नांदगावचे शेतकरी अत्यंत फिकिरीत पडले होते. अवर्षणाचा एवढा जबरदस्त तडाखा आपल्या गावाला बसेल असं त्यांना वाटलं नव्हतं.
एप्रिल महिना उजाडला होता आणि गावातल्या व शिवारातल्या विहीरी झपाट्याने आटत चालल्या होत्या. नद्या - नाले कोरडे पडत चालले होते. एप्रिल महिन्यातच पाण्याची अशी अवस्था असेल तर मे महिन्यात कसं व्हायचं ? माणसांना, गुराढोरांना पिण्यासाठी पाणी कोठून आणायचं ?..... पावसाळा सुरू होईपर्यंत कसं भागायचं ? नांदगावचे शेतकरी हवालदिल झाले होते. त्यांनी नदीच्या पात्रात खड्डे खोदण्यास सुरूवात केली पण काल ओलसर वाटणारा खड्डा आज कोरडा ठणठणीत दिसू लागला. नदीच्या पात्रात कितीही खड्डे खोदले आणि कितीही खोलवर खोदले तरी कोरड्या वाळूपलीकडे काहीच हाती लागेना.
मे महिना सुरू झाला आणि विहीरी भराभर आटू लागल्या. ऊस उत्पादक शेतकर्यांच्या तोंडचं पाणी पळालं. त्यांचे ऊसाचे मळे वाळत चालले. अखेरचा प्रयत्न म्हणून त्यांनी आपल्या विहीरी खोल खोदण्यास सुरूवात केली. पण जितकं खोल खोदीत जावं तितकं पाणी खाली जात चाललं. बहुसंख्य शेतकरी आपल्या विहीरी इतक्या खोल खोदीत गेले की, आपल्या विहीरी आणखी खोल खोदण्याची त्यांची ऐपतच उरली नाही.
शिवराम मानकर हा त्याच गावाचा एक शेतकरी. शेती व्यवसायाला दुग्ध व्यवसायाची जोड देणारा. भरपूर कमाई करणारा, आपली विहीर खोल खोदण्याची जिद्द त्यानं सोडली नाही. त्याने दुग्ध व्यवसायावर मिळविलेला पैसा विहिरीतलं पाणी काढण्यासाठी खर्च करण्याचं ठरविलं. त्यानं तालुक्याहून ब्लास्टिंग मशीन आणली. विहिरीतलं खरपण काढण्याची मशीन आणली. या दोन्ही मशीन्स विहीरीत घुसल्या. विहीरीतल्या पाण्याचा ठाव घेत निघाल्या. विहीरीच्या पाण्यातल्या गाभ्याला जावून भिडल्या, धावत-पळत यावं तसं शिवाराम मानकराच्या विहीरीत पाणी आलं. त्याच्या मळ्यातला ऊस पोटभर पाणी पिऊ लागला. नांदगावच्या इतर गावकर्यांना हे समजलं, तेव्हा त्यांना समाधान जाणवलं.
शिवराम मानकर आपल्या पिण्यासाठी पाणी देईल असं त्यांना वाटलं. खरं तर शिवराम मानकरची ही विहीर शिवाराच्या एका टोकाला होती. या विहीरीचं पाणी पिण्यासाठी आणणं त्या गावच्या लेकांना परवडण्यासारखं नव्हतं. तरीही नाईलाज म्हणून ते विहीरीवर पाणी आणण्यासाठी जावू लागले. पण शिवराम मानकर एवढं तेवढं पाणी देण्यास देखील कुरकुर करू लागला. घालून पाडून बोलू लागला. त्याचं असलं बोलणं ऐकून घेण्यापेक्षा त्याच्या विहीरीवर पाऊल ठेवणं नको, असं गावातल्या लोकांना वाटू लागलं. पण जगायचं असेल तर कुठून तरी पाणी मिळवायला हवं. पण पाणी कसं मिळवायचं ? कुठून मिळवायचं ? नादगावचे लोक एकत्र आले. त्यांना आपसात विचारविनिमय केला. सर्वांच्या संमतीने त्यांनी एक निवेदन तयार केलं. त्या निवेदनावर त्यांनी सर्वांच्या सह्या, अंगठे घेतले व तालुक्याला जावून गटविकास अधिकार्यांची भेट घेतली. त्यांना निवेदनाची प्रत सादर केली.
