अजरामर जलसाहित्य कृती


साहित्यात काही जलसाहित्य कृती अजरामर झाल्या आहेत. अशा 12 जल साहित्य कृतींचा परिचय 2013 या वर्षात वाचकांना या मालिकेद्वारे करुन देण्यात येत आहे.

पॅपिलॉन व त्याचा सखा - सागर :


पाणी म्हंटलं की आपल्याला पाणी म्हणजे जीवन, वगैरे वगैरे आठवतं. ते खरं आहे पण त्याचप्रमाणे पाण्याचं आपल्या संस्कृतीशी नातं आहे, संस्कृती म्हणजे जीवनशैली या अर्थाने. सर्व गावं नदीकिनारी वसलेली असणे, सण व परंपरांमध्ये पाण्याला महत्वाचं स्थान असणे, नदीला मातेची उपमा देणे, तिची पूजा करणे हे सर्व त्यातूनच आलंय. पण आपल्या मनात पिण्याचं किंवा शेतीसाठी लागणारं पाणी हीच संकल्पना असते.

पण आपला दृष्टीकोन अधिक विस्तारला तर आपल्याला समुद्राशी - की ज्याचं पाणी, आहे तसं पिण्यायाग्य नाही - संबंधित जीवन असलेल्या मानवी समूहांचा ही विचार करता येईल. तिथे तर पाणी म्हणजे संपूर्ण जीवन असतं. त्यातून माणसाला फक्‍त पाणीच नाही तर अन्नही मिळत, तेही सागराशी अगदी जवळून संबंध आल्यावर, त्याच्या लहरींवर स्वार झाल्यावर, त्याच्याशी नात जोडल्यावर, त्याचा लोभ, त्याचा राग अनुभवल्यावर. त्यांच्यासाठी सागर म्हणजे नुसत पाणी नसत तर त्याला दैवत्वाबरोबरच व्यक्‍तीमत्वही केलं जात आणि त्यामुळेच नारळी पौर्णिमेसारखे सण साजरे होतात. सागराची भरती ओहोटी, वारा वादळ, अथांगता, त्याने पोटात सामावलेली जैवविविधता, धोके, त्याच भूमिशी जिथे मिलन होत ती खाडी, तिचा स्वभाव, भव्य आकाश या सर्वांचा विचार तर करून पहा.

माणूस हा जिथे अगतिक होतो, जिथे त्याचे जीवन मरण निसर्गाच्या एखाद्या घटकावर अवलंबून असतं तिथे तो त्याला दैवत्व किंवा व्यक्‍तीमत्व बहाल करतो, त्याच्याशी बोलतो.....

अशीच एक गोष्ट वाचण्यात आली व तेव्हा परत एकदा जाणवल की एखाद्याच्या आयुष्यातील किती घटना, स्वप्न, यश व .... अगदी स्वातंत्र्य सुध्दा सागरावर अवलंबून असतं. एका माणसाच्या स्वातंत्र्याशी, सागराचा स्वभाव, लाटांचा स्वभाव या गोष्टींशी किती संबंध असू शकतो. ही कथा आपल्याला पाण्याकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टीकोन देवून जाते....

पपीलॉन हा फ्रान्स च्या गुन्हेगारी विश्वातील एक तरूण .... पण कसा का होईना, त्या विश्वातील नितीमत्ता पाळणारा, स्वभात: दुष्ट नसलेला, इतर तरूण मुलांप्रमाणेच स्वातंत्र्याची आवड असणारा... त्याला त्याने न केलेल्या गुन्ह्याबद्दल आमरण कारावासाची शिक्षा मिळाली. त्यावेळी फ्रान्स, इंग्लंड वगैरे देशाच्या आफ्रिका, भारत अशा ठिकाणी वसाहती असायच्या व या दुर्गम भागात त्यांनी तुरूंग बांधलेली होती. दक्षिण अमेरिकेच्या उत्तर किनार्‍यावर वेस्ट इंडिज बेटांपासून काही मैल दूर फ्रँच गियाना ही फ्रँचांची वसाहत होती. त्यात तीन महत्वाची बेटे होती... रॉयल, सेंट जोसेफ आणि सेंट लॉरेंत. एका बाजूला फ्रँच गियानाची मेन लँड व बेटांच्या भोवताली रौद्र समुद्र यामुळे तेथून निसटणे ही कल्पनातीत गोष्ट होती. शिक्षा ऐकल्याऐकल्याच पॅपिलोनने ठरवून टाकले की ही शिक्षा आपण पूर्ण करायची नाही.... पलायनाची एकही संधी सोडायची नाही... पण कोणाच्या भरवशावर ? धाडस, मित्र व समुद्र.

