देशोदेशीचे पाणी


पाण्याचा थेंबनथेंब अडविण्यासाठी तसेच सर्व अशुध्द सांडपाणी व मैलापाणी हे त्या शुध्द पाण्यात मिसळू नये म्हणून १० वर्षांचा एक मास्टर प्लॅन बनविण्यात आला. सर्व सांडपाणी व मैलापाणी गोळा करण्यासाठी स्वतंत्र सुअरलाईन्स टाकण्यात आल्या. फक्त पावसाचे पाणी - घरांच्या छतावर पडणारे, मोकळ्या जागांवर पडणारे, रस्त्यांवर पडणारे इ. हे उघड्या मार्गिकांमधून वाहून नेऊन वर उल्‍लेखलेल्या तलावांमध्ये गोळा करण्यात येऊ लागले. ह्याला नागरी पाणी म्हणू लागले.

सिंगापूर हा दक्षिणपूर्व आशियातून सर्वबाजूंनी समुद्राने वेढलेला एक लहानसा देश. केवळ ६९२.७ चौ.मी क्षेत्रफळ असलेला. म्हणजे अधिक सोप्या भाषेत सांगावयाचे तर धुळ्यासारख्या छोट्या जिल्ह्यापेक्षाही लहान. लोकसंख्या केवळ ४.५० लाख म्हणजे धुळ्यासारख्या शहराएवढीच. पण किर्ती मात्र महान आहे.

सिंगापूर म्हणजे एक मोठे आणि अवतीभोवती ७-८ लहान बेटे असलेला देश. चारही दिशांनी समुद्र असल्याने बाराही महिने पाऊस पडतो. सरासरी २३४३ मि.मी एवढा. पण तरीही देशात प्रचंड पाणी टंचाई आहे. स्वत:ची पाण्याची गरज भागविता यावी म्हणून त्यांना मलेशियाकडून पाणी विकत घ्यावे लागते. हा सगळाच प्रश्‍न जरा तपशीलवार समजावून घ्यायला हवा. तरच सिंगापूरच्या प्रयत्नांचे महत्व आणि यश म्हणजे काय हे लक्षात येऊ शकेल.

पुन्हा सिंगापूरबद्दल. सिंगापूर हा मूलत: सपाट भूप्रदेश, जास्तीत जास्त उंची ही समुद्रसपाटीपेक्षा ६५ मी. उंच एवढीच. बेट हे लांबट, चिंचोळे त्यातील सगळ्यात मोठी नदी ही सिंगापूर. तिची लांबी १५ कि.मी, दुसरी नदी ही कालांग ती १० कि.मी. लांब. सपाट चिंचोळे बेट असल्याने पडणारा पाऊस हा वेगाने समुद्रात वाहून जातो. पुन्हा शिल्‍लक रहाते ती पाणी टंचाई !

भूगर्भाचा विचार करावयाचा तर तो मुख्यत्वे अग्नीजन्य खडकाचा बनलेला प.सिंगापूरचा काही भाग हा सँडस्टोन व मटस्टोन यांचा जलजन्य खडकाचा. तर उत्तरपूर्व सिंगापूर हा रूपांतरीत खडकाचा. तेथे Palau Tekong आणि Quartz हे मुख्य प्रकार. हे सगळे इतक्या तपशीलात सांगण्याचा हेतू एवढाच ही पश्‍चिम सिंगापूरचा जलजन्य खडकाचा काही भूभाग सोडला तर अन्यत्र खडकात पाणी मुरत नाही. खोलवर खोदण्याचा प्रयत्न केला तर समुद्राचे खारट पाणी आत शिरते. त्यामुळे तो पर्यायही बाद. सिंगापूरला स्वत:ची जंगले नाहीत. फारशी शेती नाही. सपाट जमिनीमुळे नैसर्गिक तलाव नाहीत. कृत्रिमपणे तलाव निर्माण करावेत एवढी जमीन नाही. थोडक्यात म्हणजे सर्वच परिस्थिती ही विपरीत , विरोधात !

