आंदोलन नव्हे - चळवळ सद्‍गुरु जग्गी वासुदेव यांचा संदेश


नदी पात्राच्या दोहो बाजूंनी एक किलोमीटरच्या पट्ट्यात वृक्ष लागवड करण्यात यावी असे त्यांचे मत आहे. नद्यांच्या काठावर जेवढी जमीन आहे त्यापैकी ३० टक्के जमीन सरकारच्या मालकीची आहे. बाकीची जमीन खाजगी मालकीची आहे. सरकारी जमिनीवर जंगल तयार केले जावे आणि खाजगी जमिनीवर फलोत्पादन केले जावे.

आजचा जमाना आंदोलनांचा आहे, चळवळींचा नाही. रस्ता पाहिजे? आंदोलन. रस्ता नको? आंदोलन. भाव वाढवून पाहिजे? आंदोलन. प्रामाणिक कलेक्टर बदलून पाहिजे? आंदोलन. प्रामाणिक कलेक्टरची झालेली बदली रद्द करुन हवी? आंदोलन. या दबाव तंत्राचा वापर इतका वाढला आहे की त्याचा परिणाम होईनासा झाला आहे. नदी प्रत्येकालाच स्वच्छ हवी, पण ती स्वच्छ कोणी करायची, तर सरकारने. यासाठी लोकांनी आंदोलन उभारले की झाले. सरकार अशी अनेक आंदोलने पचवून बसली आहे. पण वर्षानुवर्षे नद्या स्वच्छ व्हायच्या ऐवजी अधिकाधिक गलिच्छ होत चालल्या आहेत. आणि असेच चालू राहिले तर त्या नद्या कधी मृत होतील याचा पत्ताही लागणार नाही. सध्या देशातील जवळपास सर्वच नद्या मरणासन्न अवस्थेत आहेत. नदी मरणे म्हणजे तिच्या काठी वसलेली संस्कृती नष्ट होणे हे आपल्या लक्षातच येत नाही. वेळ बराच झाला आहे, पण वेळ अजून निघून गेलेली नाही. आज आपण त्या दृष्टीने काही केले तर त्यांचे परिणाम १५-२० वर्षांनी दिसायला लागतील.

या दृष्टीने आशेचा एक किरण दिसायला लागला आहे. आणि तो दाखविणारी विभूती म्हणजे सदगुरु जग्गी वासुदेव. कोण आहे हो हा सदगुरु? समाजात सांस्कृतिक चळवळ सुरु व्हावी या दृष्टीने ज्या माणसाने १९९३ साली ईशा फाउंडेशन नावाची संस्था सुरु केली तिचा संस्थापक म्हणजे हा सदगुरु. नद्यांचे पुनरुजीवन व्हावे या साठी या माणसाने एक चळवळ समाजात उभी केली आहे. देशाचा सामाजिक व सामुहिक विकास व्हावा ही आंतरिक व तीव्र इच्छा मनात बाळगून या माणसाने ही चळवळ उभी केली आहे. या चळवळीची सुरवात १ सेप्टेंबर २०१७ या तारखेपासून सुरु केली जाणार आहे. सोळा राज्यांचे मुख्यमंत्री, विद्यापीठे, महाविद्यालये, सामाजिक संस्था, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, सरकारी संस्था आणि इतर सर्वजण यांना एकत्र घेवून या चळवळीची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. या विभूतीच्या वर्तमानपत्रांत, टी.व्ही. चॅनेल्स वर गेल्या काही दिवसात काही मुलाखती पाहण्याचा योग आला, कुतूहल वाढले, त्या निमित्ताने अभ्यास झाला, त्याचा परिणाम म्हणून ही कव्हर स्टोरी तयार केली आहे.

