त्या काळात शेती शास्त्रही आजच्या सारखे प्रगत अवस्थेत नव्हते त्यामुळे पाण्याचा वापर कसा करावा याचे ज्ञान परंपरेतून चालत आले होते. परंपरा हा एक शिक्षक निश्चितच आहे. पण या शिक्षण पध्दतीमुळे जलव्यवस्थापनाची सर्वच सूत्रे हस्तगत होवू शकत नाहीत हीही बाब तितकीच खरी आहे. आपण शेती जीवनाला आवश्यक असणारी धान्ये मिळविण्यासाठी करतो, त्या धान्याचा बाजार करण्यासाठी करीत नाही ही संकल्पना असल्यामुळे More crop, per drop या दृष्टीकोनातूनही सिंचनव्यवस्थापन गरजेचे नव्हते.
मी व्यवस्थापन शास्त्राचा एक अभ्यासक आहे. प्राध्यापक असतांना मी हा विषय आवडीने शिकवीत असे. गेल्या आठदहा वर्षांपासून मी पाण्याच्या क्षेत्रात काम करणारा तळाच्या पातळीवरचा एक कार्यकर्ता. हे कार्य करीत असतांना पाण्याचे अथवा जलाचे व्यवस्थापन हा शब्द वारंवार कानावरून जावयास लागला. अधिक खोलात गेल्यावर पारंपारिक जल व्यवस्थापनाशी पण परिचय वाढत गेला. त्याबद्दल थोडे वाचनही माझेकडून घडले. त्यामुळे आधुनिक व्यवस्थापन शास्त्राची किती व कोणती तत्त्वे पारंपारिक जल व्यवस्थापनात आढळतात याबद्दल कुतुहल जागृत होवून त्या दृष्टीने विचार करावयास लागलो व त्याचीच परिणती म्हणून हा लेख लिहिण्याचे धाडस करीत आहे.व्यवस्थापन शास्त्राचा उदय व विकास :
एक स्वतंत्र विषय किंवा शास्त्र म्हणून व्यवस्थापनाचा आधुनिक दृष्टीकोनातून अभ्यास खऱ्या अर्थाने औद्योगिक क्रांतीनंतर सुरू झाला व तो विकसित होतहोत आज सर्वव्यापक बनत चालला आहे. राजकारण, समाजकारण व अर्थकारण या तीनही क्षेत्रात या विषयाने आघाडी मिळविली आहे. याचा अर्थ असा मुळीच काढू नये की व्यवस्थापनाची ही तत्त्वे आधी अस्तीत्वातच नव्हती. माग काढत गेल्यास ही तत्त्वे आधीच्या काळातही तुरळकपणे अस्तीत्त्वात होती व वापरली जात होती असे आढळते.
व्यवस्थापन शास्त्राची तत्त्वे व कार्ये व्यवहार ज्ञानाधिष्ठित :
व्यवस्थापन शास्त्रात सांगण्यात आलेली 14 तत्त्वे व 6 कार्ये ही सर्व व्यवहारज्ञानाधिष्ठित (Common sense) आहेत. कोणत्याही कामाचे आधी नियोजन करावे (Planning), ते कार्य करण्यासाठी योग्य संघटना उभारावी (Organisation), ठरविलेले काम कृतीत उतरवावे (Actuation), कामाला योग्य मार्गदर्शन असावे (Direction), कामावर नियंत्रण असावे (Control) व कामाच्या विविधांगात सुसूत्रता (Co-ordination) असावी ही सर्व कार्ये व्यवहारज्ञानावर अधिष्ठित आहेत. इतिहासातील कोणतीही घटना घेतली तर ती घडतांना जाणतेपणे वा अजाणतेपणे ही कार्ये पाळली जाणे अपरिहार्य आहे. त्यामुळे पारंपारिक जल व्यवस्थापनात ती पाळली गेली असल्यास नवल वाटू नये. ज्यावेळी एत्राद्या कामाची व्याप्ती वाढते त्यावेळी मात्र या वर वर्णिलेल्या कार्यांना विशिष्ट अर्थ प्राप्त होतात व वैचारिक गुंतागुंत वाढीस लागते. गल्लीतील किराणा दुकान चालवितांनाही ही कार्ये असतातच पण अद्यावत मॉल चालवितांना मात्र या कार्यांची गुंतागुंत विचार करावयास प्रवृत्त करते.
