आम्ही तुम्हाला शेतकरी का म्हणून म्हणावे


सध्या महाराष्ट्रातील संपूर्ण कृषी अर्थव्यवस्था दुष्काळामुळे ढवळून निघाली आहे. पाणी नाही म्हणून सर्व महाराष्ट्र होरपळून निघाला आहे. खरीप तर बारगळलाच आहे. काही भागात तर रब्बीही संकटात आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढीस लागले आहे. सरकारला पळता भुई थोडी झाली आहे. ज्यांनी जबाब मागायला नको तेही सरकारला सध्या धारेवर धरत आहेत.

सध्या महाराष्ट्रातील संपूर्ण कृषी अर्थव्यवस्था दुष्काळामुळे ढवळून निघाली आहे. पाणी नाही म्हणून सर्व महाराष्ट्र होरपळून निघाला आहे. खरीप तर बारगळलाच आहे. काही भागात तर रब्बीही संकटात आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढीस लागले आहे. सरकारला पळता भुई थोडी झाली आहे. ज्यांनी जबाब मागायला नको तेही सरकारला सध्या धारेवर धरत आहेत. हा दुष्काळ निव्वळ नवीन सरकार आले या कारणामुळे पडला असे म्हणता येत नाही. तो गेल्या कित्येक वर्षांच्या नादानीमुळे पडलेला आहे. लागोपाठ दोन तीन वर्षे तो पडल्यामुळे त्याची तीव्रता जास्त आहे इतकेच. या दुष्काळासाठी शेतकऱ्यांना कोणीच जबाबदार धरत नाही हीच सर्वात आश्चर्याची बाब आहे. या अडचणींच्या काळात हा मुद्दा उपस्थित करायला खरे तर नको होता. पण आजच तो उपस्थित केला तर तो परिणामकारक ठरेल असे वाटल्यामुळे सर्वाचा राग पत्करून तो मांडत आहे याबद्दल मला क्षमा केला जावी ही माझी अपेक्षा आहे. यामुळे शेतकरी आत्म चिंतन करायला लागतील तर या लेखाचा उद्देश साध्य झाला असे मी समजीन.

मी विद्यार्थी होतो तेव्हापासून आम्हाला शिकवण्यात आले की भारतीय शेतकरी हा कर्जात जन्मतो, कर्जातच वाढतो व कर्जातच मरतो. आता याही गोष्टीला 60 वर्षे निघून गेली आहेत. पण परिस्थितीत काहीही फरक पडलेला नाही. प्रकृतीत फरक पडावा असे वाटत असेल तर बरेचदा ऑपरेशन करावे लागते. ऑपरेशन आजाऱ्याला भूल देवून केले जावू शकते किंवा ती न देताही केले जावू शकते. भूल दिली गेली नाही तर आजाऱ्याचे ऑपरेशन करतांना बऱ्यापैकी सहकार्य मिळू शकते. आपली अपेक्षा आहे की शेतकऱ्याच्या परिस्थितीत सुधारणा करायची असेल तर त्यानेही या ऑपरेशनला सहकार्य केले पाहिजे. पण दुर्दैवाने हे ऑपरेशन करतांना सध्या त्यांच्याकडून कोणतेही सहकार्य मिळतांना दिसत नाही. ते कसे याचीच चर्चा या लेखात करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

