चालते पाणी थांबते करा!


दैनिक लोकसत्तामधील त्यांचे जलविषयक वार्ताहार श्री. अभिजीत घोरपडे यांचा धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामधील श्री. अमरीश पटेल यांनी घडवून आणलेल्या जलक्रांतीबद्दलचा लेख वाचण्यात आला. त्यामुळे निश्चितच अस्वस्थ झालो. संपूर्ण महाराष्ट्र पाण्याच्या दुष्काळात तडफडत असतांना शिरपूर तालुका मात्र दिमाखाने जलसुख अनुभवित असल्याचे वर्णन त्यांच्या लेखात वाचायला मिळाले.

दैनिक लोकसत्तामधील त्यांचे जलविषयक वार्ताहार श्री. अभिजीत घोरपडे यांचा धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामधील श्री. अमरीश पटेल यांनी घडवून आणलेल्या जलक्रांतीबद्दलचा लेख वाचण्यात आला. त्यामुळे निश्चितच अस्वस्थ झालो. संपूर्ण महाराष्ट्र पाण्याच्या दुष्काळात तडफडत असतांना शिरपूर तालुका मात्र दिमाखाने जलसुख अनुभवित असल्याचे वर्णन त्यांच्या लेखात वाचायला मिळाले. एक-दोन मित्रांसमोर ही अस्वस्थता व्यक्त केली आणि तिथे जलसंधारणासाठी नक्की काय पावले उचलली जात आहेत हे पाहण्याची उत्कंठा जागृत झाली. माझे जलसंवादचे संपादक मित्र श्री.प्रदीप चिटगोपेकर, भारतीय जलसंस्कृती मंडळाचे श्री. गजानन देशपांडे व धुळे येथील जलतज्ज्ञ श्री. मुकुंद धाराशिवकर यांच्यासमवेत तिथे झालेल्या कामाची प्रत्यक्ष तपासणी करण्याकरिता शिरपूरला जाऊन धडकलो.

शिरपूरला एक अवलिया राहतो. त्या महापुरूषाचे नाव श्रीमान अमरीशभाई पटेल असे आहे. शिरपूर परिसरात कोणतीही चांगली गोष्ट घडते ती या महाभागामुळेच. तालुक्यातील राजकारणावर, समाजकारणावर व अर्थकारणावर या माणसाची जबरदस्त छाप आहे. प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीची ही व्यक्ती प्रवर्तक आहे. संचालक मंडळाच्या सहकार्यामुळे सूतगिरणीच्या नफ्यातून दरवर्षी दोन कोटी रूपये निव्वळ जलसंधारणाच्या कामासाठी बाजूला काढून ठेवणारी हीच ती सूतगिरणी.

चांगल्या माणसांना चांगली माणसे भेटणे हा दुग्धशर्करा योगच समजावयास हवा. श्री. सुरेश खानापूरकर (निवृत्त ज्येष्ठ भूवैज्ञानिक, महाराष्ट्र राज्य) यांना श्री. अमरीशभाईंनी आपल्या नवरत्न दरबारात सामावून घेतले आहे व त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर परिसरात ही जलक्रांती रंगरूप धारण करीत आहे. आपल्या 30 पेक्षा जास्त सरकारी सेवेतला संपूर्ण अनुभव श्री. खानापूरकर यांनी पणाला लावला व ही जलसंधारणाची जबाबदारी स्वीकारली.

परिसरातील नाले अभ्यासून त्यांना रूंद करणे, त्यांची खोली वाढविणे व त्या नाल्यांवर साखळी बंधारे बांधणे ही त्रिसूत्री श्री. खानापूरकर यांच्या कार्यपध्दतीचे सार आहे. लोकांना रोजगार पुरविणे हा मुळातच त्यांचा उद्देश नसल्यामुळे यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने पाणीप्रश्नावर अत्यंत अल्प काळात मात कशी करता येईल या ध्येयाने त्यांना झपाटले आहे. दिवसातून, कानाला गमचा बांधून उन्हाळ्यात सोळा-सोळा तास काम करून कामाचा फडशा कसा पाडता येईल या विचारात ते सदैव मग्न असतात. त्याचे फळ आता दृश्य स्वरूपात दिसावसाय लागले आहे व या परिसरातील अख्खी शेतकरी जमात त्यांच्या जलसंधारणाच्या कामावर बेहद खुश आहे. विहीरी आणि बोअर्सच्या तळागाळाला जाऊन पोहोचलेले पाणी उफाळून वर येत आहे व भूजल पातळीत भरमसाठ वाढ झाल्याचे सुख शेतकरी अनुभवीत आहेत.