इथूनच पॅपीलॉन व समुद्र यांचे घट्ट नातं सुरू होतं. 1923 पसून ते 1933 पर्यंत त्याने 13 वेळा पलायनाचा प्रयत्न केला, त्यातल्या 12 वेळेला तो फसला. त्याला अत्याचार, छळ व एकांतवासासारख्या शिक्षा सोसाव्या लागल्या पण प्रत्येक वेळेला त्याला समुद्राने साथ दिली हे तो कधीही विसरू शकलेला नाही.

सर्वप्रथम फ्रान्स चा किनारा ते गियाना हा भयंकर प्रवास, नंतर सेंट लोरेंत इथे एका हॉस्पिटल मध्ये प्रवेश करून घेण्यात यशस्वी झाल्यानंतर एका वॉर्डरकडून एक साधी होडी बनवून घेवून हॉस्पिटलच्या भिंतीवरून मागच्या मॅरोनी नदीवरून उभ्या असलेल्या होडीतून पलायन... हे करतांना भरती, ओहोटी, वारा याचा विचार करून तो पलीकडच्या खाडी किनार्‍यावर कुष्ट रोग्यांच्या वस्तीवर गेला. तिथे मात्र त्याला कळले की आपली ही होडी मोठी सागर सफर करू शकणार नाही. कुष्ट रोग्यांनी त्याला एक होडी बनवून दिली व त्यांच्या शुभेच्छा घेवून तो कित्येक मैल लाटा व वादळं पार करून वेस्ट इंडिजच्या त्रीनिनाद ला पोहोचला.... त्याला तिथे काही दिवस झाल्यानंतर कळलं की ब्रिटीश होंडूरा बेटं कैद्यांना परत पाठवत नाहीत... तेव्हा तो परत एकदा लाटांवर स्वार झाला. पण त्याच्या बरोबरच्या 3 कैद्यांनी वाटेत कोलंबियाच्या किनार्‍यावर सोडायची विनंती केली व त्यासाठी काही क्षणांसाठी कोलंबियाच्या किनार्‍याला लागण्याचा प्रयत्न करत असतांना वादळ, दिशा यामुळे तो तिथेच अडकला. तिथे एक तुरूंगवास, तिथून पलायन, एका आदिवासी जमातीबरोबरचे जीवन, परत संपूर्ण स्वातंत्र्याची व सुडाची भावना जपण्यासाठी पलायन, परत अटक व खूप खडतर काळानंतर परत एकदा फ्रँच गियानामध्ये रवानगी, तेही धोकादायक कैदी म्हणून. याच काळात त्याची समुद्राबद्दलची भावना तो आपल्याला सांगतो, मी चूक केली म्हणून परत पकडला गेलो, समुद्राने त्याचं काम केलं होतं.

फ्रँच गियानामध्ये बरच नाट्य घडलं. यावेळेला त्याची रवानगी सेंट जोसेफ वर करण्यात आली होती. तिथे पलायनासाठी एक तराफा बनवण्याचा प्रयत्न करत असतांना तो फसला. याही वेळेला अत्यंत अवघड जागा पाहून तिथून पलायन करण्याचं ठरवल होतं, कुणाच्या भरवशावर ? सागराच्या, वार्‍याच्या, भरती ओहोटीच्या व स्वत: दर्यावर्दी असल्यामुळे मिळालेल्या सागराबद्दलच्या ज्ञानाच्या.