1. शेती यशस्वीपणे करायची असेल तर निविष्ठांची (इनपुट्स) जमवाजमव करावी लागते. खते, औषधे, बी - बियाणे या सारख्या निविष्ठा जमा करण्यात शेतकरी हातपाय हालवतांना दिसतो. पण शेती यशस्वी होण्यासाठी पाणी ही एक महत्वाची निविष्ठा आहे हे त्याला समजायला नको का ? तो पिढ्यांपिढ्या शेती करतो आहे. चौफेर नजर टाकली तर जो शेतकरी पाणी जमवतो तो यशस्वी होत आहे हेही त्याला दिसते. असे असतांना तो पाणी जमा करण्यासाठी कोणते प्रयत्न करतो याचे उत्तर त्याच्याजवळ नाही. हे पाणी सरकारने त्याच्या शेतावर आणून द्यावे असा त्याचा अट्टाहास का ? सरकार किती जणांना पुरे पडणार आहे ? बरे, पाणी खरे पाहता त्याच्या शेतातच आहे. जर 700 मी.मी पाऊस पडत असेल तर त्याच्या शेतात त्याद्वारे 28 लाख लिटर पाणी जमावयास हरकत नाही. जर त्याच्या जवळ पाच एकर शेती असेल तर पाण्याच्या बाबतीत तो कोट्याधीशच असतो कारण त्याच्या शेतात पडणारा पाऊस 1 कोटी 40 लाख लिटर असतो. जेव्हा हा शेतकरी स्वत:ला कोरवाडू शेतकरी म्हणतो तेव्हा मला त्याची कीव करावीशी वाटते. हे पाणी जर त्याने जमविले तर वर्षातून दोन पिके त्याला सहजपणे काढता येवू शकतात. वर्षाला दोन पिके काढणारा शेतकरी कधीच आत्महत्या करू शकत नाही असा माझा दावा आहे.

2. मला एक तरी असे वर्ष दाखवून द्या की ज्या वर्षी पाऊस पडलाच नाही. दरवर्षी रडतखडत का होईना पाऊस सरासरी गाठतोच. फक्त आपल्याला पाहिजे त्यावेळी तो पडत नाही इतकेच. त्याला पडू द्या की जेव्हा पडायचे तेव्हा. आपण त्या पावसाला जमा करण्यात कमी पडत आहोत. भारतात दरवर्षी किती पाणी अडवले जाते माहित आहे का ? पडलेल्या पावसाच्या फक्त 10 ते 12 टक्के. हे प्रमाण वाढविणे तर आपल्या हातात आहे ना ? हे काम कोणी करायचे ? फक्त सरकारने? मग आपण काय करायचे ? पंढरपूरच्या यात्रेला जायचे विठ्ठलाला पाऊस पाड म्हणून सांगण्यासाठी ? गेल्या कित्येक वर्षांपासून मुख्य किंवा इतर पूजा करणारे मंत्री विठ्ठलाला पाऊस चांगला पडू दे म्हणून याचना करीत असतात. तो आता एक उपचार होवून बसला आहे. देव त्यालाच मदत करतो जो स्वत:ला मदत करतो अशी अर्थाची इंग्रजी भाषेत एक म्हण आहे. इंग्रजी भाषेत असल्यामुळे ती आपल्या देवाला माहित नसावी कदाचित. निदान आपल्याला तरी तसे वाटत असावे. जो शेतकरी आपल्या शेतात पाणी जमवणार नाही त्याने स्वत:ला शेतकरी का म्हणून घ्यावे हा माझा त्यांना प्रश्न आहे.

3. आपल्या देशात अगणित शेतकरी नेते आहेत. त्यांचे एकमेव काम म्हणजे शेतकऱ्यांना सरकार विरूध्द भडकावून देण्याचे. एकाही शेतकरी नेत्याला आपण पाणी संकलन करावे ही बाब शेतकऱ्याला समजावून सांगावी असे का वाटत नाही ? पोपटराव पवारांसारखा एखादाच नेता निघतो की जो शेतकऱ्यांना हे करायला सांगतो. 350 मी.मी. पाऊस पडणारे त्यांचे गाव - हिवरेबाजार - आज सुखासमाधानाने जगत आहे. पाण्याशिवाय शेती होवू शकत नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. इतके असूनसुध्दा एकही नेता शेतकऱ्याला या कामासाठी का उद्युक्त करीत नाही ? शेतकऱ्याला सुध्दा हे आपण करावे असे का वाटत नाही ?

4. जमिनीचे माती परिक्षण करून घ्यावे, तिच्यात कोणते गुणदोष आहेत हे समजून घ्यावेत, दोष दूर करण्यासाठी काय केले जावू शकते याचा विचार करावा, गुण पाहून त्या प्रमाणे कोणती पिक पध्दती निवडावी याचा विचार आजपर्यंत किती शेतकऱ्यांनी केला हा मला त्यांना प्रश्न विचारावासा वाटतो. ज्या व्यवसायात आपण आहोत त्या व्यवसायाचे बारकावे काय आहेत हे समजून घेणे हे त्या व्यावसायिकाचे काम नव्हे काय ? हे त्याला करायची इच्छा नसेल तर शेतकरी म्हणवून घेण्यासाठी तो कसा पात्र ठरतो ?