जलसंधारणाच्या कामासाठी त्यांनी शिरपूर तालुक्यातील 150 गावांची निवड केली आहे. त्यापैकी आतापर्यंत 22 गावांचे काम पूर्ण झालेले आहे. येत्या वर्षात आणखी वीस गावांत या कामांना सुरूवात करण्याचा त्यांचा मानस आहे.

श्री. खानापूरकर ज्या परिसरात काम करतात त्या ठिकाणची भूगर्भ रचना दोन प्रकारची आहे. काही परिसर अॅल्युव्हियल रचनेचा आहे तर काही भाग डेक्कन ट्रॅप खडक रचनेचा आहे व त्यांचा असा दावा आहे की त्यांचे जलसंधारणाचे काम दोन्ही प्रकारच्या भूरचनेत यशस्वी ठरू शकते. परिसर हिंडत असताना त्यांनी दोनही प्रकारच्या रचना आम्हाला प्रत्यक्ष दाखविल्या व त्यातील जलपातळी पण समजावून सांगितली. दोनही परिस्थितीत आम्हाला यश दिसून आले.

शिरपूर परिसरातील त्यांनी 59 विहिरी जलसंधारणाच्या कामासाठी निवडल्या. शिरपूर परिसरातील मध्यम जलप्रकल्पातील बंधाऱ्याचा सांडवा जेसीबी मशीनच्या साहाय्याने चर खणून या विहिरींकडे वळविला. प्रत्येक विहिरीच्या बाजूला त्यांनी दोन टाक्या बांधल्या. त्यापैकी एक टाकी मोठी असून खोल आहे. चरांमधील पाणी या मोठ्या टाक्यात सोडले जाते. ते पाणी त्या टाक्यातून बाजूच्या उथळ टाक्यात येते. हे होत असताना पहिल्या टाक्यात गाळ खाली बसतो व निव्वळ पाणी दुसऱ्या टाक्यात पडते. हे दुसरे टाके 2 पीव्हीसी पाईपद्वारे विहिरीला जोडले असून या दोन्ही पाईपद्वारे विहिरीत जलपुनर्भरण होते. इतक्या मोठ्या प्रमाणात पडणारे पाणी प्रत्येक विहिरी पिऊन टाकतात. त्यांच्या हिशेबाप्रमाणे प्रत्येक विहिरीत दररोज 14 लाख लिटर पाणी सोडले जाते. गेल्या कित्येक वर्षांच्या उपशामुळे जमिनीतील जलसाठ्याच्या रिकाम्या खोबणी हे पाणी पिऊन टाकतात व त्यामुळे परिसरात जल पातळीत सातत्याने वेगाने वाढ होताता दिसत आहे. हा हिशेबच इतका अवाढव्य आहे की गेल्या काही महिन्यात अब्जावधी लिटर पाणी जमिनीच्या पोटात जमा झाले आहे.

त्याचे परिणामही दिसायला लागलेले आहेत. ज्या ठिकाणी वर्षाकाठी शेतकरी मोठ्या मुश्किलीने एक पीक घेत होते त्या ठिकाणी वर्षभर पाण्याची उपलब्धता निर्माण झाली आहे. पुढील वर्षी पाऊस पडला नाही तरी शेतीसाठी पाणी कमी पडणार नाही असा श्री. खानापूरकर यांचा दावा आहे.

पावसाच्या रचनेत झालेल्या बदलाची नोंद घेऊन त्याला अनुरूप असे धोरण आपण स्वीकारले पाहिजे हा विचार त्यांनी आग्रहाने आमच्यासमोर मांडला. कमी दिवसांत आजकाल जास्त पाऊस पडतो त्यामुळे पाणी वाहून जाण्याचे प्रमाण वाढले असल्याचे त्यांनी दाखवून दिले. हे पाणी वाहून जाऊ नये म्हणून भूपृष्ठावर आणि भूपृष्ठाचे आत हे साठे वाढविले पाहिजेत तरच पाणीप्रश्नावर आपण मात करू शकू याबद्दल त्यांचा फार आग्रह होता.

हा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी पोकलंडच्या साहाय्याने 10-15 फूट रूंदीचे नाले त्यांनी 40-50 फूटांपर्यंत चवडे केले. या उथळ नाल्यांमध्ये खोदकाम करून नाल्यांची खोली 50 फुटांपर्यंत वाढविली. वेळप्रसंगी खोदत असताना खडक लागल्यास त्या ठिकाणी बार लावून खडक फोडले, पण खोली वाढविण्यात कसूर केली नाही.