गटविकास अधिकार्यानं नांदगावला भेट दिली. परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली व परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेवून ताबडतोब उपाययोजना सुरू केली. गावात चार ठिकाणी हापसे बसविण्यात आले. पण दोन हापसे काही दिवसातच कोरडे पडले. तिसर्या हापशाला चार - पाच वेळेला खाली वर करावं तेव्हा एव्हडं तेव्हडं पाणी मिळायचं. ते पाणी इतकं गढूळ असायचं, की ते बराच वेळ नितळत ठेवावं लागयचं. चवथ्या हापशाला करंगळीएवढी धार सुरू व्हायची. पारगभर लायनीत उभं राहावं तेव्हा कुठं बिंदगीभर पाणी मिळायचं. नांदगावच्या लोकांनी पुन्हा गटविकास अधिकार्यांची भेट घेतली. गटविकास अधिकार्यानं पुन्हा नांदगावच्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली व अखेरचा उपाय म्हणून नांदगावच्या लोकांना टँकरद्वारे पाणी पुरवायला सुरूवात केली.
पिण्याचं पाणी पुरवायला या गावात टँकर आला खरा, पण तो नुसताच आला नाही तर आपल्याबरोबर अनेक अडचणी घेवून आला. खरं तर ठरल्याप्रमाणं हा टँकर दररोज सकाळी आठ वाजेपर्यंत यावयास हवा होता. पण तो कधीही वेळेवर येत नसे. लोकांची रोजगार हमीच्या कामावर जाण्याची वेळ रहायची. तरीही टँकरचा पत्ता नसायचा. अशा वेळी काय करावं असा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित व्हायचा. रोजगार हमीच्या कामावर जावं तर दररोजच्या वापरासाठी लागणारं पाणी कुठून आणावं असा नंतर प्रश्न पडायचा. टँकरचं पाणी मिळविण्यासाठी दुसरा पर्याय नसायचा. प्रत्येक घरचा कामाचा माणूस टँकरचं पाणी भरण्यासाठी मागं थांबायचा. टँकरचं पाणीही सहजासहजी मिळायचं नाही. टँकरमधलं पाणी अगोदर गावातल्या सार्वजनिक विहीरीत ओतलं जायचं आणि नंतर गावातले स्त्री - पुरूष पाणी शेंदून घ्यायचे. विहीरीतलं पाणी काढून घेण्याची सर्वांचीच घाई झालेली असायची.
अशा परिस्थितीत कुणाला पुरेसं पाणी मिळायचं तर कुणाला एवढं तेवढं पाणी मिळायचं. शिवाय जे पाणी मिळायचं ते देखील खूप गढूळ असायचं. गाळून आणि नितळून घेतल्याशिवाय ते पिण्यासाठी वापरता येणं शक्य व्हायचं नाही. कधी कधी तर टँकरमध्ये काही बिघाड व्हायचा किंवा टँकरवाल्याला टँकरसाठी डिझेल मिळायचं नाही. अशा वेळी नांदगावच्या लोकांचे पाण्याविना हाल व्हायचे. ही परिस्थिती सुधारावी म्हणून गावकर्यांनी खूप प्रयत्न केले. गटविकास अधिकार्याच्या तसेच तहसीलदाराच्या पुन्हा भेटी घेतल्या. टँकरचं पाणी नांदगावच्या लोकांना वेळेवर व पुरेसं मिळावं म्हणून सरकारी अधिकार्यांनीही आपआपल्या परीनं प्रयत्न केले. पण कधी कधी त्यांचाही नाईलाज व्हायचा.
अशा परिस्थितीत काय करावं असा नांदगावच्या लोकांना प्रश्न पडला. अण्णाराव हा या गावातला जुना जाणता माणूस. आपल्या गावाच्या भल्यासाठी नेहमी झटणारा. गावात एकजूट राहावी म्हणून नेहमी प्रयत्न करणारा. तो गावचा सरपंच नव्हता अथवा सोसायटीचा चेअरमनही नव्हता. पण गावात त्याचं वजन होतं. गावकरी अद्यापि त्याचं मानीत होते. त्याच्या सल्ल्यानुसार वागत होते. या प्रश्नावर विचार करण्यासाठी त्याने गावातल्या प्रमुख लोकांची बैठक आपल्या घरी बोलविली. गावातल्या प्रमुख पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा आढावा घेवून ते म्हणाले, ‘मंग कसं मंडळी, आपल्या गावची प्यायच्या पाण्याची काय येवस्था करायची ?