१९५५ पर्यंत केवळ एक लाखाचे आसपास लोकसंख्या असताना त्यांचे भागत होते. पण ८० च्या दशकापासून लोकसंख्या वाढू लागली, उद्योगधंदे येऊ लागले, पाण्याची मागणी वाढू लागली. आणि ती गरज भागविण्यासाठी पाणी आयात केले पाहिजे हे देशाच्या नेतृत्वाला समजले. १९६१ साली त्यांनी पाणी आयात करण्याचा पहिला करार केला ते २०११ मध्ये संपला (काही मुदतवाढीचा लाभ घेऊन २०२० पर्यंत ओढता येईल) दुसरा करार १९६२ मध्ये केला तो २०६१ पर्यंत चालेल. मात्र त्यानंतर त्यांचे नुतनीकरण करावयाची वेळ आली तर खूप जास्त पैसे मोजावे लागतील हे त्या देशाच्या नेतृत्वाच्या लक्षात आले. त्यांनी स्वत:च्या पाण्याची गरज स्वत:लाच भागविता यावी ह्या दृष्टीने धोरणे आखायला आणि त्याची अंमलबजावणी करायला सुरूवात केली. आणि त्यातून २०११ संपतांनाच तो देश स्वत:ची गरज भागवू शकेल एवढे पाणी निर्माण करू लागला आहे आणि मुख्यत्वे तेवढ्यावर त्यांचे समाधान नाही. २०६२ सालची पाण्याची जी मागणी असू शकेल ती संभाव्य मागणी पूर्ण करता यावी ह्यासाठी आताच पुरेसे पाणी उपलब्ध करावे आणि त्याबाबतीत स्वयंपूर्ण व्हावे असा त्यांचा प्रयत्न आहे. अशा ह्या दूरदर्शी नेतृत्व असलेल्या देशाच्या पाण्याबद्दलचा विचार आणि त्यानुसार केलेला आचार हा समजावून घेऊ या.

पाण्याची गरज :


आपल्या देशाला नक्की किती पाण्याची गरज आहे हे त्यांनी प्रत्यक्ष मोजायला सुरूवात केली. दरडोई पाण्याचा किती प्रमाणावर वापर होतो हेही मोजायला सुरूवात केली. पडणारा पाऊस जे चार जुने तलाव आहेत ते तलाव तसेच नदीपात्रातील प्रवाह हे मोजून सरासरी पाण्याची उपलब्धता किती हे गणित मांडले. आणि मग सुरू झाली ही गरज पूर्तीची यशोगाथा !

सिंगापूरला पाणी मिळविण्याचे स्त्रोत चार १. तेथेच पडणार्‍या पावसापासून मिळणारे पाणी, २. समुद्राचे खारट पाणी शुध्द करून मिळविलेले पाणी (येथे हा समुद्र किनारा २००० कि.मी. पेक्षाही जास्त लांबीचा आहे ही उगाचच तुलना करता यावी म्हणून दिलेली आकडेवारी) ३. मलेशियातून आयात केलेले पाणी (हे पाणी कराराच्या कालावधीपुरतेच उपलब्ध असल्याने ती तात्पुरती व्यवस्था आहे व तिला अन्य पर्याय शोधावयाची गरज आहे) आणि चौथा त्या देशाने स्वत:च विकसित केलेला स्वत:चा मार्ग म्हणजे न्यू वॉटर (NEWWATER).

न्यू वॉटर :


ही संकल्पना समजावून घेतांना जरा मूलभूत विचारही करावा लागणार आहे. न्यू वॉटर याचा अगदी साधा, सोपा, सरळ अर्थ म्हणजे पुनर्वापर करावयाचे पाणी ( Recycling)

तेथील जलतज्ज्ञांचे आणि संख्या शास्त्रज्ञांचे मत असे की.... समजा तुम्हाला एकूण दोन थेंब पाण्याची गरज आहे, तुम्ही एक थेंब पाणी साठविण्याची व वापराची व्यवस्था करा. हे एक थेंब पाणी रिसायकल केलेत तर १/२ थेंब शुध्द पाणी मिळेल. ते वापरून पुन्हा पुनर्वापरासाठी शुध्दीकरण राबविले तर १/४ थेंब पाणी मिळेल. तिसर्‍या रिसायकल नंतर ते १/८ थेंब आणि चौथ्यानंतरही जवळजवळ तेवढेच पाणी मिळेल. याचाच अर्थ असा की उपलब्ध एक थेंब पाणी हे चार वेळा पुनर्वापारासाठी पुरविले तर १/२ + १/४ + १/८ + १/८ = १ थेंब पाणी हे अतिरिक्त स्वरूपात उपलब्ध होते. अशारीतीने मूळ उपलब्ध केलेले १ थेंब पाणी आणि रिसायकलिंगच्या प्रक्रियेद्वारे पुनर्वापारातून तयार होणारे एक थेंब पाणी असे दोन थेंब म्हणजे आपल्या देशाच्या गरजेइतके पाणी उपलब्ध होऊ शकते. हेच गणित त्यांना प्रगती च्या मार्गावर नेऊ शकले.

