आंतरराष्ट्रीय जलस्त्रोतांचे सहकार्य : नव्या युगाची हाक


भावी कालखंडामध्ये सीमापार सामुहिक जलस्त्रोताची महत्ता अनन्यसाधारण आहे. शाश्वत विकासासाठी वैश्विक जलस्त्रोत हवेत आणि त्यांचा नियोजित वापर व्हावा. एकविसाव्या शतकामध्ये सर्वांसाठी आरोग्य आणि सर्वांसाठी जलस्त्रोत हे स्वप्न साकार करण्यासाठी युनेस्कोने घालून दिलेल्या निर्देशानुसार नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी यथायोग्य मनोबळ सर्वांना लाभले तरच उदंड जाहले पाणी जीवन व्यवहार करावया हे स्वप्न साकार होऊ शकेल. हा समीपचा मार्ग नाही. हा दूरचा पल्ला गाठण्यासाठी तत्त्व, व्यवहार आणि धोरणात्मक कृती यात सुसंगती हवी, तरच जलस्त्रोत रक्षण व संवर्धनाची कठीण आव्हाने सहजपणे पेलवता येऊ शकतील तत्त्वाला व्यवहाराची व उक्तीला कृतीची जोड दिली तरच एकविसाव्या शतकात जलसाक्षरतेचे उद्दिष्ट गाठता येऊ शकेल.

प्रगत संवाद क्रांतीमुळे जग हे एक खेडे बनले आहे. या विश्व ग्रामामध्ये समान प्रश्न आणि समान उपाय हा एक नवा दृष्टीकोन आहे. युनेस्कोने हे सूत्र समोर ठेवून 'क्रॉस बॉर्डर वॉटर को-ऑपरेशन' म्हणजे आंतरराष्ट्रीय जल सहकार हे धोरण अनुसरले आहे. वर्तमान संदर्भात याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे कारण जगामधील पाणी टंचाईचे खरे कारण देशादेशातील सीमावाद आणि पाणी तंटे यातून निर्माण झालेले बिकट पेच हे होय.

मानवी हक्कांचा जाहिरनामा हे सांगते की जन्मलेला प्रत्येक माणूस हा स्वतंत्र आणि मुक्त आहे. तद्नुषंगिक विचार करता असे म्हणता येईल की विश्वातील सर्व जलस्त्रोत हे सर्वांसाठी खुले व सर्वांना मुक्त आहेत. आता या जलस्त्रोतांची उपलब्धता व वापर या बाबतीत एक व्यापक व सर्व समावेशक धोरण आखण्याची गरज आहे त्या अनुषंगाने जगातील जल समस्येचे नवे आकलन करण्याची गरज आहे.

अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांप्रमाणेच जल ही सुध्दा एक मूलभूत गरज आहे. आणि जलस्त्रोतांचे संरक्षण व नियोजन करताना केवळ स्थानिक व राष्ट्रीय नव्हे तर वैश्विक दृष्टीकोनाची गरज आहे हे आता युनेस्कोच्या लक्षात आले आहे व त्यामुळे या वर्षीच्या धोरणात्मक घोषवाक्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कृत्रिम विभाजन हे अडसर :

देशाच्या सीमेप्रमाणे होत असलेले कृत्रिम प्रकारे होणारे जलस्त्रोतांचे विभाजन हानीकारक ठरत आहे, हे ओळखून नवा मानवतावादी वैश्विक दृष्टीकोन हा विचारपूर्वक अंगीकारला जात आहे. राज्याराज्यातील जलस्त्रोतांचे विभाजन हे अनेक जटील समस्या निर्माण करते. लवाद व तंटे यामुळे प्रकल्प मागे रेंगाळतात बऱ्याचवेळा हजारो गॅलन पाणी वाया जाते.

एकदा वाया गेलेले पाणी पुनश्च कसे भरून काढता येणार ? त्यामुळे जलस्त्रोतांच्या संरक्षणाचा विचार हा आंतराष्ट्रीय पातळीवर करणे अगत्याचे आहे.

कृत्रिमपणे जल स्त्रोतांचे विभाजन केल्यामुळे अनेक जटील समस्या उभ्या राहात आहेत. अशा सर्व गुंतागुंतीच्या प्रश्नावर नवे धोरण वरदान ठरणार आहे.

जलस्त्रोताची उपलब्धता आणि वापराबाबत यथार्थ नियोजनाची आवश्यकता आहे. अशा प्रकारचे नियोजन करण्यासाठी आता खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या लाटेत जलस्त्रोतांच्या विवेकी वापरासाठी प्रस्थापित नियम व अटी यांचे आता अधिक उत्तम प्रकारे दूरदृष्टीने पुनश्च उद्घाटन करण्याची गरज आहे. उदारीकरणाच्या युगात अशा सौम्य धोरणाची गरज जाणवते. त्यादृष्टीने शिथिलीकरणाचे धोरण पूरक ठरू शकेल.

