भूजल विकासाची परंपरा


भूजल विकासाची इतिहासकालीन साधने निदान यापुढे तरी वारसा म्हणून जपून ठेवण्यासाठी कायद्याचे पाठबळ देऊन प्रयत्न केला पाहिजे. लाख मोलाची ही साधने अनास्थेमुळे नामशेष होऊ न देणे समाजाने आपले कर्तव्य समजावे. स्थानिक सेवाभावी संस्थेने पुरातत्व विभागाच्या मदतीने यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. अशा कामासाठी शासन व समाजाकडून निधी मिळत असतो. शासनावर ही जबाबदारी लोटू नये.

नदीकाठाने मानवी संस्कृती विकसित झालेली अनेक उदाहरणे आहेत. सिंधू संस्कृती सिंधू नदीच्या काठावर विकसित झाल्याचे पुरावे मोहोंजोदरो आणि हरप्पा या ठिकाणच्या उत्खननातून मिळालेले आहेत. पाण्याच्या आधारानेच मानवी संस्कृतीचा विकास होत असतो. भारतासारख्या हंगामी पावसाच्या प्रदेशामध्ये सर्वच नद्यातील पाणी बारमाही नसते. हिमालयातून उगम पावणार्‍या नद्यांचा अपवाद वगळता भारतातील इतर सर्व नद्या या हंगामी आहेत असेच म्हणावे लागेल. मानवी वस्त्यांची वाढ नद्याच्या काठाने जरी झालेली असली तरी पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी भूजलाचा स्रोत हा खात्रीचा राहिलेला आहे. भूजलाचे पुनर्भरण करण्यासाठी शहरामध्ये, वस्त्यांमध्ये तलाव निर्माण करण्याची परंपरापण फार जुनी आहे. नद्यातून वाहाणारे पाणी जरी हंगामी असले तरी, तलावात साठवलेले आणि जमिनीत मुरलेले पाणी (भूजल) हे बारमाही स्रोत म्हणून वापरण्यात आलेले आहेत. नदीतील आणि तलावातील पाणी, पिण्या व्यतिरिक्‍त प्रयोजनासाठी उपयोगी असते. पिण्यासाठी मात्र भूजल हा शुध्द पाण्याचा स्रोत म्हणून हजारो वर्षापासून वापरला गेलेला आहे. मध्य प्रदेशातील बुर्‍हाणपूर हे इतिहासकालीन प्रसिध्द शहर तापी नदीच्या काठावर वसलेले आहे.

इतिहासकाळापासून या शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हा उत्तरेकडील सातपुडा पर्वतातून पाझरणार्‍या भूजलाच्या आधाराने केलेला आहे. जवळपास १०० उसाशासह आस्तित्वात असलेली शेकडो वर्षापूर्वीची लांब भूमीगत नहर(कालवा) आजपण पाहाता येते. नदीच्या परिसरात गाव, गावामध्ये तलाव आणि त्याच्या सभेावती आड वा विहीर अशी रचना भारतामध्ये सार्वत्रिकपणे हजारो वर्षाच्या उलथा पालथी नंतरसुध्दा दिसून येते. म्हणूनच आड ही जगाला आणि विशेषत: भारताला सिंधू संस्कृतीने दिलेली देणगी आहे असे अभिमानाने इतिहासकार त्याचे वर्णन करतात.

धोलविरा हे सुमारे ५ हजार वर्षापूर्वीचे हरप्पन काळातील प्राचीन नगर गुजरात राज्यातील भूज प्रांतात आहे. उत्खननामध्ये सापडलेल्या या नगरीत अनेक आड असावेत, त्यापैकी ३ ते ४ आड प्रत्यक्षात पाहाता येतात. या प्राचीन नगरीच्या पूर्व दिशेला ५ हजार वर्षापूर्वीचा चालू स्थितीतील एक आड आहे. स्थानिक लोक या आडाचा उल्लेख कन्याबाव म्हणून करतात. वाळूच्या खडकात तासलेले हे आड आजसुध्दा जवळच्याच धोलविरा या तीन हजार लोकवस्तीच्या गावाची तहान पूर्णपणे भागवीत असल्याचे कळते. पाण्याची चणचण असलेल्या प्रदेशात वसलेल्या या नगरीला भूजलाच्या माध्यमातून बारमाही पाण्याचा आधार देण्यासाठी भूजल पुनर्भरणाचे सर्व उपचार (रेन वॉटर हार्वेस्टींग, रुफ वॉटर हार्वेस्टींग ) केले असल्याची प्रचितीपण प्रत्यक्ष पाहणीतून येते.