जलतुटीच्या क्षेत्रात प्रामुख्याने वापर :
भारतापुरते बोलावयाचे झाल्यास ज्या ज्या प्रदेशात पाण्याची तूट अथवा कमतरता होती त्या त्या क्षेत्रात या तत्त्वांचा प्रसार प्रामुख्याने झाला. पाण्याची कमतरता जाणवत असलेल्या धुळे जिल्ह्यातील फड पध्दती, पाण्याच्या कमतरतेमुळे त्रस्त असलेल्या बीड जिल्ह्यातील खजाना बावडी, दक्षिणेतील कमी जल उपलब्धता असलेल्या विविध राज्यातील तलावातील पाण्याचे व्यवस्थापन, वाळवंटी प्रदेश असलेल्या राजस्थानातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी घेतलेला जलव्यवस्थापनाचा आसरा ही नमुन्यादाखल काही उदाहरणे घेता येतील. यालाच आपण अडचणींमुळे आलेले शहाणपण म्हणावयास काय हरकत आहे?
सरकारी हस्तक्षेपाच्या अभावामुळे मिळालेली प्रेरणा :
प्रेरणा अथवा प्रोत्साहन हे व्यवस्थापन शास्त्रातले महत्त्वाचे तंत्र मानले जाते. त्या काळी (यात मोगल व ब्रिटीश राजवटीच्या आधीचा काळही समाविष्ट आहे) समाजिक व आर्थिक जीवनात सरकारी हस्तक्षेप नगण्य होता. तो नव्हताच असे म्हणावयास हरकत नाही. जलक्षेत्रातील सरकारचा हस्तक्षेप ही अगदीच अलीकडची बाब समजायला हवी. लोकांनी स्वत:चे प्रश्न सोडविण्याचा तो कालखंड होता. आज आपण लोकसहभागाच्या नावाने खडे फोडतो पण त्या काळात लोकसहभागाशिवाय पर्यायच नव्हता. त्यामुळे पाणीप्रश्न सोडविण्यासाठी करण्यात आलेले हे फुटकळ प्रयत्न या दृष्टीकोनातून पारंपारिक जल व्यवस्थापनाकडे बघावयास हरकत नसावी. प्रत्येक प्रदेशातील प्रश्नांचे स्वरूप भिन्न असल्यामुळे या सर्व प्रयत्नांना स्थानिक परिस्थिती विचारात घेवून शोधून काढलेले उपाय या दृष्टीकोनातून पहाणे क्रमप्राप्तच आहे.
उपजिवीका दृष्टीकोन महत्त्वाचा :
आजही शेतीकडे व्यापारी दृष्टीकोनातून बघितले जात नाही अशी टीका करण्यात येते. त्या काळात तर शेतीकडे जीवनाचा एक मार्ग (Way of life) म्हणूनच बघितले जात होते. उपजिविकेच्या दृष्टीकोनातून शेती (Subsistance farming) हा शेतीकडे पाहण्याचा एकमेव दृष्टीकोन होता. त्याची परिणती म्हणून पाणी ही एक सामाजिक वस्तू (Social goods) समजली जात असे. अर्थातच पाण्याला आजच्या सारखे ओरबाडले (Over exploitation) जात नसे. लोकसंख्या कमी असल्यामुळे पाण्याची दरडोई उपलब्धताही जास्त होती. सामाजिक नितीचा प्रभाव जास्त असल्यामुळे सहिष्णूता व सामंजस्यही जास्त प्रमाणात होते. त्यामुळे काही ठिकाणी पाणी ही समस्या असूनसुध्दा आजच्या सारखा भडकपणा व आतताईपणा जाणवत नव्हता. पाण्याला आर्थिक किनार नसल्यामुळे फक्त सामाजिक दृष्टीकोनातून त्याकडे पाहण्याची प्रवृत्ती प्रामुख्याने दिसून येत होती. त्यामुळे पाणी खरीदणे, विकणे, त्याचे व्यापारीकरण याही समस्या अस्तीत्त्वात नव्हत्या.
