भूजलाचे पैलू - भाग 3


भूजलशास्त्रीय परिस्थित व गुणधर्म :



महाराष्ट्रातील १८७१६ खोल विंधन विहीरींचे अभ्यासात अति खोलीवरील जलधारक खडक अस्तित्वात असल्याचे आढळून आलेले आहे. त्यात लातूर, उस्मानाबाद, सांगली, सातारा, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांचा अंतर्भाव आहे. शासनामार्फत आजवर पिण्याच्या पाण्यासाठी खोदण्यात आलेल्या २.५ लाख विंधन विहीरींपैकी जवळ जवळ ३० ते ३५ हजार विंधन विहीरी उच्च क्षमतेच्या आहेत, त्यापैकी १२००० विंधन विहीरींवर विद्युत पंप बसवून पेयजल पुरवठा ग्रामीण भागात करण्यात येत आहे.

भूजल हे डोळ्यांनी दिवस नसल्याने विहीरी, विंधन विहीरी, नलिकाकूप करूनच ते उपलब्ध होत असले. या व्यतिरिक्त झर्‍यांच्या माध्यमातूनही भूजल नैसर्गिकरित्या जमिनीवर प्रगट होवून वापराकरिता उपलब्ध होत असते. जोपर्यंत विहीर, विंधन विहीर किंवा नलिकाकूप यांची खुदाई करत नाही तो पर्यंत किती भूजल उपलब्ध होणार किंवा झाले याचा अंदाज बांधणे शक्य होत नाही. माहाराष्ट्रातील बेसाल्ट व इतर कठीण खडक, जलजन्य खडक व गाळाचा प्रदेश यात प्रामुख्याने साध्या विहीरी खोदल्या जात असत. परंपरेने हे तंत्रज्ञान पिढ्यान्पिढ्या चालत आले. परंतु सत्तरच्या दशकापासून बोअरवेल तंत्रज्ञान येताच हळूहळू विहीरी कालबाह्य होत गेल्या आणि आता त्यांची जागा बोअरवेल / ट्यूबवेल यांनी घेतली. खडकांचे गुणधर्म विशेषत: साठवण क्षमता, प्रसरण गुणांक व भूजल पुरणगती (विहीरीत पाणी येण्याची क्षमता जी सरासरी ४ तासांपासून ते १५ दिवसांपर्यंत असते) विचारात घेता राज्यात विहीरी हाच पर्याय शास्त्रीय दृष्ट्या समर्थनीय आहे. त्याच प्रमाणे विहीरी मुख्यत्वे उथळ जलधारकात केल्या जात असल्याने दरवर्षीच्या पावसाने तो कमी अधिक प्रमाणात संपृक्त होवून विहीरींना शाश्‍वत पाण्याची उपलब्धता होत असते. या उलट कठीण खडकातील विंधन विहीरींना मात्र व्यासाच्या मर्यादेमुळे उथळ जलधरातून विहीरींच्या प्रमाणात भूजल उपलब्ध होत नाही. तसेच अर्ध बंदिस्त व बंदिस्त जलधारकात पाणी उपलब्ध असे पर्यंतच त्यांना पाणी उपलब्ध होते. अर्थ बंदिस्त जलधारकांचे बंदिस्त जलधारकाच्या तुलनेने लवकर पुनर्भरण होते व हातपंप पावसाळ्यानंतर लगेचच सुरू होतात. बंदिस्त जलधारकात मात्र त्यास काही वर्षे लागतात. म्हणूनच एकदा का खोल बोअरवेल पाण्याअभावी बंद पडली तर ती अपवादात्मक परिस्थितीच पुनरूजीवित होते. अऩ्यथा नवीन घेण्याचाच पर्याय स्वीकारावा लागतो.

विहीरीचे प्रकार, संख्या व विश्‍वासार्हता :


महाराष्ट्रातील खडकात भूसत्राच्या अनुकूलते प्रमाणे साधी विहीर (dug well) तळाशी बोअर घेतलेली विहीर (dug cum borewell) किंवा विंधन विहीर / कूपनलिका (borewell) यांचा भूजल वापारासाठी उपयोग केला जातो. संघवीकृत गाळस्तरांच्या व गाळाच्या प्रदेशात (गोंडवन व विंध्यन) Cwi (४० मी पर्यंत) नलिका विहीरींचा र्(tube well) उपयोग होवू शकतो.