गेल्या दोन तीन वर्षात काही देशांना भेटी देण्याचा योग आला. ११६ बेटांचे व्हेनिस हे शहर अलिकडच्या काळात इटली या देशाशी जोडले गेले आहे. सध्या या शहराला बाहेरुन पाणी आणून नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. पूर्वी नळ नव्हते आणि आजुबाजूला समुद्राचे खारे पाणी आणि मग, गोडे पाणी मिळणार कोठून असा प्रश्‍न पडतो. बेटावर खोदलेल्या विहीरी वा आडातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचा प्रत्यय बेटावर आस्तित्वात असलेले जुने आड पाहून येतो. आडाचे पुनर्भरण करण्यासाठी बेटावर तलावपण निर्माण केलेले होते. अलिकडच्या नळ संस्कृतीमुळे जुन्या व्यवस्था पडद्याआड गेलेल्या आहेत. रोम शहराच्या काही भागामध्ये जलसेतूद्वारे दुरून सतत वाहात येणार्‍या भूजलाचा सार्वजनिक पाणपोई म्हणून वापर आजपण केला जातो. लंडन शहरामध्ये लिडो या गाव तलावाच्या परिसरात चौरस्त्यावर एका खर्‍या ख्ुर्‍या हातपंपाची प्रतिकृती कौलारु छताखाली जतन केल्याचे पाहाण्यात आले.

पूर्वीच्या काळी लंडन शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा आधार गावतळी, हातपंप इ च्या स्वरुपात भूजलाचाच होता असा अर्थ काढला तर चुकीचे ठरू नये. स्ट्रॅटफोर्ड हे शेक्सपियरचे इंग्लंडमधील खेडेगाव, एव्हान या लहान नदीकाठी वसलेले आहे. प्रसिध्द नाटककार, शेकस्पीयर ज्या वास्तुमध्ये राहात होते आणि ज्या आडाचे पाणी पित होते तेा आड जतन करुन ठेवण्यात आलेला आहे. लगतच्या इमारतीमध्ये पण साधारणत: १ मीटर व्यासाचे अशाच प्रकारचे दोन तीन आड असल्याचे दिसून येते. गुजरात मधील पोरबंदर आणि टंकारा या शहरातील म. गांधी आणि स्वामी दयानंद सरस्वतीच्या निवासस्थानातील आड पाहून इतिहासकालीन भूजलाच्या वापराची प्रतिके समोर येतात. म. गांधीच्या निवासस्थानालगतच कस्तुरबा गांधींचे दोन मजली माहेर आहे. या दोन्ही वास्तूमध्ये भूजल पुनर्भरणासाठी केलेली छतावरील जलसंचय करणारी व्यवस्था आजपण पाहाता येते.

भूजलाचा वापर आणि भूजलाचे संवर्धन या दोन्ही बाबी एकमेकांशी सख्य करुन होत्या हेच यातून सिध्द होते. महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरा शेजारी वसलेले कर्नाटकातील बेळगाव हे शहर तलावाचे आणि आडाचे शहर म्हणून प्रसिध्द आहे. शहरामधून फेर फटका मारत असताना वेगवेगळ्या आकाराचे लहान मोठे आड आजपण दिसतात. एका आडाने मात्र लक्ष वेधून घेतले. जुन्या वाड्याच्या स्वरुपातील घराच्या रस्त्यालगतच्या भिंतीमध्ये आडाची निर्मिती केलेली आहे. घरातील लोकांसाठी आणि बाहेरच्या जनतेसाठी या आडाचा सामायिक उपयोग केला जात असल्याचे दिसले. आडाच्या निर्मितीमध्ये सामाजिक जाणीवेची किनार दिसते. खाजगी मालकीच्या आडाचा उपयोग इतरांनापण नेहमीसाठी व्हावा हा भाव मोलाचा वाटतो.

पुणे, औरंगाबाद, नगर, जुन्नर, तिसगाव, सांगली, मिरज, कोल्हापूर, तंजावर, बाळापूर, अकोला, बुर्‍हाणपूर, बहादूरगड-श्रीगोंदा, भोर, विजापूर, कल्याण, अमृतसर, फलटण, अचलपूर, जालना, सिंदखेडराजा, चंद्रपूर यासारख्या अनेक शहरांना इतिहासकाळात नदीतून पाणी पुरवठ्याची थेट व्यवस्था केलेली नव्हती. याचाच अर्थ असा होतो की नदीतील उघडे पाणी पिण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने हितकारक नसते आणि त्याकाळी लोकांना हे उमजले होते. जवळच्या टेकडीतून पाझरणार्‍या खडकाचा, मातीचा फायदा घेऊन त्यात साठलेल्या पाण्याला भूमीगत कालव्याद्वारे, नैसर्गिक उताराने शहरामध्ये आणून वेगवेगळ्या भागामध्ये त्याचे वाटप करुन शहराच्या पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आढळते. औरंगाबाद परिसरातील एकूण ५२ नहरींपैकी एका नहरीवर पिठाची गिरणी चालत होती. या नहरीची ओळख पाणचक्की म्हणून आहे. आजपण ती नहर पाहाता येते. मोठ्या शहरांची पिण्याच्या पाण्याची गरज केवळ आडाद्वारे भागत नाही आणि म्हणून भूमीगत नहरीद्वारे भूजल वापरण्याचा ऐतिहासिक प्रयोग भूजल विकासाच्या शास्त्रातील शहाणपणाची उंची दर्शवितो.

