डॉ.राजेंद्रसिंग यांना न ओळखणारा माणूस आपल्या देशात सापडणे कठीण आहे. त्यांनी भारताच्या पाणी प्रश्नावर भरपूर विचारमंथन केले असून याच मंथनातून त्यांनी नदीनितीबद्दल आपले विचार मांडले आहेत. त्यांचा आढावा सामान्य जनापर्यंत पोहोचविण्याचा हा अल्पसा प्रयत्न.
भारतातील जवळपास सर्वच नद्यांचे रूपांतर नाल्यांमध्ये झाले आहे. वारंवार येणारे पूर व दुष्काळ यामुळे त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. शहरीकरणामुळे या नद्यांची अवस्था, पर्यावरण रक्षण व संस्कार धोक्यात आले आहेत. जमिनीच्या वाढत्या भावामुळे भूमाफिया जमिनीच्या जीवावर उठले आहेत. कारखान्यांनी नद्यांमधील पाणी पूर्णपणे प्रदूषित केले आहे. भूजलाच्या अतिशोषणामुळे जमिनीतील पाण्याचा स्तर सातत्याने खाली जात आहे. अतिखननामुळे नदीचे काठ धोक्यात आले आहेत. परिणामत: नद्यांचे पर्यावरणीय व प्राकृतिक प्रवाह नेस्तनाबूत होत आहेत.योग्य अशा सरकारी नितीच्या (धोरणांच्या) अभावाने नद्यांचे मूळ स्वरूपच बिघडत चाललेले आहे. त्यामुळे भारतीय जन जीवनाला नरकाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सामुदायिक उत्तरदायित्व व राजकीय अधिकारांची जाणीव क्षीण होत आहे. त्यामुळे नद्या अतिक्रमण, प्रदूषण, शोषण व सांस्कृतिक ऱ्हासाच्या शिकार बनत आहेत.
आम्ही ही स्वत:ची जबाबदारी समजून नद्यांच्या पुनरूज्जीवनाची योजना आखीत आहोत. डौला (हरियाणा) गावांत 9-10-11 मार्च 2011 रोजी भरलेल्या नदी अभ्यासक व रक्षक, नदी वैज्ञानिक, नदी प्रेमी, सर्व सेवा संघांच्या व जलबिरादरी कार्यकर्त्यांच्या 'नदी निती निर्माण संमेलनात' या विषयावर चिंतन करण्यात येवून नदी नितीचा (धोरणांचा) पहिला आराखडा तयार करण्यात आला.
नदी नीतीचा (धोरणांचा) दृष्टीकोन :
स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपावेतो भारतात नद्यांच्या संदर्भातील विवादांची उकल झालेली नाही. दुष्काळ व महापूरांमुळे हे विवाद अधिक गुंतागुंतीचे झाले आहेत. याच कारणामुळे राज्या -राज्यातील व देशा - देशातील तणाव वाढून युध्दसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हे थांबविण्यासाठी आज निसर्गाचे संरक्षण व नद्यांचे पुनरूज्जीवन करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.
इंग्रजांनी 125 वर्षांपूर्वी बनारस सारख्या सांस्कृतिक राजधानीमध्ये सांडपाण्याचे नाले गंगानदीत सोडण्यास सुरूवात केली. आज सोडण्याची परंपरा स्वीकारून आपण देशातील सर्वच नद्यांमध्ये आज ही घाण विसर्जित करावयास सुरूवात केली आहे. घाण पाण्याचे विष आज पवित्र नद्यातील अमृततुल्य पाण्यात मिसळू लागले आहे. पारतंत्र्यात झालेल्या या सुरूवातीचे भोग आज आपण भोगत आहोत.
प्राचीन काळात भारतात हे अमृत विषापासून मुक्त करण्यासाठी कुंभमेळे घेतले जात होते. आज तर या कुंभमेळ्यात हे विष अमृतात मिसळ्याचे प्रकार वाढत चालले आहेत. हे थांबविण्यासाठी योग्य अशा नदीनितीचा विचार करून हे विवाद मिटवणे आवश्यक झाले आहे. सांडपाण्याचे नाले नदीपात्रापासून विलग करण्यापासून आपण याची सुरूवात करू शकतो. या सांडपाण्यावर योग्य ठिकाणी प्रक्रिया करून ते पाणी आवश्यक त्या प्रमाणात शुध्द करून शेती व उद्योगांसाठी वापरले जावे यासाठी कायदे केले जावेत. हे सांडपाणी जमिनीत शिरता कामा नये. त्यातील दुर्गुण जे माती व पाण्यापासून वेगळे आहेत. त्यांना वेगळेच ठेवले जावे, नद्यांना 'नद्या' म्हणून जगू देण्यासाठी हे आवश्यक आहे. ज्या नद्या आज नाले बनल्या आहेत, त्यांना पुन्हा नद्या बनविण्यासाठी हा ऐकमेव मार्ग आहे.