जग्गी वासुदेव यांचा जन्म मैसूर येथे झाला. शिक्षणही मैसूर विद्यापीठात होवून त्यांनी बी.ए. ची पदवी इंग्लिश हा ऐच्छिक विषय घेवून प्राप्त केली. त्यांचा प्रोेजेक्ट ग्रीनहेड खूपच गाजला व त्याला २०१० साली इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार प्राप्त झाला. वीस लाख स्वयंसेवकांची मदत घेवून त्यांनी तामिलनाडू राज्यात २७ दशलक्ष झाडे लावली. तामिलनाडूचा १० टक्के भाग हा हिरव्या वनराईने आच्छादित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांना भारत सरकारने पद्म विभूषण किताब देवून गौरविले. त्यांना संयुक्त राष्ट्र संघाच्या आर्थिक व सामाजिक समितीचे सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे.

सध्या आपल्या देशातील नद्यांची स्थिती फारच भयानक आहे. एकूण नद्यांपैकी बर्फाच्छादित प्रदेशातून उगम पावणार्‍या नद्या फक्त ४ टक्के असून बाकीच्या सर्व नद्या या जंगलांतून उगम पावतात. या पैकी बहुतांश नद्या या आजकाल फक्त पावसाळ्यातच वाहतात. बर्‍याच नद्या तर काही महिने समुद्रापर्यंत पोहोचतही नाहीत. कृष्णेसारखी नदी चार महिने तर कावेरी नदी साडेतीन महिने समुद्रापर्यंत पाणी पोहोचवण्यास असमर्थ ठरत आहेत. नद्यांना पाणी नसल्यामुळे शेती कसणे कठीण जात आहे. गेल्या काही वर्षात जवळपास तीन लाख शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. ८५ टक्के शेतकरी शेती व्यवसायातून बाहेर येण्याची इच्छा बाळगून आहेत. हजारो वर्ष या नद्यांनी आपल्याला जीवंत ठेवले आहे. आता त्यांना जीवंत ठेवण्याची जबाबदारी आपली आहे हे विसरुन चालणार नाही. निसर्गाने आपल्याला जी संपत्ती दिली आहे ती आपल्याला पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवायची आहे. कमीतकमी आपल्याला ज्या अवस्थेत ती मिळाली त्यापेक्षा चांगल्या अवस्थेत ती पोहोचावयास हवी. नद्यांमधील पाणी ही काही आपली खाजगी संपत्ती नाही. ती राष्ट्रीय संपत्ती असून तिचे जतन चांगल्या प्रकारे व्हावयास हवे.

नद्या स्वच्छ हव्या असतील तर नद्यांना हात लावू नका, त्या आहेत तशाच राहू द्या, त्यांना येवून मिळणार्‍या प्रवाहांवर नियंत्रण मिळवा हा त्यांचा संदेश आहे. नदी निसर्गतः स्वतःला शुद्ध करुन घेत असते असे त्यांचे मत आहे. आज ठिकठिकाणी अति उत्साहापोटी नद्यांच्या प्रवाहात खोदकाम करण्यात येत आहे, हे काही योग्य पाऊल नव्हे असे ते म्हणतात. आज अनेक ठिकाणी नदी शुद्धीकरणासाठी जे फुटकळ प्रयत्न चालू आहेत त्यांनाही त्यांचा विरोध आहे. संपूर्ण देशाने एक आराखडा तयार करुन त्याप्रमाणे काम केल्यास काही साध्य होवू शकेल असे त्यांचे मत अहे. नदीच्या पुनरुजीवनाच्या कामात आधीच खूप उशीर झाला आहे, पण तो विचारात घेवून सुद्धा आज जर हे काम सुरु केले तर त्यांचा परिणाम जाणवण्यासाठी १५ ते २० वर्षांचा कालावधी जावू द्यावा लागेल. पण आज ते सुरु न होता १५ वर्षांनी हे काम सुरु केले तर १०० वर्ष लागून सुद्धा ते होवू शकेल किंवा नाही अशी शंका ते व्यक्त करतात.