प्रत्येक किल्ला हा वर्षा जल संधारणाचा एक उत्तम नमुना असल्याचा प्रत्यय येतो. डोंगरी किल्ल्यावर भूजल पुनर्भरणासाठी शेकडो तलाव निर्माण केलेले आहेत. नाशिक जवळील भामेर या गडावर ३६५ तलाव असल्याचे समजते. एकही डोंगरी किल्ला नसावा की ज्याठिकाणी जल संधारणासाठी तलाव निर्माण केलेले नाहीत. अन्यथा पाणी येणार कोठून? तलावाच्या परिसरात निर्माण केलेल्या विहीरीद्वारे भूजलाचा वापर विविध प्रयोजनासाठी गडावर केला जात असे. पुण्याजवळील सिंहगडावरील खडकात खोदलेल्या विहीरीचा उपयोग शेकडो वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी केला जात आहे. या विहीरीला देवटाकी या नावाने संबोधले जाते. अलिकडच्या काळात या गडाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यात आलेला आहे आणि वर्षाकाठी गडाला भेट देणार्‍या पर्यटकांची संख्या १४-१५ लाखाच्या पुढे गेलेली आहे.

या सर्वाची तहान एकटे देवटाके भागवते. भूजल पुनर्भरणातून वाढविलेल्या भूजल क्षमतेचे हे एक उत्तम उदाहरण आहे असे म्हणावेसे वाटते. समुद्रातील किल्यामध्येही गडावर पडलेल्या पाण्याचा थेंब वाहून जाऊ न देता अडवून, त्याच ठिकाणी मुरवून विहीरी, बारव, तलाव याच्या माध्यमाद्वारे वापर करण्याचे तंत्र विकसित केलेले दिसून येते. सिंधुदूर्ग, विजयदुर्ग, जयदुर्ग, जंजिरा, अलिबाग अशा अनेक जलदुर्गाची उदाहरणे देता येतील. भुईकोट किल्ल्यातील जल व्यवस्थापन याच्यापेक्षा एक पाऊल पुढे आहे. किल्ल्याभोवती खंदक आणि त्यातून बाराही महिने पाणी खेळवून किल्ल्यातील विहीर व बारवांना पुनर्भरणाद्वारे अविरतपणे पाणी पुरवठा केला जात असे. खंदकातील पाणी जरी किल्ल्याचे संरक्षण करत असले तरी त्याचे महत्वाचे काम पुनर्भरणाचे आहे हे सहजपणे समजून येते.

चाकण, इंदोरी, उद्‍गीर, परंडा अशा शेकडो भुईकोट किल्ल्याची उदाहरणे देता येतील. भोवती खंदक नाहीत असा भुईकोट किल्ला नाही. इतिहासकालीन मंगळवेढा, अक्कलकोट यासारख्या गावांनापण खंदकाची सोय होती. माणिकगड, गावीलगड, यासारख्या वनदुर्गामध्येपण जल संधारणाच्या माध्यमातूनच भूजल वाढवून किल्ल्यामध्ये पाण्याची व्यवस्था केलेली दिसून येते.

इतिहासकाळामध्ये जवळ जवळ सर्वच शहरी आणि ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था भूजलावर आधारुन केलेली होती. गाव तिथे गावतळी आणि गावामध्ये सार्वजनिक व खाजगी विहीरी आणि त्यातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था हे सूत्र बसविलेले होते. गाव तलाव हे चांगल्या पध्दतीने बांधलेले होते. सोलापूर जवळील बार्शी जवळ पानगाव येथे अष्टकोनी तलाव आहे. कोकण, विदर्भ या भागात प्रत्येक गावामध्ये तलाव दिसून येतात. हे तलाव म्हणजे पुनर्भरणाची साधने आहेत. लहानशा विहीरींना आड असे म्हणले जाते. जमीनीमध्ये खोलवर भूजल अडवून त्याचा साठा करणारी व्यवस्था म्हणून त्याला आड म्हणतात. जुन्या काळात असे लहान आड प्रत्येक वाड्यात होते. वाड्यामध्ये पडलेले पाणी आणि वाड्यातील छतावरील पाणी वाड्यामध्येच अडवून भूजलाची पातळी वाढवून वाड्यातील आणि शेजारील लोकांना पिण्याच्या पाण्याची कायम व सोपी व्यवस्था केलेली होती.

