अंदमानची भेट


शेतीला मानव निर्मित पाण्याची जोड देण्याची गरज आहे. त्यासाठी पाणलोट क्षेत्र विकासाचे कार्यक्रम, लहान मोठ्या तलावाची निर्मिती, या घटकांचा स्पर्श या भागाला अद्यापही झालेला दिसत नाही. ठिबक, तुषार सारखे सिंचनातील तंत्र अंदमानात पोहोचले नाही असेच म्हणावे लागेल. या भागात भूजल मुबलक असणार. सेल्युलर जेलच्या परिसरात पूर्वी विहीरीच्या माध्यमातून पाणी पुरवठा होत असे, असे सांगण्यात आले. 2012 च्या फेब्रुवारीतील पहिल्या आठवड्यात अंदमान या द्विपसमुहाला भेट देण्याचा योग आला. स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर अभिवादन यात्रेच्या माध्यमातून हे घडून आले. बंगालच्या उपसागरात 557 लहान मोठे द्विपसमुह भारताच्या पूर्व किनार्‍यापासून जवळपास 1200 किमी अंतरावर आहेत. पोर्ट ब्लेअर नगर ही या द्विपांची राजधानी आहे. हे द्विपसमुह उत्तर - पूर्व ते दक्षिण पूर्व 8249 चौ.कि.मी. क्षेत्रात पसरले आहेत. या द्विपाचा भाग चढउताराचा असून 86 टक्क्यांहून अधिक क्षेत्र वनाखाली आहे. अतिशय मौल्यवान आणि दुर्मिळ लाकडासाठी अंदमान प्रसिध्द आहे.

या द्विपमालेची उत्तर दक्षिण लांबी 780 किमी आहे. हा द्विपसमुह भारताचा केंद्र शासित प्रदेश आहे. सदाबहार हिरवेगार वन ही या बेटांची शोभा आहे. सरासरी वर्षाकाठी सुमारे 3200 मिमी पाऊस पडतो. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्‍चन, शीख, बर्मी व चिनी या पंथाचे लोक येथे रहातात. 1901 मध्ये अंदमानची लोकसंख्या 25,000 च्या आसपास होती. आज ती 4 लाखापर्यंत गेली असावी. सर्व जाती धर्माचे, प्रांताचे लोक भांडण तंटा न करता शेकडो वर्षांपासून एका छताखाली राहतात म्हणून खर्‍या अर्थाने या द्विपांना छोटा भारत म्हणून संबोधण्यात येते.

विमानातून अंदमानच्या भूमीवर पाय ठेवल्यानंतर अंदमानची भेट घडवून आणण्यासाठी परिक्षित नावाचा एक तरूण आम्हाला मदत करत होता. त्याने सुरूवातीलाच सांगितले की, अंदमान हे पर्यावरणाच्या दृष्टिने अतिशय स्वच्छ असे ठिकाण आहे. एक आठवड्याच्या वास्तव्यात पोर्ट ब्लेअर शहरातून आणि इतर उपनगरातून फिरत असताना भारतातील लाख लोकवस्ती असलेल्या शहराची स्वच्छतेच्या दृष्टिने जी दुरावस्था आहे, त्यापेक्षा अंदमानात काही वेगळे दिसले नाही. उघड्या गटारीतून घाण पाणी वाहणे, कागद आणि प्लॅस्टीकच्या तुकड्यांचे ढीग हे बर्‍याच ठिकाणी पहावयास मिळाले. नको त्या ओंगळ बाबीचा देशाच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत प्रसार करण्यात आपण भारतीय फार तत्पर आहोत. अशा बाबतीत समानता या तत्वाचे पालन झालेले दिसून येते. मानवी वस्ती व्यतिरिक्त जवळ जवळ 90 टक्के क्षेत्र वनाच्छादित असल्याने ते घनदाट जंगलांनी व्यापलेले आहे. वारेमाप वृक्षतोड झालेला भाग मात्र दिसून आला नाही. मी पाहिलेल्या दोन बाबींवर थोडे तपशीलवारपणे लिहीत आहे.

