अजरामर जलसाहित्य कृती - आम्ही भगीरथाचे पुत्र


पाण्यासाठी वाहून घेतलेल्या जलसंवाद मासिकाने यावर्षी पाण्याशी, पाणी प्रश्नाशी निगडीत साहित्यकृतींवर प्रकाश टाकून, त्यांची थोडक्यात ओळख करून द्यायचे ठरविले आहे. आम्ही भगीरथाचे पुत्र ही पाण्यावरची म्हणजे भाकरानंगल धरण कसे घडले - किंबहुना कसकसे घडत गेले त्याची ही कथा. कादंबरी जुनी म्हणजे सुमारे 45 - 50 वर्षांपूर्वी लिहिली असावी, असे म्हणण्याचे कारण म्हणजे माझ्यासमोर असलेली जीर्ण प्रत.

पाण्यासाठी वाहून घेतलेल्या जलसंवाद मासिकाने यावर्षी पाण्याशी, पाणी प्रश्नाशी निगडीत साहित्यकृतींवर प्रकाश टाकून, त्यांची थोडक्यात ओळख करून द्यायचे ठरविले आहे. आम्ही भगीरथाचे पुत्र ही पाण्यावरची म्हणजे भाकरानंगल धरण कसे घडले - किंबहुना कसकसे घडत गेले त्याची ही कथा. कादंबरी जुनी म्हणजे सुमारे 45 - 50 वर्षांपूर्वी लिहिली असावी, असे म्हणण्याचे कारण म्हणजे माझ्यासमोर असलेली जीर्ण प्रत. लेखक आहेत गो.नी.दांडेकर.

ही त्याकाळची गाजलेली कादंबरी, त्यांनी लिखाणासाठी घेतलेली मेहनत पानापानातून जाणवते जणू काही त्यांचे जन्मस्थानच भाकडा आहे इतका तो परिसर त्यांनी सिध्दहस्त लेखणीत जीवंत केला आहे. कादंबरीचा परिघही बराच मोठा आहे. पहिल्या प्रकारणाचे नावच सुमारे शंभर वर्षांपूर्वी एका जळत्या दुपारी असे आहे. प्रत्येक प्रकरणाला अशीच नावे आहेत. सन एकोणीसशे सहा ते एकोणीसशे पंधरा जेव्हा भारताबरोबर पंजाबही पेटू लागला होता. प्रकरणात लिहिलेला कालखंड त्या त्या प्रकरणात संपविला आहे.

कथानक स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू होते आणि स्वातंत्र्य मिळाल्यावरही काही कालाने संपते. एवढा कालखंड उभा करणे ही त्यातील बारकाव्या सकट ही सोपी गोष्ट नाही. हिमाचल प्रदेशच्या आजाबाजूचा प्रदेश या परिसरात हे कथानक घडते. भाकडाच्या गीताराम पंडिताचा (ब्राम्हणाचा) मुलगा जीवन, ज्याने भाकडा उभे करण्यात सिंहाचा वाटा उचलला. एका पंडिताचा मुलगा गरीबीमुळे बाहेर जाऊन कसा शिकणार ? बिलासपूरच्या राजानीच पंडितजींच्या या पुत्राचे नाकरण केले. त्याच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. तुला इंजिनिअर होऊन धरण बांधायचे आहे हे सतत त्याच्या मनावर बिंबवले. धरण हेच त्याच्या जीवनाचे ध्येय ठरले. कितीही अडचणी आल्या तरी पुरे करायचेच हा विडाच जीवनने उचलला. इंजिनिअर झाल्यावर अनेक प्रलोभनांना मागे सारून भाकड्याला परत आला.