१. पावसापासून मिळणारे पाणी :


सिंगापूरमध्ये फार पूर्वी मॅकरिची, पिअर्स आणि सेलेटर असे तीन जुने तलाव होते. तेथे कोणतेही बांधकाम न करता, त्यांना आहे त्या स्थितीत संभाळण्यात आले. त्या परिसरात कोणत्याही प्रकारची विकासाची न कामे ना बांधकामे करण्यास मनाई करण्यात आली. त्यामुळे पाण्याच्या शुध्दतेचा मूळ उच्चदर्जा हा संभाळला जाऊ लागला. त्याला ते संरक्षित पाणलोट म्हणून संबोधू लागले. ह्या खेरीज ज्या नदीच्या मुखातून खारट पाणी शिरे व पाण्याचा दर्जा खराब होई तेथेही कामे करून खाड्यांची तोंडे बांधणे, आणि आत आलेले खारट पाणी उपसून टाकणे ही कामे करून तेथे कांजी नदीवर तलाव, पांदन नदीवरील पांदन तलाव, तसेच मुराई, पोंयान सरीमबत आणि टेंग ह्या चार नद्यांची तोंडे बांधून निर्माण केलेले तलाव असे तलाव बांधले. त्यांना असंरक्षित पाणलोट म्हणू लागले.

पाण्याचा थेंबनथेंब अडविण्यासाठी तसेच सर्व अशुध्द सांडपाणी व मैलापाणी हे त्या शुध्द पाण्यात मिसळू नये म्हणून १० वर्षांचा एक मास्टर प्लॅन बनविण्यात आला. सर्व सांडपाणी व मैलापाणी गोळा करण्यासाठी स्वतंत्र सुअरलाईन्स टाकण्यात आल्या. फक्त पावसाचे पाणी - घरांच्या छतावर पडणारे, मोकळ्या जागांवर पडणारे, रस्त्यांवर पडणारे इ. हे उघड्या मार्गिकांमधून वाहून नेऊन वर उल्‍लेखलेल्या तलावांमध्ये गोळा करण्यात येऊ लागले. ह्याला नागरी पाणी म्हणू लागले.

असंरक्षित पाणलोटातील आणि नागरी पाणी हे संरक्षित पाण्यापेक्षा शध्दतेचे दृष्टीने कमी दर्जाचे होते. अनेक ठिकाणी नागरी शौचालयातील घाण सरळ नदीत / गटारीत सोडले जाई, डुक्करपालन क्षेत्रातील घाण नदीच्या स्त्रोतातच सोडली जाई. काही औद्योगिक पाण्याची विल्हेवाट अशीच केली जात होती. ही सगळी स्थिती बदलावी लागली. काही डुक्करपालन क्षेत्रे हलवून त्यांचे पुनर्वेसन करावे लागले. नियम न पाळणार्‍यांविरूध्द कडक कारवाई करण्यात आली. ड्रेनेज लाईन्स नव्याने टाकण्यात आल्या. एकूण एक घर व नागरी इमारती त्याला जोडण्यात आल्या. कोणत्याही प्रकारचे प्रदूषण निर्माण करणारे उद्योग हे कठोरपणे बंद करण्यात आले. घराघरांपर्यंत स्वच्छ व शुध्द पाणी पुरविण्यासाठी नवी, गळती न होईल अशा दर्जाच्या पाईपलाईन टाकण्यात आल्या आहेत. ह्या सगळ्या कामाला किमान १५ वर्षे लागली. ही कामे केल्यानंतर मगच वर लिहिलेल्या तलावांच्या बांधणीचे काम हाती घेण्यात आले.