आज नद्यांकडे आपण त्यांचे व्यवस्थापन आणि त्यांच्यातील पाण्याचा महत्तम वापर या दृष्टीकोनातून पाहतो. हा चुकीचा दृष्टीकोन आहे. त्यांचेकडे आपण त्यांच्या पुनरुजीवनाच्या दृष्टीकोनातून पाहायला हवे. देशातील स्त्रियांना आपण पवित्र नद्यांची नावे देतो. गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, कावेरी, कृष्णा, गोदावरी या नावाच्या अगणित स्त्रिया आपल्याला दिसतील. नद्या पवित्र असतात हे गृहित धरुन ही नावे ठेवली जातात. पण आज त्या नद्यांचे पावित्र्यच धोक्यात आले आहे याचा विचार करायला मात्र आपण तयार नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे नद्यांशी आपले नातेच धोक्यात आले आहे. शहरांची, कारखान्यांची, शेतीची सर्व अशुद्धता आपण नदीकडे वळवली आहे. नदी आपल्याला पाणी देते हेच आपण विसरुन गेलो आहोत. लहान मुलाला आपण पाणी कोठून येते असे विचारल्यास तो नदीचे नाव न घेता नळ आपल्याला पाणी देतो अशी त्याची भावना तयार झाली आहे. अशा परिस्थितीत नदी शुद्ध राहणार तरी कशी?

नदी पात्राच्या दोहो बाजूंनी एक किलोमीटरच्या पट्ट्यात वृक्ष लागवड करण्यात यावी असे त्यांचे मत आहे. नद्यांच्या काठावर जेवढी जमीन आहे त्यापैकी ३० टक्के जमीन सरकारच्या मालकीची आहे. बाकीची जमीन खाजगी मालकीची आहे. सरकारी जमिनीवर जंगल तयार केले जावे आणि खाजगी जमिनीवर फलोत्पादन केले जावे. याचा शेतीच्या उत्पादनावर विपरित परिणाम होणार नाही का असा प्रश्‍न विचारताच ते म्हणतात की आपण फक्त नदीच्या काठावरील जमिनीचा विचार या ठिकाणी करतो आहे. बाकीची जमीन धान्य उपादनासाठी उपलब्ध आहेच की. आपल्या आहारात कसा बदल केला जावा या बाबतही ते आपले विचार मांडतात. त्यांचे म्हणणे असे आहे की माणसाच्या आहारात धान्याला जेवढे महत्व आहे तेवढेच फळांना आहे. जगात फलाहाराचे प्रमाण बरेच जास्त आहे.

आपल्या देशात मात्र ते अत्यंत नगण्य आहे. फक्त ४ टक्के लोक नियमितपणे फलाहार करतात. सुखवस्तू कुटुंबातही फळे वापरण्याचे प्रमाण समाधानकराक नाही. त्याचा परिणाम म्हणून आपण जी फळे निर्माण करतो ती सुद्धा पूर्णपणे वापरली जात नाहीत. बहुतांश फळे निर्यात वाढविण्याच्या दृष्टीने उत्पादित केली जातात. त्यामुळे फळे उत्पादन वाढविण्याला चालना मिळत नाही. आहारात बदल करण्याला आपण प्रोत्साहन दिले पाहिजे. हा बदल एकदम होणार नाही पण त्या दृष्टीने पावले उचलण्याची गरज नाकारता येत नाही. हा बदल झाला तर नदी काठावर जी हिरवळ तयार करायची आहे तिच्यात फळझाडांना प्राधान्य राहील. शेतकर्‍यांना जगण्यासाठी उत्पन्न हवे, मग ते धान्यापासून असो अथवा फळांपासून असो. फलशेती धान्य शेतीपेक्षा जास्त उत्पन्न मिळवून देते असा अनुभव आहे. हे उत्पन्न धान्य शेतीपेक्षा तीन ते आठपट जास्त असते असा त्यांचा अनुभव आहे.