नद्या या आपल्या भूमातेच्या रक्तवाहिन्या आहेत. त्यांच्याबाबत कोणतेही चुकीचे पाऊल उचलले तर त्यामुळे निसर्गाचे व भूसंस्कृतीचे पतन संभवते. आज नद्यांवरील आक्रमाणामुळे महापूर व दुष्काळ यामध्ये वृध्दी होत आहे. प्रदूषणामुळे आरोग्याला हानी पोहोचत आहे. भूजलाच्या अति उपशामुळे पेयजलाचे संकट वाढू पाहात आहे.
नद्यांचे शोषण, अतिक्रमण व प्रदूषण थांबवणाऱ्या नितीचा (धोरणांचा) स्वीकार करणे गरजेचे झाले आहे. कोणत्याही खेड्यात व शहरात नदी आता मूळ स्वरूपात दिसतच नाही. कोठलेही सांडपाणी व दूषित जल नद्यांना नाल्यांमध्ये रूपांतरीत करीत आहे. नद्यांच्या जमिनीवर बनलेली घरे, उपहारगृहे, विश्रांती स्थळे, सिमेंटमध्ये बांधण्यात आलेले नाले व नदीच्या किनाऱ्यावरील आक्रमणे नद्यांचे मूळ स्वरूप बदलून त्यांना नाल्यामध्ये रूपांतरीत करीत आहेत.
मोठ्या शहरात नद्यांच्या काठाकाठाने नदी पात्रात हॉटेल्स, रिसॉर्टस् व सरकारी विश्रांती गृहे बनविल्यामुळे नद्या आपल्या स्वातंत्र्य गमावून बसल्या आहेत. नद्यांच्या काठांवर वसलेल्या शहरांमुळे नद्यांचे स्वरूप व पावित्र्य नष्ट झाले आहे.
नद्यांची संस्कृती व सभ्यता असलेला देश आज ती सभ्यता गमावून बसला आहे. जगातील फार मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला भारत हा आपला देश मानला जातो. पण आज मात्र गंगा यमुना संस्कृतिवाला सभ्य समाज आधुनिक सैतानी सभ्यतेने नरक यातना भोगतो आहे. जगातील ही एक फार मोठी दुर्घटना समजली जावी.
ज्या नदीला आपण माता मानतो ती नदी मैल्याची वाहतूक करणारी मालगाडी बनली आहे. या मैला वाहतुकीमुळे पाण्यापासून निर्माण होणारे आजार प्रबळ बनत चालले आहेत. कारखाने व हॉटेल विषयुक्त पाणी भूमीच्या पोटात ढकलत आहेत. यामुळे आरोग्य चिकित्सेवरील खर्च वारेमाप वाढत आहे. पृथ्वीवरील उष्णता वाढत आहे व त्यामुळे हवामानातील संतुलन बिघडले आहे.
पाणी आणि हवेत झालेल्या या बदलामुळे शेती व्यवसायावर आघात होत आहेत व अन्नधान्याचे उत्पादन घटत चालले आहे. नदीचा सन्मान हिरावला जात असून आपल्या भयानक भविष्याचे चित्र नजरेसमोर येत आहे. या अनर्थकारी चित्रातून आजच्या नवीन सभ्यतेचा जन्म झाला आहे. भारतीय संस्कृतीत नद्यांना 'माता' मानण्याची परंपरा होती. पण आज मात्र नद्यातील पाण्याद्वारे औद्योगिक उत्पादन वाढविणारी संस्कृती निर्माण होत आहे. पाण्याचा व नद्यांचा व्यापार करण्याचे कट कारस्थान रचले जात आहे. एकविसाव्या शतकातील दुसऱ्या दशकात या प्रकाराला आपल्याला थांबावयाचे आहे. त्यासाठीच नदीची ही नवीन नीती आखली जात आहे.
