्याची दुर्बुध्दी त्यांना झाली नसेल.

आपण देखील प्राचीन काळापासून चांगले सुसंस्कृत लोक आहोत. आपण काही शहाणपण दाखविले असेल का नाही ?

तामिळनाडू मध्ये कावेरी नदीवर चोल राजांनी इ. स. च्या दुसऐया शतकात घातलेला बांध आहे. कावेरी ही काही लहान - सहान नदी नव्हे. या नदीवर 9 फूट उंचीचा दगडात बांधलेला बांध आहे. तो देखील पाणी साठवीत नाही तर वळवितो - उदक युक्तीने चालवितो. 1800 वर्षांच्या या बंधाऐयावर इंग्रजांच्या काळात अजून दोन फूट चढविण्यात आले आणि या पायावर आता एक पूल उभा आहे. माहितीच्या महाजालात आपण Grand Anicut असा शोध घेतल्यास आपणास या पुलाचा फोटो मिळेल. तंजावर मधील लाखो एकर जमीन यामुळे ओलिताखाली आहे.

रूडकी (उ.प्र) येथून निघणारे गंगा नदीवरील कालवे इंग्रजांच्या काळात झाले परंतु त्यांचे ठिकाणी शेरशहाचे काळातील कालवे होते. कदाचित ते त्याचेही आधीपासूनचे असतील. सखल मैदानी प्रदेशातून नदी वाहते तेव्हा नदीचे पाणी पांगविणे सोपे असते आणि त्यावेळच्या लोकांनी त्याचा अवलंब केला असणार. गंगा नदी समुद्राला मिळते ती अनेक मुखांनी. ही सर्वच मुखे नैसर्गिक नाहीत. त्यातील काही मुखे तरी मनुष्य निर्मित आहे असा दावा करणारे लोक आहेत. अंग - वंग - कलिंग तीनही प्राचीन देश आहेत. महापुरांची संकटे - पात्रे बदलणाऐया नद्या - सखल मैदाने समस्या त्याच आहेत ज्या प्राचीन चीनपुढे होत्या. त्यावर तेथील लोकांनी काहीच इलाज काढले नसतील ? शोध घेतला पाहिजे.

कमी उंचीचे बांध घालून पाणी तुंबविण्याच्या आणि पाटांमधून पांगविण्याच्या योजना इंग्रजांच्या काळात झाल्या. सिंधू नदीवरील आताच्या पाकिस्तानी पंजाबमधील योजना आणि कृष्णा - गोदावरी यांच्या मुखाजवळच्या तुलनेने सोप्या योजना इंग्रजांनी पार पाडल्या. या ठिकाणी आधीच्या लोकांनी काहीच केले नसेल ? अनुकूल परिस्थिती असताना केले नसेल तर असे का घडले याचा विचार केला पाहिजे.

मोठ्या नद्यांवरील मोठ्या योजना सोडल्या तर तळ्यांची निर्मिती आपणाकडे मोठ्या प्रमाणात दिसते. पुरा बंगाल पुकुरांनी भरलेला आहे. विदर्भात भंडारा - चंद्रपूर जिल्ह्यात असंख्य तळी आहेत. आपणाकडे कितीतरी गावाच्या नावात शेवटी सर (म्हणजे सरोवर) असे शब्द असतात. सर - तलेया - पुकुर - पुष्कर - सर्व शब्द तळ्यांचे निदर्शक आहेत आणि अगदी रूक्ष राजस्थान मध्ये देखील सर ने शेवट होणारी स्थलनामे आहेत आणि तळी देखील आहेत. श्री. अनुपम मिश्रा यांनी 'आज भी खरे है तालाब' या सुंदर पुस्तकात याबाबत खूप माहिती संकलित केलेली आहे. पूर येवून गेल्यानंतरचे नदीचे प्रवाह वळवून त्यावर शेती करण्याची प्रथा बागलाण मध्ये अजून चालू आहे. त्याला फड म्हणतात. फडांचे व्यवस्थापन सामुहिक असते आणि प्रत्येक शेतकऐयाला या सिंचनाखालील क्षेत्रामध्ये थोडातरी वाटा असतो. सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी अशीच पध्दत असल्याचे एका जुन्या रेव्हेन्यू मॅन्युअलमध्ये मी वाचले आहे. माझ्या गावच्या ओढ्यावर हे आजसुध्दा चालू आहे. शेतकरी मोठे पूर अडवू शकणारी धरणे आपली आपण बांधू शकत नाहीत. परंतु पुरानंतरचे ओेढ्याचे प्रवाह अनुकूल भौगोलिक परिस्थितीत नक्की वापरात आणतात.