5. शेती कसण्यासाठी, तिच्यापासून योग्य उत्पादन मिळण्यासाठी जमिनीत सेंद्रीय कर्ब असावा लागतो. तो किमान एक टक्का असावा असे शास्त्र म्हणजे. तेवढा तो नसेल तर शेती कसण्याचे तुमचे सर्व प्रयत्न विफल ठरतात हे त्याला आजपर्यंत कोणी सांगितले नाही का ? आपल्या जमिनीत तो किती प्रमाणात आहे हे पाहण्याचा किती शेतकऱ्यांनी प्रयत्न केला आहे ? शेत कसणे म्हणजे नांगरणी, वखरणी, पेरणी, खुरपणी, पिकांचे रक्षण, कापणी, तयार मालाला बाजार दाखवणे इत्यादी गोष्टी झाल्या म्हणजे काम संपले असे तर शेतकऱ्याला वाटत नाही ना ? आज आपल्या जमिनीत सेंद्रीय कर्ब किती प्रमाणात आहे माहित आहे ? फक्त 0.1 टक्का एवढाच आहे. तो वाढविण्यासाठी आपण प्रयत्न केला नाही तर तो आणखी घसरणार आहे. तो कसा वाढवावा यासाठी निष्ठेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. आणि तसे करायचे नसेल तर काळ तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तुम्ही तसे करणार नसाल तर आम्ही तुम्हाला शेतकरी का म्हणून म्हणायचे ?

6. आज तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या जमिनीचे तुकडे पडत चालले आहेत. तुमच्या पणजोबाकडे 20 एकरचा सलग तुकडा होता. आज वारसा हक्काप्रमाणे त्याचे तुकडे पडत पडत आज फक्त दीड दोन एकराचा तुकडा तुमच्या वाट्याला आला आहे. भविष्यात हे तुकडे वाढत जाणार आहेत. हा तुकडा तुमचे व तुमच्या कुटुंबाचे पोट भरण्याला पुरेसा आहे असे तुम्हाला वाटते काय ? परदेशात वारसा हक्काप्रमाणे जमीन फक्त ज्येष्ठ मुलालाच मिळते. या मुळे तुमच्या जमिनीचे तुकडे पडत नाहीत. गेल्या 70 वर्षांपासून आपल्या मायबाप सरकारने हे तुकडे पाडले जावू नये यासाठी केलेले प्रयत्न अगदीच जुजबी आहेत. आपल्या मतांचे संरक्षण करण्याच्या नादात आजपर्यंत एकाही राजकीय पक्षाने या मूलभूत प्रश्नाबद्दल विचारच केलेला नाही. ते सर्व मूग गिळून बसले आहेत. ज्या जमिनीला आपण आपली आई मानतो तिचे असे तुकडे पडले जाणे आपल्याला कसे भावते हा माझा आपल्याला सवाल आहे. आपण स्वत:ला शेतकरी म्हणवून घेतो व आपल्या जमिनीचे असे तुकडे पडत असतांना मात्र आपण हताशपणे त्याकडे बघत बसतो हा कोणता न्याय झाला ? हे तुकडे पडण्याची क्रिया शेतकरी म्हणून आपण स्वत: थांबवू शकत नाही काय ? आपल्या हयातीत आपल्या सर्व मुलाबाळांना एकत्र बसवून त्यांच्याशी चर्चा करून जमीन कोणाला तरी एकाला मिळावी असा विचार आपल्याला का सुचला नाही ? आता पर्यंत जरी सुचला नसला तरी यापुढे हे थांबवण्यासाठी आपण काही विचार करायला तयार आहात का ?