नदी नीती - नदीची व्याख्या
हिमजल, भूजल - स्त्रोत आणि पर्जन्यजल यांना उगमापासून संगमापर्यंत स्वयंप्रवाहित राखून, जी अविरत, निर्मळ आणि स्वतंत्र वाहते व युगानुयुगे सूर्य, वायु आणि भूमी यांच्याशी मुक्तपणे स्पर्श करीत जीव - सृष्टीशी परस्परपूरक नाते जोडून जी प्रवाहीत आहे - ती नदी आहे.
उद्दिष्ट्ये :
1. भारतातील नद्यांचे जे स्वास्थ्य बिघडलेले आहे, त्याला वरील व्याख्येप्रमाणे मूळ स्वरूपात आणणे हे आपले पहिले उद्दिष्ट्य आहे.
2. नद्या या राज्य, समाज आणि सृष्टी यांच्या भागीदार आहेत. समाजहित लक्षात घेवून त्यांची सुरक्षा, संरक्षण करणे, सांस्कृतिक, धार्मिक व सामाजिक आस्था टिकविण्याची योजना तयार करणे, हा नदी नितीचा उद्देश आहे. राज्यावर नद्यांचे संरक्षण करण्यासाठी निती नियम बनविणे ही जबाबदारी आहे. पण त्याच बरोबर राज्याइतकीच नद्यांच्या प्रती समाजाची ही जबाबदारी व उत्तरदायित्व आहे हे विसरून चालणार नाही. राज्य, समाज व संत यांची ही संयुक्त जबाबदारी आहे.
3. नदी नितीच्या विरोधात बऱ्याचशा स्वार्थी शक्ती छाती ठोकून उभ्या आहेत. या शक्तीच्या विरोधात पर्यावरण रक्षण करण्यासाठी आपल्याला उभे राहायचे आहे. आर्थिक, आरोग्य व पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने नदी निती निर्माण करणे ही काळाची खरी गरज आहे. राज्य, समाज व संत यांची नद्यांचे पुनरूज्जीवन करणारी नदी निती तयार करणे, ही प्राथमिक जबाबदारी आहे. नद्या, नाले, उपनद्या यांचे व्यवस्थापन करणे, हे कार्य स्थानिक जनसमुदाय तसेच जिल्हा पंचायतीद्वारे सहजपणे केले जावू शकते. नद्यांचे पुनरूज्जीवन करणे याला ही प्राधान्य देणे गरजेचे झाले आहे.
4. नद्यातील पाण्याचा व्यापार होवू नये म्हणून, मोठे बांध, अतिक्रमण, शोषण व प्रदूषण यापासून नद्यांना वाचावयाचे आहे. नद्यांचा बाजार करणाऱ्या शक्ती नद्यांचे पाणी प्रथम प्रदूषित करतात व ते शुध्द करण्यासाठी मोठा खर्च करून नद्यांवर ताबा मिळवितात. दूषित पाण्यावर उपाय म्हणून बाटलीतील पाणी पिण्यासाठी समाजाला प्रवृत्त केले जाते 'आपले पाणी ' आपल्यालाच विकून आपली लूट केली जाते. पाणी आरोग्य व स्वास्थ्य यांची लूट थांबविण्यासाठी नदी निती गरजेची झाली आहे.
5. पृथ्वीवरील उष्णता व हवामानातील बिघाड यांचा जमिनीतील ओल व नदीचा प्रवाह यांच्याशी फार घनिष्ठ संबंध आहे. हा संबंध जेव्हा बिघडतो, त्यावेळी पाणी आणि हवा यांतील बदल अपरिहार्य ठरतात हे बदल थांबावयाचे असतील तर नदी निती बनविणे अत्यावश्यक आहे.
विकासाचा दर कसा जास्त आहे. (G.D.P) हे दाखविण्याकरिता नद्यांचे प्रदूषण, अतिक्रमण व शोषण यांची किंमत विकास दर काढतांना विचारात घेतली जात नाही. त्यामुळे विकास दर ठरवितांना नद्यांची होणारी हानी सुध्दा विचारात घेतली जावी.
