भारतातील प्रसिद्ध सरोवरे : भोज तलाव


मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ या शहराच्या पश्‍चिम बाजूला हा तलाव वसलेला आहे. या महानगरातील ४० टक्के लोकसंख्येला या तलावापासून पिण्याचे पाणी मिळते. या सरोवराला जागतिक रामसर साईटचा दर्जा प्राप्त झाला आहे. या सरोवराची लांबी ३१.५ किलोमीटर व रुंदी ५ किलोमीटर आहे. ३६१ चौरस किलोमीटर परिसरातून या सरोवराला पाणी प्राप्त होते. या सरोवराचा पृष्ठभाग ३१ चौरस किलोमीटर आहे. कोलन्स नदीपासून या सरोवराला पाणी पुरवठा होतो.

धार जिले का भोज तालाबमाळवा प्रदेसचा राजा, राजा भोज यांने या सरोवराची निर्मिती केली. १००५ ते १०५५ या कालखंडात या सरोवराचे बांधकाम करण्यात आले. याच राजाने भोपाळ शहर वसवले. सुरवातीला या शहराचे नाव भोजपाल असे होते पण पुढे त्यात स्थित्यंतर होवून ते भोपाळ बनले. कोलन्स नदीवर मातीचा बंधारा टाकून हे सरोवर तयार करण्यात आले. १९६५ साली सरोवराच्या दक्षिणपूर्व काठावर ११ दरवाजे टाकून भदभदा धरण बांधण्यात येवून या सरोवराची क्षमता वाढविण्यात आली. येथूनच कालियासोटया नदीची सुरवात होते. इतके दिवस तो बडा तलाब म्हणून प्रसिद्ध होता पण राज्यकर्त्यांनी २०११ साली त्याला भोजराजाचे नाव दिल्यामुळे तो भोजतालाब म्हणून ओळखला जावू लागला.

भोपाळचे लोक या सरोवराशी धार्मिक आणि संस्कृतिक बाजूंनी जोडले गेले आहेत.या सरोवराच्या दक्षिण भागात वनविहार राष्ट्रीय उद्याने वसलेले आहे. तलावात एक बेट असून त्या बेटावर शहाअली रहमतुल्ला यांची समाधी आहे. या सरोवराचे सौंदर्य वाढविण्यासाठी या सरोवराच्या मध्यभागी राजा भोज याचा पुतळा उभा करण्यात आला आहे. सृष्टीसौंदर्यामुळे पर्यटक येथे मोठ्या संख्येने भेटी देतात. या सरोवराचे काठावर नॅशनल सेलिंग स्कूलची स्थापना करण्यात आली असून ही संस्था दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वॉटर स्पोर्ट्सचे संचलन करीत असते.

या सरोवरापासून मोठ्या प्रमाणावर सिंचन होत असते. या सरोवराच्या परिसरात भोपाळ व सिहोर जिल्ह्यातील ८७ खेडी वसली असून इथे हे सिंचन होत असते. ५०० च्या वर सदस्य असलेल्या एका सहकारी संस्थेला या सरोवरातील मासेमारीचा ठेका देण्यात आला आहे. या सरोवराच्या लगतच असलेले प्राणी संग्रहालय हे एक आकर्षण समजले जाते. येथे नैसर्गिक पद्धतीने प्राणी संग्रहालय बांधण्यात आले आहे. हा परिसर वनस्पती व प्राणी या दोनही दृष्टींनी समृद्ध आहे.

या ठिकाणी दोन तलाव आहेत. एकाला बडा तालाब तर दुस-याला छोटा तालाब असे या जोडीला नाव दिल्या गेले आहे. या छोट्या तलावाचा आकार १.२९ चौरस किलोमीटर एवढा आहे. शहराचे सौंदर्य वाढविण्यासाठी नबाब छोटेखान याने १७७४ साली हा तलाव बांधला.

या सरोवराच्या परिसरातील दलदलीचा प्रदेश महत्वाचा समजला जातो. २००२ साली रामसर साइट म्हणून या परिसराला मान्यता देण्यात आली आहे. या सरोवराच्या सुशोभिकरण व विकासासाठी मध्यप्रदेश सरकारने जपानीज बँक फोॅर इंटरनॅशनल कोऑपरेशन कडून १९९५ साली २.५ दशलक्ष रुपयांचे कर्ज घेतले आहे.

भारतातील इतर सरोवरांचे जे झाले तेच या सरोवराचेही होत आहे. आक्रमणांमुळे या दोनही तलावांचे आकार कमी होत आहेत. मोठा तलाव ३०चौरस किलोमीटर वरुन ८ चौरस किलोमीटर इतका घटला आहे तर छोटा तलाव हा ८ चौरस किलोमीटर वरुन २ चौरस किलोमीटर इतका घटला आहे. राडारोडा टाकणे, शहरातील सांडपाणी तलावात सोडणे, शेतीतील व कारखान्यातील सांडपाणी शुद्ध न करता तलावात सोडणे यामुळे सरोवरातील पाण्याची गुणवत्ता दिवसेंदिवस घसरत चालाली आहे.

Path Alias

/articles/bhaarataataila-parasaidadha-saraovarae-bhaoja-talaava

Post By: Hindi
×