दोन ते तीन फूट व्यासाचे आड ५० ते ६० फूट खोलीपर्यंत खोदून निर्माण करण्याचे कौशल्य स्थानिक कारागिराकडे होते. मराठवाड्यातील बीड, अंबाजोगाई, परळी, वाशी अशा अनेक ठिकाणी आडाची संख्या विपूल प्रमाणात दिसून येते. नगर जिल्ह्यातील पारनेर या सेनापती बापटांच्या गावामध्ये अनेक घरामध्ये आड असल्याचे दिसून येतात. सेनापती बापटांच्या वाड्यामध्येसुध्दा आड आहे आणि तो पाहाता येतो.

इतिहासकाळात मुंबईसारखे शहरपण भूजलावरच अवलंबून होते. मुंबई, बंगलोर, हैद्राबाद, दिल्ली, पुणे यासारख्या मोठ्या शहरामध्येपण शेकडो तलाव व हजारो विहीरी होत्या. मुंबईच्या फोर्ट भागात काही विहीरी अद्यापही आपले आस्तित्व दाखवत आहेत. चर्चगेट जवळ पारशी विहीर आहे. येथे स्वच्छ पाणी लोकांना विनामूल्य उपलब्ध करुन दिले जाते. बर्‍याच विहीरीतून पाण्याची विक्रीपण केली जाते. पानशेत धरण फुटले त्यावेळी बराच काळ पुणे शहराला पिण्याच्या पाण्यासाठी शहरातील विहीरींनी आधार दिलेला होता. पुण्यामध्ये जुन्या वस्तीत एका आड एका घरामध्ये आड होते. शहरांचे आकार वाढले, लोकसंख्या वाढली आणि पाण्याची गरज वाढली. भूजल अपुरे पडले. बाहेरुन पाणी आणणार्‍या नळाच्या व्यवस्था आल्या. जुन्या विहीरी अडगळीत गेल्या. अनेक ठिकाणी त्या बुजविण्यात आल्या. पाण्यापेक्षा जागेची किंमत जास्त झाली. बाहेरुन आणलेल्या नळाची आणि जुन्या आड व विहीरींची सांगड घालणे आवश्यक होते. दुर्दैवाने तसे झाले नाही. प्रशासन व शासन या बाबतीत खुजे पडले. लोक निजी स्वार्थातून बाहेर आले नाहीत. नळ संस्कृतीने आड संस्कृतीवर मात केली. हीच परिस्थिती जवळ जवळ देशाच्या सर्वच भागात झालेली आढळेल.

कोकणात तलावात विहीरी आहेत. तलावातील पाणी आटल्यानंतर उन्हाळ्यातच या विहीरीतील पाणी वापरता येते. उन्हाळ्याच्या शेवटी पाण्याची तूट जाणवेल त्यावेळीच या विहीरीतील पाण्याचा वापर करता येतो, एरवी नाही. एका दृष्टीने गावासाठी ही पाण्याची बँक आहे आणि आपत्कालीन परिस्थितीतच या साठ्याचा वापर करता येतो. पाणी व्यवस्थापनातील पाणी जतन करण्याचा हा विचार मौल्यवान वाटतो. अकोला भागात पूर्णा नदीचा काही भाग खारपाण पट्टा म्हणून ओळखला जातो. जमीन खारी आहे म्हणून भूजलपण खारे आहे. काही ठराविक ठिकाणी दरवर्षी १ गुणिले १ मीटर आकाराच्या आणि तीन ते चार मीटर खोलीच्या लहान विहीरी खोदून थेंबा थेंबाने पाझरलेले पाणी एकत्र करुन पिण्यासाठी वापरण्याचे स्थानिक कौशल्य आजपण पहावयास सापडते. या हंगामी विहीरीस शेवडी म्हणून संबोंधले जाते.

या विहीरींना कुलूप घालून तुटपुंज्या पाण्याचे राखण केले जाते. गोड्या पाण्याचे महत्व किती असते याचे हे एक उदाहरण आहे. मुंबईमध्ये हाजी अली या प्रार्थनास्थळाला लगतच्याच आडातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असे. गर्दी वाढली आणि मुंबईचा नळ त्याठिकाणी पोहोचला, आड बाजूला गेला. चारी बाजूने खारे पाणी पण आडामध्ये गोडे पाणी ही वैशिष्ट्यपूर्ण निसर्गाची व्यवस्था येथे अनुभवास येते. सातारा जिल्ह्यातील औंध हे संस्थान इतिहासकालीन गाव तलाव व आड याचे एक आदर्श उदाहरण आहे. गावाला लागूनच एका खाली एक असे दोन तीन तलाव आहेत. यातून पाझरणार्‍या पाण्यामुळे गावातील भूजल समृध्द झालेले आहे. संस्थानिकाच्या वाड्यातील विहीरीलापण याच व्यवस्थेचा आधार आहे.