7. आज शेताचे जे अगणित तुकडे पडले आहेत व त्यामुळे जी अडचण निर्माण झाली आहे ती तुम्हाला रोखता येणार नाही का ? करार शेती, गट शेती वा सहकार शेती हे शब्द तुमच्या कानावरून गेलेच असतील. एक मेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ याची महती तुम्ही प्रत्यक्षात कधी अनुभवणार ? आज दुर्दैव हे आहे की आपला समाज विविध जातीत, धर्मात, राजकीय पक्षात विभागला गेला आहे. आपल्या शेजारचा शेतकरी आपला मित्र नसतो तर तो आपला शत्रु असतो. त्याच्याशी जुळवून घेणे आपल्या रक्तातच नाही. हे राजकारणी लोक आपल्या या दुहीचा स्वत:साठी नेमका फायदा करून घेतात. वर्षभर कोणत्या ना कोणत्या निवडणूका चालूच असतात. त्यात ते आपल्याला वेगवेगळी प्रलोभने दाखवून झुलत ठेवतात. त्यात त्यांचे भले होते पण तुम्ही जिथे असता तिथेच राहता. ते मजल्यावर मजले चढवत असतात पण तुम्हा मात्र गरीबीच्या नरकात वास करीत असता. आज इतके खंडीभर साखर कारखाने निघाले . त्याचा लाभ कोणला झाला ? त्यांनाच झाला न ? आता स्वत: शहाणे होण्याची वेळ आली आहे. सहकारी शेती, गट शेती, करार शेती या संकल्पना वापरून एकत्र या व पहा त्यांच्यात काय जादू आहे ती.

8. शहरातील कारखानदाराच्या नावाने आपण आपला राग नेहमी व्यक्त करीत असता. तो खोऱ्याने नफा कमवितो याची तुम्हाला चीड असते. पण व्यवसाय करतांना तो जे धोरण अनुसरतो त्याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का ? तो नेहमी आज व उद्याचा विचार करीत असतो. तो नेहेमी अल्प मुदतीचे व दीर्घ मुदतीचे निर्णय घेत असतो. आपला विचार मात्र आज पुरताच मर्यादित असतो. आपल्या शेताचे दीर्घ मुदतीचे नियोजन आपण कधी करणार ? तो नेहेमी आपला कारखाना 24 तास कसा चालत राहील हे पहातो. हे जेव्हा तो करतो तेव्हाच त्याला नफा मिळतो. त्याच्या जशा तीन शिफ्ट असतात तशा तुमच्याही तीन शिफ्ट असू शकतात. खरीप, रब्बी व उन्हाळी पीक या तुमच्या तीन शिफ्ट समजायला काय हरकत आहे ? तीच जमीन तीनदा वापरणे तुम्हाला शक्य नाही का ? तीनदा वापरण्यासाठी तिचा मगदूर कसा वाढवता येईल याचा कधी विचार केला आहे का ? आमच्या विदर्भात शेताला वावर म्हणतात. याचा थोडक्यात अर्थ असा की तुमचा तिथे वावर असावा. तुमचा तिथे वावरच नसेल तर आम्ही तुम्हाला शेतकरी का म्हणून म्हणावे ? शेती हा काही पार्ट टाईम व्यवसाय नव्हे. तुम्ही तुमच्या शेताच्या तुकड्याशी आपले नाते वाढवाल तेव्हाच तो तुकडा तुम्हाला जगायला मदत करणार आहे ही बाब कृपया दुर्लक्षित करू नका.