पाण्याकडे बघण्याचा दृष्टीकोनही मर्यादित :
ʅठेविले अनंते तैसेची रहावेʆ, ʅपोटापुरते देई विठ्ठला, मागणे लई न्हाईʆ उपजीविकेच्या दृष्टीकोनातून शेती, व्यापारीकरणाचा अभाव हे विचार त्या काळात सर्वमान्य असल्यामुळे पाणी हे विकासाच्या दृष्टीकोनातून एक संसाधन आहे असे समजले जात नसे. निसर्गाचा कोप सहन करूनसुध्दा आपल्याकडे पाण्याची सोय असावी हा विचारही मनाला शिवत नसे, बागायती शेती करणाऱ्या माणसाबद्दल कौतुक होते, असूया नव्हती. त्याने केले म्हणून आपणही करावे अशी अनुकरणीय वृत्तीही नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जलव्यवस्थापनाचे काम निसर्गच करीत होता. पीक पध्दती सुध्दा निसर्गच ठरवीत होता. वर्षातून एकदा पीक काढायचे की दुबार शेती करायची हा निर्णय निसर्गावरच अवलंबून होता. त्याामुळे काही तुरळक उदाहरणे सोडली तर जलव्यवस्थापन ही संकल्पना महत्त्वाची नव्हती.
पाणी वापराचे परंपरागत प्रशिक्षण :
त्या काळात शेती शास्त्रही आजच्या सारखे प्रगत अवस्थेत नव्हते त्यामुळे पाण्याचा वापर कसा करावा याचे ज्ञान परंपरेतून चालत आले होते. परंपरा हा एक शिक्षक निश्चितच आहे. पण या शिक्षण पध्दतीमुळे जलव्यवस्थापनाची सर्वच सूत्रे हस्तगत होवू शकत नाहीत हीही बाब तितकीच खरी आहे. आपण शेती जीवनाला आवश्यक असणारी धान्ये मिळविण्यासाठी करतो, त्या धान्याचा बाजार करण्यासाठी करीत नाही ही संकल्पना असल्यामुळे More crop, per drop या दृष्टीकोनातूनही सिंचनव्यवस्थापन गरजेचे नव्हते. बाजारासाठी उत्पादनाचे आधिक्य (Marketable surplus) ही संकल्पनाच त्या काळात अस्तीत्त्वात नव्हती. स्वत:ची गरज भागवून उरलेच तर त्याची विक्री या संकल्पनेचा प्रभाव जनमानसावर होता.
परंपरागत व्यवस्थापनात बहुविध पिकपध्दतीचा पुरस्कार:
पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे सर्वांना पाणी मिळावे या उद्देशाने संपूर्ण शेताला पाणी न देता तुकड्याला पाणी ही संकल्पना शेतकऱ्याच्या मनावर बिंबवण्यात ती जलव्यवस्थापन पध्दती यशस्वी ठरली. शिवाय पाण्याची उपलब्धता विचारात घेता विविध पिके घेण्यात यावीत असाही दंडक लावला जात असे. त्यामुळे पिक पध्दती शेतकऱ्याच्या गरजा भागविण्यासाठी उपयुक्त ठरत होती. आजचे सिंचन व्यवस्थापन मात्र एक पिकपध्दतीवर येवून स्थिर झाले आहे. ज्या पध्दतीने पाणी उपलब्ध करून दिले जाते ती विचारात घेता ऊस अेके ऊस हेच सिंचन पध्दतीचे वैशिष्ट्ये ठरत आहे. बहुविध पिकपध्दतीमुळे वर्षभर या ना त्या पिकापासून उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध होता. आज मात्र वर्षातून एकदा उत्पन्न मिळाले तर मिळणार यामुळे शेतकऱ्याची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली दिसत आहे.