गाव तलाव, त्याच्या भोवती आड आणि बाजूला मंदीर अशा व्यवस्थेतून ग्रामीण भाग पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेला होता. तलावातील पाणी देवाचे आहे आणि ते स्वच्छ राखले पाहिजे या भावनेतून तलावातील पाण्याची स्वच्छता राखली जात असे. पंंजाब, हरियाना, मध्यप्रदेश आणि देशाच्या सर्वच भागात गावतलाव, आड व विहीरीचे मोठे जाळे पसरले होते. काळाच्या ओघात नळ दारात आला आणि या जुन्या व्यवस्थेचे महत्व कमी झाले. बरेचसे तलाव व आड केवळ विना वापरामुळे प्रदुषित होऊन नामशेष झाले. काही ठिकाणी या व्यवस्थेला धार्मिक स्वरुप मिळाले. या पाण्यात स्नान केल्यानंतर पवित्रता मिळते असा भाव निर्माण झाला. पिण्याच्या पाण्याच्या इतिहासकालीन मूल्यवान स्रोताचे वाटोळे करण्यात आले. पंजाब प्रांतातील अमृतसर शहरातील रामतलाई, दुर्गियाना, तरणतारण, अमृतसर इ खोदून निर्माण केलेले तलाव हे पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेचे दिग्दर्शन करतात.

तलाव आणि गुरुद्वारा याची सांगड सार्वत्रिक दिसते. गुरुद्वाराच्या आस्तित्वामुळे तलाव स्व्च्छ ठेवण्याची परंपरा रुजली गेली असे म्हणले तर वावगे ठरू नये. अलिकडे दिलेल्या भेटीत नांदेड येथील गुरुगोविंद सिंहाच्या नावाने प्रसिध्द असलेल्या गुरुद्वारामध्ये कडेला एक सुरेख आड दिसून आला. आडात उतरण्यासाठी पायर्‍यापण आहेत. परिसरात उपलब्ध असणार्‍या नळाच्या पाण्यामुळे पर्यटकांचे लक्ष आडाकडे जात नाही. विना वापरामुळे आड दुर्लक्षित झालेला दिसला.

भारतदेश जसा तलावाचा देश म्हणून ओळखला जातो तसा तो बारवांचापण आहे. या बारवांना काही ठिकाणी कुंड, तीर्थ, पुष्करणी, तळे अशा नावाने संबोधले जाते. बारव म्हणजे पायर्‍याची मोठी विहीर. बारव ही बारमाही पाणी वाहाणारी व्यवस्था आहे. अनेक ठिकाणी या वास्तूचा उपयोग सार्वजनिक पाणी पिण्याची सोय म्हणून केलेला दिसतो. काही बारवांना राणीची बारव असे नाव देण्यात आलेले आहे. कदाचित त्या राणीच्या खाजगी खजिन्यातून बांधलेल्या असाव्यात. देश भरात बारवांचे जाळे पसरले आहे. अनेक बारवांचे बांधकाम अतिशय सुंदर आणि स्थापत्य कलेतील एक उत्तम नमुना म्हणून प्रसिध्द आहे. अनेक बारवा आजपण वापरात आहेत. काळाच्या ओघात दुर्लक्ष झाल्यामुळे बर्‍याच ठिकाणी त्याची मोडतोड झालेली आहे आणि त्यातील पाणी प्रदूषित झालेले आहे. जगातील सर्वात सुंदर बारव म्हणून गुजरात मधील पाटण या ठिकाणच्या राणीच्या सात मजली बारवेचा उल्लेख करावा लागेल.