9. मी एक गोष्ट अनुभवली आहे, ती तुमच्या लक्षात आली आहे का ? बसने मी जेव्हा जेव्हा प्रवास करतो तेव्हा कोणतेही गाव आले, कोणत्याही वेळी आले तरी गावातील अर्ध्यापेक्षा जास्त जनता बसस्टॉपजवळच घुटमळत असते. त्यांना कोणत्या गावाला जायचे म्हणून ते तिथे उभे असतात का ? नाही. तिथे उभे राहाणे ही आता त्यांची सवय बनली आहे. माझ्या समोर प्रश्न उभा राहातो - या गावातील लोकांना काही काम नाही का ? एका बाजूने म्हंटले जाते की गावात मजूर उपलब्ध नाहीत पण इथे तर लोकांना काम दिसत नाही. याचा गावकऱ्यानी कधी विचार केला आहे का ? मी जालना जिल्ह्यातील एका गावात भाषण द्यायला गेलो असतांना सरकारच्या मदतीशिवाय स्वत:च्या हिंमतीवर शेततळे बांधण्याची कल्पना गावकऱ्यांसमोर मांडली. शेवटी विषयावर चर्चा सुरू झाली. एक म्हातारा गावकरी उठून उभा राहिला व म्हणाला, सर तुमची कल्पना चांगली आहे हो. पण हे काम करावे कोणी ? मी आता म्हातारा झालो, माझ्याच्याने टिकावही उचलली जाणार नाही. माझ्या मुलाने हे काम करावे असे आपल्याला वाटते का ? तो तर सकाळीच मला 10 - 15 रूपये मागून बसस्टँडवर जातो, पैसे नाही दिले तर संतापतो. दिवसभर काय करतो त्याचे त्याला माहित, पण रात्री दारू पिवून येतो व आम्हालाच मारतो. त्याच्याकडून हे काम होणार नाही. मग ते कोणी करावे ? महाराष्ट्रातील ग्रामीण विकासाचा दर कमी का याचे उत्तर तर या पाठीमागे दडले नाही ना?

10. सर्व प्रकारच्या शेतीत धान्य शेती ही तोट्यातील शेती म्हणून ओळखली जाते. हे माहित असूनसुध्दा तुम्ही धान्य शेतीवरच का म्हणून विसंबून राहता ? तुम्ही काय तोट्यात असूनसुध्दा समाजाला धान्य पुरवण्याचा ठेका घेतला आहे का ? समाज तुम्हाला तुमच्या धान्याला योग्य भाव देत नसून सुध्दा तुम्ही स्वत:च्या पायावर धोंडा का म्हणून पाडून घेत आहात ? शहरातला कारखानदार लोकांना काय पाहिजे याची सतत चाचपणी करीत असतो. ती चुकली तर त्याचा फटका त्याला बसल्याशिवाय राहात नाही. पिढ्यानपिढ्या अशा धान्य शेतीत अपयश येत असतांना तुम्ही कधीतरी ही बाब शिकणार की नाही ? आज समाजाचे राहणीमान वाढले आहे. त्याच्या गरजा बदललेल्या आहेत. त्याला आजकाल फळे जास्त प्रमाणात हवी आहेत. त्याला मांस, अंडी, दुग्धजन्य पदार्थ जास्त प्रमाणात हवे असतात. याची नोंद तुम्ही कधी घेणार ? आज जळतणाचे भाव आकाशाला भिडले आहेत. तुमच्या जवळील जमिनीचा काही तुकडा हलका असतो, त्या ठिकाणी तुम्ही झाडे वाढवून वनशेती करू शकणार नाही का ? बदल हा व्यवसायाचा आत्मा आहे. जो बदलतो तोच जगतो, बाकी काळाच्या ओघात गडप होत असतात. आज बदल करणे या शिवाय तुम्हाला दुसरा कोणताही पर्याय नाही. मराठवाड्यातील हवामान कुरणे वाढविणे, जनावरे पाळणे, दुग्ध व्यवसाय वाढविणे या साठी उत्कृष्ट आहे. धान्य निर्माण करण्यापेक्षा या व्यवसायात जास्त बरकत आहे. डेन्मार्क सारखा देश आज याच व्यवसायावर जगाच्या नकाशात तळपतो आहे. तुम्ही त्याचे अनुकरण करायला काय हरकत आहे ?

11. बरे, ती धान्य शेती तरी तुम्ही कशी करता ? तुमचे दर एकरी उत्पादनही अगदी तुमच्या प्रतिष्ठेला लाज आणेल असे आहे. एका एकरात तुम्ही पाचपट उत्पादन काढल्यास तुमचा उत्पादन खर्च कमी येणार नाही का ? मागील हंगामात आमच्या एका मित्राने एक गावरान ज्वारीचा प्रयोग केला. त्याने एका एकरात किती ज्वारी काढली माहित आहे ? तब्बल 45 क्विंटल. मोठ्या अभिमानाने कर्नाटकातील बसवकल्याण या गावी मी या प्रयोगाची बातमी सांगायला गेलो तर मलाच लाज वाटायला लागली कारण तिथे एक शेतकरी भेटल्या ज्याने एका एकरात 100 क्विंटल ज्वारी काढली होती. आता बोला. आहे तुमची हिंमत असे करून दाखवण्याची ? नाही. आपण आपले सर्व लक्ष सरकारने धान्याचे भाव बांधून देण्यावर केंद्रीत केले आहे, कारण त्यातच आपला पुरूषार्थ आहे. सराकरला भाव ठरवून देण्यासाठी सळो की पळो करून सोडायचे हाच आपला एक कलमी कार्यक्रम असेल तर गोष्ट वेगळी.