त्यानंतर मिळालेली शिक्षा भोगून तीन बेटांपैकी भौगोलिक दृष्ट्या एका अत्यंत अवघड बेटावर -- रॉएलवर त्याला स्थानबद्ध केलं गेलं होतं. ओळीने दोन वेळा 2-2 वर्ष एकांतवासाची शिक्षा भोगत असतांना त्याच्या बरोबरचे कित्येक कैदी त्या भयानक एकांतात वेडे झाले, काही मृत्यूमुखी पडले पण हा पठ्ठ्या मात्र स्वत:च्या पूर्वीच्या पलायनांच्या, त्यात आलेल्या मानवतेच्या व संपूर्ण स्वतंत्र्याच्या आठवणींवर तगून राहिला. या आठवणी हीच त्याची ताकद होती. सकाळी उठल्याउठल्या सतत खोलीत येरझारा मारुन स्वत:ला फिट ठेवणे, निराशा आल्यास या आठवणी नजरेसमोर आणणे असे उपाय करुन तो त्यातून पार झाला. समुद्रात घालवलेल्या साहसी रात्रा, लाटांशी केलेले खेळ, नितळ आकाश हेच त्याचे सखे सोबती होते.

तिथून त्याला परत सेंट जोसेफ बेटावर हलवण्यात आलं. तिथे वेड्याचं नाटक करुन तो हॉस्पिटलमध्ये भरती झाला, गुपचूप एक साधा तराफा बनवला व एका अंधा-या रात्री एका धाडसी मित्राला घेवून समुद्राच्या खडकाळ किना-याला आला. तराफ्याबरोबर त्याने समुद्रात उडीही मारली पण एका लाटेने त्याला परत किना-यावर फेकलं... जणू समुद्रानेच त्याला सल्‍ला दिला की ही जागा धेकादायक आहे ... इथून पलायन केलंस तर यशस्वी होणार नाहीस... हाही प्रयत्न फसला.

इथेच त्याने निर्णय घेतला की यापुढे सुनियोजित, खूप विचार करुन, तराफे व होड्या बनवून पलायन करणं बंद... जे करायचं ते कमीतकमी साधनं वापरुन, धाडस व अंत:स्फूर्तीच्या बळावर. त्यानंतर त्याने खटपट करुन रॉयल बेटावर स्वत:ची बदली करुन घेतली. रॉयल बेट हो फ्रेंच गियानाच्या तीन बेटांपैकी भौगोलिक दृष्ट्या सर्वात धोकादायक बेट... तिथून जर कोणीही पलायन केलंच तरी एक तर आसपासच्या बेटांवर पकडला जाण्याचा धोका होताच पण इथला समुद्रही खवळलेला असायचा. तिथून सुटका म्हणजे एक अशक्यप्राय गोष्ट होती.

तिथे समुद्राच्या काठावर एका ठिकाणी .......सीट म्हणून एक बाक होता. इथे तो दररोज बसायचा. ..समुद्राकडे पाहात.समुद्राच्या लाटा इथे प्रचंड वेगाने खडकांवर फुटत होत्या. पण त्याच्या लक्षात आलं की त्यांच्या येण्यामध्ये एक प्रकारचा क्रम आहे. ..त्याचे विचारचक्र वेगाने फिरु लागलं. नक्की हा क्रम कसा आहे? काही छोट्या लाटांनंतर एक अजस्त्र लाट येते व खडकांवर राक्षसी वेगाने फुटून तशीच समुद्राच्या आत जाते. .. परत येत नाही. आणि त्याच्या डोक्यात विजेसारखी एक कल्पना आली. तराफे , होड्या यांना तिलांजली देवून फक्‍त नारळाची दोन पोती घेवून त्यात स्वत:ला नीट बांधून घेवून त्याच्याचबरोबर आत दूर अथांग दर्यात निघून जायचं.