प्रत्येक दगडावर अर्थपूर्ण आणि अप्रतिम शिल्पे कोरलेली आहेत. ही विशाल बारव मऊ मातीच्या पायावर शेकडो वर्षापासून भक्कमपणे उभी आहे. राजस्तान या कमी पावसाच्या प्रदेशात जयपूरपासून जवळच असलेल्या अभावेरी या खेड्यात ९ व्या शतकातील चांद बावडी नावाची बारव आहे. जलसंधारणाबरोबरच तीव्र उन्हापासून थोडीशी उसंत घेण्यासाठी राज परिवाराबरोबर जनतेलापण एकत्र येण्यासाठी ३५०० पायर्‍याची बारव बांधण्यात आली आहे. जगातील या मोठ्या बारवेच्या पाण्याचा स्रोत भूजल आहे. लांबी जास्त, खोली जास्त असलेल्या या बारवा रुंदीमध्ये मात्र मर्यादित दिसतात. बर्‍याच बारवा गोल आकाराच्या आहेत. या बारवांचे बांधकाम सिमेट्रीकल आहे आणि यामुळेच कदाचित भूकंपाच्या धक्क्याला तोंड देऊन भक्कमपणे त्या उभ्या असाव्यात. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील होळकरांच्या राजवाड्यातील बारव मात्र असिमेट्रीकल आहे. १९७२ च्या दुष्काळात चांदवड सह आजुबाजूच्या ८० खेड्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा या बारवेतून केला जात होता असे समजते. पुण्याजवळ सातारा महामार्गालगत असलेल्या खेड शिवापूर या गावातील होळकरांच्या जुन्या वाड्यात चालू स्थितीत असलेला आणि जपून ठेवलेला आड नजरेस आला. वाड्या लगतच वाहाणार्‍या शिवगंगा या नदीचा भूजल पुनर्भरणासाठी उपयोग होत असणारच.

दिल्ली, बडोदा, अहमदाबाद, देवगिरी, चारठाणा, परळी, देगलूर अशा हजारो ठिकाणी निर्माण केलेल्या इतिहासकालीन बारवांची संख्या काही लाखामध्ये जाते. पिण्याच्या पाण्याचे भरवशाचे स्रोत म्हणून त्यांचे महत्व अबाधित आहे. पण त्यापेक्षाही काकणभर जास्त मूल्य या स्थळांना पर्यटनाची ठिकाणे म्हणून राहाणार आहे. जगामध्ये फार कमी देशांना पाण्याचा असा वारसा लाभलेला असावा. अनेक बारवामध्ये महालांची निर्मिती करण्यात आलेली आहे. पाण्याच्या जवळ आल्हादकारक वातावरण असते. त्याचा फायदा महालरुपी विश्रांतीच्या ठिकाणांना सहजपणे मिळतो. सिंधखेडराजा येथे चांदणी तलावाच्या पायथ्याला सजणा बारव आहे. ही बारव सतत भरलेली असते कारण उशाला तलावाच्या स्वरुपात पुनर्भरणाचे साधन आहे. बारव बांधत असतानाच महालाची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्याच परिसरात तलावाच्या खालच्या भागात एक पुतळा बारव आहे. या बारवेच्या प्रत्येक दगडावर पुतळा घडविलेला आहे. सिंधखेडराजा हे छ.

शिवाजीमहाराजांचे आजोळ आणि जिजाऊंचे माहेर आहे. ज्या राजवटीत त्या परिसरात अनेक तलाव आणि बारवा निर्माण केल्या गेल्या त्या राजाने पाण्यावरील प्रेमाचे प्रतिक म्हणून बारवांना स्वत:च्या मुलींची नावे दिली आहेत असे स्थानिक लोक सांगतात. त्याठिकाणी इतिहासकालीन दोन मोठे तलाव आहेत. एकाचे नाव मोती तलाव आहे तर दुसर्‍याचे नाव चांदणी तलाव आहे. या परिसरातील बाळसमुद्र बारव सोळा मोटेची आहे. हा परिसर पावसाच्या दृष्टीने अवर्षण प्रवण आहे. तरीपण मानवी प्रयत्नातून निर्माण केलेल्या पुनर्भरणाच्या उपचारातून बारवांना समुद्राची उपमा देण्या इतके विपूल पाणी उपलब्ध झालेले आहे आणि म्हणूनच पाणी उपसण्यासाठी सोळा मोटेची व्यवस्था कार्यान्वित केलेली असणार.

मृद व जल संधारणाच्या उपचारातून या गावाचे शिवार दोन पिकी झालेले आहे. पुनर्भरणाच्या मदतीने भूजलाची ताकद अनेक पटीने वाढते हेच यातून दिसून येते. सातार्‍याजवळ लिंब या गावी बारा मोटेची बारव आहे. बारवेचे बांधकाम सुंदर आहे. विश्रांतीसाठी आतल्या भागात ओवर्‍या निर्माण केलेल्या आहेत. काळाच्या ओघात बारा मोटेची जागा विजेच्या पंपाने घेतलेली आहे आणि बारवेद्वारे सिंचनाखाली आलेले क्षेत्र विपुल आहे. बीड जवळील खजिना बारव हे सिंचन क्षेत्रातील आश्‍चर्य आहे असे म्हणावयास हरकत नाही. शेकडो वर्षापासून या बारवेच्या भूमीगत कालव्याद्वारे सिंचन केले जात आहे.