मगन रणदिवे अगोदरच तापट डोक्याचा. त्यात पुन्हा पिण्याच्या पाण्याचे असे हाल सुरू असल्यामुळे संतापानंं त्याचं मन खदखदत होतं.
तो म्हणाला, ‘ शिवराम मानकरला इचारा की. गावातल्या लोकांची प्यायच्या पाण्याची काय सोय करतोस म्हनावं.’
आण्णारावांनी त्याला विचारलं, ‘त्याचा हितं काय संबंध ?
‘संबंध न्हाई तर कसा. एकांद्या दिशी त्याच्या घरावर दरवडा पडला तर तो आपल्या नावानं आरडाओरडा करायचा न्हाई का ?.....त्याच्या मदतीला आपुन जायचे न्हाईका?
‘गावचा मामला हाय. त्याच्या घरावर दरोडा पडायची येळ आल्यावर आपल्याला त्याच्या मदतीला धावावं लागंल.
आपल्यावरबी तशीच येळ आलेली हाय. मंग त्यानं आपल्याल मदत का करूनी ?
दलपत कदमनं त्याचं म्हणणं उचलून धरलं. तो म्हणाला, ‘ बराबर हाय मगनचं. सारं गाव हिकडं पान्याविना तडफडत असताना त्यानं आपला ऊस पोसत बसायचं म्हंजी काय ?’ मानसं मोलाचे का ऊस मोलाचा.
भीमराव जाधवला त्याचं हे बोलणं पटलं नाही. तो म्हणाला, ‘ मगनराव, तुमी मानकराच्या जागी आसते तर काय केलं आसतं ?.... आपला ऊस वाळवून तुमी गावकर्यांना प्यायला पानी दिलं आसतंं का ?
मगन ठासून बोवल्यावनी म्हणाला , ‘ जरूर दिलं आसतं’.
मगन काही क्षण थांबला. नंतर म्हणाला, ‘तात्या, मला एक सांगा. मानकराची ही हीर दोन किलोमीटरच्या आतमंदी आसती तर सरकारनं ती ताब्यात घेतली नसती का ? त्या हिरीतलं पाणी गावच्या लोकांना प्यायला मोकळं केलं नसतं का ?’.....
भलतीकडं घरंगळत निघालेला हा विषय वेळीच वळणावर आणावा म्हणून अण्णाराव म्हणाले ,‘अमुक केलं असतं तर तमुक झालं आसतं हे बोलून आता उपेग काय?.... ह्या हालतीत काय करायचं ते सांगा.
यावर बराच खल झाला. आणि गावातल्या प्रमुख लोकांनी शिवराम मानकरांची भेट घ्यावी व त्याच्याशी याबाबत बोलावं असं ठरलं.
गावकरी शिवराम मानकराच्या घरी गेले तेव्हा शिवराम मानकर शेताकडं निघण्याच्या तयारीत होता. गावकरी आपल्याकडं का आले असावेत हे त्यानं ताबडतोब लक्षात घेतलं.
पण तसं न दाखविता तो म्हणाला, ‘ बोला मंडळी, का येणं केलं ?
आपल्या इथं येण्याचा हेतू अण्णाराव शिंद्यांनी थोडक्यात सांगितला व अखेरीस ते म्हणाले, ‘तुमी कसंबी करा अन् कायबी करा, पर आपल्या हिरीचं पानी आमाला प्यायला मोकळं करा.
‘म्या कुठं न्हाई म्हनलं, नडीव्हडीला कुनाला पानी लागलं तर घागरी घिऊन या की माज्या हिरीवर. म्या रिकामी घागर वापर धाडली तर मंल मला बोला.
‘हितक्या लांबनं डोक्यावर पानी आननं आमाला कसं परवडंल बरं.
शिवराम मानकर उपरोधाने म्हणाला, ‘मग काय टँकर लावून पानी आनायचा तुमचा इचार हाय का?
‘आमची काय तेव्हडी ऐपत न्हाई, पर निदान पानी आनायला बैलगाड्या तरी लावाव्या लागत्याल. बैलगाडीत टिपडं ठिवून पानी आनावं लागंल.
‘ तेव्हडं पानी पुर्या गावाला द्यायला मला जमायचं न्हाई. माजा ऊस वाळून जाईल.