सीमापार जलस्त्रोत :


जलनियोजनाचा विचार करता क्रॉस बॉर्डर हा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो. शुध्द व मुक्त जलस्त्रोताचे मानवी कल्याणासाठी पुढील महत्त्वाचे लाभ होतात -

- शुध्द जलस्त्रोतामुळे राष्ट्रा - राष्ट्रातील प्रजेचे आरोग्य अधिक सुदृढ होऊ शकते.

- जलस्त्रोतांच्या विपुलतेमुळे कृषी, उद्योग आणि मानवी विकास या त्रिविध क्षेत्रात रचनात्मक बदल होऊ शकतात.

- राष्ट्रीय विकासाच्या मार्गात असलेले अडसर दूर करून विकासाला गती देण्याचे कार्य जलस्त्रोत करू शकतात.

- वाढती लोकसंख्या आणि नागरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये जलस्त्रोतांचे, विवेकी उपयोजन पोषक ठरू शकते.

- लोकसंख्येचा प्रस्फोट आणि जागतिक प्रदूषणाची गुंतागुंत तसेच ग्लोबल वॉर्मिंगचे संकट पाहाता जलस्त्रोत सीमापार जलस्त्रोतांचे नियोजन मानवी कल्याणासाठी पोषक ठरू शकते.

नवी आव्हाने कोणती?


औद्योगिक विकासाचा हव्यास आणि जलस्त्रोतांचा अवाजवी वापर यामुळे विश्वातील जलस्त्रोत सातत्याने घटत आहेत. त्याच देशातील जलस्त्रोत आता त्याच प्रदेशात पुरेशे ठरतील असे नाही त्यामुळे वैश्विक पातळीवर जलस्त्रोतांचे नियोजन करणे गरजेचे झाले आहे.

भविष्यकाळामध्ये जलस्त्रोतांचे पर्याप्त नियोजन (Optimum Water use planning) हे मूलभूत सूत्र घेऊन पावले टाकली पाहिजेत. त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर जलस्त्रोत सामुग्री नियोजन मंडळ स्थापन करण्याची गरज आहे.

पेयजलाचे दुर्भिक्ष्य असो की शेती सिंचनासाठी पाण्याची कमतरता असो तसेच औद्योगिक विकासासाठी पाण्याचा सुयोग्य वापर असो या दोन्ही बाबी एकाच नाण्याच्या बाजू आहेत त्यामुळे आता भविष्याकाळामध्ये पेयजलाच्या शुध्दतेचा विचार करताना वैश्विक सामाजिक आरोग्य दृष्टीनेही या प्रश्नाकडे पाहिले पाहिजे. सर्वांसाठी आरोग्याचा विचार करता सर्वांसाठी शुध्द पाणी हा पायाभूत विचार दिशादर्शक ठरू शकतो.

जलसाक्षरतेचे महत्त्व :


एकविसाव्या शतकामध्ये आंतरराष्ट्रीय जलस्त्रोताचे परस्पर सहकार्य ही नव्या युगाची हाक आहे. पाणी सिंधूचे असो की ब्रम्हपुत्रेचे त्याचा वैश्विक मानवी कारणासाठी उपयोग व्हावा ही अपेक्षा आहे. त्यासाठी व्यापक प्रमाणावर जलसाक्षरता मोहीम आखली पाहिजे -

- प्रत्येकाला शुध्द पेयजल अल्पदरात प्राप्त व्हावे
- शेती व उद्योग विकासामध्ये जलस्त्रोताच्या यथार्थ वापर व्हावा.
- पेयजल शुध्दीकरणावर यथोचित भर द्यावा.
- जलसाक्षरतेसाठी प्रसार माध्यमांनी पुढाकार घ्यावा.
- जलस्त्रोत बचतीसाठी नवे अभ्यासक्रम आखावेत.

समारोप :


भावी कालखंडामध्ये सीमापार सामुहिक जलस्त्रोताची महत्ता अनन्यसाधारण आहे. शाश्वत विकासासाठी वैश्विक जलस्त्रोत हवेत आणि त्यांचा नियोजित वापर व्हावा. एकविसाव्या शतकामध्ये सर्वांसाठी आरोग्य आणि सर्वांसाठी जलस्त्रोत हे स्वप्न साकार करण्यासाठी युनेस्कोने घालून दिलेल्या निर्देशानुसार नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी यथायोग्य मनोबळ सर्वांना लाभले तरच उदंड जाहले पाणी जीवन व्यवहार करावया हे स्वप्न साकार होऊ शकेल. हा समीपचा मार्ग नाही. हा दूरचा पल्ला गाठण्यासाठी तत्त्व, व्यवहार आणि धोरणात्मक कृती यात सुसंगती हवी, तरच जलस्त्रोत रक्षण व संवर्धनाची कठीण आव्हाने सहजपणे पेलवता येऊ शकतील तत्त्वाला व्यवहाराची व उक्तीला कृतीची जोड दिली तरच एकविसाव्या शतकात जलसाक्षरतेचे उद्दिष्ट गाठता येऊ शकेल.

Path Alias

/articles/antararaasataraiya-jalasataraotaancae-sahakaaraya-navayaa-yaugaacai-haaka

Post By: Hindi
×