भूजल नियोजनामध्ये भूस्तर अभ्यासाचे महत्व


महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यात कारीचे पट्टे आढळून येतात. उदा. औरंगाबाद, जालना, नाशिक, पुणे इत्यादी भूजल साठवण्यासाठी कारीच्या पट्टायाची महत्वाची भूमिका असते. काही कारीचे पट्टे भूजल वहनासाठी तर काही ठिकाणी भूजल अडविण्याचे काम हे कारीचे पट्टे मोठ्या प्रमाणात करत असतात. कारीच्या पट्ट्याला लागून विहीर किंवा बोअर असल्यास अशा विहीरी किंवा विंधन विहीरींना भूरपूर भूजल उपलब्ध असते.

दुष्काळ किंवा पाणी टंचाई ही त्या भागात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला की निर्माण होते अशी सर्वसाधारणपणे धारणा आहे. परंतु सरासरी पावसासोबत त्याभागातील भूस्तर कसा आहे ? किंवा त्या भागातील खडकांची भूजल साठविण्याची क्षमता किती आहे त्यावर सुध्दा पाणी टंचाई अवलंबून असते. परंतु आपणाकडे नागरिक व शासन सुध्दा फक्त पाऊस किती पडतो यावरून सर्व नियोजन करते, परंतु भूस्तराची भूजल साठविण्याची क्षमता कमी असेल तर सरासरी पेक्षा पाऊस जास्त झाला, तरी त्या भागात सुध्दा पाणी टंचाई परिस्थितीत निर्माण होते. भूजल साठे वृध्दींगत करण्यामध्ये किती पाऊस पडतो या पेक्षा भूस्तराची महत्वाची भूमिका असते. उदा. कोकणातील भागात ३००० मि.मी पेक्षा जास्त पाऊस पडून सुध्दा कोकणाच्या अनेक गावांना उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईचा प्रश्‍न भेडसावतो, या उलट पश्‍चिम राजस्थान, पश्‍चिम पंजाबच्या अनेक जिल्ह्यांमध्ये फक्त २५० ते ३५० मि.मी एवढा कमी पाऊस पडून सुध्दा तेथील खडकांची भूजल धारण क्षमता चांगली असल्यामुळे पाणी टंचाई निर्माण होत नाही. पूर्वी भूजल पातळी वरती असल्यामुळे एखाद्या वर्षी पाऊस कमी झाला तरी पाणी टंचाई जाणवत नसे, वर्षभर त्या भागातील नागरिकांना भूजल उपलब्ध असायचे. त्यामुळे पाणी टंचाई कमी करण्यासाठी भूस्तर रचना समजून घेणे आवश्यक आहे.

वाढणारी लोकसंख्या, शहरीकरणामुळे दरडोई वाढणारा पाण्याचा वापर, वाढणारे सिंचन क्षेत्र (बागायती), उत्पन्न वाढीसाठी उन्हाळ्यात घेतली जाणारी पिके व उद्योगिकरण यामुळे भूजलाची मागणी सातत्याने वाढत असून, सिंचनामुळे ग्रामीण भागात आणि उद्योग व दैनंदिन वापरासाठी घेतलेल्या शहरातील हजारो विंधन विहीरीमुळे भूजल पातळी मागील काही वर्षात सातत्याने खालावत जात आहे. मागील अनेक वर्षांपासून पाणी टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी सरकार व नागरिक अनेक उपाययोजना करतात. ज्यामध्ये ग्रामीण भागात पाणलोट विकास, लघु वा मध्यम तलाव, बंधारे तसेच शहरी भागात रेन वॉटर हार्वेस्टिंग अशी अनेक उदाहरणे आहेत. मोठ्या शहराला दैनंदिन वापरासाठी धरणातून पाणीपुरवठा होत असला तरी ३० टक्के ते ३५ टक्के पाणी पुरवठा स्थानिक भूजल स्त्रोतातून बोअरद्वारेे होत असतो.