अशा खोल नाल्यात जेव्हा त्यांनी सिमेंटचे बंधारे बांधले त्या ठिकाणी मोठमोठे जलाशय निर्माण झाले आहेत. नजीकच्या डोंगरावर जाऊन आम्ही जेव्हा बंधऱ्यांचा परिसर न्याहाळला त्यावेळी त्यांच्या कार्याची भव्यता नजरेसमोर आल्याशिवाय राहिली नाही. पाण्याच्या साठ्यामुळे जे प्रेशर निर्माण झाले आहे त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाणही वाढीस लागल्याचे त्यांनी सांगितले.

पहिल्या वर्षी एवढे यश मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडत होता व श्री.अमरीशभाईंच्या भरीव आर्थिक पाठिंब्यामुळे व प्रोत्साहनामुळे आपण याहीपेक्षा मोठे व भरीव काम करू शकू याबद्दल त्यांचे मन ग्वाही देत होते. त्यांच्याबरोबर विविध ठिकाणी हिंडत असताना बरेचसे शेतकरी भेटत होते व त्यांचे तोंडातून झालेल्या कामाला पावती मिळत होती. सप्टेंबरचा शेवटचा आठवडा चालू असल्यामुळे शेतात कापूस व तूर ही दोन पिके उभी होती. जवळपास सर्वच शेतात ती दोन्ही पिके आमच्या डोक्याच्या उंचीपेक्षा जास्त उंचावर डोलत असलेली पाहून मन भारावून येत होते. कापूस निघाल्यानंतर गहू व हरबरा ही दोन पिके आम्ही निश्चित घेणार याबद्दल सर्व शेतकरी आम्हाला खात्री देत होते.

जवळपास सर्व शेतकऱ्यांनी एक महत्त्वाची खंत बोलून दाखविली. आज आमच्याजवळ मुबलक पाणी आहे पण सोळा तासांच्या पॉवर कटमुळे त्या पाण्याचा आम्ही योग्य तो वापर करू शकत नाही याबद्दलची नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होती. अमरीशभाईंनी याही प्रश्नावर तोडगा शोधून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अगदीच असमाधानकारक आहे अशा शेतकऱ्यांना डिझेलपंप व पाईप विनामूल्य देऊन या पाण्याचा वापर कसा वाढविता येईल याबद्दलही त्यांचे विचार चालू आहेत.

या जलसंधारणाचा सर्वांत मोठा फायदा दुबार शेती आणि पिकांच्या निवडीत झालेले बदल या स्वरूपात दाखविता येईल. दोनदा किंवा तीनदा एकाच जमिनीचा वापर झाल्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात स्थायी स्वरूपाची वाढ झालेली दिसून आली. पिकांच्या निवडीतही फरक जाणवला. खरिपात कापूस घेऊन रबीत गहू व हरबरा घेण्याच्या तयारीत शेतकरी बांधव गुंतले होते. शेती व्यवसायात शाश्वतता येणे या पेक्षा शेतकऱ्याच्या जीवनात दुसरी सुखकारक घटना कोणती? अजूनही पाण्याची पातळी वाढून जास्त दिवस झाले नाहीत. जसजसे दिवस जात जातील तसतशी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती निश्चितच सुधारल्याचे दृश्य अनुभवता येईल.

श्री. अभिजीत घोरपडे यांच्या लेखनामुळे एक फायदा निश्चितच झाला आहे. या प्रयोगाचे यश महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. त्यामुळे ठिकठिकाणाहून अभ्यासक, शेतकरी यांची शिरपूरला वर्दळ वाढली आहे. नांदेडहून 110 शेतकरी भाड्याने गाड्या करून झालेल्या कामाची पाहणी करण्यासाठी नुकतेच शिरपूरला येऊन गेलेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या गावचे हे शेतकरी त्यांच्यापर्यंत हा प्रयोग पोहोचविण्याचे आश्वासन देऊन गेलेत. पहावयाचे त्यांना या कामात किती यश येत ते!

ज्यांनी खरे पाहिले असता हा प्रयोग पहावयास हवा होता असे सिंचन खात्याचे अधिकारी, धोरण ठरविणारे राज्यातील अधिकारी व विकासाच्या गप्पा मारणारे राजकारणी मात्र अजूनपर्यंत हा प्रयोग पाहण्यासाठी फिरकले नाहीत. किमान ज्यांचा या कार्याशी प्रत्यक्ष संबंध येत आहे असे भूजल खात्यात काम करणारे अधिकारी तरी तिथे यावसास हवे होते अशी अपेक्षा करणे चूक ठरू नये.