12. आज तुमच्या धान्याला बाजारात भाव मिळत नाही अशी तुमची तक्रार आहे. धान्य तयार झाल्याबरोबर तुम्ही सर्वच जण बाजारात गर्दी करणार असाल तर बाजारभाव पडणार नाहीत तर काय होणार ? आज गावात गोडाऊन बांधण्याच्या सरकारच्या योजना आहे. हे गोडाऊन बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात सबसिडी मिळते. गावागावात असे गोडाऊन बांधले गेले तर माल गोडाऊनमध्ये साठवून ठेवता येतो. तिथून मिळालेली पावती बँकेत गहाण ठेवून तुम्हाला कर्ज मिळू शकते. या पैशातून तुमच्या तात्काळीच्या गरजा भागविल्या जावू शकतात. त्यामुळे बाजारभाव स्थिर राहतात व त्याचा लाभ तुम्ही घेवू शकता. तुमच्या गावात रोजगार नाही म्हणून तुम्ही तक्रार करता. गावातील चारपाच तरूणांनी एकत्र येवून असे गोडाऊन बांधले तर त्यांना सहजपणे रोगजार उपलब्ध होवू शकतो. आजचा जमाना काहीतरी नवीन करून दाखवायचा आहे. वर सांगितलेली पध्दती अंगीकराली तर धान्य भाव स्थिर होवून गावात रोजगाराच्या संधीही निर्माण होवू शकतील.

13. आज तुम्ही तयार केलेला कच्चा माल वापरून त्याचे पक्क्या मालात रूपांतर करून व्यापारी गब्बर झाले आहे. तुम्ही मिरच्या तयार करता व मातीमोल किंमतीने बाजारात विकता. पण त्याचे तिखट बनवून जास्त पैसे मिळू शकतात. यालाच मूल्यवर्धन म्हणतात. तुम्ही लसुण, आले पिकविता, त्याची पेस्ट बनवून पैसे मिळविता येतात. असे केल्यास तुमच्या गावात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होवू शकतात. तुम्ही आंबे पिकविता, वादळ आले की आंब्याचे नुकसान होते. पण वादळात पडलेल्या आंब्यांपासून आमचूर बनविला जावू शकतो. तो चढ्या दराने बाजारात विकता येतो. अशी एक ना दोन शेकडो उदाहरणे दिली जावू शकतात. थोडी कल्पकता दाखविली तर ग्रामीण भागात असे शेकडो उद्योग सुरू करता येतात.

वर जे मुद्दे मांडले आहेत त्यांचा विचार करण्याची वेळ आज येवून ठेपली आहे. तो आज केला गेला नाही तर तो कधी करणार ? व्यवसाय हा व्यावसायिक पध्दतीनेच केला गेला पाहिजे. त्याला पर्याय नाही. हे कोणीतरी स्पष्टपणे बोलणे गरजेचे होते. तो वाईटपणा पत्करून माझे विचार मांडण्याचे मी धाडस केले आहे. मला शेतीचा अनुभव नाही, त्यामुळे मला हे सांगण्याचा अधिकार नाही अशी टीका मात्र कोणीही करू नये कारण मीही जवळपास 30 वर्षे शेती केली आहे. माझे विचार वाचून तुम्हाला राग आला असेल तर मी तुमची माफी मागतो. पण काही दिवसांनी राग शांत झाल्यावर या दृष्टीने विचार केला तर मला कृतकृत्य झाल्यासारखे वाटेल.

डॉ. दत्ता देशकर, पुणे - मो : 9325203109

Path Alias

/articles/amahai-taumahaalaa-saetakarai-kaa-mahanauuna-mahanaavae

Post By: Hindi
×