भूजल उपलब्ध असल्यामुळे अनेकवेळा शहराला २ ते ३ दिवस पाणी पुरवठा झाला नाही तरी पाण्यासाठी तेवढा आवाज उठविला जात नाही. भूजल साठे किंवा भूजल पातळी उंचाविण्यासाठी पावसाच्या पाण्याने पुनर्भरण करणे हा प्रमुख पर्याय आहे. त्यासाठी त्याभागातील भूस्तर कसा आहे, यावर पुनर्भरणाचे यश अवलंबून असते. पूर्वी शहरांमध्ये मोठ्या प्रमणात मोकळी जागा, उद्यान, झाडी असल्यामुळे नैसर्गिक रित्या पुनर्भरण होत असे परंतु मागील काही वर्षात वाढते शहरीकरण, सिमेंट व डांबरी रस्ते, गटार, वृक्षांचे कमी प्रमाण, त्यामुळे आता पुनर्भरण होण्यास मर्यादा आल्या आहेत.

आज महाराष्ट्रातील १३ टक्के शेती सिंचनाखाली असून त्यापैकी कालव्याद्वारे ६ टक्के तर भूजलाद्वारे ७ टक्के शेती सिंचनाखाली आहे. आजसुध्दा ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्त्रोत हे भूजल हेच आहे, असे असतांनाही मागील २५ -३० वर्षात विहीर तेथे विद्युत पंप आल्यापासून भूजल उपसा अविवेकी पध्दतीने केल्यामुळे भूजल पातळी खोलवर गेली. आज महाराष्ट्रातील बहुसंथ्य जिल्ह्यातील विहीरीची खोली ५० ते ७० फुटापर्यंत व विधंनविहीरीची खोली २०० ते २५० फुट खोल असल्यामुळे महाराष्ट्रातील भूस्तर कोरडा झाला आहे. एवढ्या खोलवरचे भूजल वापरणे म्हणजे २०० ते ३०० वर्षापूर्वीचे भूजल आपण वापरत आहोत. महाराष्ट्रातील खोलवर गेलेली भूजल पातळी पूर्ववत वरती आणायची असल्यास पुढील १५ ते २० वर्षे पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण मोठ्या प्रमाणात करावे लागेल.

मागील वर्षी महाराष्ट्रात सरासरी एवढा पाऊस झाला, तरी सुध्दा भूजल पातळी सरासरीपेक्षा खोल गेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बहुसंख्य तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे किंबहुना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ ऑक्टोबर - नोव्हेंबर मध्येेच आली आहे. म्हणजे सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडून जर भूजल पातळी ४ ते ५ फुटांनी खाली गेली आहे म्हणजे सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडून जर भूजल पातळी खोल जात असेल तर नक्कीच आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. म्हणजे भूजल नियोजन कुठेतरी चुकते आहे, याचा शोध घेवून भूजल नियोजनासाठी नव्याने विचार करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रातील ८२ टक्के भागामध्ये असणार्‍या बेसाल्ट खडकांची भूजल धारण क्षमता :


पश्‍चिम व मध्य भारतात फिशर टाईप ज्वालामुखीचा उद्रेक होवून त्यामधील बाहेर पडलेला लाव्हारस थंड होवून काळा पाषाण म्हणजेच बेसाल्ट ( डेक्कन टॅ्रप) खडक तयार झाला.

बेसाल्ट व भूजल उपलब्धता :


बेसाल्ट खडकाची भूजल उपलब्धता थोड्या अंतरावर बदलत असल्यामुळे गाव व शिवार पातळीवर भूस्तर अभ्यास करणे आवश्यक आहे. व त्यावरून प्रत्येक गावाचा भूशास्त्रीय नकाशा तयार करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील भूप्रदेश पठार असल्यामुळे बहुसंख्य भागात भूशास्त्रीय अभ्यास करण्यासाठी उघडा खडक अवलोकनासाठी मिळणे दुर्मिळ आहे. हा अभ्यास करण्यासाठी विहीर व टेकड्यांचे रोडकट सर्वेक्षण करून भूशास्त्रीय रचनेचे वर्गीकरण करता येते. महाराष्ट्रात बेसाल्ट खडकाचे आडवे थरावर थर असल्यामुळे भुजलसाठे तयार होत नाहीत. भरीत कुहरी आणि अकुहरी दोन्ही प्रकारच्या खडकामध्ये कमी जास्त प्रमाणात विदारण होत असते. काळापाषाण बेसाल्टमधील संधीमुळे विदारण होण्याची क्रिया होते.

