चंद्रपूरकरांची संमेलनावरील प्रतिक्रिया


भरपूर पाऊस कोसळतो म्हणून पाण्याच्या वापराबाबत निश्चिंत असणाऱ्या चंद्रपूर - गडचिरोली परिसरात भारतीय जल संस्कृती मंडळ औरंगाबादच्या 6 व्या अखिल भारतीय जलसाहित्य संमेलनाने अंतर्मुख केले आहे. चंद्रपूर - गडचिरोली जिल्ह्यातील 1983 साली सुरू झालेल्या पहिल्या राजीव गांधी अभियांत्रिकी महावलिद्यालयने यजमानपद स्वीकारून दुर्गम व मागासलेल्या भागातील उत्साही दायित्वाचे दर्शन घडविले.

भरपूर पाऊस कोसळतो म्हणून पाण्याच्या वापराबाबत निश्चिंत असणाऱ्या चंद्रपूर - गडचिरोली परिसरात भारतीय जल संस्कृती मंडळ औरंगाबादच्या 6 व्या अखिल भारतीय जलसाहित्य संमेलनाने अंतर्मुख केले आहे. चंद्रपूर - गडचिरोली जिल्ह्यातील 1983 साली सुरू झालेल्या पहिल्या राजीव गांधी अभियांत्रिकी महावलिद्यालयने यजमानपद स्वीकारून दुर्गम व मागासलेल्या भागातील उत्साही दायित्वाचे दर्शन घडविले.

सहावे अखिल भारतीय जलसाहित्य संमेलन 4 व 5 डिसेंबर 2010 रोजी सर्वादय मंडळाच्या सरदार पटेल महाविद्यालयात नियोजित होते. तारखात बदल करून 18 व 19 डिसेंबरला अधिवेशन ठरले. पुढे जागेत बदल होऊन राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय स्थळ ठरले. दोन्ही संस्थांचे अध्यक्ष माजी केंद्रिय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे असल्यामुळे हे बदल सहज पचवता आले.

मॅगासेसे पुरस्कार विजेते राजेंद्रसिंह, जलतज्ज्ञ डॉ.माधवराव चितळे, जलतज्ज्ञ डॉ.सुधीर भोंगळे, डॉ.दि.मा.मोरे व आनंदवनाचे शिल्पकार डॉ.विकास आमटे एकाच व्यासपीठावर आल्यामुळे संमेलनाची उंची वाढली. ही किमया शांताराम पोटदुखे यांचे नेतृत्त्व व प्राचार्य डॉ.किर्तीवर्धन दीक्षित यांचे अनुपम संयोजन यामुळे घडली, अरूणा सबाने यांनी समन्वयक म्हणून काम केले.

पाहुण्यांना सर्वप्रथम जाणवला तो हिरव्यागार वृक्षराजीने नटलेला महाविद्यालयाचा भव्य परिसर. गेल्या 27 वर्षांपासून लावलेली वृक्षराजी आपल्या सावलीचे वरदान घेऊन डेरेदार झाली आहे. महाविद्यालयाच्या परिसरात इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअर्सच्या इमारतीची कोनशिला बसवण्यात आली वाटते असा निर्देश करीत डॉ. माधवराव चितळे यांनी संयोजक प्राचार्याकडे कौतुकाचा कटाक्ष टाकला.

सुनियोजित उद्घाटन समारंभात उद्घाटक राजेंद्रसिंहजी आकर्षण होते, याच महाविद्यालयात दोन वर्षापूर्वी ते आले होते. वृक्षमित्र मोहन हिराबाई हिरालाल सोबत होते. मध्यंतरी चंद्रपूरच्या बंडू धोतरे प्रणित इकोप्रोने अदानी पॉवर कंपनीच्या विरोधात आंदोलन छेडले. त्यावेळी राजेंद्रसिंहजी पांडवांच्या मदतीला धावून येणाऱ्या श्रीकृष्णासारखे आले. बलाढ्य पॉवर कंपनीला काढता पाय घ्यावा लागला. त्या पार्श्वभूमिवर राजेंद्रसिंहजींचे स्वागत झाले.

उद्घाटनपर भाषणानंतर डॉ.माधवराव चितळे यांच्या सूचनेवरून नदीनीती यावर त्यांनी पुन्हा स्वतंत्र विचार मांडले. कसलेल्या संशोधक अभ्यासकाने वर्ग घ्यावा त्याप्रमाणे राजेंद्रसिंहजी व्यासपीठावरून उतरून खाली आले. सभागृहात वक्ता-श्रोता अंतर कमी करीत त्यांनी संवाद साधला. राजेंद्रसिंह जलमग्न असल्यामुळे सर्वांचे ज्येष्ठ सल्लागार व प्रमुख प्रबोधक म्हणून भारतात ख्यात आहेत.