साध्या विहीरी :


विहीरींच्या स्थळाप्रमाणे व भूजलधारक प्रस्तरानुसार विहीरींची क्षमता खूप वेगवेगळी असते. उथळ भूजलधारक प्रस्तरातील साठवण जमिनीचे उताराप्रमाणे व भूस्तरांच्या स्थितीप्रमाणे कमी अधिक होते. तरी पण दक्षिणी कातळ खडकांमधील (कोकण विभाग सोडून) ६ मीटर व्यासाची व १२ मीटर खोली पर्यंतची विहीर साधारण: रब्बी पिकासाठी दररोज ३ ते ४ तास उपसा करून ४० ते ५० हजार लिटर पाणी देवू शकते. म्हणजे रब्बी हंगामाच्या १२० दिवसात ५००० घनमीटर पाणी एका विहीरीतून मिळू शकते. वार्षिक वापरासाठी अंदाजे २५.४ अब्ज घमी भूजल या उथळ भूस्तरातून प्राप्त व्हावे अशी अपेक्षा आहे. २०१३ - १४ ची स्थिती पहाता जवळपास २१ लक्ष वीजपंप बसविलेल्या विहीरी आज या उथळ भूस्तरातील पाणी शेतीला उपलब्ध करू देत आहेत.

भंडारा, गडचिरोली व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रूपांतरीत खडकांमध्ये विहीरींचा व्यास तुलनेने कमी म्हणजे साधारणत: ४ मीटर पण खोली मात्र जास्त १५ ते १८ मीटर पर्यंत असेल तेव्हा अशा विहीरींद्वारा रब्बी पिकांसाठी प्रति दिवशीचे ३ ते ४ तास उपसा करून साधारणत: ३० ते ४० हजार लिटर पाणी उपलब्ध होवू शकते. त्यातून सामान्यत: खरीपालाही लाभ होतो व रब्बीलाही पाणी मिळते. या तुलनेत कोकण विभागातील जांभ्या खडकामधून मात्र ३ ते ४ मीटर व्यासाची व १५ ते २० मीटर खोलीची विहीर २ ते ३० हजार लिटरच पाणी उपलब्ध करून देवू शकते.

तळाशी बोअर असलेल्या विहीरी :


दक्षिणी कातळ व रूपांतीत खडकांमध्ये खोदलेल्या विहीरींना पाण्याची उपलब्धता कमी पडल्यास विहीरींचे तळाशी १० ते १५ मीटर खोलीचे व १५ सेंमी व्यासाचे विंधन भोक पाडून विहीरींना जास्त खोलीवरील अर्ध बंदिस्त भूजलधारक प्रस्तारातून पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करता येतो. साधारण ४० टक्के विहीरींना तरी अशी विंधन भोकांची पूरक मदतदिलेली दिसते. गडचिरोली व चंद्रपूर या भूजलाच्या दृष्टीने अविकसित जिल्ह्यात विहीरींच्या तळाशी विंधन छिद्रे घेवून आदिवासी भागात सिंचन वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

दक्षिणी कातळ व रूपांतरित खडकांमध्ये खोदलेल्या विहीरींना पाण्याची उपलब्धता कमी पडल्यास विहीरींचे तळाशी १० ते १५ मीटर खोलीचे व १५ सेंमी व्यासाचे विंधन भोक पाडून विहरींना जास्त खोलीवरील अर्ध बंदिस्त भूजलधारक प्रस्तरातून पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करता येतो. साधारण ४० टक्के विहीरींना तरीही विंधन भोकांची पूरक मदत दिलेली दिसते. गडचिरोली व चंद्रपूर या भूजलाच्या दृष्टीने अविकसित विहीरींच्या तळाशी विंधन छिद्रे घेवून आदिवासी भागात सिंचन वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

विंधन विहीर :