आणि मांजर्‍या बेसाल्ट मधील अष्मपत्री संधीमुळे विदारण तयार होते. विदारणाची तीव्रता आणि जाडी जितकी जास्त तितके अधिक भूजल त्या भागातील भूस्तरामध्ये उपलब्ध असते. काळ्या बेसाल्ट मध्ये लाव्हारस थंड होतांना चिरा अथवा संधी तयार होतात. या संधी एकमेकांपासून जितक्या जवळ आणि अशा संधियुक्त खडकाची जाडी अधिक तितके जास्त प्रमाणात भूजल उपलब्ध होते. भौगोलिक दृष्ट्या खोलभागात नदीबाजूला असलेले खडक जास्त विपरीत असतात.

अकुहरी बेसाल्ट (कॉम्पॅक्ट बेसाल्ट किंवा काळा पाषाण) :


ज्वालामुखी मधून बाहेर पडलेला लाव्हारस जमिनीवर आडवा अंथरला जातो व हा लाव्हा रसाचा स्थर थंड झाला की त्यापासून काळापाषाण कठीण आणि टणक खडक तयार होतो. काळा पाषाण खडकाचे संधीवरून दोन भाग पडतात. उदा. अपार्य व पार्य खडक : उष्णजलीय प्रक्रियेमुळे कठीण, संधीमुक्त झालेला वरचा थर जो अविदारित असल्यामुळे अपार्य (Impermeable) असतो. काहीवेळा विदारणामुळे अश्मपत्र संधी तयार होवून द्वितीयक पार्यता (Permeability) निर्माण होते. ह्या खडकाची पाणी धारण करण्याची क्षमता अत्यंत कमी असून सर्वधाराणपणे ३ ते ७ टक्के पर्यंत आढळून येते. भूजलधारण क्षमता ही खडाकातील संधीवर अवलंबून असते. काळ्या पाषाण खडकाच्या थरातील कोणता भाग जमिनीवर उघडा झालेला आहे. यावरून त्या भागात पाण्याचा किती निचरा होतो हे अवलंबून असते.

अकुहरी बेसाल्टच्या एकाच थरातील खालील, मध्य व वरील भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संधी (Joints) तयार झालेल्या आढळून येतात. त्यामुळे एकाच बेसाल्ट खडकामध्ये सुध्दा थोड्या थोड्या अंतरावर भूजल धारण क्षमता बदललेली आढळून येते. महाराष्ट्रातील भूशास्त्रीय सर्वेक्षण करत असतांना अशी अनेक गावे आढळून आलेली आहे ज्या गावांच्या परिसरामध्ये कमी संधी असलेला (Broadly Jointed) आणि ५० ते ६० फूट जाडी असलेला काळा पाषण खडक जमिनीवर आढळून येतो, या काळ्या पाषाण खडकाची जाडी जास्त असल्यामुळे हा थर ३ ते ५ कि.मी लांबी पर्यंत आडवा पसरलेला आढळून येतो. त्यामुळे अशा गावाच्या परिसरामध्ये पाणलोट विकास पाण्याच्या पुनर्भरणाचे अऩेक प्रयोग निष्फळ झालेले आढळून येतात. अशा ठिकाणी पुनर्भरण यशस्वी करावयाचे असल्यास ७० ते ८० फूट खोलीपर्यंत जमिनीखाली (Permeable Flow) पर्यंत कृत्रिम पुनर्भरणाचे बोअर घेवून पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण पार्य खडकामध्ये केल्यास अशा भागातील भूजल साठ्यात वाढ करता येवू शकते. नंतर हे पाणी उन्हाळ्यामध्ये नागरिक सहजासहजी वापरू शकतात परंतु यासाठी सूक्ष्म पातळीवर भूशास्त्रीय सर्वेक्षण होणे आवश्यक आहे.