व्याप्ती केवढी हाही विचार महत्त्वाचा :
पारंपारिक जल व्यवस्थापन पध्दतीचे गोडवे गाणारे त्या पध्दती किती यशस्वी ठरत होत्या याबद्दल विविध मुद्दे मांडून त्या पध्दतींचे समर्थन करतांना दिसतात. त्या यशस्वी होत्या याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. पण ज्या प्रमाणात (Scale) त्या राबविल्या जात होत्या ते प्रमाणही त्यांना यशस्वी ठरविण्यास कारणीभूत होते हेही नाकारून चालणार नाही. फड पध्दतीचेच उदाहरण घ्या ना! धुळे जिल्ह्यातील एका छोट्याशा तुकड्यात ती यशस्वी ठरली. तिची व्याप्ती संपूर्ण धुळे जिल्हा ही ठेवली असती तर कदाचित ती तितकी यशस्वी ठरली असती का हाही विचार करण्यासारखा मुद्दा आहे. अण्णा हजारेचे प्रयोग फक्त राळेगणसिध्दीत वा राजेंद्रसिंगांचे प्रयोग अल्वर जिल्ह्यात यशस्वी ठरले. या प्रयोगांची व्याप्ती वाढविली तर ते तितकेच यशस्वी ठरतील याची हमी काय?
याठिकाणी मुंबईच्या प्रकाशकाचे उदाहरण अत्यंत उद्बोधक ठरते. त्याची प्रकाशन संस्था वर्षानुवर्षे महाराष्ट्रात कार्यरत होती. व्यवस्थापन शास्त्राचे नवीन वारे वाहायला लागल्यावर आपल्या प्रकाशन संस्थेत ही नवीन व्यवस्थापन पध्दती वापरण्याचा त्याला मोह झाला. त्याने स्वत:च्या व्यवस्थापन पध्दतीत अमूलाग्र बदल करण्याचा प्रयोग हाती घेतला. परिणाम काय झाला? तो सपशेल तोंडघशी पडला. थोडक्यात काय तर एखादी व्यवस्थापन पध्दती एका विशिष्ट कालखंडात, विशिष्ट परिस्थितीत, विशिष्ट सामाजिक मूल्ये गृहित धरून यशस्वी ठरू शकते. पण बदलत्या कालखंडात ती यशस्वी ठरेलच याची हमी देता येणार नाही.
पारंपारिक जल व्यवस्थापनातून साध्य झालेल्या गोष्टी :
व्यवस्थापन तत्त्वांचा किमान वापर झाला असतांना सुध्दा पारंपारिक जल व्यवस्थापनाद्वारे काही गोष्टी निश्चितच साध्य झाल्या आहेत. त्यांची यादी खालीलप्रमाणे करता येईल -
1. कोणत्याही प्रकारची औपचारिक (Formal) संघटना नसतांना सुध्दा लोकसहभागाद्वारे पाणीप्रश्न मार्गी लावला जावू शकतो ही बाब निश्चितच वाखाणण्यासारखी आहे. सध्या लोक सहभागाचा अभाव असल्यामुळे सरकारला पाणी प्रश्न सोडविण्यासाठी म्हणावे तेवढे यश येतांना दिसत नाही.
2. पाण्याचा प्रश्न समन्यायी पध्दतीने सोडविण्यात पारंपारिक जल व्यवस्थापनाला आलेले यशही वाखाणण्यासारखे आहे. 1992 साली जागतिक मंचावर आलेल्या समन्यायी जल व्यवस्थापनाचे तत्त्व त्याच्या कित्येक वर्षे आधी भारतीय मंचावर राबविण्यात आले याचा सार्थ अभिमान आपणास असावयास हवा. प्रत्येकाने पाणी किती प्रमाणात व कशासाठी वापरावे यासाठी सरकारी यंत्रणा पाठीशी नसतांना सुध्दा आपण राबविलेली आहे.
3. पावसाळ्याच्या काही दिवसात जमा झालेले पाणी वर्षभर कसे वापरावे हे राजस्थानने आपल्याला निश्चितच शिकविले आहे. भरपूर पाऊस पडणाऱ्या महाराष्ट्रात पावसाळा संपतासंपताच टँकर्स वापरावे लागतात पण अत्यंत कमी पाऊस पडणाऱ्या राजस्थानात मात्र लोकांनी तो प्रश्न यशस्वीपणे सोडविल्याचे आपण पाहतो.