दक्षिणी कातळ खडकाच्या वेगवेगळ्या खोलीवरील थरांमध्ये काही भेगा व फटी आहेत असे दिसते. त्या तिरकस कोनातून भूस्तर छेदतांना दिसतात. अशा चिरा व फटींमुळे ६० ते १०० मीटर खोलीपर्यंतच्या विंधन विहीरींना २ ते ३ ठिकाणी वेगवेगळ्या खोलीवरल अर्धबंदिस्त किंवा बंदिस्त स्थितीतील भूस्तरातून जलस्तंभीय दाबाने साधारणत: ५०० ते ५००० लिटर्स प्रति तास भूजल उपलब्ध होते. त्यातून सरासरीने ७० टक्के विंधन विहीरींना ८००० ते ८०००० लिटर्स प्रतिदिन भूजल उपलब्ध होताना दिसते. दक्षिणी कातळ खडकांच्या भूरचनेविषयी अजूनही पुरेशी तपशीलवार व संगतवार वैज्ञानिक माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे नेमके कोठे अशा प्रकारचे खोलीवरच्या भूस्तरांतील पाणी उपलब्ध होवू शकेल, किती उपलब्ध होवू शकेल व त्याची दीर्घकालीन शाश्‍वती काय, खोलीवरील तड्यांना पुनर्भरीत करणारा स्त्रोत नेमका कोणता, या विषयी निश्‍चितपणे काही सांगता येणे शक्य नाही. म्हणून सिंचनाच्या नियोजनात अशा विंधन विहीरींवर विसंबून रहाता येणार नाही.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्यासाठी खोदलेल्या समन्वेषण विंधन विहीरींचे (१८७१६) विश्‍लेषण केले असता त्यातून सर्व साधारण असा निष्कर्ष निघतो की ६० मीटर ते १०० मीटर पर्यंतच्या ५० टक्के विहीरी स्थायी रूपात पाणी देत आहेत. पण १५० मीटर पर्यंतच्या विहीरींपैकी मात्र केवळ २ टक्के विहीरीच स्थायी स्वरूपात पाणी देवू शकत आहेत. परंतु यासाठी सुध्दा जास्त खोली वरील तड्यांना पुनर्भरित करणार्‍या स्त्रोतांचाही अभ्यास झाल्याचे दिसत नाही. साधारणपणे जास्त खोलीवरील तडे बंद होवून त्यात पाणी येणे व देणे प्रक्रिया थांबते. जास्त खोलीवरील तड्यांना पाणी पुरवठा अनियमित झाल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी खोदलेल्या बर्‍याच विंधन विहीरींना पाणी येत नसल्याचे दिसून आले आहे. म्हणून विंधन विहीरींतील खोली केवळ ६० व अपवादात्मक परिस्थितीत १०० मीटर पर्यंतच मर्यादित ठेवणे इष्ट राहील. त्याखालील भूजलाची साठवण वार्षिक आवर्ती पध्दतीने स्थायी स्वरूपात वापरात येण्याची शक्यता बरीच कमी दिसते. फार तर तिचा उपयोग अत्यंत निकडीच्या टंचाई काळापुरता मर्यादितपणे होवू शकतो.

संघनीकृत गाळस्तरांच्या (गोंडवन व विंध्य) व अघनीकृत गाळाच्या प्रदेशातील -

1.साधी विहीर :
महाराष्ट्रातील नदीच्या गाळांच्या व गाळ स्तरांच्या खडकात साधारण ३ ते ३.५० मीटर व्यासाची व १५ ते २० मीटर खोल साध्या विहीरी खोदून पाण्याचा उपसा होतो. अशा बहुतांशी विहीरी सिमेंटचे बांधकाम करूनच पूर्ण करण्यात येतात. शेतकर्‍यांनी सध्या जळगाव, धुळे जिल्ह्यातील तापी नदीच्या गाळाचा भाग, अकोला, बुलढाणा व अमरावती जिल्ह्यातील पूर्णा नदीच्या गाळाचा भाग, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील नदीकाठचा भाग येथे अशा विहीरी केलेल्या आहेत.

