आज ढगेवाडीत सुबत्ता आहे. हिरवीगार शेते आहेत. तरूण मुले शिकून नाशिक, पुण्यासारख्या शहरात नौकरी करीत आहेत. श्रमदानातून केलेल्या कामामुळे गाव समृध्द झाला आहे. पाणी अडवा पाणी जिरवा हे विधान कृतीत आणून ढगेवाडीने एक आदर्श आपल्या समाजापुढे घालून दिला आहे. पाणी अडवून नुसता पाण्याचा प्रश्न सुटत नाही तर शेती, लघु उद्योग, ग्राम सुधारणा असे बरेच काही साधता येते.
शहरापासून दूर दऱ्याखोऱ्यात, वनात छोटी छोटी वस्ती करून रहाणारे आपले वनवासी बांधव हे नेहमीच दुर्लक्षित. सर्व सुविधांपासून वंचित. पाणी प्रश्न तर त्यांच्या पाचवीला पूजलेलाच. पण असाही एक पाडा आहे की ज्याने आपल्या गावाचा कायापालट करून आदर्श ग्राम बनवले. पाड्याचे नाव आहे 'ढगेवाडी'.संगमनेर भंडारदरा रस्त्यावर अकोल्याच्या जवळ डोंगरांच्या रांगेमध्ये 'ढगेवाडी' हा पाडा वसलेला आहे. ढगेवाडीला जायचे असेल तर तीन डोंगर ओलांडून चढ चढून वर गावात जावे लागे. साधारण 30 वर्षांपूर्वी या पाड्यावर 50 - 60 कच्च्या झोपड्या होत्या. वर पाड्यावर जायला रस्ता तर दूरच पण पाण्यासाठी महिलांना डोंगर उतरून 5 कि.मी अंतर चालून जायला लागत होते. पावसाळ्यात थोडीफार शेती होई, पण नंतर मात्र पाण्याअभावी शेती करता येत नसे. गावातील लोक मजुरीसाठी दूर जात असत. रस्ता दुरूस्ती, बांधकाम, ऊस तोडणी अशा कामांच्या शोधात वणवण फिरावे लागे. पाड्यावर म्हातारी कोतारी, लहान मुले रहात. त्या गावातील एक तरूण 'भास्कर पारधी' हा मात्र या परिस्थितीतून गावाला बाहेर कसे काढायचे या विचाराने सतत चिंतीत असायचा.
अकोला (ता.संगमनेर) येथील 'वनवासी कल्याण आश्रमाच्या' वस्तीगृहात राहून त्याने शालेय शिक्षण घेतले. नंतर पुण्यातील मोहनराव घैसास यांच्या 'सुयश चॅरिटेबल ट्रस्ट' या संस्थेत काम करू लागला. वनवासी कल्याण आश्रम व सुयश चॅरिटेबल ट्रस्ट या दोन्ही संस्था आपल्या वनवासी बांधवांच्या विकासासाठी करत असलेल्या कामामुळे तो प्रभावी झाला. त्याला एक नवी दृष्टी मिळाली. त्याची विचार चक्रे गावाच्या विकासाच्या दृष्टीने फिरू लागली.
