17 व्या सिंचन परिषदेच्या शिफारशी


दिनांक २० व २१ फेब्रुवारी २०१६ ला जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र चिंचोली मोराची, तालुका शिरूर, जिल्हा पुणे या ठिकाणी १७ वी महाराष्ट्र सिंचन परिषद संपन्न झाली. अवर्षण प्रवण क्षेत्राचा विकास घडवून आणण्यामध्ये नेमक्या कोणत्या घटकांना महत्व देण्याची गरज आहे हा विषय डोळ्यापुढे ठेवून अनेक अनुभवी आणि प्रयोगशील शेतकर्‍यांच्या सहभागातून आठ वेगवेगळ्या सत्रातून विचार मंथन घडवून आणण्यात आले. राज्याच्या वेगवेगळ्या भागातून जवळपास हजार एक शेतकर्‍यांची उपस्थिती परिषदेमध्ये लाभली. आधुनिक शेती, हवामानाला अनुकूल पीक पध्दती, विक्री व्यवस्था, रोजगार निर्मिती, कृषी पर्यटन, सिंचन प्रकल्पाचे सान्निध्य इ. अऩेक महत्वाच्या घटकांचे योगदान अवर्षण प्रवण क्षेत्राच्या विकासामध्ये कसे महत्वाचे आहे या विषयावर संवाद झाला. या दोन दिवसाच्या परिषदेमध्ये शेतकर्‍यांना मुक्तपणे कृषी आधारित विकसित पर्यटन केंद्राच्या वेगवेगळ्या घटकांचे अवलोकन करता आले आणि या बरोबरच कामिनी नाला पाणलोट क्षेत्र विकासाची यशोगाथा पण अभ्यासता आली. चिंचोली मोराची या ठिकाणी विकसित झालेले पर्यटन केंद्र जवळ जवळ २५ एकरावरील हलक्या व माळरान प्रदेशावर वसलेले आहे.

दोन दिवसाच्या या चर्चेतून जो संदेश वा सार पुढे आले तो संक्षिप्तपणे खालील प्रमाणे मांडण्यात आले आहे.

१. आधुनिक व संरक्षित शेती तंत्राच्या (पॉलीटनेल) आधाराने दररोज, दरमहिना हातात पैसे देणारी (भाजीपाला इ.ची) शेती करा.

२. केवळ सिंचनाच्या पाण्याचा विचार न करता शेतीचे पाणी, नागरी व उद्योगाचे पाणी व पाण्याचा फेरवापर इ.तून पाण्याच्या वापराचा समन्विक विचार करा.

३. कमी पाण्यातून उत्पादकता वाढविणे हे उद्दिष्ट ठेवून शेती करा.

४. एक संरक्षित पाणी, उत्पादनात मोठी भर घालते म्हणून बारमाही सिंचनाऐवजी संरक्षित सिंचनावर भर द्या.

५. गावावर वेधशाळा बसवा. प्रत्येक कारखाना परिसरात पण वेधशाळा बसवा आणि हवामानाचा वेध घेवून होणारे नुकसान टाळा.

६. अवर्षण प्रवण प्रदेशात विंधन विहीरीवर बंधन घालून भूजालाचे संरक्षण करा.

७. दूरगामी (१५ वर्षे) विचार करता सौरपंप हा शेतीसाठी फायदेशीर उपाय राहणार आहे. म्हणून त्याचा वापर वाढवा.

८. महाराष्ट्राच्या अवर्षण प्रवण प्रदेशात (सांगोला) पाणलोट क्षेत्राच्या व्याख्येत न बसणारे (सपाट) क्षेत्र आहे, त्याच्या विकासासाठी वेगळा विचार करा.

९. विज्ञानाधारित, व्यवहार व व्यवस्थापन जाणून कुटुंबातील हुशार मुलाने जर शेती केली, तर शेतीला चांगले दिवस येतील.

१०. केवळ पाणी वाचविणे हे उद्दिष्ट ठेवून सिंचन तंत्राचा वापर न करता, जास्तीत जास्त अन्नद्रव्ये पिकाच्या, झाडाच्या आत पोहोचविणे हा हेतू ठेवून सिंचन करा.

११. अवर्षण प्रवण भागात पाणी वापराच्या आधुनिक तंत्राची व शेती उत्पादनाचे टिकावू पदार्थात रूपांतरण करून त्याचे मार्केटींग करण्याच्या कौशल्याची वानवा आहे. यावर मात करण्याची गरज आहे.

१२. तुरीची रोपे तयार करून, विद्राव्य खते व ठिबक सिंचनाचा वापर करून तुरीची छाटणी करून एकरी २५ ते ३० क्विंटल उत्पादन मिळवा.