मगननं खडसावल्यावनी विचारलं , ‘ मानसापरीस तुमचा ऊस जास्त आला का ?
मगननं असं विचारावं याचा शिवराम मानकरला राग आला, तो म्हणाला, ‘ कस्याला उगं अवांतर बोलत बसलाव. माजा ऊस वाळवत ठिवून मला पुर्या गावाला पानी द्यायला परवडायचं न्हाई म्हंजी न्हाई.
दलपतनं रागानं विचारलं , ‘ म्हंजी आमची नड इचारात घ्यायचा तुमचा इचार दिसत न्हाई.
‘म्या तर नडीव्हडीला घागर पानी आना म्हनलं की.
‘आमाला हितक्या लांबनं टिपड्यासिवा पानी आननं परवाडायचं न्हाई’.
‘मलाबी हितकं पानी गावाल देनं जमायचं न्हाई.
‘म्हंजी आता कवा गावासंगं तुमची नड पडायची न्हाई म्हना की.
मगनकडं रोखून बघत शिवराम मानकर म्हणाला , ‘नड पडंल खरी, पर तुमचं आसं नुकसान करून माजी नड भागवा आसं म्या तुमाला म्हननार न्हाई.
‘म्हंजी आमी आलं तसंच वापस जावं म्हना की.
‘ते म्या काय सांगी. तुम्हाला सोयीचं व्हईल तसं करा.
गावकरी काहीशा निराश, काहीशा चिडलेल्या मन:स्थितीत परत आले, पाण्याविना होणारे हाल भोगीत राहिले.
दहा बारा दिवस असेच गेले.
संध्याकाळची वेळ, रोजगार हमीचे लोक नुकतेच कामावरून परत आले होते. पाण्याचा टँकर अद्यापही गावात आला नव्हता. सकाळपासून गावात पाणी नव्हतं. डोळ्यात जीव आणून लोक पाण्याच्या टँकरची वाट बघत होते.
गावात पिण्याच्या पाण्याची अशी स्थिती असतानाच शिवराम मानकराच्या वाड्यात हलकल्लोळ उठला. काय झालं असावं, हे काही वेळ कुण्याच्याही लक्षात आलं नाही. पण जिभल्या चाटीत नागिणीनं बिळाच्या बाहेर यावं त्याप्रमाणं आगीचा लोळ शिवराम मानकराच्या वाड्यातून बाहेर आला. शिवराम मानकराच्या घराला आग लागली होती. लोकांची धावाधाव झाली. अण्णारावही धावले. मानकराच्या वाड्यात आले, मानकराचा वाडा एका बाजूनं पेटला होता. आग पसरत चालली होती. ज्या बाजूनं वाड्याला आग लागली होती तिथंच एका बाजूला धान्याची पोती रचून ठेवली होती. एकदा का या पोत्यांनी पेट घेतली तर आग आटोक्यात आणणं शक्य नव्हतं. मानकारचा संबंध वाडा जळून खाक होण्याची शक्यता होती. म्हणून वेळीच आग विझविणं आवश्यक होतं. आग कशी विझवायची ?.... आग विझविण्यासाठी पाण्याची आवश्यकता होती. पण शिवराम मानकराच्या घरात दहा बारा घागरीपलीकडं पाणी नव्हतं. मानकरच्या मळ्यातल्या विहीरीत भरपूर पाणी होतं, पण ते पाणी कसं आणायचं हा प्रश्न होता.
शिवाय मळ्यातलं पाणी येईपर्यंत सबंध वाडा पेट घेईल असं वाटत होतं. शिवराम मानकर हवालदिल झाला होता. त्याची बायको - पोरं रडत होती. आक्रंदत होती. गावातले लोकही मानकराच्या वाड्याकडं धावले होते. काही लोक सामान हलवीत होते. काही लोक काठीनं आग बडवीत होते. तर काही लोक एखादा खेळ बघावा त्याप्रमाणं पेटत चाललेल्या मानकरच्या वाड्याकडं बघत होते. अण्णाराव शिंद्यांना बघताच शिवराम मानकर डोळ्यात पाणी आणीत त्यांना म्हणाला , ‘अण्णाराव कसंबी करा, पर ही आग विझवायची बगा, माजा वाडा जळाला तर मी बरबाद व्हईन. म्या व्हत्याचा न्हवता व्हईन.
