पावसाळ्याच्या पूर्वसंध्येला हवामान खात्याच्या तज्ञांनी व्यक्त केलेल्या मान्सूच्या वेळेवर होणाऱ्या समाधानकारक पावसाच्या अंदाजाची नोंद घेवून जून महिन्याच्या जलसंवादच्या संपादकीयात चाहूल मान्सूनची वर्तविली होती. तसा मृगाच्या सुरूवातीला पाऊस बऱ्यापैकी बरसला अन् लगेच गायब देखील झाला. आणि म्हणूनच जूनच्या जलसंवादचे मुखपृष्ठावर आता वाट पावसाची असे शिर्षक असलेले सुरेख रेखाटण कल्पक रेखाचित्रकार सौ.
पावसाळ्याच्या पूर्वसंध्येला हवामान खात्याच्या तज्ञांनी व्यक्त केलेल्या मान्सूच्या वेळेवर होणाऱ्या समाधानकारक पावसाच्या अंदाजाची नोंद घेवून जून महिन्याच्या जलसंवादच्या संपादकीयात चाहूल मान्सूनची वर्तविली होती. तसा मृगाच्या सुरूवातीला पाऊस बऱ्यापैकी बरसला अन् लगेच गायब देखील झाला. आणि म्हणूनच जूनच्या जलसंवादचे मुखपृष्ठावर आता वाट पावसाची असे शिर्षक असलेले सुरेख रेखाटण कल्पक रेखाचित्रकार सौ. अर्चना देशकर यांनी अत्यंत मार्मिकपणे चितारले होते. व शेतकरीदादाला वाट पाहा पावसाची तू धीर असा सोडू नकोस असे आशादायक मधाचे बोट ही दाखविले होते.पण हाय! नंतरच्या पूर्ण जून व जुलैचे तीन आठवडे सरले तरी बऱ्याच वेळा आभाळात जमा झालेले काळे ढग पाण्याविनाच पसार झाले अन् जुलैअखेर अजूनही वाट पावसाची म्हणत हताशपणे अन् आशाळभूतपणे आकाशाकडे डोळे लावून वाट बघण्याची वेळ शेतकरीदादास सर्वसामान्य नागरिक अन् सिंचन, जलविद्युत व पिण्यासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या प्रशासनावर दुर्दैवाने आली आहे.
बा, लहरी निसर्गा! आता तरी अधिक अंत पाहू नकोस, अशी प्रार्थना करण्यासाठी व वरूणराजाची पूजा बांधणे, अंधश्रध्देपोटी जादूटोणा - मंत्रतंत्र, जपजाप्य, होमहवन अशा गोष्टींचे स्त्रोम वाढून खेड्यापाड्यातील शेतकरी व सामान्य नागरिक हतबलपणे तोतया मांत्रिकांच्या व संधीसाधू 'गुरूं' च्या मागे लागल्याचे केविलवाणे चित्र अेक ठिकाणी दिसायला लागले आहे. नाशिक जिल्ह्यात तर एका ठिकाणी पावसाला साकडे घालण्यासाठी गाढव-गाढविणीचे अपारंपारिक लग्न लावून त्यासाठी जवळपासच्या पंचक्रोशीतील हजारो नागरिकांना रितसर निमंत्रीत करण्यात आले व सनई, चौघडे, बँड आदी वाद्यवृंदाच्या कल्लोळात विवाहसमारंभ पार पाडून यथेच्छ भोजनावळीही उठविण्यात आल्याचे वृत्त नुकतेच दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांवर झळकले. एकीकडे पाऊस नसल्याची चिंता तर दुसरीकडे अंधश्रध्देचा महापूर समाजात वाढत चालल्याची चिंता अशा दुहेरी फेऱ्यात आपण अडकून पडलो आहोत.
पावसाअभावी संपूर्ण महाराष्ट्रत सध्या अनेक लहानमोठ्या धरणांची जलाशये 15-20 टक्केपर्यंतच भरली आहेत. गतवर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ही टक्केवारी अंदाजे एकतृतीयांशच्या आसपास असल्याने ज्या उद्दिष्टांसाठी सर्वसामान्यपणे जलसंपदा खात्याने ही धरणे उभारली त्या सिंचन, जलविद्युतनिर्मिती अशा मूलभूत उद्दिष्टांना फाटा देवून केवळ पिण्यासाठी या पाण्याचे आरक्षण करण्याची जबाबदारी प्रशासनावर येवून पडली आहे. इतकेच नव्हे तर हा अपूरा पाण्याचा साठा येणाऱ्या पुढील मान्सूनपर्यंत पुरवठा करणे अशक्य झाल्याने मुंबई, पुणे, नगर, नागपूर सारख्या औद्योगिक, सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या प्रगत असलेल्या शहरांतूनही आवश्यक पाणीपुरवठा करणे कठीण झाल्याने ऐन पावसाळ्याच्या मध्यातच 15 ते 30 टक्के पाणीकपात करण्याची वेळ आली आहे.