झालं....आता आला जोडीदाराची शोध व काही प्रयोग करणं. कारण वेडं साहस म्हंटलं तरी थोडासा अभ्यास करावाच लागणार होता आणि पलायनानंतरही साथीला कोणीतरी असणं महत्वाचं होतं... अर्थात पलायन ठरलंच होतं.. जोडीदाराबरोबर अथवा एकट्याने, सागराच्या साथीने. सिल्विन नावाच्या कैद्याला ही कल्पना सांगताच तो तयार झाला पण जेव्हा त्याने लाटेचे ते खेळ बघितले तशी त्याला धडकीच भरली...पण प्रथम काही प्रयोग करायचं ठरलं. एकदा नारळाचं पोतं एका मोठ्या लाटेवर टाकलं... धडधडत्या अंत:करणाने त्या पोत्याकडे बघत असतांनाच काही मिनिटांनी ते पोतं समुद्रातून प्रचंड वेगाने किना-याकडे आलं व धाडकन खडकांवर आदळलं... अरे... असं कसं झालं? परत निरिक्षण केलं तेव्हा लक्षात आलं की दर सात मोठ्या लाटांनंतर जी एक सर्वात मोठी लाट येते तीच फक्‍त परत येत नाही... तिच्या पोटात जे काही असतं ते सरळ समुद्रातच जातं. बास... हीच ती तारणहार लाट... या निरीक्षणानंतर परत एकदा प्रयोग... यावेळी बरोबर त्याच लाटेवर टाकलेलं पोतं त्या लाटेबरोबर तरंगत तरंगत सरळ कित्येक मैल दूर गेलं... कायमचं. आणि मग ठरलं ... सिल्विन बरोबर पलायन करायचं. नको ते् तराफे, नको ते अयशस्वी प्रयेग... फक्‍त आपण, साहस, नारळाची पोती, अवखळ सागर आणि ती अवखळ लाट. पण हिला नुसती लाटच म्हणायचं? तिला नाव नको द्यायला? ठरलं...लीसेट...लीसेट हे नाव द्यायचं तिला.

बरेच प्रयोग झाले, पोती टाकून पाह्यली. नंतर वारा, लाटा, भरती-ओहोटी याचा दर्यावर्दी विचार करुन आपण केव्हा, कधी कोठे पोहोचू? तिथं काय करायचं, कोणाला भेटायचं? तिकडच्या किना-यावर राहात असलेल्या व पलायनाची इच्छा असलेल्या एका चिनी मित्राची मदत घेवून, होडीतून ब्रिटिश होंडुराला जायचं....1,2,3,4,5,6 आणि लीसेट.... धड्डाम... अथांग सागरात दोन पोत्यांच्या जोड्यामध्ये एक एक माणूस ... ठरल्याप्रमाणे सर्व बेत पार करुन शेवटी हुर्यो....शेवटी माझा खरा सोबती सागरच कामाला आला…

शेवटी नाना खटपटी करुन, सागराला गवसणी घालून त्याने हजारो मैलांचा प्रवास केलाच पण एका भयानक वादळाने त्याला गाठलं व व्हेनेझुएला या देशाच्या किना-यावर पोहोचवलं.

तिथे काही महिने नजरकैदेत राहून त्याला त्या देशाचे नागरिकत्व मिळाले, पण ती एक वेगळी गोष्ट आहे व ती तुम्ही स्वत:च वाचणं चांगलं.

सागराने मात्र त्याला योग्य देशात पोचवलं, जिथे त्याला माणूस म्हणून ओळखलं गेलं... कैदी म्हणून नव्हे.का विसरेल तो समुद्राचं ऋण?

विश्वास भावे, न्यास ट्रस्ट

Path Alias

/articles/ajaraamara-jalasaahaitaya-kartai

Post By: Hindi
×