आताची वाट तर अधिकच बिकट होती. त्यावेळी भाकडाचे काम बंद होते. थोडेफार कुठे चालू होते तेथे माला काम करण्याची संधी ब्रिटिश गर्व्हमेंटने दिली नाही. मग सुरू झाला एकाकी लढा. सोबतीला होते अनपढ पण जिवाला जीव देणारे सोबती. त्याच्या प्रोफेसरांनी दाखविलेली दिशा, घरची गरीबी, आई वडिलांचा विरोध, त्याच्याच घरात रहाणारा पण त्याच्या विरोधात पेटणारा जोगेंद्र अशा अनेक नकाराचे होकारात रूपांतर ही परिक्षाच होती. सर्वार्थाने शोषून घेणारी. तुटपुंज्या यंत्रसामुग्रीवर याने अखंड परिश्रम घेतले. सर्व परिसराची, भूभागाची बुडीत जाणाऱ्या पाण्याच्या पातळीचा अभ्यास केला. नकाशे काढले, आपली निरीक्षणे नोंदवून ठेवली, भूसभुशीत स्तर असलेला हिमालय. अडचणींचे डोंगर पालथे घालून उभा केलेला जीवन वाचकाला केव्हाच आपलासा करून घेतो. त्याला साथ देणारी त्याची पत्नी विनय ही अतिशय लोभसवाणी व्यक्तिरेखा आहे. घरेलू, अतिशय संमजस, प्रहल्भ व्यक्तिमत्व असणारी आहे.

पहाडी देखणेपणा, गोड आवाज, कष्टाळू, पतीला परमेश्वर मानणारी , तसे आचरण करणारी, घरच्यांना बरोबर घेऊन चालणारी, तरीही स्वत:चे वेगळेपण जपणारी विनय आपल्या मनात घर करते. इतर खेडुतांपैकी थोडेफार शिकलेले, आपले गुरूजीपण सांभाळणारे, गावाशी तिथल्या रितिरीवाजांशी एकरूप झालेले, वडिलकीने गावाला संभाळून नेणारे गीताराम साधेसुधे आहेत. आपले काम प्रामाणिकपणे करणारे, श्रध्दाळू, आपल्या सद्शील वागणुकीने विलासपूरच्या राजाला प्रभावित करणारे गीताराम कथानक पुढे घेऊन जातात. त्यावेळच्या सामान्य पण दृष्ट्या भिक्षुकाचे प्रतिनिधित्व करतात. ते काळाच्या पुढे चालणारे आहेत. ते व पत्नी विद्यावती (जीवनची आई) लग्नाआधीच सुनेला घरी आणतात. मुली सारखी संभाळतात, इंजिनिअर झालेल्या जीवनचे गरिबी पत्कारून तिथेच रहाणे, त्यांना फारसे पटत नाही, त्यांची राजेसाहेबांपाशी असलेली निष्ठा त्यांना आठवते. आपला इतका विद्वान मुलगा चुकीचे वागणारच नाही याची खात्री असल्याने त्यांच्याकडून होईल तेवढी मदत करतात. जीवनच्या विरूध्द वातावरण तापले तरी त्याची साथ सोडत नाही. एका सामान्य माँसाचे, प्रेमळ, दृष्ट्या पित्याचे प्रतिनिधित्व ते करतात.

या कादंबरीत पात्रे खूप आहेत, आणि ती असणारच कारण कादंबरीचा कालखंड ब्रिटिश अधिकारी, त्यांची दंडेली स्वार्थी वृत्ती, वेळकाढूपणा करणारे, पैसाच देव मानणारे, निष्क्रीय शासकीय अधिकारी, एकाच वेळी जीवनला साथ देणारे पण जोगेंद्र भडकल्यावर त्याच्या विरोधात जाणारे गावकरी. अशा अनेक व्यक्तिरेखा गो.नी. नी ब्रशच्या फटकाऱ्याने चित्रकाराने रंगाकृती उभी करावी तशा उभ्या केल्या आहेत.