स्वागत आणि स्वागतपर भाषणाचा उपचार झाला. डॉ.किर्तीवर्धन दीक्षित, मदन धनकर व शांताराम पोटदुखे यांनी स्वागत करून विचार मांडले. संमेलनाचे अध्यक्ष आनंदवनाचे शिल्पकार डॉ.विकास आमटे यांचे आटोपशिर पण मननीय भाषण झाले. ते, पत्नी डॉ.भारती आमटे यांचेसह आले होते. पाण्याचे दुर्भिक्ष्य ही प्रारंभी आनंदवनाची समस्या होती. बाबा आमटे यांनी पाण्यासाठी माळरानावरील कातळ फोडून जलसाठे तयार केले.

डॉ. विकास आमटे चौफेर व शाश्वत विकासाचा विचार करतात. प्रतिभा व परिश्रम यांच्यासोबत जगभरातील अनुभवांचे संचित्र ग्रंथरूपाने त्यांनी बाळगले आहे. गेल्या 30 वर्षातील आनंदवनाच्या प्रगतीचे ते शिल्पकार आहेत. जलसंचय, गृहबांधणी, शेती, मस्त्यशेती, युवा प्रबोधन, वस्त्र स्वावलंबन, दुग्धोत्पादन, वृक्ष संवर्धन याबाबत नव्या संकल्पना त्यांनी आनंदवनाला दिल्या. सेवेला दयेच्या दास्यातून मुक्त करण्याच्या संग्रामाचा हा भाग आहे. पाण्यासंबंधीची वस्तुस्थिती व उपचार यावर ते निकडीने बोलले.

तलावांचे जलव्यवस्थापन यावर दुपारी परिसंवाद झाला. अध्यक्षस्थानी आमदार शोभाताई फडणवीस होत्या. त्यांचे वास्तव्य झाडीपट्टीत आहे. झाडीपट्टीतील सावली मतदार संघाचे नैतृत्व विधान सभेत त्यांनी सतत 20 वर्षे केले. आता त्या विधान परिषदेवर आल्या आहेत. अॅड. एकनाथ साळवे माजी आमदार, अभियंता श्रीकांत डोईफोडे, प्रा.डॉ.उल्हास फडके व दत्तोपंत मामीडवार यात सहभागी होते. डॉ. उल्हास फडके भंडारा येथील. तलावांचा त्यांचा विशेष अभ्यास, तलावांची वैशिष्ट्ये व सद्यस्थिती यांचे फायदे-तोटे त्यांनी गावाच्या नावानिशी मांडले. लोकप्रतिनिधी किती जागरूक अभ्यासक असतो हे शोभाताईंनी दाखवून दिले. त्यांचे अध्यक्षीय भाषण म्हणजे अभ्यासकांसाठी उघडलेले पुस्तक होते.

महाराष्ट्रातील मरणासन्न नद्या हा परिसंवाद श्रवणीय झाला तो डॉ.सुधीर भोंगळे यांच्या भाषणाने. चंद्रपूर - गडचिरोली जिल्ह्यातील पाणी समस्येसाठी जीवाचे रान करणारे अन् मान मोडून राबणारे असा त्यांचा परिचय आहे. त्यांची पुस्तके सुशिक्षितांजवळ आहेत. श्रोत्यांनी तुडुंब भरलेली सभागृहे या परिसरात त्यांना सतत दाद देत आहेत. प्रा.एस.एन.कुलकर्णी व अभियंता विवेक वरंभे यांनीही आपले विचार मांडले.

पहिल्या दिवशी सायंकाळी संपन्न कवी संमेलनात अध्यक्षस्थानी अभियंता किशोर पाठक होते. डॉ. मनोहर नरांजे व प्रसेनजित गायकवाड यांनी खुशखुशीत संचालन केले. कवी संमेलनाच्या संचालकांना आपल्या कवितासोबत इतर कवींच्या कवितांचा रतीब घालावा लागतो. मनोहर नरांजे व प्रसेनजित गायकवाड यांनी अन्वर्थक कविता सादर करून संमेलनाचा रंग खुलवला. श्रीपाद प्रभाकर जोशी, माधुरी आशिरगडे, अजय चिकाटे, डॉ.पद्मरेखा धनकर-वानखेडे यांनी प्रत्येकी दोन कविता सादर केल्या. पाणी हा विषय कवी किती लिलया हाताळू शकतात याचे ते प्रात्यक्षिक होते.

