चला शिकुया सामान्य विज्ञान पाण्याचे


अशा व इतर सामाजिक व वैज्ञानिक पैलूंवर क्रमाक्रमाने आपण माहिती करून घेणार आहोत. या शिवाय पाण्यासंदर्भात जिज्ञासा निर्माण व्हावी या हेतूने प्रत्येक अंकात आपणास त्या विषयावर आधारीत एक प्रश्‍न विचारला जाईल ज्याचे अचूक उत्तर त्यापुढील अंकात प्रसिध्द केले जाईल. आपले उत्तर आपण या उत्तरशी पडताळून पाहू शकाल.

मुलांनो, संपला एकदाचा उन्हाळा म्हणून हुश्श करत आपण सारे खूष झालेले होतो. पण पावसाळा सुरू होऊन दोन महिने लोटलेत. पण पावसाचा पत्ताच नाही. सर्व आबाल वृध्द ग्रामीण भागातील असोत वा शहरी भागातील - अगदी मेटाकुटीस आलेले आहेत, हो ना ? सर्वांना एकच चिंता. ती म्हणजे पावसाळा भर मध्यावर आला पण पर्जन्यराजा काही प्रसन्न व्हावयाला तयार नाहीत. देशातील लाखो लोकांवर मैल मैल अंतरावरून केवळ पाणी मिळवण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. आपल्या आजूबाजूलाही आपण हीच परिस्थिती प्रत्यक्षात अनुभवत असतो. पाऊस नाही, विहीरींनी तळ गाठला, नदी, तलाव, धरणे कोरडी पडलीत अशा बातम्या वृत्तपत्रात तसेच दूरदर्शनवर सतत झळकतांना आपण पाहतो. पाण्याच्या साठ्यांअभावी अनेक गावांच्या / शहरांच्या नगरपालिकांनी एक दिवसाआड, दोन दिवसाआड, आठ दिवसांनी काही ठिकाणी त्याहीपेक्षा जास्त कालावधीनी पाणी पुरवठ्याचे धोरण अंगिकारले आहे. या परिस्थितीत कसे निभायचे हे वर्ष असा गंभीर प्रश्‍न सर्वांना न पडला तरच नवल. प्यायला तरी पाणी शिल्‍लक राहील काय ? शेतीचे काय होईल ? शेती पिकली नाही तर धान्य व भाजीपाला कुठून मिळणार ? हे सारे प्रश्‍न आ वासून पुढे आले आहेत. एकूणच, पावसाने अशीच दडी मारली तर किती भीषण परिस्थिती निर्माण होईल याची कल्पनाही करवत नाही, खरे ना ?

मुलांनो, धास्तावलात ? खरे आहे. परिस्थितीच तशी आहे. पण हतबल होऊन कसे चालेल ? ही परिस्थिती आपल्या देशावर काय पहिल्यांदाच आली आहे ? राजस्थान सारख्या काही राज्यांत तर अतिशय कमी पाऊस पडतो. तरीही ते लोक वर्षानुवर्षे आनंदात जीवन जगतात. पण यासाठी त्यांनी आपल्या परंपरागत ज्ञानाच्या अनुभवावर स्वत:च्या सवयींमध्ये योग्य ते बदल करून घेतले म्हणून त्यांना ते शक्य झाले. आपल्या या शेजार्‍यांकडून आपल्याला अनेक धडे घ्यावे लागणार आहेत. तरच आपण कमी पावसाच्या वर्षांस समर्थपणे सामोरे जाऊ शकू.

आज इंटरनेटचे युग आहे. जरा त्यावर शोध घ्या. मागील 100 वर्षांच्या पावसाची माहिती मिळवा. आपल्याला असे दिसेल की त्यातील काही वर्षे चांगल्या पावसाची तर बरीच वर्षे ही कमी पावसाची होती ज्यातील काही वर्षे तर भीषण दुष्काळाची देखील होती. कोणत्या भागात किती पाऊस पडतो हेही तपासा. आपले आई वडील, आजी आजोबा याबद्दल खूप काही सांगतील.