अंदमान बेट समुहावरील जंगलातील सखल भागात ज्या ठिकाणी मानवी वस्त्या आहेत त्या ठिकाणी शेती केली जात असल्याचे दिसून आले. जवळ जवळ 8.25 लक्ष हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी सुमारे 50,000 हेक्टर क्षेत्रावर शेती केली जाते. नारळ, भात, भाजीपाला, सुपारी, केळी ही प्रमुख पिके घेतली जातात. इतर अन्नधान्याची पिके, फळपिके व भाजीपाला पण घेतली जातात असे समजते. शेतकरी कुटुंबाची संख्या 15000 च्या आसपास असावी. हवामान कोकण प्रदेशासारखे असल्याने शेती व पीक पध्दती ही कोकणासारखीच पारंपारिक पध्दतीची आहे. आधनिक सिंचन पध्दतीचा लवलेश दिसून आला नाही. कोकणासारखे भाताचे एक पीक घेतल्यानंतर सर्व जमिनी रिकाम्या राहतात. क्वचित काही ठिकाणी झर्‍याचे, नाल्याचे पाणी वळवून भाजीपाला व फळपिके जगवली जातात.

दिवसेंदिवस शेतीकडे लोकांचा कल कमी होत चालला आहे. बोटीतून प्रवास करताना खलाशी म्हणू लागला की - लोक आधुनिक झाले आहेत. म्हणून त्यांना शेती करावीशी वाटत नाही. सहजपणे तो फार महत्वाचे बोलून गेला. लोक शिकले आणि इतर व्यवसायात नोकरीच्या निमित्ताने रमू लागले. शेतीमध्ये हात मळवून कष्ट करण्याची इच्छा त्यांच्यामध्ये राहिली नाही. शिकलेला माणूस शेतीपासून दुरावला आहे. पारंपारिक पध्दतीने, त्याला शेती करावीशी वाटत नाही. आधुनिक पध्दतीने यंत्राच्या सहाय्याने शेती करण्यासारखी त्याची आर्थिक परिस्थिती राहिली नाही.

लहरी हवामान आणि शेतीतील न सुटणारे अनेक प्रश्‍न, बाजारात मिळणारा कमी दर या सर्वांचाच परिणाम म्हणून पारंपारिक पध्दतीची शेती किफायतशीर राहिली नाही. बहुतांशी शेतकर्‍यांना याचा फटका बसत आहे आणि म्हणून येणारी पिढी शेतीमध्ये रमत नाही. त्यांचा कल नोकरी, पर्यटन इकडे जास्त आहे. आधुनिकता व शेती यामध्ये, 36 चा आकडा निर्माण झाला आहे, ही वस्तुस्थिती बोट चालवणारा खलाशी सहजपणे सांगून गेला. देशातील इतर राज्यातील चित्र यापेक्षा वेगळे नाही. अंदमानात बहुतांशी वीज ही डिझेल जनरेटरच्या माध्यमातून निर्माण केली जात असल्याचे समजते. ब्रिटीश काळापासून कार्यान्वित असलेला सर्लात मोठा लाकूड कापण्याचा कारखाना चालू स्थितीत दिसून आला.