अशा तीन पध्दतीतून आपले पाणी शुध्द स्वरूपात गोळा करणे हा पाणी उपलब्धतेचा पहिला भाग झाला.

२. आयात पाणी :


आपल्या देशाच्या विकासात सर्वात महत्वाचे आहे पाणी हे महत्व राज्यकर्त्यांना ५० वर्षांपूर्वीच ओळखले आणि पुढची ५० ते ८० वर्षांपर्यंत सातत्याने पाणी मिळत राहील ह्यासाठी मलेशियाशी पाण्यासाठी करार केले. पहिला करार १९६१ तर दुसरा १९६२ साली केला. पहिल्या करारानुसार गोंगांग पुलाई आणि पोंटेन ह्या जोहोर राज्यातून वहाणार्‍या दोन नद्यांमधून पाणी घेण्याचा संपूर्ण हक्क २०११ पर्यंत देण्यात आला. तर पुढच्या वर्षी म्हणजे १९६२ मध्ये केलेल्या काररानुसार जोहोर नदीतून दररोज २५० दशलक्ष गॅलन पाणी घेण्याचा करार करण्यात आला. ह्यासाठी ३ सेन प्रती १००० गॅलन हा पाण्याचा दरही ठरला. त्यासाठी त्या त्या नदीवर पाणी साठविण्यासाठी धरण बांधणे, पाईप लाईन टाकणे हा खर्चही सिंगापूरलाच करावयाचा होता हा १० कोटी सिंगापूरी डॉलर्सचा खर्च केल्यानंतरही दररोज काही शुध्द केलेले पाणी जोहोर राज्यात अत्यल्प दरात उलट पुरवावयाचे होते.

पण असे थोडे महागडे असले तरी निश्‍चित पाण्याची उपलब्धता हा आयात पाण्यामुळे फार मोठा फायदा झाला. अर्थात एवढे करूनही ही गरज पूर्णपणे भागणार नव्हतीच. म्हणून तिसरा मार्ग अवलंबिण्यात आला.

३. समुद्राच्या पाण्याचे शुध्दीकरण (नि:क्षारीकरण) :


चारी बाजूला असलेला १६७ कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा, तेथे मुबलक प्रमाणात पाणी पण खारट, उर्ध्वपातनकरून ते शुध्द करणे व वापरणे हे शक्य, पण ही पध्द अतिशय महागडी, फक्त तेलामुळे श्रीमंत झालेल्या राष्ट्रांनाच परवडू शकेल अशी. शेवटी मेंब्रेन टेक्नॉलॉजी ही पध्दत विकसित झाली. ५० ते ६० डीग्री सेल्सीयस तापमानाला हॅपरबोला आकाराच्या मेंब्रेनचा वापर करून पाण्यापासून सर्व क्षार वेगळे करणे हे शक्य झाले. हे वेगळे केलेले क्षार, समुद्रात वेगवेगळ्या ठिकाणी खोलवर सोडण्यात येऊ लागले. त्या जास्तीचा क्षारतेचा तिथल्या वनस्पती व प्राणीजातीवर परिणाम होणार नाही ह्याचा अभ्यास व काळजीही घेण्यात आली.

हे शुध्द केलेले पाणी सरळ प्यायला वापरता येईल अशा दर्जाचे होते. ते तसे असल्याची प्रात्यक्षिकेही देशात ठिकठिकाणी करून दाखविण्यात आली. तरीही देशाची तहान प्रत्यक्ष गरज भागली नाही. आणखी पाणी हवेच होते. ते त्यांनी निर्माण केले पाण्याच्या पुनर्वापरातून ! न्यू वॉटर ह्या नावाने ते उत्पादन सुरू केले. त्याबद्दल जरा सविस्तरपणे बोलले पाहिजे.