२. तळाशी बोअर असलेल्या विहीरी :
तापी नदीच्या गाळयुक्त भागात पिवळी माती व वाळू यांचे एकावर एक असे १० ते १५ मीटर जाडीचे स्तर आहेत. साध्या विहीरीमधून १५ ते २० मीटरमधील वालुकामय भूजल धारक प्रस्तरामधील पाणी संपल्यास किंवा कमी पडल्यास विहीरींच्या तळाशी १५ ते ३० मीटर खोलीचे सेंमी व्यासाचे विंधन भोक पाडून खालच्या बंदिस्त भूजल प्रस्तरातील पाणी उपलब्ध होते. सध्या जळगाव व धुळे जिल्ह्यात अशा प्रकारच्या ३० ते ४० हजार तळाशी विंधन भोक पाडलेल्या विहीरी कामात आहेत.

३. मध्यम क्षमता नलिकाकूप :
महाराष्ट्रातील गाळयुक्त भागाची उत्तर प्रदेशातील गाळाचे भागांशी तुलना केल्यास नलिका कूप द्वारा प्राप्त होणार्‍या भूजलाची क्षमता कमी स्वरूपाची असते व म्हणून महाराष्ट्रातील अशा नलिकाकूपांना राष्ट्रीय संदर्भात मध्यम क्षमतेच्या नलिकाकूप म्हणून वर्गीकृत केलेले आहे. साधारणत: ६० चे १५० मीटर खोलीपर्यंतच्या १५० ते २०० मि.मी व्यासाच्या कूपनलिकांद्वारा गाळातील वालूकामय स्तरांमधून १०० ते २०० घनमीटर भूजल प्रत्येक नलिका कूपेतून प्रतिदिन उपलब्ध होतांना दिसते. खडकांमधील विहीरींच्या तुलनेत ही क्षमता बरीच मोठी म्हणजे २५ ते ५० पट आहे. अशा प्रकारच्या वालूकामय भूजल धारक प्रस्तरांमधील भूजल साठा रब्बी व बारमाही पिकांसाठी शाश्‍वत स्वरूपात असू शकतो, पण अशा अनुकूलतेचेे क्षेत्र महाराष्ट्रात फारच थोडे आहे.

खोलीवरचे भूजल :


महाराष्ट्रातील १८७१६ खोल विंधन विहीरींचे अभ्यासात अति खोलीवरील जलधारक खडक अस्तित्वात असल्याचे आढळून आलेले आहे. त्यात लातूर, उस्मानाबाद, सांगली, सातारा, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांचा अंतर्भाव आहे. शासनामार्फत आजवर पिण्याच्या पाण्यासाठी खोदण्यात आलेल्या २.५ लाख विंधन विहीरींपैकी जवळ जवळ ३० ते ३५ हजार विंधन विहीरी उच्च क्षमतेच्या आहेत, त्यापैकी १२००० विंधन विहीरींवर विद्युत पंप बसवून पेयजल पुरवठा ग्रामीण भागात करण्यात येत आहे. म्हणजेच खोलवरील व अति खोलवरील खडकात भूजल उपलब्ध असून त्याचा उपयोग पिण्यासाठी करण्यात येत आहे. याच अनुभवाचा उपयोग शेतकरी करून घेत असून साधारणपणे १९९० पासून सिंचनासाठी विंधन विहीरी घेण्याचे प्रमाण सतत वाढतच चालले आहे, औद्योगिक क्षेत्र देखील त्याला अपवाद नाही. आज राज्यात पिण्याचे पाणी वगळता इतर उपयोगांसाठी अस्तित्वात असलेल्या विंधन विहीरींची अधिकृत संख्या उपलब्ध नाही. परंतु त्यांची संख्या विहीरींच्या बरोबरीने असावी असा अंदाज महाराष्ट्र जल व सिंचन आयोगाने वर्तवलेला आहे. या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर भूजलाचा उपसा करण्यात येत आहे. अति खोलीवरील भूजल हे खूप वर्षांपूर्वीचे असल्याने त्याचा उपयोग पिण्यासाठी आपतकालीन परिस्थितीत करणे गरजेचे आहे, असे मत महाराष्ट्र जल व सिंचन आयोगाने देखील व्यक्त केलेले आहे.