भरीत कुहरी किंवा मांजर्‍या बेसाल्ट :


हे खडक अविदारित असतांना त्यांचा संपूर्ण थर कठीण व अपार्य असतो. महाराष्ट्रातील अनेक भागातील लेण्या अशा खडकामध्ये कोरलेल्या आहेत. या खडकांच्या थरामध्ये काही ठिकाणी मधल्या व खालच्या भागात भरित कुहराचे प्रमाण कमी झाल्यामुळे तेथे संधी निर्माण झाल्याने खडकांची पार्यता काही प्रमाणात वाढल्याचे आढळून आले. अविदारित स्थितीत मांजर्‍या खडक अपार्य असतो. परंतु विदारणामुळे या खडकात अकुहरी बेसाल्ट च्या वरच्या थराप्रमाणे अश्मपत्र संधी (सिट जॉइन्ट) तयार होवून द्वितीयक पार्यता निर्माण होते. त्यामुळे अशा थरात भूजलाची उपलब्धता असल्याची शक्यता असते. मांजर्‍या बेसाल्ट खडकांचे अनियमित व लहान आकारांचे थर असल्यास अशा खडकांची झीज लवकर होवून भूजल पुनर्भरणासाठी हे खडक उपयुक्त आहेत. त्यामुळे मोठे भूजल साठे अशा भागात निर्माण करता येतात.

भरीत कुहरी खडक महाराष्ट्रातील बहुसंख्य भागांमध्ये काळ्या पाषाणानंतर मोठ्या प्रमाणात आढळून येणारा खडक आहे. हा खडक जर नदीपात्राच्या प्रवाहालगत किंवा खोल दरी भागात किंवा पठारी भागात असेल तर हा खडक मोठ्या प्रमाणात झिजलेला आढळून येतो. प्रत्येक गावांच्या शिवारामध्ये नदी नाले किंवा भौगोलिकदृष्ट्या खोल भाग आढळून येतो. अशा भागांमध्ये ज्या ठिकाणी मांजर्‍या खडकाचे थर आढळून येतात अशा जागा भूजल पुनर्भरणासाठी अति योग्य असून अशा ठिकाणी योग्य पध्दतीने पुनर्भरण केल्यास त्या गावातील पूर्ण शिवाराचे भूजलसाठे विकसित केल्या जावू शकतात परंतु यासाठी सुध्दा प्रत्येक गावातील सूक्ष्म पातळीवर भूशास्त्रीय सर्वेक्षण करणे आवश्यक आहे.

ज्वालामुखी संसोणाशम :


या खडकामध्ये संधी निर्माण न झाल्यामुळे पाण्याची उपलब्धता राहत नाही. परंतु हा खडक क्वचितच आढळून येतो व याचा विस्तार सुध्दा मर्यादित असतो. त्यामुळे खडकांचा भूजल साठे निर्मितीवर मोठा परिणाम होत नाही.

रेड बोल किंवा लाल गेरू :