४. न्यू वॉटर (पाण्याचा पुनर्वापराचा यशस्वी प्रयोग) :


पाण्याचा यशस्वीपणे पुनर्वापर करणारा सिंगापूर हा पहिला देश नाही. सिंगापूरच्या आधी अमेरिका, इंग्लंड, इस्त्राईल आणि अनेक युरोपीय देश हा पुनर्वापराचा प्रयोग करीत होतेच. शहरातील सांडापणी व मैलापाणी (अंतश: प्रक्रिया केलेले व काही प्रमाणात न केलेले ) हे नदीच्या पाण्यात मिसळत होतेच. त्यामुळे ह्या पाण्याचे शुध्दीकरण करून वापर हा सुरू झाला होता. WHO ह्या संघटनेने त्यासाठी १८० मानके निश्‍चित केलेली होती. सिंगापूरची योजना थोडी वेगळीच होती. हे सांडपाणी व मैलापाणी शुध्दीकरण करून ते इतर पाण्यात न मिसळता सरळ तसेच वापरता यावे ही त्यांची योजना होती त्यासाठी २ वर्षे प्रयोगशाळेत अनेक शास्त्रज्ञ अहोरात्र झटत होते. त्यासाठी ठिकठिकाणहून गोळा केलेल्या पाण्याच्या नमुन्यांवर २०००० पेक्षाही जास्त चाचण्या घेण्यात आल्या. मासे, उंदीर ह्या प्राण्यांवर हा शुध्द पाण्याचा काय परिणाम होतो हे ही अनेकदा तपासून घेतले. युनो आणि WHO च्या मानकांपेक्षाही कडक अशा मानकांवर चाचण्या घेऊन साध्या टिशुपेपरवर एकही डाग पडणार नाही इतपर्यंत सर्व चाचण्या यशस्वीपणे पार पडल्यावरच ह्या न्यू वॉटर ची घोषणा करण्यात आली. त्यातून दररोज २.२ दशलक्ष गॅलन पाणी तयार करणारा पहिला प्लँट २००७ मध्ये उभा राहिला त्यासाठी ड्युएट मेंब्रेन तंत्रज्ञान वापरण्यात आले. ह्या पाण्याची शुध्दता कायम आहे तशीच रहावी ह्यासाठी खालील कायमस्वरूपी उपाय अंमलात आणले गेले -

१. सर्व सांडपणी व मैलापाण्यावर जगभर पारंपारिक पध्दतीने जी प्रक्रिया केली जाते ती करण्यात येई. त्यातून इतरत्र हे पाणी पुनर्वापरासाठी पाठविले जाई, मात्र सिंगापूरने आणखी काही पावले टाकली.

२. हा दुसरा टप्पा म्हणजे मायक्रो फिल्टरेशन (MF) आणि अल्ट्रा (UF) ह्यामुळे पाण्यावर तरंगणारे सूक्ष्मकण (Collodal Particals) , जिवाणू व विषाणू तसेच इतर सूक्ष्मजीव (Protozoan Cysts) हे गाळून वेगळे केले जाऊ शकतात. फक्त विरघळलेले क्षार व सूक्ष्म जैविक रेणू (Molecules) तेवढेच पुढे जाऊ शकतात. त्यापुढची पायरी म्हणजे (RO) रिव्हर्स ऑस्मॉसिस. तेथील मेंब्रेन ही अधिक सूक्ष्म छिद्रे असलेली असते. त्यामुळे तेथून निघणारे पाणी हे जैविक व इतर सर्व विरघळलेल्या पदार्थांपासून मुक्त आणि अति शुध्द असते.

३. हे रिव्हर्स अस्मॉसिस मधून आलेल्या पाण्यावर शेवटची प्रक्रिया म्हणजे अल्ट्रा व्हॉयलेट (UV) ची प्रक्रिया. त्यातून जे काय सूक्ष्म जिवाणू वा विषाणू उरले असतील त्यांचा पूर्णत: नायनाट करणे.

इतक्या प्रमाणावर शुध्दीकरण केल्यावरही पाण्याचा दर्जा टिकविण्यासाठी सतत दक्षता पथकाचा पहारा व प्रयोगशास्त्रीय चाचण्यांची मालिका ही सक्तीची करण्यात आली. WHO च्या १५० मानकांऐवजी त्यांनी स्वत:ची २५० मानके तयार केली व त्यानुसार दर्जा तपासला जाऊ लागला.

लोकसहभागासाठी जागृती :


असे उत्तम गुणवत्तेचे पाणी तयार केल्यावरही ते वापरण्यासाठी जनतेची मानसिकता तयार व्हावी म्हणून अनेक अंगांनी प्रयत्न सुरू केले.

