छोट्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे


Save Water - पाणी वाचवा प्रकल्प


कोणी कवी लिहून गेले - छोट्याश्या विषयात आशय कधी, मोठा किती आढले, याठिकाणी ज्याविषयी माहिती देत आहोत, तो प्रकल्प या उक्तीचे तंतोतंत उदाहरण आहे ! भारताच्या 2/3 भूभागावर वर्षानुवर्षे पाणीटंचाई जाणवते आहे. लोकसंख्या वाढ, कारखानदारी आणि आधुनिक शेती यामुळे पाण्याची गरज सतत वाढत असताना पावसाचे प्रमाण आहे तेच आहे ! परिणाम असा की पाण्याचा वापर काटेकोर नियोजनाने केला तरच सर्वांच्या किमान गरजा भागू शकतील याची आता जाणीव सर्वांमध्ये पसरू लागली आहे. मात्र ते कसे साधता येईल त्यावर एकमत होवू शकत नाही. राजकारण, सामाजिक परंपरा, अर्थकारण, स्थलांतर अश्या विविध सामुदायिक व्यवहारांवर परिणामकारक नियंत्रण ठेवणे शक्य होत नसते. अशाच ठिकाणी तंत्रज्ञान मदत करू शकते. प्रस्तुत प्रकल्पामध्ये असाच साध्यासोप्या तंत्रज्ञानाच्या मदतीने लाखो लिटर पाणी वाचवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

आपला नेहमीच्या वापरातला नळ अर्थात तोटी हा या तंत्रज्ञानातला महत्वाचा घटक आहे. बहुमजली इमारतींची उंची जेवढी जास्त, तेवढा खालच्या मजल्यांवर तोटीतून पाणी वाहण्याचा वेग जास्त व त्यामुळे वापराबरोबरच वाया जाणार्‍या पाण्याचे प्रमाणही जास्त. उदाहरण - 10 मजली इमारतीच्या 10 व्या मजल्यावर एका मिनिटात 3 लिटर पाणी येत असेल तर 5 व्या मजल्यावर ते 8 लिटर पर्यंत आणि तळमजल्यावर 12 - 14 लिटर एवढ्या प्रमाणात येत असते. प्रत्यक्ष हात धुण्यासाठी लागणारे म्हणजे वापरले जाणारे पाणी तिन्ही ठिकाणी सारखेच असते - समजा 2 लिटर - आणि उरलेले पाणी वाया जात असते. थोडक्यात म्हणजे इमारतीच्या उंचीच्या वाढत्या प्रमाणात आपल्या नकळत जास्त जास्त पाणी वाया जात असते.

असे वाया जाणारे पाणी वाचवण्यासाठी केलेल्या प्रयोगांमधून शोधून काढलेले साधन म्हणजे Flow regulator अर्थात प्रवाह नियंत्रक एकाच चकतीच्या रूपात आपले काम करते. तोटीच्या मागे ही चकती बसवली म्हणजे पाण्याचा दाब कितीही जास्त असला तरी तोटीतून वाहणारे पाण्याचे प्रमाण साधारणत: मिनिटाला 2 लिटर एवढेच रहाते. ‘वापरण्यासाठी आवश्यक तेवढे पाणी मिळते आणि वाया जाणारे पाणी अडवले जाते’. असे काम हे साधन करते. ‘पाणी वाचवा’ मोहिमेचे हे बलस्थान आहे. या तंत्राचा व्यावहारिक उपयोग कसा करता येईल ते हा प्रकल्प सांगतो - करतो आहे.

‘प्रवाह नियंत्रक’ कसा बसवावा ?


हे तंत्रज्ञान वापरणे अत्यंत सोपे आहे, त्यासाठी विशेष कौशल्याची गरज नसते. तीन टप्प्यांमध्ये हे काम होते -

1. तोटी नळापासून वेगळी करा.
2. तोटीच्या नळाकडील तोंडावर चकती बसवा.
3. तोटी पुन्हा पहिल्या प्रमाणे नळाला जोडा.

प्रवाह नियंत्रकाचा वापर कोठे करता येईल ?


तत्वत: याचे उत्तर आहे की ‘सर्वच तोट्यांवर ही चकती बसवावी.’ खर्चाचा विचार केला आणि पाणी वाया जाण्याचे प्रमाण अभ्यासले तर शाळा - महाविद्यालये, मोठी कार्यालये, मंगल कार्यालये यांसारख्या सार्वजनिक वावराची ठिकाणे डोळ्यांसमोर येतात. रोटरी क्लब ने महानगरपालिकांच्या शाळांपासून हा प्रकल्प राबवण्याचे ठरवले आहे. विद्यार्थीदशेत झालेला हा संस्कार त्या मुलांना पुढे आयुष्यभर मार्गदर्शन करेल असाही हेतू त्यात आहे. दि. 18 जानेवारी 2017 यादिवशी डॉ. वसंतराव पाटील माध्यमिक विद्यालय, शुक्रवार पेठ या शाळेमध्ये मा. प्रांतपाल प्रशांत देशमुख यांच्या शुभहस्ते प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

नंतरच्या 2 -3 दिवसात शाळेच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेवून शाळेतील सर्व 61 तोट्यांमध्ये ‘प्रवाह नियंत्रक’ चकत्या बसवून टाकल्या. आतापर्यंत विविध क्लब्जच्या माध्यमातून काही शाळा आणि काही निवासी संकुलांमध्ये मिळून सुमारे 3000 चकत्या बसवून झाल्या आहेत. रोज 50- 75 संख्येने हे प्रमाण वाढत चालले आहे. एका शाळेत 500 विद्यार्थी आहेत आणि प्रत्येकामागे रोज 10 लिटर्स पाणी वाचेल असे मानल्यास रोज 5000 लिटर, प्रमाणे वर्षातले 220 दिवस शाळेत पाणी वाचले तर 11,00,000 लिटर एवढे पाणी एका शाळेत वाचेल. म.न.पा.च्या सुमारे 300 शाळांमध्ये जरी पहिल्या फेरीत या चकत्या बसवल्या तरी केवढी बचत होईल याची कल्पना करा !

रोटरी क्लब पुणे रॉयलचे अध्यक्ष उदय कुलकर्णी यांनी पुढाकार घेवून या प्रकल्पाचा पाठपुरावा केला. त्यांना रो. क्लब पुणे साऊथचे अध्यक्ष सुधांशु गोरे यांच्याप्रमाणे रॉयलचे माजी अध्यक्ष जयंत राजपूत यांनी जोरदार साथ दिली. सुमारे 20 क्लबांनी यासाठी आपापल्या परिसरातील शाळांबरोबर संपर्क साधून कामास सुरूवात केली आहे. डिस्ट्रिक्ट डायरेक्टर रो. पीपी सतीश खाडे यांच्या मार्गदर्शनानुसार हा प्रकल्प प्रगती करत असून उद्दिष्ट्यपूर्ती लवकरच होईल असा विश्वास वाटतो.

Path Alias

/articles/chaotayaahai-vaisayaata-asaya-kadhai-maothaa-kaitai-adhalae

Post By: Hindi
×