अशा बिकट परिस्थितीत सिंचनासाठी पाणीपुरवठा होणे शक्य नसल्याने व ढग दगा देत राहिल्याने शेतकरीवर्गांच्या पेरण्या 15-20 टक्केही होवू शकलेल्या नाहीत व झालेल्या पेरण्याही पाण्याअभावी जळून गेल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे अस्मानी संकट कोसळले आहे. कर्जबाजारी शेतकऱ्यांची तर दुबार पेरणी करण्याइतपत आर्थिक स्थिती अनुकूल नसल्याने दुष्काळात तेरावा महिना आल्यासारखीच बहुतेकांची अवस्था झाली असल्याचे अनुभवास येत आहे. कशा कमी होतील गरीब बिचाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशा आपत्कालीन परिस्थितीत?
हे सारे संकट पुरेसे नाही म्हणूनच की काय, राज्यात विद्युतपुरवठा आवश्यकतेच्या प्रमाणात केवळ साठ टक्केच उपलब्ध असल्याने राज्यातील सर्वच लहानमोठ्या शहरांतून व खेड्यापांड्यांतून भारनियमनाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मोठ्या शहरांतून रोज चार ते सहा सात, काही ठिकाणी आठ ते दहा तास तर छोट्या दुर्गम खेड्यांतून तर हे प्रमाण जवळपास चौदा ते सोळा तास इतके प्रचंड झाले आहे. या परिस्थितीत हे चित्र नजिकच्या भविष्य काळात तरी पालटण्याची फारशी शक्यता दिसत नाही. याचाच परिणाम मोठ्या शहरांतील औद्योगिकरण ठप्प होण्यात तर खेड्यापाड्यांतून विहीरींमध्ये थोड्याफार प्रमाणात शिल्लक असणारे पाणी विद्युत पंपांचा विद्युतपुरवठा बंद असल्याने उघड्या डोळ्यांनी जळणारी पिके जगविण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्याची वाताहात होण्याचे पाहणे हेच दुर्देवाचे फेरे पाचवीला पुजलेल्या शेतकऱ्यांच्या नशिबी येते आहे. सर्वसामान्य नागरिकही पाण्याअभावी तसेच भारनियमनामुळे विजेअभावी त्रस्त आहेतच. कामगार, शेतकरी, कष्टकरी, चाकरमाने यांच्याप्रमाणेच औद्योगिक क्षेत्रातील वीजकपातीमुळे आठवड्यातून दोनदोन दिवस बंद राहणाऱ्या उद्योगांमुळे उद्योगजगतही परेशान आहे. परिणामी कृषी व औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनात होणारी घट महागाई, चलनवाढ यांना निमंत्रित करत असल्याचे भीषण चित्र दृष्टोत्पतीस येत आहे.
हे सारे दुष्टचक्र थांबण्यासाठी आपण सारेजण अजूनही पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहात आहोत. पाऊस जेव्हा यायचा तेव्हा येवो. पण सद्यस्थितीत मात्र शासनाला या निराशाजनक परिस्थितीशी सामना करण्यासाठी दुष्काळ सदृष्य परिस्थिती जाहीर करावी लागली आहे. प्राप्त परिस्थितीत राज्याच्या काही भागात आजच दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून शासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे.
समाधानकारक पावसाळ्याच्या भाकितापासून सुरू झालेली यंदाची मान्सूनची वाटचाल संभाव्य सुकाळापासून दुष्काळसदृश परिस्थितीकडे व पुढेमागे दुष्काळसदृश्य परिस्थितीकडून प्रत्यक्ष दुष्काळाकडे चालत राहिली तर येणाऱ्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी केवळ शासनावर अवलंबून न राहता प्रत्येक नागरिकाने डोळसपणे प्राप्त परिस्थितीत पाण्याच्या काटकसरीचा स्वत: होवून अवलंब करण्याचे धोरण अंगिकारणे सर्वांच्याच हिताचे ठरणार आहे.
पुरेशा पावसाअभावी पृष्ठभागावरील पाणीसाठे अपुरे पडत आहेत व भूगर्भात नव्याने पाणी मुरणेही कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत भूगर्भातील उपलब्ध असलेला, पण दिवसेंदिवस अधिकाधिक खोलखोल जात असलेला तोकडा भूजलसाठा, तो वाढविण्यासाठी समग्र समाजाने सातत्याने करावयाचे प्रयत्न, भूजलवापराच्या मर्यादा, भूजल कायदे, भूजलाचे वाढते महत्व इत्यादी बाबी स्पष्ट करणारे जलतज्ञांचे, या क्षेत्रातील मान्यवरांचे विचार त्यांच्या मुलाखतींच्या व लेखांच्या माध्यमातून सुबुध्द वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्वपूर्ण कार्य जलसंवादने जुलै महिन्याचा भूजल विशेषांक काढून केले आहे.