आपण जी नवीन पद्धती विचारात आणत आहोत तिच्यात शेती कसण्याच्या पद्धतीत व त्याचबरोबर माणसाच्या आहार पद्धतीत बदल अपेक्षित आहे. पर्यावरण व पारिस्थितीकी यांच्या विकासासाठी जी झाडे आपण लावणार आहोत त्यांचेमध्ये विविधता असणे आवश्यक राहील. आपल्याला आपले जीवन आर्थिक दृष्ट्या समृद्ध करायचे आहे की सांस्कृतिक दृष्ट्या याचा विचार करण्याची वेळ येवून ठेपली आहे. धान्य आहारामुळे पोट निश्‍चित भरते पण तो आहार पुरेसा सात्विक राहत नाही याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. मी हा जो बदल सुचवू इच्छितो तो अमूलाग्र स्वरुपाचा असल्यामुळे तो तडकाफडकी होणार नाही याची मला जाणीव आहे. दीर्घ मुदतीत का होईना, तो व्हावयास हवा याबद्दल मात्र माझा आग्रह राहील. म्हणूनच मी म्हणतो की आपल्याला आंदोलन नाही तर चळवळ उभी करायची आहे. आंदोलन हे कोणाचे तरी विरुद्ध असते. आपल्याला इतरांचे विरुद्ध लढायचे नसून आपल्या स्वतःमध्ये बदल घडवून आणावयाचा आहे.

या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. ती म्हणजे ही काही मते मिळवण्यासाठी उभी केलेली ही कृती नव्हे. आपण मते मिळवण्यासाठी पैसे वाटणार नाही, महिलांना साड्या वाटणार नाही की गरीबांना धान्य वाटणार नाही किंवा खोट्या भूलथापा देणार नाही. आपल्याला सरकारमध्ये बदल नको आहे, बदल हवा आहे तो आपल्या स्वतःमध्ये. याच कारणामुळे या चळवळीसाठी आपल्याला सर्वांना बरोबर घेवून चालायचे आहे. या ठिकाणी पक्षांच्या आवेशाला, प्रादेशिक महत्वाकांक्षांना काही स्थान नाही. आपल्याला हवी आहे चळवळीद्वारे आत्मोन्नती. सध्या नद्यांना कायदेशीर व्यक्तीचा दर्जा देण्याचे खूळ निर्माण होत आहे. बाकीची परिस्थिती तीच राहिली आणि निव्वळ कायदेशीर व्यक्तीचा दर्जा मिळाळा तर त्यापासून काय साध्य होणार?

आज नद्यांमध्ये जे सांडपाणी जात आहे, मग ते कोणत्याही स्त्रोतापासून का असेना, ते शुद्ध करुन आपल्याला नदीत सोडता येणार नाही का हा खरा प्रश्‍न आहे. पाणी शुद्ध करण्याची नवनवीन तंत्रे आज जगात उपलब्ध आहेत. त्या तंत्रांचा वापर आपण करु शकणार नाही का? सिंगापूरमध्ये सांडपाणी शुद्ध करुन ते पिण्याच्या दर्जाचे बनविले जाते. हे तंत्र आपणही आत्मसात करु शकतो. ते पाणी शुद्ध करण्यासाठी खर्च येत असतो. तो करण्याची मात्र आपली तयारी असली पाहिजे. पाणी अशुद्ध करणार्‍याला आपण शासन करु शकत नाही का? मी पाणी शुद्ध केल्याशिवाय ते पाण्याच्या स्त्रोतांकडे जाऊ देणार नाही हे जर प्रत्येकाने ठरविले, जो हे करणार नाही त्याला शासन केले जाईल या बद्दल आपण निश्‍चय केला तर तो दिवस दूर नाही जेव्हा आपल्या नद्या शुद्ध होवू शकतील. तसे केले तर नदीपात्राकडे न फिरकता सुद्धा नद्या शुद्ध होवू शकतात. फक्त गरज आहे ती इच्छाशक्तीची. ही सर्व एका रात्रीत होणारी गोष्ट नव्हे. पण आपल्या प्रत्येकाचा प्रयत्न मात्र त्या दिशेने हवा. आपल्या जीवनाचा दर्जा काय ठेवायचा हे आपल्याला ठरवायचे आहे.