माणूस गरीब असो वा श्रीमंत, तो कोणत्याही धर्माचा असो, त्याची समृध्दी, जीवन व सद्सद्विवेक नद्यांशी निगडीत असते. त्यामुळे त्याचा जगण्याचा हक्क टिकवून ठेवण्यासाठी नदी निती आवश्यक आहे.नदी नीतीचे सिध्दांत :
1. गेल्या 100 वर्षात आलेला पूर विचारात घेवून नदी खालील जमिनीचे क्षेत्र ठरविले जावून त्या अनुसार गॅझेट नोटिफिकेशन काढण्यात यावे.
2. नदीचे प्रवाह क्षेत्र व पूर यांच्या उपयोगात बदल केला जावू नये. नदीच्या उगमापासून समुद्रापर्यंत नद्यांचे संरक्षण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात यावे. यासाठी लावलेल्या सीमा चिन्हांची माहिती नागरिकांना सातत्याने दिली जावी.
3. नद्यांमध्ये कोणत्याही नागरी वस्तीने वा उद्योगाने प्रदूषित पाणी विसर्जित करू नये. 'रिव्हर व सीव्हर' यांना एकमेकांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जावा.
4. नदीचे पाणी प्रदूषण करणाऱ्यांवर लोकसूचनेच्या आधारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा व मोठ्या आर्थिक दंडाची शिक्षा घोषित केली जावी.
5. नद्यांची शुध्दता व निर्मलता राखण्यासाठी योजलेले सर्व उपाय, नदी खोरे क्षेत्राचे संरक्षण व नद्यांच्या पुरूज्जीवनाचे प्रयत्न यांना संरक्षण देण्यात यावे.
6. नद्यांचा पर्यावरणीय प्रवाह किती असावा, हे निश्चित करण्यासाठी राज्या-राज्यात कायदे बनविले जावेत.भारताची नदी नीती :
1.1. नद्यांतील पाण्याचा पर्यावरणीय प्रवाह निश्चित केल्यावर मगच पाण्याचा इतर कामासाठी वापर करण्यात यावा. आम्हाला विश्वास आहे की, समाजाच्या आवश्यकता पूर्ण करण्याच्या आड हा सिध्दांत येणार नाही. नदीची प्राथमिक गरज ही तिचे अस्तित्व व निर्मलता टिकवून ठेवणे हे आहे.
नदीच्या पाण्याचा उपयोग करतांना खालील क्रम विचारात घेतला जावा -
अ. पर्यावरणीय प्रवाह
ब. पेयजल
क. शेतीकामासाठी
ड. कुंभमेळे, उत्सव साजरे करण्यासाठी
इ. घरगुती वापर, ग्रामपंचायती, नगरपालिका यांचे वापराकरिता
उ. सांस्कृतिक पर्यटनाकरिता
ऊ. ऊर्जा व उद्योगाकरिता
1.2 पर्यावरणीय पाण्याच्या प्राथमिकतेत परिवर्तन अथवा बदल करण्यात येणार नाहीत. नदीतील पाणी व भूजल हे एक संयुक्त सामाजिक संसाधन आहे. यांचा उपयोग कसा केला जावा यासाठी हे काम समाज समुदयाकडे सोपविण्याचे दृष्टीने कायदे केले जावेत. पूर्वीचे काळी सुध्दा नदीचे सामुदायिक व्यवस्थापन होते. आता पुन्हा आपल्याला ही जुनी परंपरा प्रत्यक्षात आणावयाची आहे.
सर्व कौटुंबिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि अध्यात्मिक संस्थांना नद्यांच्या पुनरूज्जीवनाच्या कार्यक्रमांकडे वळविण्यासाठी विद्यार्थी वर्गाला व नागरिकांना नद्या, उपनद्या व नैसर्गिक नाल्यांच्या संरक्षणासाठी स्वैच्छिक श्रम करण्याच्या दृष्टीने सामाजिक जागरूकता अभियानात सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे.
धर्मसत्ता, जनसत्ता व राजसत्ता या तीनही माध्यमांतून नदी उत्सव, कुंभमेळे, साप्ताहिक, मासिक व वार्षिक मेळे भरवून नद्यांची शुध्दता टिकविण्यासाठी व नद्यांचे पुनरूज्जीव करण्याकरिता समाजाला संस्कारित व प्रोत्साहित करण्यात यावे.
(डॉ.राजेंद्रसिंग यांनी लिहिलेल्या नदीकूच या पुस्तिकेवरून)
Path Alias
/articles/dao-raajaendarasainga-yaancayaa-najaraetauuna-nadai-naitaicai-sankalapanaa
Post By: Hindi