या कादंबरीतील महंतजी आपल्या कायमचा लक्षात रहातो. हा महंत फिरून, निरिक्षण करणारा, काळाच्या पुढे चालणारा आहे. मिठास वाणीने व निष्कलंक चारित्र्याने जो सर्वांना आपलासा करतो. परिसराचे पुढारीपण संभाळतो, जीवनच्या पाठीशी खंबीरपणे उभा रहातो. प्रत्यक्ष सरकारचे सहाय्याने धरणाचे काम सुरू झाल्यावर, तेथील निष्क्रीयता, भ्रष्टाचार पाहून उद्वीग्न झालेल्या जीवनला उभारी देतो, सावरतो. गो.नी. दा नी आपले सारे तत्वज्ञान महंत त्या व्यक्तीरेखेतून आपल्या पर्यंत पोहोचवले आहे. हा महंत आपल्या विचारांचे रूपांतर कृतीत करवून घेणारा आहे. श्रध्दाळू पण अंधश्रध्द गावकऱ्यांना तो बदलायला लावतो. मंदीर बांधतो तेही भगिरथाचे. त्या भगिरथाने गंगा आणली, आपले जीवन भिंत बांधून सुखात असलेला हरियाना, पंजाब, राजस्थान सुजलाम् सुफलाम् करणार आहे. त्याला साथ द्या असे ठणकावून सांगण्याची धमक त्यांच्यात आहे. महंत या पात्राला असलेली आदब, आचार विचार, किंबहुना आदर्श महंत कसा असावा याचे उत्तम उदाहरण आहे. ही किमया आहे गो.नी.दांची त्यांच्या लेखणीची.

गो.नी.दां.नी कादंबरीची वीण इतकी घट्ट विणली आहे की त्याला तोड नाही. अनेक व्यक्तीरेखा घरेलू, सामाजिक बंधन मानणाऱ्या, काही स्वार्थी स्वत:ची पोळी भाजून घेणाऱ्या, अंधश्रध्दा आपले गाव पाण्याखाली जाणार हे साधुने वर्तविलेले भविष्य खरे मानणाऱ्या, कोणाकोणा बद्दल लिहावे ? एकाच वेळी गो.नी. दा धरणाचे महत्व, धरणामुळे होणारे नुकसान दोन्ही दाखवतात.

अतिशय बुध्दीमान, कष्टाळू, प्रेमळ, गावासाठी झटणारा, धरण हेच सर्वस्व मानून काया वाचा मने वागणारा जीवन. कादंबरी व्यापून उरतो. त्याच्याकडे रहाणारा उग्रवादी, अन्यायाने पेटून उठणारा, त्यासाठी प्राणपणाने लढा देणारा जोगेंद्रही तितक्याच ठळकपणे उभा रहातो. गावकऱ्यांच्या होणाऱ्या विस्थापनाने अस्वस्थ होतो, परिसरात धरणाविरोधात रान उठवतो, अन्याया विरूध्द पेटून उठणारा, जीवनचे विचार व मागे न परताही त्याच्यावर प्रेम करणारा, जीवनच्या आईचे, त्याच्या पत्नीचे नाजुक बंध तितक्याच प्रेमाने संभाळणारा जोगेंद्र ही एक कणखर, प्रभावी व्यक्तिरेखा आहे. या व्यक्तिरेखेद्वारे विस्थापितांचे प्रश्न, त्यांची अगतिकता. आपल्याच देशात विस्तापित त्यांची भावना लेखकाने अचूक पकडली आहे.