औरंगाबादची पाणचक्की - तेथील नहर आणि त्यावर अवलंबून असणारे हौद - बीड येथील खजिना विहीर, या पाण्याचा साठा (डोळ्यांना तरी दिसत नाही) न करता अखंड पाणी पुरवठा करणाऐया वैशिष्ट्यपूर्ण योजना आहेत. काहीही देखभाल न करता शेकडो वर्षे या चालू आहेत. मध्य आशियामधील रूक्ष प्रदेशामध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी या युक्त्या निघाल्या. जमिनीत झाकलेल्या नळामध्ये भोवतालच्या जमिनीतले पाणी गोळा करून ते सर्व पाणी योग्य ठिकाणी पोचते केले जाते. अशाच सुविधा इराणमध्ये होत्या, चीनमधील यिघुर लोकांनी उंच पर्वतावरील बफर्चे पाणी याच पध्दतीने त्यांच्या वाळवंटापर्यंत आणलेले आहे.

परंतु एकूणच आपल्याकडील राजकीय नेतृत्व आणि लोक सगळेच, चिनी राज्यकर्ते (प्राचीन काळापासूनचे) आणि लोक यांच्या तुलनेत या इहलोकात उपयोगी पडणारी साधने उभारण्यात मागेच दिसतात. स्वातंत्र्यानंतर मोठ्या कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आपण धरणे बांधली. यांच्यामुळे येणारी सुबत्ता साधारण 1980 सालापासून आपण उपभोगत आहोत. साखरेबाबत 'पाहुण्यासाठी आतापासून साठविलेली बरी' असे तूर्त तरी म्हणावे लागत नाही. आपण जागतिक बाजारात अचानकपणे मोठ्या प्रमाणात गहू आणू की काय अशी भीती आज जग व्यक्त करते आहे. पण ही सुबत्ता ज्यांच्या जीवावर आहे त्यांची काळजी घेतली नाही तर मात्र कठीण परिस्थिती ओढावेल. पण आपण व राज्यकर्ते यांचा विचार करतो आहोत का ? आपण पुतळे उभारण्यात आणि बुलेट ट्रेनची सर्वेक्षण करण्यात मग्न आहोत.

आत्ता आपण काय केले पाहिजे ? मला वाटते की प्रथम दृष्टीकोन बदलला पाहिजे. आज आपण (तसेच नियोजन करणारे) 100 वर्षांपुढे विचार करायला तयार नाही. हे धरण 100 - 125 वर्षात गाळाने भरून जाईल आणि धरणे बांधायला योग्या जागा थोड्याच असतात हे या क्षेत्रामधील अभियंते सहजपणे सांगतात. त्याच्या पुढे काय ? या प्रश्नावर ते खांदे उडवितील, किंवा त्यावेळचे लोक बघून घेतील असे सांगतील. कोणी म्हणतील गाळ उपसून काढावा लागेल. आजमितीस कोळसा, खनिज तेल यांसारखे ऊर्जास्त्रोत उपलब्ध आहेत. ते असतांना आपण जे करू शकत नाही ते अजून 50 वर्षांनी आपण करू शकणार आहोत ? गेल्या उन्हाळ्यात विविध तळ्यांमधून गाळ काढण्यात आला. नद्या - ओढ्यांची पात्रे खोल केली. ही सर्व कामे झाली हे चांगले झाले पण एकूण किती गाळ उपसला आणि त्यासाठी किती डिझेल गेले हा अभ्यासच करायला हवा. सध्या आपण मनोभावे चार्वाकवादी झालो आहोत. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनो कुत:। यावत् जीवेत सुखं जीवेत ऋणं कृत्वा घृतं पिबेत। यावर आपला दृढ विश्वास बसलेला दिसतो आहे. हा इहवादी दृष्टीकोन आहे पण अतिशय ऐहस्वदृष्टीचा आहे.