प्रत्येक बारवांना, विहीरींना आणि आडांना पुनर्भरणाची सोय केलेली होती. अपवाद म्हणूनपण पुनर्भरणाच्या साधनाविना जमिनीतून पाणी उपसण्याचे साधन असावे. पाटणची सात मजली बारव सहस्रलिंग तलावात बांधलेली आहे. वेरुळ येथील बारव ओढ्याच्या काठावर निर्माण केलेली आहे. अनेक ठिकाणी पुनर्भरणाच्या साधनाची मोडतोड झाल्यामुळे बारवा एकाकी पडलेल्या आहेत आणि त्यामध्ये पाणी दिसत नाही. करमाळा येथील जुनी ९६ पायर्‍याची बारव पुनर्भरणाच्या साधनाअभावी कोरडी राहिलेली दिसली. भूजलाला पुनर्भरणाचा भक्कम आधार लागतो. अनेक ठिकाणी निसर्गत:च, जमीनीच्या चढ उतारामुळे, भूस्तरीय रचनेमुळे, वृक्षाच्छादनामुळे परिसरातील आड, विहीरींना पुनर्भरणाची अनुकूलता लाभत असते. करमाळा येथील सात विहीरीच्या विहीरीला उशाला असलेल्या तलावाचा आधार मिळालेला आहे. १९६०-६५ पर्यंत कढईच्या आकाराची ही बारव करमाळा गावाला पाणी पाजत होती असे कळते.

सह्याद्रीच्या पश्‍चिम पायथ्याला निर्माण केलेला महाड येथील चवदार तलाव हा चौदा विहीरीचा तलाव आहे. पंजाबमध्ये अमृतसरच्या परिसरात शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी चाळीस विहीरीची व्यवस्था केलेली होती. त्या विहीरीच्या समूहाला चालीस कूँ असे संबोधले जाते. बुर्‍हाणपूरची नहर १०० विहीरीची विहीर म्हणून ओळखली जाते. उत्तर भारतात हिमाचल प्रदेश इ भागात फिरत असताना रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी लहानशा मंदिरवजा वास्तू दिसतात. डोंगरातून येणार्‍या झर्‍यावर बांधलेल्या या विहीरी आहेत. सार्वजनिक पाणपोई म्हणून त्याचा उपयोग केला जातो. भूतान या चिमुकल्या देशात फिरत असताना झर्‍यावर निर्माण केलेले अगणित पाणवठे दिसले. या पाणवठ्यांना लहानशा मंदिराचा आकार दिलेला आहे. या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी, सिंचनासाठी केला जातो.

महाराष्ट्रात सह्याद्रीच्या पूर्व आणि पश्‍चिम पायथ्याला अनेक ठिकाणी झर्‍यावरील सिंचन नजरेस येते. झर्‍याला आधार उशाशी असलेल्या डोंगरातील भूजलाचा असतो. महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सरहद्दीवर सोलापूर महामार्गालगत अमृतकुंड नावाचे कुंड आहे. कर्नाटकातील बिदर शहरात गुरुद्वारालगत झर्‍यावरील कुंड आहे. नानकझिरा या नावाने तो प्रसिध्द आहे. वर्षातील बाराही महिने कुंडातून पाणी वाहात असते आणि त्या पाण्यातून खालच्या भागात शेती केली जाते. डोंगराच्या कपारीत वसलेल्या या कुंडाचा स्रोत भूजल आहे.

मानव आणि इतर प्राणीमात्राच्या वेगवेगळ्या गरजा भागविण्यासाठी इतिहासकाळापासून भूजलाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे. जमीनीवर साठवलेले पाणी मर्यादित असते आणि ते अनेकवेळा सार्वजनिक मालकीचे असते. जमीनीखाली साठलेले पाणी मात्र खाजगी मालकीचे झाल्यामुळे वापरकर्त्यांना ते पाणी त्याच्या हक्काचे वाटते. वास्तविक जमीनीखालील प्रचलित कायद्याने खाजगी मालकी स्थापन करण्याचा हक्क दिलेला असला तरी, खर्‍या अर्थाने भूजल सार्वजनिक संसाधनच असते. देशाला स्वातंत्र्य मिळाले, लोकसंख्येमध्ये भर पडू लागली, पाण्याच्या गरजा वाढल्या. शेतीतील उत्पादन वाढविण्यासाठी आधिकाधिक शेती सिंचनाखाली आणण्याची गरज निर्माण झाली.