शेतीला मानव निर्मित पाण्याची जोड देण्याची गरज आहे. त्यासाठी पाणलोट क्षेत्र विकासाचे कार्यक्रम, लहान मोठ्या तलावाची निर्मिती, या घटकांचा स्पर्श या भागाला अद्यापही झालेला दिसत नाही. ठिबक, तुषार सारखे सिंचनातील तंत्र अंदमानात पोहोचले नाही असेच म्हणावे लागेल. या भागात भूजल मुबलक असणार. सेल्युलर जेलच्या परिसरात पूर्वी विहीरीच्या माध्यमातून पाणी पुरवठा होत असे, असे सांगण्यात आले. ती विहीर सध्या अस्तित्वात नाबी. अलिकडे जवळपासच्या नदी नाल्यावर तलाव बांधून नळाने पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था बसविण्यात आली असल्याचे समजते. दुर्दैवाने पर्यटक म्हणून जेव्हा कोणत्याही भागाला भेट दिली जाते, त्या वेळी त्या ठिकाणच्या पाण्याबद्दल, शेतीबद्दल, पीक पध्दती, उद्योगधंदे, रोजगार निर्णिती, शिक्षण व्यवस्थेबद्दल माहिती दिली जात नाही. विकासाच्या या वेगवेगळ्या घटकावर बोलले जात नाही. माहिती घेण्याचा प्रयत्न केलाच तर देणार्‍याकडे त्याचा अभाव असल्याने प्रतिसाद उत्साहजनक मिळत नाही. पुन्हा पुन्हा विचारून तुटक तुटक माहिती मिळवावी लागते. देशात सुध्दा अशीच परिस्थिती आहे. देशाबाहेर पण यापेक्षा वेगळे नाही. परवा फ्रान्सला हाच अनुभव आला.

एकूणच असे लक्षात आले की, अंदमान या केंद्रशासित प्रदेशात शेतीची उत्पादकता वाढवण्यात, त्यातून रोजगार निर्मिती करण्याकडे शासनाचा कल नाही आणि शेतकरी कुटुंबाना सुध्दा शेतीत रस राहिला नाही. 50000 हेक्टर वरील शेती येत्या काळात शेती म्हणून राहील का ? हे प्रश्‍नचिन्ह आहे. वास्तविक हा भाग नैसर्गिक साधन सामुग्रीने संपन्न आहे, पाणी विपुल आहे, उत्पादक जमीन आहे. याला आधुनिकतेची, कौशल्याची आणि विवेकाची जोड दिल्यास शेतीतील उत्पादन नजरेत भरण्यासारखे राहणार आहे. ऊसासारखी अधिकपाणी पिणारी पिके वाढवता येतात. याकडे लक्ष वेधण्याची गरज दिसून आली.

शेवटच्या दिवशी बाराटांग या बेटाला भेट देण्याचा योग आला. घनदाट जंगलातून हा रस्ता जातो. संध्याकाळी पोर्ट ब्लेअरला परत येताना असं निश्‍चितपणे वाटून गेले की, या प्रदेशातील जरावा आदिवासी जे रंगाने काळे आणि नग्नावस्थेत विहार करतात त्यांना पाहण्यासाठीच हा प्रवास घडवून आणला होता. अंदमानला भेट देणार्‍या सर्वच पर्यटकाना हे उंचीने बुटके, जाड ओठांचे, कुरळ्या केसांचे, चपट्या नाकाचे, उघडे नागडे लोक पर्यटनाचा एक भाग म्हणून दाखविण्यात येतात. हे लोक जंगलामध्ये कंदमुळे, शिकार करून जगतात. त्याची घरे म्हणजे झाडांच्या फांद्या व पाला. त्यांची भाषा इतरांना समजत नाही. आपली त्यांना समजत नाही. अनेक वर्षाच्या अनुभवावरून काही उघडी नागडी कुटुंबे रस्त्यावर येऊन थांबत असतात. जाणारे येणारे पर्यटक काही खायला देतील का या आशेने ते उभे असलेले दिसतात.

पर्यटकांनी भरलेल्या वाहनांना पोलिसांचे संरक्षण दिले जाते. हे आदिवासी लोक बाणाच्या व हत्यारांच्या मदतीने पर्यटकांवर हल्‍ला करतील, या भितीने पोलिस संरक्षण दिले जाते. जरावा जमातीच्या लोकांची संख्या काही शेकड्यात असावी असे सांगितले जाते. रस्त्यावर ही मंडळी दिसावीत म्हणून सर्वच पर्यटक आतुरतेने बसच्या खिडकीतून बाहेर डोकावत पहात असतात. खिडकीतून डोक काढण्यास, हात काढण्यास, फोटो काढण्यास प्रतिबंध असतो. आमच्या, जाताना येतानाच्या प्रवासात 1 डझनाच्या वर नग्न अवस्थेतील आदिवासी कुटुंबे पहावयास मिळाली. काही मुले चड्डी घातलेली होती. बहुतेक सर्वांनाच त्यांनी पाहून धन्य झाल्यासारखे वाटले आणि दिवस कारणी लागल्यासारखा वाटला.