जलसाहित्य स्वरूप आणि व्याप्ती हा परिसंवाद अध्यक्ष डॉ. दत्ता देशकर यांच्या अभ्यासपूर्ण भाषणाने रंगला. कवी संमेलनासाठी आलेले किशोर पाठक विस्ताराने पण विषयाला धरून अनुभवाचे बोल सांगून गेले. डॉ. जया द्वादशीवार यांनी आपले भाषण समर्पक दाखले, नेमक्या पुस्तकांची नावे देऊन सजीव केले.

दुसऱ्या दिवशी समारोपापूर्वी डॉ. माधवराव चितळे यांचे स्वतंत्र भाषण झाले. जल संचय व जल वितरण यासाठी भारताचे मानचित्र त्यांनी उभे केले. पाण्याच्या प्रश्नाकडे राष्ट्रीय दृष्टी बाळगून विचार करण्याची गरज असल्याचे साधार विवेचन त्यांनी केले. वर्धा - वैनगंगेचे खोरे पाण्यासाठी संपन्न असून त्याचा उपयोग शेती व उद्योग यासाठी होऊ शकतो. पाण्याचे नीट नियोजन केले तर समृध्दी जवळ आहे असा विश्वास त्यांनी श्रोत्यात जागवला. संपूर्ण भाषण दिशादर्शक ठरावे असे झाले. डॉ.माधवराव चितळे जल आयोगाचे अध्यक्ष असतांना याच सभागृहात त्यांचे भाषण झाले. त्यांच्या भाषणात कार्यकर्त्यांचे उद्बोधन होते. सामान्य माणसाला दिलासा होता. त्यांचे भाषण संमेलनाचा शिखर बिंदू होता.

भारतीय जलसंस्कृती मंडळ औरंगाबादचे अध्यक्ष डॉ. दि. मा. मोरे यांनी पहिल्या दिवशी प्रास्ताविकात व दुसऱ्या दिवशी डॉ. चितळे यांच्या भाषणापूर्वी केलेल्या उद्बोधनात संस्थेसंबंधी सविस्तर बोलले. संस्थेची रचना व त्यात सहभागी होण्यासंबंधी तपशीलवार विवेचन केले. महाराष्ट्रत संस्थेचे सभासद मोठ्या प्रमाणावर नोंदण्याची गरज आहे. पाच स्तरातून संस्थेचे चालणारे काम कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर केवळ सामावून घेणारेच नाही तर त्यांना प्रत्यक्ष कार्यात सहभागी होण्यासाठी उद्युक्त करणारे आहे.

भारतीय जल संस्कृती मंडळाची आमसभा पहिल्याच दिवशी सायंकाळी झाली. संस्थेच्या कार्याचा आढावा डॉ. दि. मा. मोरे यांनी समर्थपणे घेतला. नवे अध्यक्ष म्हणून डॉ.दत्ता देशकर यांचे नाव त्यांनीच सुचविले. खेळाडू वृत्तीने सभा पार पडली. डॉ. दत्ता देशकर नवे अध्यक्ष यांनी सर्वांचे आभार मानले.

समारोपात स्वागताध्यक्ष शांताराम पोटदुखे यांचे हृदयस्पर्शी भाषण झाले. चंद्रपूर - गडचिरोली परिसरातील सार्वजनिक जीवन संपन्न व्हावे ही त्यांची तळमळ आहे. त्यासाठी ज्ञानसाधनेची कास धरीत सर्वांनी एकोप्याने कामे करावे अशी वांछा बाळगून प्रत्येक उपक्रमामागे मायेने छत्र धरणारे शांताराम पोटदुखे यांचे नेतृत्त्व संमेलनाची खरी प्रेरणा होती. पाचवे संमेलन जळगाव येथे संपन्न झाले. जळगावहून केवळ फोनवर आलेल्या निरोपावर शांतारामजींनी होकार भरला, संमेलन यशस्वी झाले. चंद्रपूर - गडचिरोली जिल्ह्यात यादृष्टीने वातावरण तयार करून मंच उभा झाला तर संमेलनाची योग्य फलश्रुती होईल.

लेखक : प्राचार्य मदन धनकर - (भ्र : 9881303414)

Path Alias

/articles/candarapauurakaraancai-sanmaelanaavaraila-parataikaraiyaa

Post By: Hindi
×