पहाड़ी वातावरण, त्यांचे देव, त्यांच्या सार्वजनिक पूजा, सणवार, चालिरिती, निसर्ग यांचे चित्रदर्शी वर्णन लेखक करतात जणुकाही त्यांचे सगळे आयुष्य तिथेच गेले आहे इतके ते त्या भूमीशी, लोकांशी एकरूप झाले आहेत. सतलजला शतलुज म्हणणे ही जवळीक भावणारी आहे. बोली भाषेत लेखन हे गो.नी.दां.चे वैशिष्ट्यच आहे. सतलजचे अनेक रूप दाखवले आहेत की सतलज जशी काही जीवंत व्यक्तीरेखा होती अशी कादंबरीभर वावरते. सहज, आघोवती भाषा, हे कादंबरीचे आणखी एक वैशिष्ट्य. कथानकात जीवनला आपल्या पत्नीने लग्नापूर्वी म्हटलेले गाणे आठवते -

हो ऊंची धारारा पीपलू सूखी रा
दुंगे साला रा सूया

ऐकलस का ? उंच पर्वतावरला पिंपळ तर सुखावलाच, पण खालचा नालाही पार कोरडा पडला आणखी बरच काही पुढे आहे.

हे त्या अवर्षणग्रस्त भागाच गाण्यातले प्रतिबिंब कादंबरीच्या शेवटी शेवटी ती दोघ सतलजच्या जवळ कड्यावर उभे असतात. भाकडा पूर्ण झाला आहे. स्वप्नपूर्तीचे समाधान आहे. जीवन पत्नीला गाणे म्हणालया सांगतो. ती पुन्हा तेच गाणे म्हणते जीवन सुधारणा करतात - आता पिंपळही सुकलेला नाही नालाही पूर्ण भरलेला आहे. असे नाजुक धागेही कादंबरीने गुंतलेले आहेत.

जीवन सहकारी अरजन, जमाल, बनीप्रसाद हे ही पहाडी जमातीचे वैशिष्ट्य दाखविणारे आहेत. कष्टाळू, निसर्गावर प्रेम करणारे, जीवाला जीव देणारे. धरण या विषयावरची मराठीतली ही पहिली कादंबरी आहे. त्यातील भाकडा शब्द काढला तर आजही लेखकाने उभ्या केलेल्या समस्या, माणसं, भ्रष्टाचार अशा अनेक गोष्टी कुठल्याही धरणावर आधारित कादंबरीला लागू पडतील. धरणाचा लेखकाने आर्थिक, सामाजिक, तांत्रिक, वैज्ञानिक सर्व बाजूंनी विचार केला आहे. मी त्याच्या तपशिलात जात नाही.

धरण म्हणजे पाणी, पाणी म्हणजे संपन्न शेती, त्यातून उन्नत समाज जीवन, त्यातून सर्वदूर प्रगती असे चित्र समोर दिसत असतांनाही स्थानिक मंडळींचा ते बदल स्वीकारायला असलेला नकार, त्यातून उभी रहाणारी आंदोलने फक्त भारतातच आढळत नाही. त्यामुळेच या कादंबारीला एक प्रतिनिधित्व मूल्य लाभले आहे. आजही असे अनेक जोगेंद्र आसपास दिसतात.

भाकरा नांगल धरणावर खरोखरचा जीवन शर्मा होता की नाही माहित नाही. कादंबरी वाचल्यावर तो असावा असे वाटायला लागते. हेच या कादंबरीचे यश आहे. भगिरथाला गंगेला म्हणजे पाणी खाली आणायला जेवढे परिश्रम करावे लागले तसेच परिश्रम आजच्याही धरणकारांना करावे लागतात. त्या अर्थानेही आम्ही भागिरथाचे पुत्र हे नाव सार्थ आहे. 30-35 वर्षांपूर्वी मी ही कादंबरी वाचली होती. एवढी प्रभावित झाले की आम्ही त्यावर्षी भाकरा नांगल पहायला गेलो. धरणाची भव्यता, दुथडी भरून वहाणारी सतलज आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर आजही नव्हे आत्ताही डोळ्यांसमोर आहे. कादंबरीची यशस्वीता याहून मोठी काय असणार ?

सौ. मीरा धाराशिवकर, धुळे - (मो : 09420377684)

Path Alias

/articles/ajaraamara-jalasaahaitaya-kartai-amahai-bhagairathaacae-pautara

Post By: Hindi
×