26 जुलै 2005 च्या मुंबई मधील प्रलयंकारी पावसानंतर जलसंवादने काढलेला महापूर विशेषांक, नदीजोड प्रकल्पांचे महत्व व आवश्यकता विशद करणारा नदीजोड प्रकल्प विशेषांक, पाणी आणि संस्कृती या विशेषांकाद्वारे पाण्याचे संस्कृतीशी असणारे अतूट नाते उलगडणारा जलसंवादचा अंक, महिलांचे पाण्याशी असलेले जवळकीचे संबंध विचारात घेवून या विषयावर विशेष प्रकाश टाकणारा पाणी आणि महिला विशेषांक, अखिल भारतीय जलंसस्कृती मंडळाच्या माध्यमातून संपन्न होणाऱ्या जलसाहित्य संमेलनाचा मागोवा घेणारा जलसाहित्य संमेलन विशेषांक आणि विदर्भ तसेच मराठवाड्यात गेली काही वर्षे सातत्याने होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमिवर त्यांच्या दु:खाला वाचा फोडणारा अन् आत्महत्यांच्या कारणमिमांसेच्या आधारे आत्महत्या टाळण्याच्या दृष्टीने उपायायेजना सुचविणारा जलसंवादचा चतुर्थवर्ष वर्धापनदिन विशेषांक अशा एकापेक्षा एक सरस विशेषांकांच्या मालिकेत नूतन भूजल विशेषांकाने भर टाकत जलसंवादच्या आतापावेतोच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपतेच आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. पाण्यासारख्या एकमेव विषयावर सारखे काय लिहिणार आणि हे मासिक मासिकस्वरूपात नेमके कसे चालवणार या वाचकांच्या जिज्ञासू प्रश्नाला अनेकविध विषयांच्या मांडणीच्या माध्यमातून जलसंवादने चार वर्षांच्या सातत्यपूर्ण वाटचालीने चोख उत्तर दिले आहे.
जलसंवाद मार्फत सातत्याने केले जात असलेले वेळोवेळचे प्रबोधन सर्वसामान्य जनात पाणीविषयक जागृती वाढविण्यारे प्रभावी माध्य ठरत असल्याने जलसंवादची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसेंदिवस बिकट होत चाललेल्या पाणी प्रश्नावर जागृती करणारे जलसंवाद हे एकमेव माध्यम न ठरता जलसंवादच्या वाटचालीत जलतज्ञांप्रमाणेच आपल्यासारख्या सर्वसामान्य जनांचीही शक्ती जलसंवादच्या पाठीशी उभी करणे हे आपणा सर्वांचेच प्राथमिक कर्तव्य ठरते. याची जाणीव ठेवून जलसंवादने गेली चार वर्षे सातत्याने तेवत ठेवलेल्या ज्योतीचा प्रकाश सर्वदूर पोहोचविण्यात आपण सर्वजण आपापल्या परीने कटीबध्द होवू यात असे आवाहन या निमित्ताने करावेसे वाटते.
पाऊस आला नाही म्हणून बोकड कापणे, गाढवाचे लग्न लावणे, अशा अंधश्रध्दांचा आधार न घेता शास्त्रीय कारणांवर लक्ष केंद्रित करणे, कृत्रिम पावसासारख्या अभिनव मार्गाचा अवलंब करणे, स्वत: अभ्यास करणे व लोकांपर्यंत जलजागृतीचे महत्व पोहोचविणे, स्वत: काटकसरीने जलवापर करणे व जनसामान्यांनाही यासाठी प्रवृत्त करणे अशा सकारात्मक कार्याच्या माध्यमातून आजच्या पाण्याअभावी उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत आपापला खारीचा वाटा उचलून जलसंवाद ने आरंभलेल्या जागृतीयज्ञात आपणही आपला सहभाग नोदवूयात.
चला तर मग! आपण सारेच हातात हात घालून एकसंघपणे येणाऱ्या बिकट परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज होवू यात. अजून अर्धा पावसाळा बाकी आहे. अजूनही वाट आहे पावसाची. आलाच पाऊस तर त्याचे स्वागत आहे. परिस्थिती दुर्देवाने अशीच राहिली तर मात्र जलसंवादच्या साथीने आपण परिस्थितीवर मात करण्यात निश्चितच यशस्वी होवूत याचा मला विश्वास वाटतो.
दीपनारायण मैदंर्गीकर, सोलापूर
Path Alias
/articles/ajauunahai-vaata-paavasaacai
Post By: Hindi