आत्मावै पुत्रनामासी त्वं जीवेत शरद: शतम्। हा देखील इहवादी दृष्टीकोनच आहे. तुझ्या पुत्राच्या रूपाने तू 100 शरद ऋतू पहा हा श्वेतकेतूला त्याच्या गुरूने केलेला उपदेश आहे. आपण मेलो जग बुडाले पुढचे लोक पुढचे पाहून घेतील असा हा दृष्टीकोन नाही. तेव्हा आपण मेलो जग बुडाले हे खरे नसून आपण आपल्या पुत्रपौत्रांमधून आपणच जगतो आहोत यावर आपला विश्वास पाहिजे.

मोठी धरणे बांधली. ते बरोबर होते की चूक यावर वाद घालू - त्यामधून निष्कर्ष काढू, शाश्वत मार्गही शोधू पण आधी आहेत ते जलसाठे तर राखले पाहिजेत ! त्यात गाळ येणार नाही याला सर्वोच्च महत्व दिले पाहिजे. वनखात्याने सलग समपातळी चरांचा कार्यक्रम धडाक्याने अंमलात आणला पाहिजे. शेती क्षेत्रातील धूप थांबवावयाचा कार्यक्रम शेतकरी आणि तज्ज्ञ यांच्या संवादामधून काढला पाहिजे. रोज चारचाकी घेवून कार्यालयात जायचे आणि रविवारी एक तास सायकल चालावायची यासारखे प्रतिकात्मक उपक्रम करण्यात काही अर्थ नाही . प्रत्यक्ष परिणाम घडविणाऐया कृतीची आवश्यकता आहे.

तेल, कोळसा यांसारखी संसाधने रोज तयार होत नाहीत. त्याची उपलब्धता कमी होत जाणार हे स्पष्ट आहे. त्यांचा उपयोग शाश्वत साधने निर्माण करण्यासाठी केला पाहिजे. आजदेखील कोसी नदी बिहारमध्ये विध्वंस करते. चिनी लोक जर पीत नदीला नियंत्रणाखाली ठेवू शकतात तर आपण कोसी नदीला वेसण का घालू शकणार नाही ? चिनी लोकांनी केवळ मनुष्यबळावर ही कामे जुन्या काळी पार पाडली. आपण यासाठी यंत्रे वापरू पण जे करू ते हजारो वर्षे टिकणारे करू. समरांगण सूत्रधार हा बांधकामविषयक प्राचीन ग्रंथ आहे. मंदिरांची वास्तु हजार वर्षे टिकली पाहिजे हे त्यातले मानक आहे. आपल्या परंपरेमध्ये पृथ्वी म्हणजेच लक्ष्मी असे मानले जाते आणि तिला पाय लावल्याबद्दल आपण त्या देवीची रोज क्षमा मागतो. ही झाली प्रतिकात्मक कृती ! मृद् व जल संधारणाची शाश्वत साधने ही खरे तर या देवीची आभूषणे आहेत. देवीला ही आभूषणे चढविणे हीच खरेतर तिची खरी प्रत्यक्ष पूजा आहे.

प्रतीके स्थापन करणे आणि प्रत्यक्षापेक्षा प्रतीक पूजेवर समाधान मानणे हे सोडून प्रत्यक्ष पूजा करण्याची आम्हाला सद्बुध्दी दे अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो.

ईमेल- gole_hemant@yahoo.co.in

Path Alias

/articles/dharanaancae-ayausaya-kaitai

Post By: Hindi
×