4. किल्ल्यांवर व गडांवर पाण्याचा योग्य पध्दतीने संग्रह करून पुढील पावसाळ्यापावेतो ते पाणी कसे पुरविता येईल याचे यशस्वी प्रयोग जास्त दूर न जाता महाराष्ट्रातच बघावयास मिळतील. शत्रुने गडाला वेढा घातल्यावरसुध्दा पाण्याची चणचण न भासता गडांवरचे जीवन कसे सुरळीत चालत असे याच्या रम्य कथा आपण इतिहासात वाचतो.
5. गावतळ्यांचे व गावातील सार्वजनिक विहीरींचे आदर्श जल व्यवस्थापन आपल्या देशात पिढ्यांपिढ्या झालेले आपण बघतो. पाण्याचे संरक्षण, शुध्दता, तलावांतील गाळ काढण्यातील सहभाग हे आपल्या देशात कशाप्रकारे होत असे याचे रसभरित वर्णन ‘आज भी खरे है तालाब’ सारख्या पुस्तकातून वाचावयास मिळते.
6. भारतातील श्रध्दाळू व धार्मिक प्रवृत्तीचे लोक लक्षात घेता प्रत्येक धार्मिक स्थळाचे ठिकाणी बांधण्यात आलेले कुंड, घाट उत्कृष्ट जल व्यवस्थापनाचीच उदाहरणे नव्हेत काय? नद्यांवर घाट बांधून जनतेला नदीवर अतिक्रमण न करण्याचा संदेशही या घाटांद्वारे दिला जात असे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता पडू नये.
7. तलावांची व जलसाठ्यांची पापपुण्याशी सांगड घालून तलाव निर्मितीची कामे आपल्याच देशात होवू शकतात. आपल्या राजवटीत किती तलावांची निर्मिती केली हे सांगतांना राज्यकर्त्यांचा उर समाधानाने भरून येत असे.
8. उन्हाळ्याचे दिवसात पांथस्थांना रस्त्यावर थंड पाण्याच्या सोयी पाणपोईद्वारे उपलब्ध करून दिल्याची अगणित उदाहरण देता येतील.
या परंपरागत जल व्यवस्थापनाचे पुनर्प्रयोग शक्य होतील ?
पूर्वीचे काळी जल व्यवस्थापनाचे भारतात जे विविध प्रयोग झालेत ते त्या स्वरूपात पुन्हा घडवून आणता येतील काय हा खरा प्रश्न आहे. आज पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. समाज स्वार्थी बनला आहे, नितीतत्त्वांत अमूलाग्र बदल झाला आहे, पाण्याच्या वापरात नवनवीन हिस्सेकरी निर्माण झाले आहेत, पाणी प्रश्नाचे स्वरूप अधिक व्यापक बनत चालले आहे, सरकारसारखा एक नवीन दमदार खेळाडू मैदानात उतरला आहे, सामाजिक प्रश्नाबाबत एक औदासिन्य दाटत चालले आहे. पाणी ही सामाजिक वस्तु न राहता त्याची वाटचाल आर्थिक वस्तु होण्याचे दृष्टीने चालू आहे, पाण्याचे राजकारण व व्यापारीकरण होतांना दिसत आहे. ते आर्थिक विकासाचे एक महत्त्वाचे संसांधन बनत चालले आहे. अशा परिस्थितीत या पारंपारिक जल व्यवस्थापनाची पुनरावृत्ती (Replication) करणे जवळपास अशक्य झालेले आहे. त्यामुळे पारंपारिक जल व्यवस्थापनाचा अभ्यास फक्त अभ्यासासाठी अभ्यास राहिला आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.
डॉ. द्त्ता देशकर, औरंगाबाद
Path Alias
/articles/adhaunaika-vayavasathaapana-saasataraacayaa-darsataikaonaatauuna-paaranpaaraika
Post By: Hindi