मुलांनो, लोकसंख्या वाढ व वाढत्या औद्योगिकरणामुळे पाणी उपलब्धता दिवसेंदिवस अधिक मुष्कीलीची बाब ठरत आहे. जलस्त्रोत मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत आहेत. पूर्वी प्रत्येक तलावाच्या काठी एक गाव होते. म्हणूनच गाव तेथे तळे ही म्हण रूढ झाली. आज बहुतांश तलावांची व पुरातन जलस्त्रोतांची अवस्था दयनीय झाली आहे. तळी केव्हाच गाळाने भरली आहेत. शिवाय त्या संदर्भातील आरोग्यविषयक दृष्टीकोनही आता नष्ट पावला आहे. म्हणऊन ती आता तळी न राहता रोग प्रसाराची केंद्रे झाली आहेत. प्रातर्विधी ते जनावरांच्या स्वच्छतेपर्यंत या तलावांचा वापर केला जातो. गावातील सांडपाण्याची गटाचे त्यात आणून सोडली जातात आणि तलावांच्या पवित्र क्षेत्राचा अधिकाधिक दुरूपयोग कसा करता येईल याकडे लोकांचे विशेष लक्ष असते. अशा परिस्थितीत आपले पाण्याचे स्त्रोत संपूर्ण स्वच्छ व पिण्यालायक कसे राहतील याची खबरदारी घेणे तर आवश्यक झालेले आहेच पण त्याचबरोबर या पाण्याचा सदुपयोग करण्यावर आपले सुखद भविष्य अवलंबून राहणार आहे.

पाण्याशिवाय गावाचा राज्याचा व देशाचा विकास होऊ शकत नाही हे आपल्याला समजले आहे व ही पाणी उपलब्धता टिकवून ठेवण्यासाठी जलसाक्षरतेची मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविणे आवश्यक झालेले आहे. 1.पाण्याचा काटकसरीने वापर 2. पाण्याचे पुनर्भरण 3. पाण्याचा पुनर्वापर 4. पाण्याचे शुध्दीकरण हे चार जलसाक्षरतेचे महत्वाचे मुद्दे आहेत.

पाण्याबाबत जास्तीत जास्त माहिती आपण जमवली व त्यानुसार आपण आपल्या जीवन पध्दतीत बदल केले तर अशा बिकट परिस्थितीचा समर्थपणे सामना करू शकणार आहोत. यासाठी आपल्याला पाण्याची उपलब्धता, त्याचे गुणधर्म, त्याची दुर्भिक्षता, त्यामागील कारणे व आवश्यक उपाययोजना याबाबत माहिती करून घेणे अत्यंत गरजेचे ठरते. या लेखमालेतून पाण्याच्या विविध पैलूंबाबत सामाजिक व वैज्ञानिक दृष्टीकोनातून माहिती करून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.

या पुढील प्रत्येक अंकात पाण्यासंदर्भातील अनेक पैलुंबाबत आपण या सदरातून माहिती करून घेणार आहोत. त्यापैकी काही विषय पुढे दिले आहे. जसे -

1. पृथ्वीवर पाणी कोठे कोठे साठले जाते.
2. पृथ्वीवर पाणी किती आहे.
3. जलचक्र काय आहे.
4. पाऊस - एक मूल्यवान स्त्रोत
5. जलोत्सारण क्षेत्र म्हणजे काय.

अशा व इतर सामाजिक व वैज्ञानिक पैलूंवर क्रमाक्रमाने आपण माहिती करून घेणार आहोत. या शिवाय पाण्यासंदर्भात जिज्ञासा निर्माण व्हावी या हेतूने प्रत्येक अंकात आपणास त्या विषयावर आधारीत एक प्रश्‍न विचारला जाईल ज्याचे अचूक उत्तर त्यापुढील अंकात प्रसिध्द केले जाईल. आपले उत्तर आपण या उत्तरशी पडताळून पाहू शकाल.

सम्पर्क


श्री. गजानन देशपांडे, औरंगाबाद

Path Alias

/articles/calaa-saikauyaa-saamaanaya-vaijanaana-paanayaacae

Post By: Hindi
×