१. त्यातला पहिला प्रयत्न म्हणजे हे पाणी असरंक्षित पाणलोटातील पाण्यात मिसळणे आणि त्यावर पुन्हा शुध्दीकरणाची प्रक्रिया करून मग ते लोकांना पिण्यासाठी पुरविणे.

२. लोकप्रतिनिधी (MP) आणि पंतप्रधान ह्यांनी स्वत: हे पाणी पिऊन ते उत्तम दर्जाचे असल्याची लोकांना खात्री पटवणे. त्यासाठी जाहीर सभांमधून मुद्दाम लोकांसमोर हे पाणी पिऊन दाखविणे. त्याला पुरेशी प्रसिध्दी देणे

३. ह्या शुध्दीकरणाचे प्लँटवर वेगवगळ्या गटांच्या सहली आयोजित करणे.

४. प्रदर्शने, व्याख्याने, जाहिराती, पोस्टर्स, माहितीपत्रके ह्याद्वारे ह्या पाण्याबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचविणे.

५. शाळा कॉलेजांमधून ह्या पाण्याबद्दलची माहितीपत्रके वाटणे.

६. ह्या पाण्याबद्दलची माहिती देत रहाण्यासाठी सर्व प्रसिध्दी माध्यमांचा वापर करणे.

७. वेगवेगळ्या उद्योगांना हे न्यू वॉटर वापरण्यासाठी प्रवृत्त करणे.

८. ह्या पाण्याचे वापरासाठी (PPP) पब्लिक प्रायव्हेट पार्यनरशीप फर्मस् स्थापन करणे.

ह्या सगळ्या बाजूंनी केलेल्या प्रयत्नांमुळे २००८ पर्यंत हे पाणी वापरण्यासाठी जनमानस अनुकुल झाले. ठिकठिकाणी हे न्यू वॉटर चे कारखाने टाकले जाऊ लागले. २०११ पर्यंत एकूण पाण्याच्या गरजेपैकी ३० टक्के पाणी हे न्यू वॉटर असेल इतके हे वापराचे प्रमाण वाढले.

सिंगापूरची जनता आणि तिथले राज्यशासन ह्यांच्या संयुक्त प्रयत्नामुळे त्यांना न्यू वॉटर साठीचे हे यश मिळू शकले. आपल्या पाण्याच्या गरजेपैकी ५० टक्के गरज ही ह्या न्यू वॉटर द्वारा भागविली जावी ह्या उद्दिष्टाकडे ही वाटचाल सुरू आहे.

२०६२ मध्ये पाणी आयात करण्याचा दुसरा करार संपेल तेव्हा पाणी आयातीची गरजच पडू नये. त्यावेळच्या लोकसंख्येला तसेच उद्योगधंद्यांना पुरेल एवढे पाणी देशातच निर्माण व्हावे असे हे नियोजन आहे.

तसे म्हटले तर देशाची गरज भागेल एवढे पाणी त्यांचे जवळ आजही आहे पण ते येथे समाधानी नाहीत, ते म्हणतात पाण्याचा प्रत्येक थेंब आणि प्रत्येक डॉलर आणि पाण्याबद्दलची प्रत्येक कल्पना ही अत्यंत मौल्यवान आहे. सिंगापूरसाठी पाणी हा प्रश्‍नच राहू नये म्हणून हा एक आणि एकमेव मार्ग आहे. आज, उद्या आणि भविष्यकाळात केव्हाबी..... उत्तर हेच असणार आहे.

जेथे पाण्याची कमतरता आहे अशा ठिकाणी पाण्याचे शास्त्रशुध्द व काटेकोर व्यवस्थापन हे अतिशय महत्वाचे आहे. शिवाय प्रदूषणापासून ते पर्यावरणीय बदलापर्यंत सर्वच गोष्टींचा ह्या पाण्याचे उपलब्धतेवर परिणाम होतो तेव्हा त्या प्रश्‍नाचे गांभीर्य आणखीच वाढते. अशावेळी सिंगापूर सारख्या छोट्या राष्ट्राने पाण्याच्या समग्र व्यवस्थापनाचे जे मॉडेल तयार केले आहे ते जगात इतरत्रही राबवावे यासाठी WHO ह्या संघटनेने सिंगापूर बरोबर करार करून तसा प्रयत्न चालविला आहे.