आज राज्या राज्यात पाण्यासाठी भांडणे आहेत. २५ वर्ष हे असेच चालू राहिले तर भांडणाचे मूळच नाहीसे होईल. कारण त्यानंतर भांडण्यासाठी पाणीच राहणार नाही. मग भांडणार कोणाशी व कशासाठी? कावेरी नदीच्या खोर्‍यात राहणार्‍या ७००० शेतकर्‍यांचे मी एक संमेलन आयोजित केले आहे. त्यात केरळचे शेतकरी आहेत, तसेच तामिलनाडूचेही शेतकरी आहेत. त्यांना समजू द्या की हा प्रश्‍न दोन राज्यांचा नसून पाण्याच्या उपलब्धतेचा आहे. आपले प्रयत्न पाण्यासाठी भांडणे करीत बसण्यासाठी नाहीत तर पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी असावयास हवेत याची त्यांना या संमेलनात जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही.

वनस्पतीचा पाण्याशी दुतर्फा संबंध आहे हे आपल्या लक्षातच येत नाही. जमिनीवर झाडझाडोरा चांगला असेल तर तो ढगांना आकर्षित करुन पाऊस पडायला मदत करतो. आपली अशी समजूत आहे की पाण्यामुळे झाडे आहेत. पण तसे नसते, झाडांमुळे पाणी असते. जंगलव्याप्त भागामध्ये पावसाळा जास्त व स्थिर असतो. शिवाय झाडे असलेल्या जागेतच भूजल पुनर्भरण वेगाने होत असते. झाडे व इतर वनस्पती पाणी पकडून ठेवते, पाण्याचा वाहण्याचा वेग मंदावतो व पाणी जमिनीत जास्त प्रमाणात मुरायला लागते. वाहते पाणी जमिनीत मुरण्याची शक्यता कमीच असते. झाडांच्या मुळ्या जमिनीत खोलवर रुजतात व कठिणातील कठीण खडक फोडण्यास मदत करतात. जमिनीत त्यामुळे चिरा तयार होतात व त्याचा परिणाम जमिनीत जास्त पाणी मुरण्यात होतो. या शिवाय आणखी एक फायदा आपल्याला डोळ्याआड करता येणार नाही. वनस्पती मातीला धरुन ठेवते व पावसाचे पाणी जेव्हा प्रवाहित होते तेव्हा फक्त तेच वाहते, बरोबर ते मातीला घेवून जात नाही. म्हणजेच, जमिनीची धूप कमी होते व जमिनीवरील सुपिक थर धरुन ठेवण्याचे श्रेय या वनस्पतीला जाते.

आपण पाण्याचा अतिवापर करीत आहोत याची जाणीव आपल्याला असायला हवी. भारतात १२ मोठी शहरे नदी किनार्‍यावर आहेत. ही सर्व शहरे पाण्यासाठी त्रस्त आहेत. पाऊस कमी झाला का? नाही. मग ही स्थिती का आली? पूर्वी पाण्यासाठी आपल्याला १०० फूट खोदावे लागत होते आता १४००-१५०० फूट खोदूनही पाणी लागत नाही. याचेसाठी पाण्याचा हव्यास जबाबदार आहे हे आपल्याला समजावयास हवे.

पाणी आणि जमीन या दोहोकडे आपले सतत दुर्लक्ष होत आहे. वनस्पतीकडे झालेले दुर्लक्ष आपल्याला विनाशाकडे नेत आहे याची जाणीवही आपल्याला नाही. जमिनीतील सेंद्रिय कर्ब प्रमाणाबाहेर घटत चालला आहे. निसर्ग नियमाप्रमाणे तो किमान दोन टक्के असावा लागतो. आपल्या देशात तो सध्या ०.०५ टक्के एवढा घटलेला आहे. शेती उत्पादन वाढविण्याच्या नादात रासायनिक खतांचा वापर बेसुमार वाढत आहे. आपला प्रवास वाळवंटीकरणाकडे चालला आहे. असेच चालू राहिले तर येत्या काही वर्षांत ६० टक्के जमीन नापिक हो़णार आहे. झाडे, झाडांची पाने व जनावरे आपल्याला सधन करीत असतात. त्यांचे द्वारे जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढत असते. वनस्पतीचे घसरते प्रमाण हा सध्या चिंतेचा विषय बनला आहे. आपल्याला निसर्गाशी जुळवून घ्यायला हवे. निसर्ग आपल्याशी कधीच जुळवून घेणार नाही व ती अपेक्षाही करणे चुकीचे आहे.