दुर्दैवाने आज राज्यभर पातळी खालावत जात असल्याने विहीरींच्या ऐवजी बोअरवेल / ट्युबवेल घेण्यामागचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. या मागची प्रमुख कारणे म्हणजे एका दिवसात विंधन विहीरी करून त्यावर विजपंप बसवून लगेचच पाणी पुरवठा सुरू होतो. परंतु यातील तांत्रिक विश्‍वासार्हतेची बाजू अद्यापही शेतकर्‍यांपर्यंत पोहोचलेली नाही. मुळात अति खोलीवरील पाणी हे संधी व भेगांमध्ये लागलेले असल्याने व त्यांची व्याप्ती सर्वदूर नसल्याने हे पाणी बराच काळ टिकत नाही, असा अनुभव आहे. परिणामी शेतकर्‍यांनी केलेली अर्थिक गुंतवणूक वाया जाते आणि तो हवालदिल व कर्जबाजारी होतो. बोअरवेलची तांत्रिक विश्‍वासार्हता खूपच कमी असल्याने शासनाने तसेच बँकांनी देखील त्यास आजवर प्रोत्साहन दिलेले नाही. मुळात शेतकर्‍यांना विहीरीसाठी कर्ज देत असतांना तारण प्रमाण पत्रासाठी विहीरींचीच शिफारस शासनामार्फत केली जाते. परंतु शेतकरी मात्र बँकेच्या व शासनाच्या शिफारसींचा विचार न करता बोअरवेलच्या मागे लागतो. बँकेने नाकारले म्हणून खासगी सावकारांकडून कर्ज काढून बोअरवेल करतो, आणि त्यात अपयश आले तर तिथेच खचून जातो. शेतीसाठी करण्यात येणार्‍या बोअरवेल उच्च क्षमतेच्या (३५०० लि/ मिनीट) असणे आवश्यक असून त्यांच्या यशस्वीतेचे प्रमाण फक्त २० ते ३० टक्के इतकेच आहे. यावरून त्यांच्या विश्‍वासार्हतेची कल्पना येते.

मूळात शासन बोअरवेलला प्रोत्साहन करीत नसल्यामुळे त्यासाठी लागणारा तांत्रिक सल्ला देखील दिला जात नाही. परिणामी शेतकरी स्थानिक स्तरावर पानड्यांच्या मदतीने जागी शोधून घेतो. परंतु त्यांच्या यशस्वीतेचे प्रमाण अत्यल्प असते. म्हणजेच शेतकर्‍यांचे विषचक्र बोअरवेलच्या जागा निवडीपासून सुरू होते. नशिबाने पाणी लागलेच तर ते देखील फार काळ टिकत नाही आणि शेतकरी आपले स्थैर्य गमावून बसतो. या विष चक्रातून शेतकर्‍यांना सोडविण्यासाठी शासनाने पुढाकार घेवून त्यांचे प्रबोधन करण्याची नितांत गरज आहे. सिंचनासाठी बोअरवेल ऐवजी विहीर घेण्यासाठी स्थानिक स्तरावर तांत्रिक व आर्थिक सहकार्य व मदत उपलब्ध करून देणे, दरवर्षी पावसाळ्यानंतर उपलब्ध भूजल पातळींचे नकाशे उपलब्ध करून देणे, त्यांच्या मनातील गैरसमज दूर करणे, शाश्‍वत भूजल उपलब्धतेसाठी कृत्रिम पुनर्भरणाचे उपक्रम राबविणे या व इतर अनुषंगिक बाबींचा अंतर्भाव असण्याची गरज आहे. आज शासन धोरणांची जी कप्प्याकप्प्यांनी अंमलबजावणी केली जाते, म्हणजेच विविध विभागांमार्फत वेगवेगळ्या पध्दतीने, त्यात सुसूत्रता आणून ती अधिक परिणामकारक करणे गरजेचे आहे, तरच शेतकर्‍यांच्या या प्रश्‍नावर परिणाम कारक उपाययोजना करता येतील.

श्री. शशांक देशपांडे, पुणे, मो : ०९४२२२९४४३३

Path Alias

/articles/bhauujalaacae-paailauu-bhaaga-3

Post By: Hindi
×