१३. भू संपादन टाळण्यासाठी आणि पाण्याचा र्‍हास कमी करण्यासाठी सिंचनासाठी बंद पाईपची वितरण व्यवस्था बसवा.

१४. अवर्षण प्रवण प्रदेशात ड्रॅगन फ्रूट व शिंदीचे पीक लावून प्रती एकरी भरघोस (रूपये कोटींमध्ये) उत्पन्न मिळवा.१५. राज्यामध्ये कापसाखालील व ऊसाखालील क्षेत्र कमी करा, तुरीचे क्षेत्र वाढवा व अधिक उत्पन्न मिळवा.

१६. कृषी पर्यटन हे सेवाक्षेत्र ( Service industry) आहे. या क्षेत्रात स्थानिक रोजगार निर्माण करून शहराकडे होणारे स्थलांतर थांबविण्याची क्षमता आहे म्हणून अवर्षण प्रवण भागासाठी कृषी पर्यटन हा शेतीसाठी जोडधंदा म्हणून वाढवा.

१७. शेती ही निसर्गावर अवलंबून आहे व निर्सग बिन भरवशाचा आहे. म्हणून अवर्षण प्रवण प्रदेशात उद्योग व सेवा क्षेत्राची निर्मिती करून रोजगार निर्माण करावा. त्यासाठी लोक दबाव वाढवावा. ग्रामीण भागाच्या विकासासाठी उद्योग व सेवा क्षेत्राचा विकेंद्रीत पध्दतीने विकास करावा.

१८. कृषी पर्यटनाला इतर अनेक सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, आर्थिक स्वच्छतेला नजरेआड करू नका.

१९. कालव्याच्या अस्तरीकरणातून, पाणी वापर संस्थेच्या निर्मितीतून व सूक्ष्म सिंचनाचा अंगीकार करून चासकमान सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्राचा विस्तार करावा. (१.५ लक्ष हेक्टर) व मोठ्या संख्येतील शेतकर्‍यांना पाणी उपलब्ध करावे आणि उत्पादनात भर घालावी.

२०. सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील मोडकळीस आलेल्या वसाहतीतील इमारती व जागेचा पर्यायी वापर करावा. अन्यथा शासकीय मालमत्तेचा दुरूपयोग होईल.

२१. हैड्रोपोनिक्सच्या (Soil less agriculture) तंत्राचा वापर करून कमीत कमी पाण्यात हिरवा चारा तयार करून पशुधन वाचवा व दुग्ध व्यवसाय वाढवा.

२२. विशिष्ट प्रकारच्या वनस्पतीचा (Eco - STPS, root zone technology) वापर करून बिगर शेती क्षेत्रातील सांडपाणी स्वच्छ करून त्याचा उपयोग शेती, उद्योग इ. साठी पुनर्वापर करा.

२३. शेतकर्‍यांनी आपल्या उत्पादनाचे ब्रँडींग करून विक्रीची व्यवस्था बसवावी.

२४. शेतकर्‍यांवर देशाच्या रोजगार निर्मितीचे ओझे टाकू नका.

२५. केवळ पाणी संधारण करण्यावर भर देवून भागणार नाही. पाणी जपून व विवेकाने वापरणे हे पण महत्वाचे आहे.

२६. संघटीत होवून, बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी रोजगार निर्मिती करा.

२७. गीर जातीच्या देशी गायीचे पालन करा. जर्सी गायीचा आग्रह सोडा.

२८. शेतीसाठी संगणकाचा वापर करा.

२९. शेतीसाठी वापरावयाचे तंत्रज्ञान सोपे असावे.

३०. शेतीमध्ये कोणत्याही निविष्टांच्या (सेंद्रीय खते इ.) तंत्रज्ञानाच्या वापराचा अतिरेक करू नका.

३१. जगामध्ये कृतज्ञ लोक कमी आहेत आणि कृतघ्न लोक जास्त आहेत. दुभत्या गायी, म्हशीवर ऑक्सिटॉक्सिन इंजेक्शनचा वापर केल्यामुळे दुधाचे उत्पादन वाढते पण यामुळे दुधात विष येते व आरोग्यावर याचा दुष्परिणाम होतो. युरिया या खताचा अतिवापर केल्यामुळे जमीनी खराब झाल्या. कृतघ्न लोकांकडून फसवणूक होते म्हणून सावध रहावे.

डॉ. दि. मा. मोरे, पुणे, मो : ०९४२२७७६६७०

Path Alias

/articles/17-vayaa-saincana-paraisadaecayaa-saiphaarasai

Post By: Hindi
×