वेगवेगळ्या ठिकाणी बांधलेल्या बंधाऱ्यात पाणी साचल्यामुळे वेगवेगळ्या ओढ्यात फुटलेले पाझरही त्यांनी आम्हाला दाखविले. ज्यावेळी जमिनीची तहान पूर्णपणे भागेल त्यावेळी त्या पाझरात वाढ होऊन हे सर्व ओढे / नाले बारमाही वाहू लागतील असा विश्वास खानापूरकरांनी व्यक्त केला. थोडक्यात पूर्वीच्या काळी जसे नद्या नाले बारमाही वाहत असत तशी परिस्थिती काही काळातच येथे अनुभवता येईल याची त्यांना खात्री आहे.

या कार्यात घडलेला एक हृद्य प्रसंग कथन केला. जलसंधारणाच्या कामात गावकऱ्यांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने एका गावात त्यांनी बऱ्याच सभा घेण्याचा प्रयत्न केला. गावकऱ्यांचा त्यांच्यावर विश्वास बसत नव्हता म्हणून त्यांनी खानापूरकरांना हाकलून लावले. पण लवकरच त्यांच्या प्रयत्नांना जेव्हा यश यायला लागले, पाणी थांबायला लागले, भूजल पातळीत भरमसाठ वाढ झाली व गावकऱ्यांना त्याचा फायदा मिळायला लागला त्यावेळी त्याच गावकऱ्यांनी प्रत्येकी दोनशे रूपये वर्गणी जमा करून त्यांचा सत्कार घडवून आणला. त्यांनी दिलेली स्मृती भेट हा माझ्या जीवनातला सर्वाेच्च पुरस्कार समजतो असे भरलेल्या मनाने खानापूरकर बोलून गेले.

तुमच्या परिसरात तुम्हीही बंधारे बांधले व सरकारनेही बांधले, मग तुमच्या कामाचे वैशिष्ट्य ते काय हा प्रश्न आम्ही त्यांना जरा स्पष्टच विचारला. ते म्हणाले की मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याच्या आधी काही सरकारी बंधारे नमुन्यादाखल दाखवितो आणि मगच तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो. त्यांनी बंधाऱ्यावर उभे राहून त्यांचे गणित आम्हाला समजावून सांगितले. एखाद्या नाल्यावर बंधारा बांधण्याचे आधी खूप जास्त पाणी साठविले जाणार असे अंदाज करणे, त्याला अनुसरून बंधाऱ्याचा आकार ठरविणे, त्याप्रमाणे अेस्टीमेट करणे, प्रकल्पाला मंजुरी मिळविणे, हलक्या दर्जाचे काम करणे व त्यामुळे पाण्याच्या ऐवजी पैसा मुरविणे हे या कामांचे इंगित असल्याचे त्यांनी दाखवून दिले. याला तुम्ही वाचा का फोडत नाही असा प्रश्न केला असताना मी काही समाजसुधारक नाही, मला मार खावयाचा नाही, मला माझे काम करून शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यायचा आहे. इतक्या स्पष्ट शब्दांत त्यांनी आपले मत बोलून दाखविले. दुसऱ्याचे घाणेरडे कपडे धुणे मला जमणार नाही असे ते म्हणाले. एका ठिकाणी तर सरकारचा बंधारा व खानापूरकरांचा बंधारा असे दोन्ही बंधारे जवळजवळ होते. सरकारी बंधारा पाण्याशिवाय ओस पडला होता व खानापूरकरांच्या बंधाऱ्यातील निळे गडद पाणी त्याची खोली दाखवित होता. चौकशी करता त्या ठिकाणी 30 फुटांच्या वर पाणी असल्याचे ते बोलले.

आमच्या कामाचा फायदा हा कायमस्वरूपी टिकणार असून भूजल पातळी वाढविण्यासाठी उपकारक ठरणार आहे याबद्दल श्री. खानापूरकरांना खात्री आहे. माझ्या कामात दोष असू शकतात, ते जर कोणी दाखवून दिले तर मी माझ्या कार्यपध्दतीत बदलसुध्दा करावयास तयार आहे, थोडक्यात शेतकरी बंधुंना हलाखीचे जीवन जगावे लागू नये यासाठी हा सर्व खटाटोप आहे हे त्यांनी अत्यंत लीनतेने सांगितले. खुद्द अमरीशभाईसुध्दा प्रसिध्दी पराङ्मुख आहेत. या कामाचा जास्त गवगवा होऊ नये, ते पाणीप्रश्न सोडविण्यासाठी उपकारक ठरावे हीच त्यांची अपेक्षा असे खानापूरकरांनी आवर्जून सांगितले.

श्री. अमरीशभाई पटेल व श्री. सुरेश खानापूरकर यांना त्यांच्या जलयज्ञास शुभेच्छा!
डॉ. दत्ता देशकर - (भ्र : 9325203109)

Path Alias

/articles/caalatae-paanai-thaanbatae-karaa

Post By: Hindi
×