खरं तर ही आग विझवायला हवी असं अण्णारावांना वाटत होतं. पण कुणी विझवायची हाच त्यांच्यासमोर प्रश्न होता. तेवढ्यात ‘टँकर आला, पाण्याचा टँकर आला’ असा गलका सुरू झाला. पाण्याचा टँकर गावात आल्याचं कळताच गावातले लोक पाणी भरण्यासाठी सार्वजनिक विहीरीकडे धावले. विलंब करून कसं चालंल ? आपणाला विहीरीवर पोहोचायला उशीर झाला आणि दरम्यान गावातल्या इतरांनी पाणी शेंदून नेलं तर ?..... आता या घटकेला घरात तांब्याभर देखील पाणी नाही. आता एकदा पाण्याचा टँकर येवून गेला की, उद्याच पुन्हा केव्हा तरी हा टँकर येणार ? तोपर्यंत स्वयंपाकासाठी, पिण्यासाठी , पाणी कोठून आणायच ? गावातले लोक हातात पोहोरे, घागरी, घागरी बादल्या घेवून विहीरीकडे धावले. एव्हाना टँकर विहीरीच्या काठावर जावून थांबला होता. रबरी पाईप विहीरीत सोडला जात होता. तेवढ्यात आण्णावराव विहीरीजवळ येवून थडकले. भान नसल्यावनी एकदम ओरडले. ‘थांबा’ ?
अण्णारावांनी एवढ्या जोरात का ओरडावं हे कुणालाच कळालं नाही. सर्वजण एकदम थबकले. आण्णाराव त्याच आवाजात म्हणाले, पानी हिरीत टाकू नका’.
टँकरमधलं पाणी विहीरीत सोडण्यात मगनचा पुढाकार होता. आण्णाराव टँकरचं पाणी विहीरीत का सोडू देत नाहीत हे त्याच्या लक्षात आलं असावं.
त्यानं आण्णारावांच्या नजरेला नजर भिडवीत विचारलं, ‘का ’?
‘मानकराच्या वाड्याला आग लागलीय’. पाण्याचा टँकर तिकडं घ्या. अगोदर आपल्या ती आग विझवावी लागले.
गावात तांब्याभर पानी न्हाई. लोक सकाळधरनं पान्यापायी तरसाया लागलेत’.
‘आपलं व्हईल काय तरी ?
‘हमेस्या आपलंच काय तरी कसं व्हतंय. समदं गाव पान्यापायी वणवण फिरत व्हतं. तवा का त्याला तसं वाटलं न्हाई. आपल्या ऊसाचं पानी कमी करून आपल्याच गावातल्या लोकांना प्यायला पानी द्यावं, आसं त्याला तवा का वाटलं न्हाई.
‘त्याचा इचार करायची ही येळ न्हवं. त्याच्या घराला आग लागलीय.
‘आमच्याबी पोटात आग पेटलीय. अस्या हालतीत आमी पान्याचा टँकर हितनं हलू देनार न्हाई
असं म्हनून मगन टँकरच्या ड्रायव्हरजवळ आला. ओरडल्यावनी त्याला म्हणाला, ‘ड्रायव्हर साहेब, बगताव काय ,सोडा हिरीत पानी.
ड्रायव्हरला गोंधलल्यावनी झालं. या परिस्थितीत काय करावं हे त्याला सुचेना. विहीरीवरच्या लोकांनी ड्रायव्हरला घेरलं. सर्वांनी एकच गिल्ला केला. आण्णाराव जीव तोडून ओरडत होते. पाण्याचा टँकर मानकराच्या जळणार्या वाड्याकडं घेण्याविषयी सांगत होते. हात जोडून विनंती करीत होते. पण कुणीही त्यांच्याकडं नुसतं बघण्यास देखील तयार नव्हतं. आपण एकाही आहोत, आपलं कुणी ऐकून घेण्यास देखील तयार नाही हे त्यांना जाणवत होतं आणि तरीही त्यांनी विनवणी करणं सोडलेलं नव्हतं.
टँकरच्या ड्रायव्हरनं एकूण परिस्थिती विचारात घेतली आणि टँकरचं पाणी विहीरीत सोडलं. विहीरीतलं पाणी भरण्यासाठी गावातल्या स्त्री - पुरूषांची झुंबड उडाली. मानकराचा वाडा पेटलेला आहे याचंही भान त्यांना आता राहिलेलं नव्हतं.
Path Alias
/articles/avarasana
Post By: Hindi