बदलत्या पावसाच्या निमित्ताने


महाबळेश्वरचा पाऊस कमी होतोय


पुण्यातील 'सेंटर फॉर क्लायमेट चेंज रीसर्च' या संस्थेच्या अभ्यासातील हा धक्कादायक निष्कर्ष. खरंतर हा अभ्यास प्रसिध्द होवून काही काळ लोटला, तरीही तो धक्कादायक वाटतो. कारण या अभ्यासातून पावसाच्या बदलांबाबत बरेच काही माहीत झाले आहे. हे पाहून माझ्यासारख्या हवामानाच्या अभ्यासकाच्या मनात स्वाभाविकपणे एक प्रश्न उपस्थित होतो, हे सर्व कशामुळे तापमानवाढीमुळे की इतर कारणांमुळे ?

पुण्यातील 'सेंटर फॉर क्लायमेट चेंज रीसर्च' या संस्थेच्या अभ्यासातील हा धक्कादायक निष्कर्ष. खरंतर हा अभ्यास प्रसिध्द होवून काही काळ लोटला, तरीही तो धक्कादायक वाटतो. कारण या अभ्यासातून पावसाच्या बदलांबाबत बरेच काही माहीत झाले आहे. हे पाहून माझ्यासारख्या हवामानाच्या अभ्यासकाच्या मनात स्वाभाविकपणे एक प्रश्न उपस्थित होतो, हे सर्व कशामुळे तापमानवाढीमुळे की इतर कारणांमुळे ?

सेंटर फॉर क्लायमेट चेंज रीसर्च हे पुण्यातील 'भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्था' अर्थात 'आयआयटीएम' या संस्थेच्या आवारात असलेले महत्वाचे केंद्र. तिथे हवामानातील बदलांचा शास्त्रशुध्द पध्दतीने मागोवा घेतला जातो. वेगवेगळे अभ्यास केले जातात. हा अभ्यास करताना हवामानाच्या जुन्या नोंदींचा अर्थ तपासून घेतला जातो. त्यात हवामानाचा काही कल दिसतो का, हेही पाहिले जाते. या संस्थेचे संचालक आर. कृष्णन आणि जे.व्ही जावडेकर, मिलिंद मुजुमदार या अभ्यासकांनी देशातील मोसमी पावसाच्या आतापर्यंतच्या आकडेवारीचा तपशीलवार अभ्यास केला. ही आकडेवारी थोडीथोडकी नाही, तर 1871 ते 2011 अशी तब्बल 141 वर्षांची आहे. त्यात अनेक चढउतार पाहायला मिळाले - काही वर्षागणिक होते, तर काही दशकागणिक ! त्यातून काही कलसुध्दा पाहायला मिळाले. त्याबाबतची निरीक्षणे बरंच काही सांगणारी आहेत.

या अभ्यासातील निष्कर्ष :


- या 141 वर्षांच्या काळातील पहिल्या 71 वर्षांमध्ये (1871 ते 1941) दहा दुष्काळ पडले, तर पुढील 70 वर्षात (1942 ते 2011) त्यांची संख्या वाढून पंधरा झाली.
- महत्वाचा बदल म्हणजे अलीकडच्या काळात (1951 ते 2007 ) पश्चिम घाटावरील पावसाचे प्रमाण तुलनेने घटले आहे. उत्तर - मध्य भारतातही अशीच घट दिसून आली आहे.
- पश्चिम घाटात केरळच्या तुलनेत कोकण - गोवा आणि कर्नाटकात पावसामध्ये घट होण्याचे प्रमाण जास्त आहे. कोकण - गोवा, कर्नाटक या भागात दशकाला 2 टक्के या गतीने पावसाचे प्रमाण कमी होत आहे. या भागातील पावसाची वार्षिक सरासरी 2481 मिलिमीटर इतकी आहे.
- केरळमध्ये पावसामध्ये घट होण्याचे प्रमाण तुलनेने कमी म्हणजे दशकाला 1 टक्का इतके आहे. तेथील पावसाची वार्षिक सरासरी 1867 मिलिमीटर इतकी आहे.
- गेल्या काही दशकांमध्ये भारतीय उपखंडात पृष्ठभागावरील तापमानात वाढ झाली आहे, असेही हा अभ्यास सांगतो.
- 1901 ते 2007 या काळात भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कमाल तापमानात वाढ होण्याचे सरासरी प्रमाण दशकाला 0.09 सेल्सिअस इतके आहे. मात्र, उत्तरार्धात (1951 ते 2007) हा तापमानवाढीचा वेग दशकाला 0.15 अंश सेल्सिअस इतका वाढला आहे.

आता माहबळेश्वरबाबत.....


हा अभ्यास महाबळेश्वरबाबत स्पष्टपणे सांगतो की, तेथे 1901 ते 2011 या काळात पावसाच्या प्रमाणात दशकाला 1.21 टक्के या वेगाने घट झाली आहे. हे आकडेवारीत मांडायचे तर तेथील पावसाचे प्रमाण दशकाला तब्बल 71 मिलिमीटर या वेगाने कमी होत आहे.

आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे - काही प्रयोग अशी शक्यता दर्शवतात की, ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम म्हणून मान्सूनच्या वाऱ्यांची ताकत कमी होत आहे. परिणामी, डोंगरी भागातील पावसाच्या प्रमाणात घट झाली आहे.