पर्यावरण, शिक्षण, लैंगिकसमानता व बालमृत्यूचा प्रश्‍न आणि दारिद्र्य निर्मूलन ह्या क्षेत्रात काम करणार्‍यांसाठी एक महत्वाचा संदेश आहे तो म्हणजे सांडपाणी व मैलापाणी ह्यांचे शुध्दतेकडे लक्ष द्या. त्याचेपासून पिण्याचे पाणी प्रदूषित होऊ देऊ नका, हे संभाळलेत तर इतर प्रश्‍न आपोआप संभाळले जातील.

आज आपण नद्या आणि तलाव ह्यांचा जलसाठे म्हणून वापर करतो, तेच पाणी पुरवितो. त्यामार्गानेच पुर नियंत्रित करण्याचाही प्रयत्न करतो. मूलभूत पाण्याचा प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला काही पावले पुढे चालावे लागले. नवनिर्मितीच्या दृष्टीने ही पाण्याची शक्ती वापरण्यासाठी स्वत:ला तयार करावे लागले त्यातून पाणी उपलब्ध तर होईलच व त्यातून आनंद आणि उत्साह जलक्रिडेपासून ते करमणुकीपर्यंत अनेक प्रकारे पाण्याचा वापर करता येणे शक्य आहे.

एखाद्या प्रश्‍नावर अहोरात्र मेहनत केल्यानंतर जेव्हा यश मिळते तेव्हा ते यश अशा शब्दात व्यक्त होते.

आपल्या देशातच्या संदर्भात ह्याचा विचार करावयाचा तर निसर्गत: परिस्थिती आपल्याला किती अनुकूल आहे आणि आपल्या जीवनशैलीचा विचार करता हे यश मिळविण्यात किती अडथळे आहेत याचे केवळ कल्पनाचित्र समोर आणले तरी दडपण येते.

सर्वांना पिण्यासाठी शुध्द पाणी ह्या मूलभूत संकल्पनेपर्यंत पोहोचण्यासाठी, ती शुध्दता निर्माण करणारी सयंत्रे बसविण्यासाठी, त्याची काटेकोरता सांभाळण्यासाठी, आपल्या गुणवत्तेचा समाजमनावर शिक्का निर्माण करण्यासाठी, अशुध्दता, अस्वच्छता, सांडपाणी व मैलापाण्याची परिपूर्ण प्रक्रिया हे सगळे करावयाचे तर प्रचंड पैसा लागणार आहे. तोही मिळू शकेल, उभारता येईल. पण हे करण्याची मानसिकता, कठोरता. धडाडी, परिश्रम आणि परिपूर्ण बिनचुततेचा आग्रह हे केव्हा आणि कसे निर्माण होईल ?

समाजमनाला एखादी गोष्ट पटविणे सोपे नसते. परंतु सातत्यपूर्ण अविरत आणि प्रामाणिक प्रयत्नातून हे शक्य कोटीत आणता येते. सिंगापूरने हे करून दाखविले आहे. दोन थेंब पाण्याची गरज ही एक थेंब पाणी मिळवून व त्याचे ४-५ वेळा पुनर्वापरातून ती गरज भागविली आहे. काटेकोरपणे शुध्दता संभाळून नवी मानके व मानदंड तयार केले आहेत.

त्यामुळेच स्टॉकहोम पुरस्कार विजेते प्रा.असिन विश्वाास म्हणतात तेव्हा त्यांचे विधानातील सत्यता आधोरेखितच होते, जर जगात कुठेही पाण्याची टंचाई किंवा दुर्भिक्ष जाणवत असेल तर.... त्यामागचे खरे कारण पाणी उपलब्ध नसणे हे नाही. चुकीचे व्यवस्थापन किंवा व्यवस्थापनाबद्दलची अनास्था हेच कारण आहे.

 

देशोदेशीचे पाणी

इस स्टोरी को एक जगह पढ़ने के लिये नीचे दिये गये लिंक पर क्लिक करें

1

देशोदेशीचे पाणी

2

देशोदेशीचे पाणी

3

देशोदेशीचे पाणी - 5

 

सम्पर्क


मुकुंद धाराशीवकर, धुळे -(दू : ०२५८२ २३६९८७)

Path Alias

/articles/daesaodaesaicae-paanai

Post By: Hindi
×