भारतातील प्रसिद्ध सरोवरे : दल सरोवर


हे सृष्टीसौंदर्याने विनटलेले श्रीनगर येथील एक सुंदर सरोवर आहे. खरे पाहिले असता दल याचा अर्थच मुळी सरोवर असा आहे. म्हणून दल सरोवर म्हणणे तितकेसे बरोबर ठरत नाही पण आता तो रुळलेला शब्दप्रयोग झाला असून त्याचा उल्लेख सर्वत्र दल सरोवर म्हणूनच केला जातो. काश्मीरमधील हे दुसर्‍या क्रमांकाचे सरोवर आहे.

डल झीलया सरोवराचा परिसर हा १५.५ किलोमीटर असून याचे क्षेत्रफळ १८ चौरस किलोमीटर आहे. सरोवराची लांबी ७.४४ किलोमीटर असून रुंदी ३.५ किलोमीटर आहे. सरासरी खोली १.४२ मीटर असून जास्तीजास्त खोली ६.०० मीटर आहे.

श्रीनगर ही मोगल कालीन दिल्ली दरबारची उन्हाळी विश्रांतीची जागा असल्यामुळे या शहरात राजेशाही पदोपदी आढळून येते. सरोवराच्या काठावरील मोघलकालीन बगीचे (जसे शालीमार बाग, निशात बाग वगैरे) सरोवरातील राजेशाही तरंगत्या बोटी या पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरतात. हिवाळ्याचे दिवसात या परिसरातील तापमान शून्याखाली जात असल्यामुळे हे सरोवर त्या काळात गोठते.

या सरोवराच्या मध्ये एक बेट असून ते चार चिनार म्हणून ओळखले जाते. चार चिनार वृक्षांची तिथली उपस्थिती असल्यामुळे हे नाव पडले आहे. हे सरोवर चार भागात विभागले गेले आहे. गागरीबाल, लोकुटदल, बोडदल व नगीन हे ते चार भाग होत. तसे पाहिले असता नगीन हे स्वतंत्र सरोवर म्हणूनही ओळखले जाते.

दल सरोवरात पाण्याचा येवा मरसर सरोवरातून तेलबाल नाल्यातून होतो. तसेच या सरोवरातून दल गेट आणि नाला अमीर मधून पाणी बाहेर सोडले जाते. तरंगता बगीचा हे या सरोवराचे वैशिष्ट्य आहे. तो सरोवराच्या तळापासून विलग असतो आणि तो एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी हालविला जाऊ शकतो. जसे जहाज नांगरले जाते तसे हा बगीचा नांगरला जाऊ शकतो. या बगीचात टमाटे, काकड्या, टरबुजे या सारख गोष्टी तयार होतात.

मासेमारी हा येथील एक महत्वाचा व्यवसाय आहे. सरोवराच्या काठावरील बरेच लोक हा व्यवसाय करतात. कार्प नावाचे मासे हे येथील वैशिष्ट्य आहे. १९५७ पासून हे मासे येथे उपलब्ध आहेत. सरोवराचे पाणी दिवसेंदिवस प्रदूषित होत चालले आहे. त्यामुळे या व्यवसायाला त्याची हानी पोहोचत आहे. सांडपाण्यामुळे या सरोवरात नायट्रोजन व फॉस्फोरसचे प्रमाण वाढत आहे. पर्यावरणाच्या प्रश्‍नाशिवाय दुसरा महत्वाचा प्रश्‍न म्हणजे सरोवरावर होणारे आक्रमण. पूर्वी या सरोवराचे क्षेत्रफळ २२ चौरस किलोमीटर होते, ते कमी होत होत आता फक्त १८ चौरस किलोमीटर राहिले आहे. त्याचबरोबर वाढत्या गाळाची समस्याही वाढत चालली आहे.

Path Alias

/articles/bhaarataataila-parasaidadha-saraovarae-dala-saraovara

Post By: Hindi
×