हे महाबळेश्वरसारख्या पश्चिम घाटातील आणि विपुल जैवविविधतेच्या भागात घडणे ही काळजी वाढवणारी बाब आहे.

हे सर्व निष्कर्ष मांडून ही मंडळी असा प्रश्न उपस्थित करतात की 'मोसमी पावसाचा जोर कमी झाला आहे का' ?

मोसमी पावसात (मान्सून) काही बदल होत आहेत का, याचा विचार करताना या अभ्यासातील शेवटचा प्रश्न महत्वाचा ठरतो. त्याचाच मागोवा घेत घेत या बदलांबाबत जाणून घ्यावे लागेल. या नोंदी आणि आकडेवारीशी संबंधित अभ्यासाला जोडूनच सध्या हवामानात जाणवणारे बदल समजून घ्यावे लागतील.

पावसाबाबतची आपली काय निरीक्षणे आहेत ?... थोडक्यात सांगायचे तर सर्वसामान्य माणसाला पावसाचा भरवसाच उरलेला नाही. 2014 आणि 2015 या वर्षांचे उदाहरण घेवू. या काळात पावसाळा कधी संपला आणि इतर ऋतू कधी सुरू झाले हे नेमकेपणाने सांगता येत नाही. पूर्वी इतर ऋतूंमध्ये पाऊस पडत नव्हता असे नाही. मात्र, तो अपवाद ठरावा इतका क्वचित पडत होता. आता मात्र तो अपवाद झालेला नाही, तर कधी पडणे हा नियमच होवून बसला आहे... अनेक सामान्य लोकांशी बोलताना ही प्रतिक्रिया हमखास येते. जसे पावसाचे तसेच, थंडीचे, उन्हाळ्याचे आणि हवामानाच्या इतर घटकांचे !

पावसाच्या किंवा हवामानाच्या लहरीबाबत तीव्र प्रतिक्रिया येतात. त्या इतक्या असायचे कारण म्हणजे - त्याच्यामुळे होणारे नुकसान. वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या पिकांपासून ते चांगले पैसे मिळवून देणाऱ्या आंबे, द्राक्ष्यांनाही हवामानाची झळ बसली. कधी गारपिटीचा तडाखा बसला, कधी पावसाने सारं धुवून टाकलं, तर कधी ढगाळ हवामानाने रोग पसरवला. कारणे काहीही असोत, पण या नुकसानीचा रोष शेवटी हवामानात जाणवणाऱ्या बदलांवरच येतो. त्यामुळे प्रतिक्रिया तीव्र असणे स्वाभाविकच !

आता मुद्दा येतो, या घटनांचा अर्थ समजून घेण्याचा. त्याबाबत काही निष्कर्ष काढण्याचा. हे सारे कशामुळे ? याचे उत्तर देणे वाटते तितके सोपे नाही. याचे कारण हवामानात असणारी प्रचंड गुंतागुंत. हवामानावर बदलत्या परिस्थितीचे परिणाम होतात, त्याचप्रमाणे त्यातील नैसर्गिक चढउतारही प्रभाव टाकत असतात. त्यामुळे होणारे बदल हे बदलत्या परिस्थितीचे परिणाम आहेत की नैसर्गिक चढउताराचा भाग ? हे ठामपणे सांगणे धाडसाचे ठरते. तसा निष्कर्ष काही दशकांमध्ये काढता येत नाही, हे तर निश्चित! त्यामुळेच हवामान अभ्यासक आणि संशोधकसुध्दा या बाबतीत तातडीने कोणत्याच निष्कर्षापर्यंत पोहोचत नाहीत. ते योग्यही नाही.

हा मुद्दा पुन्हा पुन्हा स्पष्ट करण्याचे कारण हेच की, आपल्याकडे अजूनही याबाबत जागरूकता आलेली नाही. शिवाय प्रत्येक गोष्टीचा संबंध उलगडला पाहिजे आणि ते कोणाशी तरी जोडला पाहिजे, असा अट्टाहासही असतो. पण हवामानाच्या बाबतीत हे दरवेळी शक्य नसते. अर्थात त्यामुळे नुसतेच गप्प बसून राहायचे, असेही नाही. बदल जाणवत आहेत आणि नुकसान होत आहे, तर त्यातून मार्ग काढण्याच्या मागे लागायला हवे. नेमके कसे बदल होत आहेत, त्यांचा कल काय आहे हगे शोधावे लागेल. पिकांच्या नुकसानीचा मुद्दा असेल तर पिकांच्या चिवट जातींचा स्वीकार, नवे तंत्रज्ञान, पीकपध्दतीतील बदल, एकाऐवजी चार पिके घेवून संभाव्य घोक्याची विभागणी करणे... असे काही प्रयोग करून या बदलांच्या परिणामातून मार्ग काढावा लागेल. नुकसान टाळण्यासाठी नैसर्गिक व्यवस्था सुस्थितीत असणे हेही गरजेचे ठरते.

या सर्व गोष्टींबाबत आपण कुठे आहोत याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. नुसता विचारच नव्हे तर त्याला सुसंगत कृतीसुध्दा करावी लागेल. याच गोष्टी बदलत्या हवामानाचे आणि पावसाचे आव्हान पेलण्यास उपयुक्त ठरणार आहेत.

श्री. अभिजीत घोरपडे, पुणे, मो : 9822840436, abhighorpade@gmail.com

Path Alias

/articles/badalatayaa-paavasaacayaa-naimaitataanae

Post By: Hindi
×