नद्या, नाले अडवून लहान मोठी जलाशये निर्माण करण्यात आली. जमीनीवर निर्माण केलेली जलाशये ही एका अर्थाने भूजल पुनर्भरणाचेपण काम करत असतात. पृष्ठभागावर साठलेले पाणी गुरुत्वाकर्षणामुळे जमीनीमध्ये मुरून भूजलात वाढ करण्याचा प्रयत्न करत असते. सुरुवातीच्या काळात जमीनीतून पाणी उचलण्याच्या यंत्राच्या अभावामुळे प्राण्यांच्या मदतीने आणि मानवी श्रमाने भूजलाचा वापर केला जात असे. वर्षाकाठी होणार्‍या पुनर्भरणाच्या तुलनेत हा वापर फारच मर्यादित होता. त्यामुळे मान्सून संपल्यानंतरसुध्दा भूजलाच्या वाहाण्यामुळे नद्या, नाले प्रवाहीत होते. काळाच्या ओघात डिझेलवर आणि विजेवर चालणारे पंप उपलब्ध झाले. १९७२ ते ८० च्या दरम्यान वीज सार्वत्रिकपणे उपलब्ध झाली. ही वीज स्वस्त होती आणि काही ठिकाणी नि:शुल्कपण होती.

जमीनीतील पाण्याचा उपसा अनिर्बंधपणे होऊ लागला. देशाच्या अवर्षण प्रवण भागाला याचा मोठा फटका बसला. अनेक भागात भूजलाची पातळी घसरू लागली. अति मोह विकासाला घातक ठरतो. भूजल वापराच्या चांगल्या परंपरेचे विडंबन होऊ लागले. पाणलोट क्षेत्र निहाय देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये भूजल उपलब्धीचा अंदाज बांधणे आणि त्याचे नियमन करण्याची निकड जाणवू लागली.

१९७३ पासून केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवर भूजलाचा अंदाज अजमावण्याचा आणि त्याचे नियमन करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. आजच्या घडीला राज्यामध्ये होणारा भूजलाचा वापर वर्षाकाठी सरासरीने उपलब्ध होणार्‍या भूजलाच्या तुलनेत ५० टक्क्याच्या जवळपास आहे. देशपातळीवरील प्रमाण याच्याशी मिळते जुळते आहे. काही पाणलोट क्षेत्रात भूजलाचा वापर मर्यादेपेक्षा जास्त झालेला आहे तर कोकण आणि विदर्भाच्या भागात तो तुलनेने कमी आहे. राज्यातील जवळपास १५०५ पाणलोट क्षेत्रापैकी २०० च्या जवळपास पाणलोट क्षेत्र वापराची मर्यादा ओलांडत आहेत. १९७२ च्या दरम्यानच विजेच्या पुरेशा उपलब्धी बरोबरच विंधन विहीरीच्या कालखंडाची सुरुवात झाली.

जमीनीमध्ये खोल जाऊन भूजल उपसणे सोपे झाले. आजच्या घडीला राज्यामध्ये विविध प्रयोजनासाठी जमीनीतून पाणी उपसणार्‍या पंपाची संख्या ३० लाखापेक्षा जास्त असावी. ५ लाखाच्या आसपास विंधन विहीरी असाव्यात. भूजलाचा वापर भूजल उपलब्धीच्या तुलनेत जास्त होणे भूजल विकासाला मारक ठरणारे आहे. या बरोबरच या मूल्यवान स्रोताची गुणवत्ता ढासळू न देणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे. औद्योगिक क्षेत्र, मानवी वस्त्या आणि सिंचित शेती यामधून बाहेर पडणारे प्रदूषित सांडपाणी भूजलाची गुणवत्ता ढासळण्यास कारणीभूत ठरत आहेत. या दोन्ही बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे. भूजलाचा वापर प्रत्येकाला ठरवून दिलेल्या प्रमाणात मोजून देण्याची व्यवस्था बसविणे आवश्यक आहे. भूजल हा अदृष्य स्रोत आहे. जमीनीच्या खाली असल्यामुळे बाष्पीभवन आणि प्रदूषणाच्या मार्‍यापासून अलिप्त राहू शकतो.

भूजल विकासाची इतिहासकालीन साधने निदान यापुढे तरी वारसा म्हणून जपून ठेवण्यासाठी कायद्याचे पाठबळ देऊन प्रयत्न केला पाहिजे. लाख मोलाची ही साधने अनास्थेमुळे नामशेष होऊ न देणे समाजाने आपले कर्तव्य समजावे. स्थानिक सेवाभावी संस्थेने पुरातत्व विभागाच्या मदतीने यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. अशा कामासाठी शासन व समाजाकडून निधी मिळत असतो. शासनावर ही जबाबदारी लोटू नये.

डॉ. दि.मा. मोरे , पुणे - मो. ९४२२७७६६७०

Path Alias

/articles/bhauujala-vaikaasaacai-paranparaa

Post By: Hindi
×