जमिनीच्या खाली हा लाल गेरू खडक संधिमुक्त कठी व अपार्य खडक असून, या खडकामधील पाणी पाझरण्याची थोडीसुध्दा शक्यता नसते, त्यामुळे जमिनीखाली या खडकाच्या वरील भागात बहुतेक ठिकाणी विहीर किंवा बोअरवेलला भरपूर पाणी मिळते. परंतु हा रेड बोल वातावरणाशी संपर्कात आला तर काही दिवसात हा खडक विदारित होवून त्याची लालमाती तयार होते व त्यामुळे जमिनीवर लाल गेरूचे मोठे खडक आढळून येत नाहीत. महाराष्ट्रातील बहुसंख्य भागांमध्ये लालगेरूचे २ ते ३ फूट जाडीचे पट्टे दोन लाव्हा थरांच्या मध्ये सँडवीच झालेले आढळून येतात. प्रवासामध्ये घाटांमधून वेडीवाकडे वळणे घेत असतांना लाल रंगाचे पट्टे अनेक भागात आढळून येतात. जमिनीखाली विहीरींमध्ये लाल रंगाची रिंग सहजासहजी आढळून येते. लालगेरूचे हे पट्टे भूजल साठे वाढविणे किंवा कमी करण्यामध्ये या थरांची फार महत्वाची भूमिका असते. ज्या गावांच्या शिवारामध्ये कमी खोलीवर गेरूचा आडवा पट्टा खडकामध्ये आढळून येतो अशा गावांचे भूजल साठे विकसित होत नाहीत, कारण गेरूचा अपार्य थर कमी खोलीवर असल्याने पावसाचे पाणी खोलवर पाझरू देत नाही. अशा शिवारांमध्ये भूशास्त्रीय अभ्यासाच्या निष्कर्षानुसार कृत्रिम रित्या पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण केल्यास भूजलाचे साठे वाढू शकतात.

कारीचे पट्टे ( Dyke):


महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यात कारीचे पट्टे आढळून येतात. उदा. औरंगाबाद, जालना, नाशिक, पुणे इत्यादी भूजल साठवण्यासाठी कारीच्या पट्टायाची महत्वाची भूमिका असते. काही कारीचे पट्टे भूजल वहनासाठी तर काही ठिकाणी भूजल अडविण्याचे काम हे कारीचे पट्टे मोठ्या प्रमाणात करत असतात. कारीच्या पट्ट्याला लागून विहीर किंवा बोअर असल्यास अशा विहीरी किंवा विंधन विहीरींना भूरपूर भूजल उपलब्ध असते. कारीच्या खडकांमध्ये मोठ्या प्रमाणात संधी निर्माण झालेली असल्यामुळे अशा कारीच्या पट्ट्यामधून पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण मोठ्या प्रमाणात केल्या जावू शकते. अनेक कारींची लांबी ३ ते ५ कि.मी पर्यंत सुध्दा आढळून येते अशा कारींचा उपयोग पुनर्भरणासाठी केल्यास ह्या परिसरात मोठ्या प्रमाणात भूजल साठे निर्माण करता येवू शकतात.

निष्कर्ष :


मागील २५ ते ३० वर्षात भूजलाचा अति उपसा हे भूजल पातळी खोलवर जाण्यास मुख्य कारण आहे. भूजल पातळी वाढविण्यासाठी वाढती लोकसंख्या व विकास गृहित धरून नियोजनबध्द पाण्याचा वापर व सरासरी पडणार्‍या पावसाच्या पाण्याचे जास्तीत जास्त पुनर्भरण करण्यासाठी अद्यावत सुविधांचा वापर असणार्‍या योजना राबविणे, त्यामध्ये पुनर्भरणासाठी जमिनीवर दिसणार्‍या खडकांचाच फक्त अभ्यास न करता ज्यामध्ये प्रात्यक्षिकरित्या भूजलसाठे वाढविण्याचे आहे, त्या जमिनीखालील खडकांचा अभ्यास व गावपातळीवर भूशास्त्रीय नकाशे बनवून योग्य त्या ठिकाणी पुनर्भरणाचे बंधारे बांधून भूजल साठे वाढवावे लागतील, तेव्हा आपल्याला अशा परिसरामध्ये भूजलाची उपलब्धता वाढविता येईल, भूजल वृध्दी झाल्यानंतर एखाद्या वर्षी सरासरीपेक्षा थोडा कमी पाऊस झाला तरी पाणी टंचाईची तीव्रता वाढणार नाही.

डॉ. अशोक तेजनकर - मो : ०९५२७२१५५३३

Path Alias

/articles/bhauujala-naiyaojanaamadhayae-bhauusatara-abhayaasaacae-mahatava

Post By: Hindi
×