एक नवी दृष्टी घेवून तो आपल्या पाड्यावर आला. बरोबर वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते व सुयश ट्रस्टचे श्री.मोहनराव घैसास व सौ. स्मिताताई घैसास सगळ्यांनी मिळून गावाची पहाणी केली. विकासाच्या दृष्टीने काही योजना आखल्या, ग्रामस्थांना एकत्र करून त्यांना योजना समजावून दिल्या. जलसंधारणाचे महत्व पटवून दिले. सगळ्यांची साथ मिळाली. गावातील तरूणांच्या मदतीने गावाभोवतालच्या डोंगर उतारावर ठिकठिकाणी चर खणून पावसाचे पाणी जिरवण्याची व्यवस्था केली. गावात एक पाझर तलाव होता. त्या तलावाच्या खाली बांध बांधला. अशा तऱ्हेने पावसाचे पाणी अडवण्याची व्यवस्था केली. हे सर्व गावकऱ्यांच्या श्रमदानातून केले. त्याची गोड फळे लवकरच दिसू लागली. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी डोंगर उतारावर जमिनीत मुरल्याने गावातील विहिरींना भरपूर पाणी लागले. पाझर तलावात उन्हाळ्यातही पाणी राहू लागले. गावातील पाण्याचा प्रश्न तर सुटलाच पण पूर्वी फक्त पावसाळ्यात होणारी शेती बाराही महिने होवू लागली. गावात 1990 पूर्वी फक्त पाच विहीरी होत्या. पण आता 25 विहीरी आहेत. प्रत्येकाच्या शेतात विहीर नसली तरी ग्रामस्थांनी पाण्याचे वाटप सगळ्यांना समान केले. त्यामुळे प्रत्येकाचे शेत हिरवेगार दिसू लागले.
डोंगरावर गाव असल्याने सपाट जमीन कमी, उतार जास्त म्हणून गावकऱ्यांनी उतारावर भाजीपाल्याचे पीक घ्यायचे ठरविले. पीक चांगले आले. त्यातल्यात्यात टोमॅटोचे पीक अमाप आले. भाजीपाला शहरात विकायला नेण्यासाठी दळणवळणाचे साधन नव्हते, साधा रस्ताही नव्हता. पण श्रमदानातून विकास साधता येतो हे गावकऱ्यांच्या लक्षात आले. सगळ्यांनी मिळून रस्ता तयार केला. भाजीपाला बाहेर विकायला जावू लागला. टोमॅटोचे अमाप पीक बघून मोहनराव घैसास यांनी सहाय्य करून 2001 मध्ये ढगेवाडीत 'अंबेमाता अभिनव टोमॅटो सॉस उत्पादक सहकारी संस्था' या नावाने प्रकल्प सुरू झाला.
महिलांनी एकत्र येवून दोन बचतगट सुरू केले. त्यातील पैशातून गांडूळखत प्रकल्प सुरू केला. 60 - 70 झोपड्या असलेल्या गावात विटांची पक्की घरे दिसू लागली. गावात सायकली - मोटारसायकली आल्या. दारिद्र्य रेषेखाली असलेले गाव तीन वर्षातच दारिद्र्य रेषेच्यावर आले. गावकरी आता मजुरीसाठी अन्यत्र न जाता गावातच काम करू लागले. उलट बाहेरचे मजूर गावात कामासाठी येवू लागले. गावकऱ्यांनी फळझाडे लावण्याचेही मनावर घेतले. हे सर्व स्वावलंबनातून शक्य झाले. अठराविश्व दारिद्र्य असलेले गाव आता स्वावलंबनातून संपन्नतेकडे वाटचाल करत आहे.
आज ढगेवाडीत सुबत्ता आहे. हिरवीगार शेते आहेत. तरूण मुले शिकून नाशिक, पुण्यासारख्या शहरात नौकरी करीत आहेत. श्रमदानातून केलेल्या कामामुळे गाव समृध्द झाला आहे. पाणी अडवा पाणी जिरवा हे विधान कृतीत आणून ढगेवाडीने एक आदर्श आपल्या समाजापुढे घालून दिला आहे. पाणी अडवून नुसता पाण्याचा प्रश्न सुटत नाही तर शेती, लघु उद्योग, ग्राम सुधारणा असे बरेच काही साधता येते. पाण्याचे अनन्य साधारण महत्व ढगेवाडीतील ग्रामस्थांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. भास्कर पारधी सारखे वनवासी युवक तयार झाले तर वनवासी भागाचा विकास दूर नाही.
सौ.वृषाली पांचाळ, नाशिक - मो : 9420484892
Path Alias
/articles/dhagaevaadaicaa-kaayaapaalata
Post By: Hindi