उघड्या जंगलात आकाशाखाली ते जगतात, शिकार करण्यासाठी फिरत असतात, याच कालावधीत त्या ठिकाणी काही पर्यटकांनी जारवा जमातीच्या महिलांना अर्धनग्न अवस्थेत नृत्य करावयास लावून त्याची चित्रफित तयार करून प्रसारित केली असल्याची बातमी वाचण्यात आली. जारवांच्या अर्धनग्न अवस्थेचा लज्जास्पद आनंद घेणारी, स्वत:ला सुसंस्कृत म्हणवणारी ही कृती घृणास्पद आणि निंदनीय म्हणावी लागेल. हे आदिवासी लोक समुहाने नैसर्गिक जीवन जगतात. गरजेइतकीच नैसर्गिक संपदा वापरतात, ओरबाडण्याची, साठवण्याची त्यांना हौस नसते. म्हणून जंगल सोडून आपल्या गरजा भागविण्यासाठी गावात, शहरात त्यांना येण्याची गरज वात नाही. हा अर्थ आधुनिक जगात जगणार्‍या आणि शिक्षित आणि सांस्कृतिक वलयाची बिरूदावली लावून फिरणार्‍या पर्यटकांना समजत नसावा का?

त्यांना सध्याच्या प्रवाहात आणण्याचा कोणी प्रयत्न पण केला नसावा. वास्तविक या जमातींना हळू हळू मानवी व्यवस्थेच्या चाकोरीत आणण्याचा प्रशासनाने आणि समाजाने प्रयत्न करण्याची गरज आहे असे वाटून जाते. ही पण माणसेच आहेत . त्याना प्रदर्शनीय वस्तु बनविण्याचा आपल्याला काय अधिकार आहे ? देशाला स्वातंत्र्य मिळून 6-7 दशके झालेली असताना पण अशी तुकतुकीत काळ्या रंगाची, सुंदर पांढर्‍या दातांची, नग्नावस्थेतील पुरूष, महिला, मुले पाहण्यामध्ये आपण माणुसकीपासून किती दूर जात आहोत याची कल्पना न केलेली बरी. कोणाला रानटी म्हणावे हा प्रश्‍न आपण स्वत:लाच विचारावयास हवा. गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसाच्या जंगलातील आदिवासी पण थोड्याबहुत प्रमाणात जारवा जमातीच्या जवळपास असतील ना ? आमटे परिवाराने स्वयंप्रेरणेने या जमातीला मानव म्हणून वागणूक देण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. गेल्या 25-30 वर्षातील त्यांच्या प्रयत्नांना फळ आले आहे.

याच आदिवासी, रानटी, समाजातील मुले, मुली आज डॉक्टर, प्राध्यापक झाले आहे. त्याच भागातील आपल्या बंधु भगिनींना सेवा देऊन सुधारण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारतीय शासनापुढे आणि समाजापुढे अशी काही यशस्वी उदाहरणे आहेत. रानटी अवस्थेतील समाजाला रानटी अवस्थेत ठेवून दरवर्षी लाखो पर्यटकांसाठी त्यांना प्रदर्शनीय वस्तु म्हणून दाखविण्याचे अमानवी कृत्य आपण किती दिवस चालू ठेवणार आहोत ? प्रत्येक ठिकाणी प्रकाश आणि मंदा आमटे निर्माण होण्याची वाट पाहणार आहोत का ? याचे उत्तर आपल्याच पिढीला द्यावे लागणार आहे. असे घडू नये म्हणून हा शब्द प्रपंच.

डॉ. द.मा मोरे, पुणे - (मो : 9422776670)

Path Alias

/articles/andamaanacai-bhaeta

Post By: Hindi
×