त्यांनी १६ राज्यांच्या मुख्यमंत्रांशी चर्चा केल्याचा उल्लेख सुरवातीला आलाच आहे. सर्वांकडून भरीव प्रतिसाद मिळतो आहे. त्यांनी जेव्हा मुख्य मंत्र्यांंशी संपर्क साधला तेव्हा सर्वात प्रथम प्रतिसाद त्यांना मध्य प्रदेशच्या मुख्य मंत्र्यांकडून मिळाला. नर्मदा नदीच्या पुनरुजीवनासाठी मी स्वतः झटीन असे त्यांनी अभिवचन पण दिल्याचे ते म्हणाले. चळवळीत एकवाक्यता असण्यासाठी सरकारने या कामात पुढाकार घ्यावा आणि प्रत्येकाने कोणताही अलग विचार न करता त्याला पाठिंबा द्यावा असे त्यांचेे मत आहे. आपला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी ज्याचेजवळ फोन आहे त्या प्रत्येकाने पंतप्रधांनाना एक सेप्टेंबर रोजी एक मिस्ड कॉल द्यावा अशी त्यांनी विनंती केली आहे. जे पाणी पीत नाहीत, ज्यांना नद्या जीवंत राहाव्यात अशी इच्छा नाही आणि ज्यांना भविष्याची चिंता नाही अशांनी हे न केले तरी चालेल असे ते थट्टेने म्हणतात. पंतप्रधानांचा मोबाईल नंबर ८०००९ ८०००९ हा आहे त्यावर हा मिस्ड कॉल करावा असे ते म्हणतात. शालेय विद्याथ्यार्ंनी आपल्या शाळेतर्फे पंतप्रधानांना या संदर्भात एक पत्र लिहावे आणि त्या पत्रावर सर्वांनी सह्या कराव्या. हे जे आपण सर्व करणार आहोत ते पंतप्रधानांवर दबाव आणण्यासाठी करीत नसून त्यांना या कामासाठी आमचा पाठिंबा आहे हे दाखवण्याचा एक प्रयत्न आहे.

त्यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी एक रॅली आयोजित केली आहे. ही रॅली १६ राज्यांमधून जाईल. ज्याला ज्याला ज्या ज्या पद्धतीने शक्य असेल तसा त्याने या रॅलीत सहभाग नोंदवावा अशी त्यांनी कळकळीची विनंती केली आहे. १ सेप्टेंबरला आपण काय करणार आहोत?

१. नद्या ज्या संकटातून जात आहेत त्याबद्दल समाजाला अवगत करणे.
२. नदी वाचवण्यासाठी रॅली काढण्याची गरज समाजाला पटवून सांगणे
३. नदीसाठी सकारात्मक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारला प्रवृत्त करणे.

देशातील ६० शहरात १ सेप्टेंबरला जागृती सभा घेतल्या जाणार आहेत. सकाळी ८ ते ११ च्या दरम्यान शहरातील प्रचलित जागांवर उपस्थित राहून जनजागर करा. त्यासाठी रस्त्यावर घोषणापत्रे, प्रसिद्धी पत्रे घेवून त्यांचे वितरण करा. जर्सींवर संदेश छापून घ्या व त्या जर्सी घालून जन जागृती करा. नदी वाचवा, स्वतःला वाचवा.

डॉ. दत्ता देशकर, पुणे - मो : ०९३२५२०३१०९

Path Alias

/articles/andaolana-navahae-calavala-sadagaurau-jagagai-vaasaudaeva-yaancaa-sandaesa

Post By: Hindi
×